जंतुवैद्यक  शास्त्राची मुहूर्तमेढ

डॉ. जयदेव पंचवाघ
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022

मेंदूचा शोध

सूक्ष्मजंतूंमुळे आजार होतात, हे नेमके माणसाला कधी आणि कसे कळले याची अत्यंत रोचक कहाणी आहे. या शोधांमुळे मागील शतकात मेंदू व मज्जारज्जूच्या शस्त्रक्रिया शक्य झाल्या. वर्ष १९०० नंतर (विसाव्या शतकात) जंतुविज्ञान शास्त्र वेगाने प्रगत होत गेले. जंतुविज्ञान शास्त्राची मुहूर्तमेढ मात्र १८५० ते १९०० या पन्नास वर्षांत घडलेल्या अत्यंत अद्‍भुत घटनांमुळे रोवली गेली. 

कोविड १९च्या व्हायरसने गेली दोन वर्षे सगळ्या जगात धुमाकूळ घातला आहे. सूक्ष्मजीव शास्त्रातील गेल्या दोनशे वर्षांच्या प्रगतीमुळे निदान ही साथ कशामुळे आली आहे, हे तरी आपल्याला समजून त्यावर उपाय योजना करणे शक्य होत आहे. 

सूक्ष्मजंतूंमुळे आजार होतात, हे नेमके माणसाला कधी आणि कसे कळले याची अत्यंत रोचक कहाणी आहे. या शोधांमुळे मागील शतकात मेंदू व मज्जारज्जूच्या शस्त्रक्रिया शक्य झाल्या. मेंदू आणि मज्जारज्जूला होणारा जंतुसंसर्ग (मेनिन्जायटिस) बरा करण्यासाठी प्रथम तो कशामुळे झाला आहे हे शोधून काढणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे शरीरातील फक्त मेंदूची नव्हे, तर सर्वच शस्त्रक्रिया या निर्जंतुकीकरण केलेल्या वातावरणातच कराव्या लागतात. ही गोष्ट आता आपण गृहीत धरून चालतो.

इसवी सनापूर्वी साधारण चारशे वर्षांपूर्वी हिप्पॉक्रेटस हा प्रसिद्ध डॉक्टर होऊन गेला. त्याच्या काळी गावागावात पसरणाऱ्या रोगांच्या साथी या ‘दूषित हवे’मुळे पसरतात असे गृहीतक त्याने मांडले. या ‘दूषित हवे’ला ‘मिआझमा’ असे म्हटले जायचे.  इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्या काळातला दुसरा प्रसिद्ध डॉक्टर गॅलनने हा विचार योग्य आहे असे पुन्हा प्रतिपादन केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा सिद्धांत अगदी १८५०पर्यंत प्रचलित होता. दुसऱ्या बाजूला, गेल्या चारशे वर्षांपासून अधिक चांगले सूक्ष्मदर्शक यंत्र (मायक्रोस्कोप) तयार करण्याच्या प्रक्रियेला जोर आला आणि त्यामुळे सूक्ष्मजीवसृष्टीचे एक मोठे दालन उघडले. सन १६६५ ते १६८३ या वर्षांमध्ये प्रथम रॉबर्ट हूक याने बुरशीची सूक्ष्म रचना आणि त्यानंतर लुवेनहोक याने पाण्यातील एकपेशीय जंतू सूक्ष्मदर्शक यंत्राखाली बघितले.

मात्र त्याचा यानंतरच्या लगेचच्या काळात वैद्यकीय जगतावर फार परिणाम झालेला दिसत नाही. एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला म्हणजे साधारण १८४५नंतर युरोपमध्ये कॉलराच्या साथी आल्या. १८५०च्या दशकातल्या या साथी एशियाटिक कॉलरा या नावाने ओळखल्या जातात. विशेषतः लंडन व पॅरिस या दोन गावात या साथीने भरपूर बळी घेतले. मात्र त्याआधी जवळजवळ पावणे दोनशे वर्षांपूर्वी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली काही प्रकारचे जंतू दिसूनसुद्धा १८५०मध्ये ही साथ दूषित हवेमुळेच पसरते आहे, अशी युरोपमधील डॉक्टरांची पक्की धारणा होती.

या काळात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यातली पहिली घटना अशासाठी महत्त्वाची आहे, की या आजाराच्या व्यक्तींमध्ये जंतूंचा प्रादुर्भाव असतो हे प्रयोगाने सिद्ध करूनसुद्धा अनेक वर्षांच्या मतप्रवाहाच्या आग्रहामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

कॉलराची ही साथ १८५४मध्ये युरोपमधल्या विविध गावांमधून पसरत पसरत इटलीमधील फ्लोरेन्स येथे पोचली. इतर गावांप्रमाणेच फ्लोरेन्समध्येसुद्धा अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक कुटुंबांची वाताहत झाली. फ्लोरेन्समधल्या फिलीप्पो पॅचिनी या डॉक्टरने या साथीचा खोलवर अभ्यास केला. कॉलरामुळे मरण पावलेल्या व्यक्तींचे शवविच्छेदन करून त्याने त्यांच्या आतड्याचे विविध भाग सूक्ष्मदर्शक यंत्राखाली अभ्यासले. त्यात त्याला सूक्ष्मजंतू अगदी स्पष्टपणे दिसले. हे जंतू अत्यंत वेगाने वळवळ करताना त्याने पाहिले आणि म्हणून त्या जंतूंना त्याने ‘व्हीब्रीओ कॉलरी’ असे नाव दिले (Vibrio - वेगाने ‘व्हायब्रेट’ होणारे).

