उद्यानांचे बीज...

डॉ. कांचनगंगा गंधे, ओंकार गरुड
सोमवार, 31 जानेवारी 2022

उद्यानरंग 

भारतीय संस्कृती जगातल्या सर्व संस्कृतींमध्ये श्रेष्ठ आहे. जगात आत्तापर्यंत अनेक संस्कृती उदयाला आल्या, बऱ्याच लोपही पावल्या; पण भारतीय संस्कृतीचे सौंदर्य, जादू आणि गारुड वेदकालापासून आत्तापर्यंत अजूनही आणि टिकून आहे. भारतीय संस्कृतीची जडणघडण, जोपासना निसर्गाच्या निकट सान्निध्यात झाली. मानव हे निसर्गाचे अपत्य आहे ही जाणीव आपल्या पूर्वसूरींना होती. मानवाच्या संरक्षणात, संभरणात, पोषणात निसर्गाचा पहिल्यापासूनच फार मोठा वाटे आहे, याची शहाणी जाणही पूर्वसूरींना, ऋषिमुनींनी होती. म्हणूनच आपल्या अवतीभोवतीच्या निसर्गाशी, सृष्टीशी, सृष्टीतल्या प्राणी, वनस्पतींशी भारतीय संस्कृतीने आपले नात सातत्याने आणि उत्कटतेने राखते आहे. 

निसर्गातल्या अनेक शक्तींना भारतीय संस्कृतीने देवतांचे स्थान दिले. निसर्ग नियम, सत्य, ऋतुचक्र, तत्त्वे, पंचमहाभूते आणि सजीवांची भूमिका, त्या प्रत्येकाचे वेगळेपण, त्यांचा परस्परांमध्ये असलेला संबंध हे सारे ऋषिमुनींनी योग, ध्यान, मनन, चिंतन, निरीक्षण शैलीमुळे प्राप्त झाले! सृष्टीत अद्‍भुत शक्ती असल्याचे त्यांना अनुभवातून जाणवले! त्यासाठी रानावनात, अरण्यात अनेक वर्षे त्यांनी केलेल्या कठोर तपसाधनेमुळे ती अरण्ये, वने पवित्र झाली. अशा या ‘तपोवना’त वनस्पती, प्राण्यांना अभय दिले गेले! ऋषिमुनींनी ‘पर्णकुटी’च्या भोवतालची जागा स्वच्छ करून त्यात विविध प्रकारची कंदमुळे, सात्त्विक आहारासाठी योग्य वनस्पती आणि तुळस, दुर्वांसारख्या छोट्या वनस्पती, गुळवेलासारख्या औषधी वनस्पतींची वाढ केली. घराभोवती उपयोगी पडणाऱ्या वनस्पतींची वाढ करण्याची आत्ताची कल्पना यातूनच आली असावी. तपोवनांमध्ये ऋषिमुनींशिवाय इतर कोणत्याही माणसाला प्रवेश नव्हता. सहाजिकच तिथल्या वनस्पती, प्राण्यांना आपोआपच अभय दिले मिळत होते! तपोवनांच्या आतल्या भागातल्या जंगलात महाकाय वृक्ष, वेली आणि वन्यप्राण्यांचा वावर असे. असे हे नैसर्गिक ‘महावन’ आणि ‘तपोवन’ म्हणजे ‘जैवविविधतेचे कोठार’ आणि आत्ताच्या काळातले ‘संरक्षित क्षेत्र - अभयारण्य’! 

ही नैसर्गिक वने अरण्यदेवतांना अर्पण केल्यामुळे तिथल्या प्राण्यांना, वनस्पतींना, वृक्षांना अभय मिळाले! तिथे असलेल्या सजीवांच्या अनेक जाती टिकून राहिल्या. हल्लीच्या काळातल्या ‘देवराया’ आणि ‘जीन बॅँक’ या संकल्पना यातूनच आल्या असे म्हटले तर वावगे न ठरावे! त्यावेळची नैसर्गिक जंगले बिया, फळे, चारा, लाकूड अशा अनेकांमुळे समृद्ध होती. वैदिक काळातही त्यांचा गरजेपुरता उपयोग माणूस करतच होता. जंगल संपत्तीचे हे ‘श्रीवन’ त्याकाळी ‘समृद्धी वनदेवता’ म्हणूनच पूजले जायचे! कदाचित यावरूनच आताची ‘ॲग्रोफॉरेस्ट्री’ ही कल्पना आली असावी. 

