एमव्हीडी शस्त्रक्रियेची गुढी!

डॉ. जयदेव पंचवाघ
सोमवार, 28 मार्च 2022

मेंदूचा शोध

‘ट्रायजेमिनल न्यूराल्जियाची वेदना’ हा विषय गैरसमजुतींच्या गुंत्यात अनेक वर्षे अडकलेला आहे. त्याबद्दलच्या लोकप्रबोधनाचा प्रयत्न आम्ही गेली पंधरा वर्षे करतो आहोत. त्याचा उपयोगही होतो आहे, पण अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. या प्रयत्नांना आशीर्वादांचे बळ हवे आहे. 

‘मेंदूच्या अगदी खोलवरच्या ‘पॉन्स’ नावाच्या भागावर आम्ही न्यूरोमायक्रोस्कोपचा प्रखर झोत वळवला... चेहऱ्याच्या उजव्या भागातील संवेदना वाहून नेणारी ट्रायनेमिनल नस ज्या ठिकाणी मेंदूत प्रवेश करत होती, तो भाग दृष्टिक्षेपात आला. नसेच्या या भागावर एका मोठ्या रक्तवाहिनीचा तीव्र दाब येऊन ती एखाद्या चिंधीसारखी चपटी झाली होती. रक्तवाहिनी नसेच्या पोटात खोलवर रुतल्यामुळे ही ‘चिंधी’ विरून नसेचे तंतू विलग झाले होते. प्रत्येक मिनिटाला पंचाहत्तर-ऐंशी वेळा या रक्तवाहिनीची स्पंदने नसेवर आदळत होती. गेली अनेक वर्षं हा दाब वाढत जाऊन ही स्थिती आली होती...’

दुर्दैवाने ट्रायजेमिनल न्यूराल्जिया सेंटरमध्ये हे दृश्य आमच्यासाठी नवीन नाही, पण प्रत्येक वेळेला मला ते बघून तेवढीच उद्विग्नता येते. ही शस्त्रक्रिया काही वर्षांपूर्वी केली असती तर ही परिस्थिती आली नसती; रुग्णाला गेली अनेक वर्षे ही आत्यंतिक असह्य वेदना सहन करावी लागली नसती आणि मेंदू व संपूर्ण शरीर बधिर करणारी औषधे घ्यावी लागली नसती. या शस्त्रक्रियेला केवळ योग्य माहितीच्या अभावाने आजच्या काळातही उशीर व्हावा, हे त्या उद्विग्नतेचे कारण! 

लेखाच्या सुरुवातीला ज्या शस्त्रक्रियेविषयी मी लिहिले आहे, त्या निवेदिता भटनागरच्या (नाव बदलले आहे) न्यूराल्जियाच्या अनुभवात या आजाराविषयीची महत्त्वाची माहिती दडलेली आहे. निवेदिता ही दिल्लीमधली अत्यंत कार्यक्षम आर्किटेक्ट. ती टी. एन. (ट्रायनेमिनल न्यूराल्जिया) सेंटरला पहिल्यांदा आली, तेव्हा फक्त खुणेनेच बोलू शकत होती, कारण बोलण्यासाठी तोंड जरी उघडले तरी तिची उजव्या बाजूची हिरडी, गाल आणि डोळ्यात विजेसारखी कळ पसरायची.

एमव्हीडी शस्त्रक्रियेने हा आजार बरा झाल्यावर एक वर्षाने ती दिल्लीहून आली, तेव्हा तिने तिचा अनुभव विस्तृतपणे सांगितला. निवेदिता मुळातच संवेदनाक्षम असल्यामुळे तिच्या आजाराचा प्रकार, त्यामुळे अनेक वर्षे व्यक्तिमत्त्वात झालेला बदल, विविध उपाय करून परत-परत असह्य वेदना कायम राहिल्यामुळे येणारी मानसिक विफलता आणि विविध औषधांचे शरीरावर झालेले दुष्परिणाम वगैरे पैलूंचा सखोल विचार तिने केला होता. त्याचप्रमाणे हा आजार शस्त्रक्रियेने बरा होऊ शकतो आणि या आजारावर जनजागृती आणि उपचार करणारे केंद्र भारतात उपलब्ध आहे, ही माहिती अनेक वर्षे न कळाल्याचा विषादसुद्धा तिच्या अनुभवात दिसला.

तिच्या कथनाचा सारांश असा... ‘‘डॉक्टर, जानेवारी २००४मध्ये खरंतर या आजाराची सुरुवात झाली. उजव्या बाजूच्या वरच्या हिरडीतून अचानक तीव्र कळ सुरू होऊन ती उजव्या गालात पसरायची. पुढच्या एक-दोन महिन्यात ती उजवा डोळा व उजव्या बाजूच्या कपाळातसुद्धा पसरू लागली. ही वेदना अचानक इलेक्ट्रिकचा शॉक बसावा तशी असायची. दात घासताना, उजव्या बाजूच्या हिरडीला ब्रशचा स्पर्श झाला किंवा अन्न चावताना त्या ठिकाणी घास लागल्यास ही वेदना उमटायची. नंतर नंतर तर तोंड धुताना उजव्या गालाला हाताचा स्पर्श झाला, तोंड पुसताना टॉवेलचा स्पर्श झाला किंवा गाडीतून जाताना वाऱ्याचा झोत उजव्या गालावर किंवा कपाळावर आला तरीसुद्धा जीवघेणी असह्य कळ यायची.