ज्या अर्थी हे जंतू कॉलरा झालेल्या रुग्णांच्या आतड्यात अत्यंत मोठ्या प्रमाणात दिसतात, त्याअर्थी या जंतूंमुळे हा आजार होत असणार हे त्याने स्पष्टपणे नमूद केले. कॉलरामध्ये जे तांदळाच्या पेजेतील पाण्याच्या रंगाचे जुलाब होतात त्यातून हे जंतू पसरत असणार, हा निष्कर्ष खरेतर ओघानेच निघायला हवा होता! पण इटलीमधल्या त्यावेळच्या सर्व डॉक्टरांनी या पुराव्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ या न्यायाने जुन्या काळच्या ‘दूषित हवे’च्या सिद्धांताचाच आधार घेतला. जुन्या मतप्रवाहाच्या विपरीत असलेली गोष्ट शास्त्रीय पुराव्यानिशी सिद्ध करूनसुद्धा कशी दुर्लक्षिली जाते, याचे हे काही एकच उदाहरण नाही.

सूक्ष्मजीवशास्त्र व जंतू-विज्ञान शास्त्र या दोन्ही शाखांमध्ये अत्यंत संस्मरणीय ठरलेली अत्यंत महत्त्वाची दुसरी घटना याच वर्षी, म्हणजे १८५४मध्ये लंडनमध्ये घडली. कॉलराची साथ ही ‘मिआझमा’ म्हणजेच दूषित झालेल्या हवेमुळे पसरते हे फ्लॉरेन्सप्रमाणेच लंडनमध्येसुद्धा गृहीत धरलेले होते. ही हवा विशेषतः गावाच्या बाहेरील माळरानांवरून कुजलेले गवत आणि मैल्यामुळे दूषित होऊन रात्रीच्यावेळी गावात पसरते असा समज होता. त्यामुळे याला ‘नाईट एअर’ असे म्हटले जायचे. या नाईट-एअरमुळे आपल्याला कॉलरा होऊ नये म्हणून लोक रात्री घरात दारे-खिडक्या बंद करून कुबट हवामानात झोपायची. पुन्हा सांगतो... ही गोष्ट १८५४ मधील आहे! फार पुरातन नाही!!

जॉन स्नो या अत्यंत तल्लख बुद्धिमत्तेच्या लंडनमधल्या डॉक्टरचा मात्र या गोष्टीवर मुळीच विश्वास नव्हता. ही साथ हवेमधून पसरणे शक्य नाही हे सूक्ष्म निरीक्षणानंतर त्याच्या लक्षात आले होते. ही साथ पिण्याच्या पाण्यातून पसरत असावी असे त्याला निश्‍चितपणे वाटत होते. अर्थातच पॅचिनीप्रमाणेच त्याच्यावरही कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हते. तेव्हा त्याने एक प्रयोग केला. आजही साथीच्या रोगांच्या शास्त्रात तो मूलभूत मानला जातो. त्याने लंडनचा नकाशा घेतला. त्याकाळी प्रत्येक रस्त्यावर पाणी उपसायचे लोखंडी पंप असायचे. या पंपातून जमिनीतील पाणी वर ओढून घराघरात पिण्यासाठी वापरले जायचे. जॉन स्नोने लंडनच्या नकाशावर प्रत्येक पाणी उपसायच्या पंपाच्या जागेची प्रत्येक रस्त्यागणित अचूक नोंद केली. त्याच्या लक्षात आले की ब्रॉड-स्ट्रीट या रस्त्यावर जो पाण्याचा पंप होता, त्याच्या आजूबाजूच्या वस्तीमध्ये कॉलराची साथ अत्यंत मोठ्या प्रमाणात पसरलेली होती. म्हणजेच ज्या घरात या पंपातून उपसलेले पाणी वापरले जायचे त्या घरात कॉलरा होत होता. अर्थातच कॉलरा पाण्यातून पसरतो या त्याच्या गृहीतकाला शंभर टक्के पुरावाच मिळाला. एवढे होऊनसुद्धा जेव्हा प्रशासन हालचाल करेना, तेव्हा जॉन स्नोने स्वतः जाऊन त्या पंपाचे हॅण्डलच काढून टाकले आणि अक्षरशः काही दिवसांतच साथ आटोक्यात आली.

पण या प्रयोगातून कॉलराला कारणीभूत असणारा घटक पाण्यातून पसरतो एवढेच लक्षात आले होते. जंतूंमुळे कॉलरा होतो आणि हे जंतू विशिष्ट प्रकारचे असतात हे मात्र सिद्ध झाले नव्हते. खरेतर आधी लिहिल्याप्रमाणे फिलीप्पो पॅचिनीने ते त्याच काळात दाखवूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष झाले होते.