जंगलातल्या सजीवांची नैसर्गिकरीत्या झालेली जपणूक, सृष्टीतल्या अद्‍भुत शक्तीची अनुभूती, त्यातून आलेले आत्मज्ञान, अनुभवलेले निसर्ग सत्य, जीवनाविषयी श्रद्धा अशा प्रकारचे ज्ञान ऋषिमुनींनी चार वेदांमध्ये पद्य आणि गद्याच्या स्वरूपात संस्कृत भाषेत मांडले! ऋग्वेदात विविध देवदेवतांच्या प्रार्थना, स्तुती करणारी सूक्त आणि काही वनस्पतींचे उल्लेख विविध संदर्भात केले आहेत. यजुर्वेदात प्रार्थना, मंत्र, यज्ञात दिल्या जाणाऱ्या आहुतींचे मंत्र, यज्ञात ज्या वनस्पतींच्या लाकडाचा उपयोग ‘समिधा’ म्हणून करत असत त्यांचेही संदर्भ आहेत. सामवेदात यज्ञ विधीच्यावेळी तालासुरात गायन केलेल्या मंत्रांच्या विविध शैलींचा संग्रह आहे. अथर्ववेदात बुद्धी, शौर्य, युद्ध विजय, शत्रुनाश, आरोग्य, रोग निवारण, विवाह, गर्भाधान, नामकरण अशा अनेक गोष्टींविषयीचे ज्ञान नमूद केलेले आहे. अथर्ववेदात मूळ असलेला ‘आयुर्वेद’ हा एक उपवेद आहे. त्यात अनेक वनस्पतींचे औषधी गुणधर्म आणि त्यांचे मानवाच्या निकोप आरोग्यासाठीचे महत्त्व सांगितले आहे. कदाचित आत्ताच्या काळातली ‘औषधी वनस्पतींचे उद्यान’ ही संकल्पना तेव्हाच उदयाला आली असावी.

वेदपूर्व काळात आणि वेदातही उल्लेख केलेला ‘अश्वत्थ’ पवित्र आणि छाया देणाऱ्या वृक्षांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला आहे. हवा शुद्ध करण्याची क्षमता, औषधी उपयुक्तता आणि लाकडाचे विविध उपयोग यांचे संदर्भ सापडतात. अश्वत्थाला -पिंपळाला जमिनीलगतच्या मुळाजवळच्या खोडावर अनेक धुमारे फुटतात, त्यामुळेच अश्वत्थाला अंत नाही अशी श्रद्धा आहे. अश्वत्थाच्या कुळातल्या वड आणि औदुंबराचे उल्लेखही वेदांमध्ये आहेत. या वृक्षांबरोबरच इतर अनेक वनस्पतींचा उल्लेख तीन प्रकारात केला आहे. ‘वृक्ष’ (मोठी, उंच, महाकाय झाडे) - विशेषतः  छाया देणारी, प्राणवायूचा जास्त पुरवठा करणारी झाडे; ‘औषधी’ (माणसाला उपयोगी पडणाऱ्या औषधी वनस्पती) आणि ‘विरुष’ (इतर छोट्या मोठ्या वनस्पती). याशिवाय सुगंधी फुले देणाऱ्या वेली, वृक्ष, गवतांचे विविध प्रकार, जाती यांचे उल्लेख वेदांमध्ये आहेत. यावरून जैवविविधतेची संकल्पना आपल्याकडे पूर्वीपासूनच होती हे दिसते. 

वेदांमध्ये भांग, तुळस, चंदन, जाई आणि नीम (कडुलिंब) या पाच वनस्पतींचा उल्लेख प्रामुख्याने केला आहे. यातली प्रत्येक वनस्पती विशिष्ट गुणधर्माची ‘निदर्शक’ आहे. भांगेच्या सेवनाने नशा चढते, देहभान हरपते, अतिसेवनाने शरीराचा नाशच होतो. वैदिक काळात त्या वनस्पतीची अध्यात्म, चिंतन आणि मन एकाग्र होण्यासाठी आणि औषधी गुणधर्मामुळे वाढ, जोपासना केली जात होती. तुळस औषधाची जननी, हवा शुद्ध करणारी, अनेक विषारी वायू शोषून घेणारी, घातक जिवाणूंचा नाश करणारी आणि पवित्र वनस्पती म्हणून आजही तुळशीची पूजा करतात. चंदन हा सुगंधी, पवित्र आणि औषधी वृक्ष आहे. अनेक रोगांचे मूळ असणारी शरीरातली कडकी घालविणारा औषधी वृक्ष आहे. देवपूजेत देवाला चंदनाचा टिळा लावतात. चंदनाच्या सुगंधामुळे आणि जाईच्या सुगंधी फुलांमुळे माणसाची घाणेंद्रिये उद्दीपित होतात, मन उल्हसित होते! सदाहरित असणारा, मध्यम उंचीचा नीम वृक्ष औषधी तर आहेच, पण पानगळ एकदम होत नसल्यामुळे बाराही महिने छाया देणारा वृक्ष म्हणून अनेक ठिकाणी आजही लावला जातो.