सुरुवातीच्या काळात हा दाताचा त्रास असेल, म्हणून डेंटिस्टना दाखवलं. उजव्या बाजूच्या वरच्या दाढेचं रूट कॅनॉल केलं. पण दुखण्याची तीव्रता वाढत गेली. दिवसातून वरचेवर कळा येऊ लागल्या. दुसऱ्या एका डॉक्टरांनी हा नसेचा आजार असल्याचं निदान केलं. काही औषध सुरू केली. या औषधांमध्ये ‘कारबामॅझेपिन’ हा घटक होता. त्याने गोळीचा परिणाम असेपर्यंत दुखणं थांबायचं. पण त्या औषधानं मला गुंगी येत असे, गोष्टी विसरायला होत आणि जशी औषधाची मात्रा वाढत गेली तसा चालताना तोलसुद्धा जायला लागला. औषधं नेमकी काय करतात याबद्दल मी थोडं संशोधन केलं आणि माझ्या लक्षात आलं, की ही औषधं नसांची आणि मेंदूची संवेदनशीलता कमी करतात. संपूर्ण चेतासंस्थेलाच  बधीर करतात. म्हणजे पूर्वीच्या काळी वेदनेच्या आजारांनी त्रस्त झालेले लोक दारू पिऊन मेंदू बधिर करून घ्यायचे तसंच थोडसं नाही का? मला समजत नव्हतं की जर हा आजार एका नसेच्या बिघाडामुळे होतो आहे, तर संपूर्ण मज्जासंस्थेला बधिर करणाऱ्या औषधांचा मारा मी स्वतःवर का करते आहे? आपल्या शरीरात अब्जावधी नसा आहेत. या सर्वच भागांना ही औषध बधीर करतात, मग याचे दुष्परिणाम होणार नाहीत का? माझा हा तर्क खरा होता. अति झोप येणे, चालताना चक्कर येणे, तोल जाणे असे त्रास सुरू झाले. २००९मध्ये मी कामानिमित्त आधी पॅरिस आणि नंतर लंडनला गेले. थंडीत हा त्रास वाढला. तिथल्या डॉक्टरांनी औषधांची मात्रा वाढवली आणि अर्थातच दुष्परिणाम आणखी वाढले...

या वेदनेचा आणखी एक परिणाम असा होतो, की व्यक्ती कायमच एका प्रकारच्या घाबरलेल्या अवस्थेत राहू लागते. ‘मला अचानक कळ तर येणार नाही ना?’ ही टांगती तलवार दिवस-रात्र साथ करत राहते. त्यामुळे हळूहळू सामाजिक सहभागही कमी होत जातो. संपूर्ण आयुष्यच चेहऱ्याच्या वेदनेभोवती फिरू लागतं. या आजारावर इतर काही उपाय आहेत का याचा शोध घेणं मी सुरू केलं. माझ्या असं लक्षात आलं की अगदी पूर्वीच्या काळापासून चेहऱ्याच्या दुखऱ्‍या भागाला लाल तिखट चोळण्यापासून, इलेक्ट्रिक करंटने ही नस जाळणे (रेडिओफ्रिक्वेन्सी), नसेमध्ये अल्कोहोल टोचून ती थोडीफार बधिर करणे आणि आजच्या काळात रेडिएशन थेरपीने नसेचा भाग जाळणे असे नानाविध प्रकार यासाठी करण्यात आलेले आहेत. पण यापैकी कुठलीच उपाययोजना आजाराचं मूळ कारण दूर करताना दिसत नाही. किंबहुना माझ्या असं लक्षात आलं की आजाराचं मूळ कारण दूर करता येतं, हेच बहुसंख्य रुग्णांना आणि डॉक्टरांनासुद्धा तितकंसं माहीत नाही. या संशोधनादरम्यान भारतातच पुणे येथे असलेल्या ट्रायजेमिनल न्यूराल्जिया या आजाराला वाहून घेतलेल्या संशोधन आणि उपचार केंद्राविषयी मला माहिती मिळाली. एमव्हीडी शस्त्रक्रिया हा आजार मुळापासून दूर करू शकते, हे इथं प्रथम मला आत्मविश्वासानं सांगण्यात आलं, आणि शस्त्रक्रियेनं माझं दुखणं पूर्ण नाहीसं झालं. मुख्य म्हणजे अनेक प्रकारचे दुष्परिणाम करणारी औषधं बंद झाली आणि ‘मला परत कळ येईल की काय?’ ही जवळ जवळ माझी कायमच साथ करणारी भावना दूर झाली.’’

