उद्यान विद्येचा उगम

डॉ. कांचनगंगा गंधे, ओंकार गरुड
सोमवार, 17 जानेवारी 2022

उद्यानरंग 

भारतीय संस्कृतीत निसर्ग सौंदर्य, निसर्ग घटकांची उपयुक्तता, जोपासना, जपणूक यांचा अनोखा संगम आहे. शेती, वास्तुकला, शिल्प-चित्रकता, वेद, कादंबऱ्या, अर्थशास्त्र, नाट्य-महाकाव्य अशा अनेकांमधून विविध प्रकारात निसर्ग सौंदर्याची वर्णनं आहेत. त्यातूनच भारतीय उद्यानकलेचा विकास कसा होत गेला, कालानुरूप त्यात बदल कसे घडत गेले; त्याचबरोबर आत्ता अस्तित्वात असलेल्या उद्यानांचा इतिहास, वैशिष्ट्यं आणि मनाला भुरळ पाडणारं त्यातलं सौंदर्य मांडणारी ही लेखमाला.

साऱ्या सृष्टीचा कर्ता-करविता आणि ऊर्जेचा स्रोत म्हणजे सूर्य! साऱ्या चराचरांचं जीवन सूर्यावरच अवलंबून! सूर्याच्या ‘अमृत’ कणांचं स्वागत करून त्यात स्वतःतल्या ‘तेजरसा’ची जोड देऊन सौरऊर्जेचं रूपांतर अन्न ऊर्जेत करणं, त्याचा उपयोग स्वतःसाठी करणं आणि सृष्टीतल्या चराचरांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे अन्न-ऊर्जा देण्याचं ‘परोपकारी’ अन्‌ ‘अनमोल’ काम ‘अबोल’, ‘अचल’ वनस्पती करत असतात. 

जीवसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील वनस्पतींचं पहिलं रूप अगदीच वेगळं होतं! भोवतालच्या परिस्थितीशी मिळतं-जुळतं घेत त्यांनी स्वतःच अनेक बदल घडवून आणले आणि वनस्पतींच्या विविध जाती निर्माण झाल्या. प्राणी जगतातही उत्क्रांती झाली आणि माणूस जन्माला आला. अनेक ठिकाणी फिरून, जंगली प्राण्यांची शिकार करून तो स्वतःचं पोट भरायचा. हे ‘इंटरर्स’ ‘फर्टाइल क्रिसेन्ट’ (नाईल दरी, इस्राईल, उत्तर-पूर्व जॉर्डन, पूर्व सिरीया, लेबनॉन, दक्षिण-पश्चिम टर्की, टायग्रीस-युफ्रेटीस दऱ्या आणि पूर्व इराणचा भाग) या सुपीक भागात अनेक वर्षे राहिले! (ह्या वेळचा काळ अश्‍मयुगाच्या सुरुवातीचा काळ मानला जातो). उपजत असलेल्या कुतूहलापोटी निसर्गातल्या अनेक उपयुक्त वनस्पतींची, प्राण्यांची मानवाला महिती झाली. शिकारीसाठी भटकणाऱ्यांनी आता एके ठिकाणी राहून बिया, कंद वाढवायला सुरुवात केली. वनस्पतींमध्ये विशेषतः गवताच्या अनेक प्रकारांमध्ये ठरावीक ऋतूंत बिया तयार होतात आणि पुढील वर्षी ठरावीक वेळेसच त्या उगवतात इतपत ज्ञान त्यांना आलं होतं! त्यांनी गवताच्या बिया गोळा करून त्या रुजत घालायला सुरुवात केली. त्यात मुख्यत्वे करून आत्ताच्या गहू आणि बार्लीच्या जंगली बियांचा समावेश होता (हा काळ अश्‍मयुगाचा मधला काळ होता). असं म्हणतात की त्याचवेळेस उत्तर-पश्‍चिम भारतात आणि बर्मा मधले ‘हंटर गॅदरर्स’ कंदमुळं वाढवत होते. ‘हंटर गॅदरर्स’ एकत्र राहिल्यामुळे त्यांच्यात देवाण-घेवाण तर होतीच, निसर्गाबद्दलचं कुतूहलही होतं; हळूहळू ‘मानव-संस्कृती’ही उदयाला येत होती. बिया-कंद, आणि अनेक उपयुक्त वनस्पती त्यांनी राहत्या ठिकाणी, विशेषतः नदीच्या किनारी वाढवायला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर मोठ्या वृक्षांचं महत्त्वही त्यांना जाणवायला लागलं. त्यांची जपणूक, संवर्धन करणं हेही ज्ञान त्यांना निसर्ग सहवासातून होत होतं! 

निसर्गातलं सौंदर्य रंगीबेरंगी फुलाफळांनी खुलतं, हेही एव्हाना ‘हंटर गॅदरर्स’च्या लक्षात यायला लागलं होतं! अशा जंगली फुलांच्या बिया गोळा करून राहत्या ठिकाणच्या आजूबाजूला पेरून ती जागाही सुशोभित करायला त्यांनी सुरुवात केली. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आणि पुरातत्त्व संशोधनानुसार सिंधू नदीच्या काठची ‘सिंधू संस्कृती’ -मोहें-जो-दडो आणि हडप्पा संस्कृती ही सर्वात जुनी आणि त्या काळातली ‘प्रगत’ संस्कृती! मातीच्या भांड्यांवर कोरलेली पिंपळ, आंबा, कडुलिंब या वृक्षांची चित्रं बरंच काही सांगून जातात. अनेक ठिकाणी वड, पिंपळ या वृक्षांची पूजा करत असल्याचे पुरावेही सापडतात. 

शेतीसाठी लागणारी लाकडी मुठीची दगडी अवजारं; फुलझाडं, फळझाडं, उपयुक्त झाडं वाढवण्यासाठी योग्य आणि सुनियोजित जागेची, योग्य ऋतूची निवड करणं, पाण्याची व्यवस्था ठेवणं हे सिंध संस्कृतीचं वैशिष्ट्य! त्यातूनच भारतातल्या वेदकालीन आणि सध्याच्या ‘प्रगत’ उद्यानांचा उगम झाला असावा!

(डॉ. कांचनगंगा गंधे या वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. ओंकार गरुड हे लखनौ येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे वरिष्ठ उद्यान अधिकारी आहेत.)

संबंधित बातम्या