यानंतरचा पुढच्या चाळीस वर्षांचा काळ सूक्ष्मजीवशास्त्राच्या दृष्टीने देदीप्यमान ठरला आणि जंतुविज्ञान शास्त्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. १८६४मध्ये लुई पाश्चर स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर होणाऱ्या जंतूसंसर्गाविषयी संशोधन करत होता. त्या काळात या आजाराने अनेक स्त्रिया मृत्युमुखी पडत. त्यांच्या रक्ताची चाचणी करत असताना त्याला त्यात असंख्य वळवळणारे सूक्ष्मजीव दिसले. हे निरीक्षण त्याने नमूद करून ठेवले आहे.

रॉबर्ट कॉख या जर्मन डॉक्टर-शास्त्रज्ञाने १८७६मध्ये अँथ्रॅक्स या आजाराला कारणीभूत असलेल्या जिवाणूचा शोध लावला. ज्या गाईंना हा आजार झाला होता त्यांच्या रक्ताचे नमुने तपासून हा जिवाणू त्याने शोधला. एखादा आजार हा निश्चित अशा एका जिवाणूमुळे होतो हे जगात सर्वप्रथम सिद्ध झाले, आणि त्यानंतरच वैद्यकीय जगतावर घट्ट पगडा असलेली मिआझमा किंवा दूषित हवेची संकल्पना नष्ट झाली. जग मिआझमा सिद्धांताकडून जंतू विज्ञानाच्या सिद्धांताकडे वळले. रॉबर्ट कॉखने त्यानंतर क्षयरोगाच्या जिवाणूचा शोध लावला. रॉबर्ट कॉखच्या सन्मानार्थ क्षयरोगाच्या म्हणजेच ट्युबर्क्युलोसिसच्या जिवाणूला रॉबर्ट कोखचे नाव दिले गेले.

सन १८५४मध्ये घडलेल्या कॉलराच्या रामायणानंतर १८८४मध्ये  डॉक्टर रॉबर्ट कॉखने शेवटी कॉलराच्या जिवाणूचाही निश्चित शोध लावला. साधारण पन्नास वर्षांपूर्वी फिलीप्पो पॅचिनीच्या १८६४मधल्या संशोधनाला मानवंदना म्हणून कॉलराच्या जिवाणूचे त्याच्या नावे नामकरण करण्यात आले.

हे सर्व घडत असताना दुसऱ्या बाजूला रासायनिक जंतुनाशकांचा शोध लागण्याची प्रक्रियासुद्धा सुरू होती. १८३२मध्ये टारपासून कार्बोलिक अॅसिड (फिनॉल) तयार करण्यात आले. गावात किंवा गावाबाहेर गवत, पालापाचोळा आणि मैला कुजून व आंबून रोगराई पसरू नये म्हणून त्यात कार्बोलिक ॲसिड घालण्याची पद्धत सुरू झाली. जोसेफ लिस्टर या डॉक्टरला असे वाटले की कार्बोलिक ॲसिडने जर पालापाचोळा कुजून घाण वास येण्याची प्रक्रिया थांबत असेल, तर माणसाला झालेल्या जखमेची कुजण्याची प्रक्रियासुद्धा थांबू शकेल. या विचारांनी प्रेरित होऊन त्याने जखमांमधला कुजण्याचा व वास येण्याचा प्रकार थांबावा म्हणून त्यात कार्बोलिक ॲसिड टाकायला सुरुवात केली.

ता. १२ ऑगस्ट १८६५ रोजी एका तरुण मुलाला पायावरून घोडागाडीचे चाक गेल्यामुळे भली मोठी जखम व फ्रॅक्चर झाली. त्या काळात अशा प्रकारची जखम झाल्यास व्यक्ती क्वचितच वाचत असे, याचे कारण म्हणजे जवळजवळ निश्चितच होणारा जंतुसंसर्ग. जोसेफ लिस्टरने ही जखम कार्बोलिक ॲसिडने धुतली आणि तिला मलमपट्टी केली. आश्चर्य म्हणजे कुठलाही जंतुसंसर्ग न होता ती पूर्णपणे भरून आली. या शोधाचा परिणाम म्हणजे शस्त्रक्रियांमध्ये होणारा जंतुसंसर्ग कार्बोलिक ॲसिडच्या वापराने बहुतांश टळू लागला आणि त्यामुळे सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रियांना त्याचा फायदा झाला.

वर्ष १९००नंतर (विसाव्या शतकात) जंतुविज्ञान शास्त्र वेगाने प्रगत होत गेले. जंतुविज्ञान शास्त्राची मुहूर्तमेढ मात्र १८५० ते १९०० या पन्नास वर्षांत घडलेल्या अत्यंत अद्‍भुत घटनांमुळे रोवली गेली हे निश्चित.

(लेखक तज्ज्ञ न्यूरोसर्जन आहेत.)

संबंधित बातम्या