निवेदिताचा अनुभव अत्यंत बोलका आहे. या आजारात व्यक्तीच्या चेहऱ्याच्या एकाच बाजूला असह्य वेदना सुरू होतात. इलेक्ट्रिकचा शॉक बसल्याप्रमाणे, अचानक तीक्ष्ण हत्याराने या भागात टोचल्याप्रमाणे, डोळ्यात-गालावर तांबडी पूड टाकल्याप्रमाणे, चेहऱ्याच्या त्या भागात आगीचा डोंब उसळल्याप्रमाणे, असंख्य सुया त्या भागात टोचल्याप्रमाणे... अशा अनेकविध शब्दप्रयोगांनी रुग्ण या वेदनेचे वर्णन करतात. ही वेदना एका बाजूची हिरडी, गाल, कपाळ, हनुवटी, नाकपुडी यापैकी एका भागात सुरू होते. अचानक सुरू झालेली ही तीव्र कळ काही सेकंद ते काही मिनिटे टिकते व परत कमी होते. काही वेळाने असाच प्रकार परत परत घडत राहतो. हिरडीच्या, चेहऱ्याच्या, नाकपुडीच्या, गालाच्या किंवा कपाळाच्या एखाद्या भागाला हाताचा, टॉवेलचा स्पर्श झाल्यास दात घासण्याच्या ब्रशचा स्पर्श झाल्यास, अन्न चावताना, पाण्याचा गुळणा करताना, थंड हवेचा झोत-वारा त्या भागाला लागल्यावर ही वेदना अचानक उद्‍भवते. जसे दिवस जातील तशी वेदनेची तीव्रता व व्याप्ती वाढत जाते. या वेदनेचं वर्णन अनेक रुग्णांनी ‘शत्रूलासुद्धा होऊ नये अशी वेदना,’ ‘मानवाला ज्ञात असणारी सर्वात असह्य वेदना’... अशा विविध प्रकारांनी केलेलं आहे. असं असून अनेक वेळेला या वेदनेचं योग्य निदान होत नाही, उपचार पद्धतींची माहिती नीट मिळत नाही असा जगभरचा अनुभव!

हा आजार असलेल्या बहुसंख्य रुग्णांमध्ये ट्रायजेमिनल नस मेंदूमध्ये जिथे प्रवेश करते, त्या भागावर रक्त वाहिनीची स्पंदने आपटत असतात. जसे दिवस, आठवडे, महिने, वर्ष जातील तशी या रक्तवाहिनीची लांबी वाढत जाते आणि उत्तरोत्तर ती नसेच्या हळव्या भागामध्ये रुतत जाते. यामुळे वेदनेची तीव्रता वाढत जाते. नसेवरचा दाब वाढण्याच्या या काळामध्ये औषधांच्या वाढत्या मात्रा घेऊन किंवा नसेचा भाग जाळून नष्ट करण्यासारखे बाह्य उपचार करून, वाढत जाणाऱ्या या आजाराची प्रक्रिया थांबत नाही, ही गोष्ट नीट आणि पूर्ण कळेपर्यंत समजावून घेतली पाहिजे. काळानुसार रक्तवाहिनीचे नसेमध्ये रुतत जाणे कसे घडत जाते हे सोबतच्या मेंदूच्या अंतर्भागातील चित्रांद्वारे दाखवले आहे.

सन १९६०च्या दशकात अमेरिकेमध्ये पीटर जेनाटा या न्यूरोसर्जनने या आजाराचे मूळ कारण दूर करणारी एमव्हीडी (मायक्रो - व्हॅस्क्युलर - डीकॉम्प्रेशन) ही शस्त्रक्रिया शोधून काढली. अर्थात हा शोध त्या आधीच्या अनेक लोकांच्या संशोधनावर आधारित होता. ट्रायजेमिनल नसेवर दाब आणणारी रक्तवाहिनी या नाजूक शस्त्रक्रियेत न्यूरोमायक्रोस्कोपच्या साहाय्याने अलग करण्यात येते. ती परत त्या नसेत घुसू नये म्हणून टेफ्लॉन या पदार्थाच्या कापसाने ती गुंडाळून ठेवण्यात येते. असह्य आणि आत्महत्या प्रेरक अशा तीव्र वेदनेतून या व्यक्तींची मुक्तता करण्याची गुढी पीटर जेनाटांनी १९६०च्या दशकात उभारली. या कार्यापासून प्रेरणा घेऊन गेली पंधरा वर्षे पुण्यात याचे केंद्र कार्यान्वित आहे. हा आजार दूर करण्याचा वसा घेतलेले केंद्र अमेरिका आणि जपानमधील काही ठिकाणे वगळता अस्तित्वात असल्याचे माझ्या तरी माहितीत नाही. आज अनेकांच्या सकारात्मक सहभागाची या केंद्राला गरज आहे.

पीटर जेनाटांनी उभारलेल्या गुढीला तोरण बांधून या व्यक्तींच्या आयुष्यातील वेदना संपवण्याचा संकल्प दृढ करण्यासाठी गुढीपाडव्यापेक्षा अधिक चांगला दिवस कुठला असेल...

संबंधित बातम्या