वृक्षआयुर्वेदामध्ये अनेक औषधी वनस्पतींचे गुणधर्म, कोणत्या रोगांवर कोणत्या वनस्पती उपयोगी पडतील यांची ही वर्णने आहेत. जंगल, त्यातली सजीवसृष्टी, पाण्याचे स्रोत, उंच-सखल भाग, छोट्या मोठ्या टेकड्या जपल्या तर निसर्गाचा तोल सांभाळला जातोच, शिवाय मानवी जीवनही सुखकर होते हेही वेदांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नमूद केलेले आहे. अलीकडची ‘फॉरेस्ट गार्डन’ ही संकल्पना याच कल्पनेला समांतर म्हणता येईल. नैसर्गिक सौंदर्य, नैसर्गिक भूभाग-भूप्रदेश आहे तसेच ठेवून जंगलाचा आस्वाद घेण्याची प्रथा अलीकडे रुजायला लागली आहे.

वेदांत वनस्पती, प्राण्यांबरोबर विविध प्रकारच्या फुलांचेही संदर्भ आहेत. देवदेवतांची पूजा विशिष्ट फुलांनी करतात. सुगंधी फुले, औषधी फुले, सौंदर्यप्रसाधनात, त्या सामग्रीत वापरणाऱ्या अनेक फुलांचे उल्लेख विविध प्रकारांनी वेदांत सांगितले आहेत. देवदेवतांच्या पूजेसाठी लागणारी फुले घराच्या आजूबाजूला लावण्याची कल्पनाही यातूनच आली असावी.

वैदिक काळात देवदेवता, वृक्षपूजा होतीच पण त्या काळात विविध उद्देशांसाठी यज्ञ केले जात असत. यज्ञ पात्र लाकडी किंवा मातीचे असे. होमासाठी ज्या समिधा वापरतात त्यासाठी आंबा, पिंपळ, वड, जांभूळ, चंदन, मोर, शमी, बेल, खैर, प्लाक्श, अगर, तगर, देवदार या वृक्षांच्या छोट्या फांद्यांचा, लाकडाचा वापर करीत असता. यज्ञात जेव्हा समिधा टाकल्या जातात, यज्ञकुंडातील  तापमानामुळे घातक जिवाणूंचा नाश होतो. समिधांमध्ये असलेल्या रासायनिक घटकांमुळे प्रक्रिया घडून त्यातून फॉर्मल्डीहाईड आणि फॉरमॅलिन तयार होते. हवन सामग्री म्हणून केशर, मस्क, अगर, तगर, चंदन, वेलदोडा, जायफळ, पानडी, नागरमोथा, कापूर अशी सुगंधी वास येणाऱ्या वनस्पतींचा समावेश असायचा. याशिवाय गुळवेल, ब्राह्मी, नागकेशर, बेहडा, हिरडा, सुंठ, वेखंड या औषधी वनस्पती; तूप, दूध, फळे, बिया असे काही स्वास्थवर्धक, काही पौष्टिक पदार्थ वापरत असत. यज्ञात कधी कधी यज्ञ स्तंभ उभारला जात असे, तो अश्वत्थाच्या लाकडापासून केला जाई. आहुती देण्यासाठी निरनिराळी लाकडाची उपकरणे वापरत असत; त्यासाठी वारणा, पकम, औदुंबर, कटई, अश्वत्थ या वृक्षांचेच लाकूड वापरत. विविध कारणांसाठी अनेक वनस्पतींचा, वृक्षांचा वापर होत असे. सहाजिकच नैसर्गिकरीत्या त्यांची जपणूक आणि संवर्धनही केले जात असे. यातूनच जैवविविधतेबरोबर उपयुक्त वृक्षांची जोपासना करण्याची कल्पना सुचली असावी.

आताच्या सेंद्रिय खताची ‘पेरणी’ वेदातच केली गेली. घराभोवतालच्या झाडांना द्रव गोबर आणि गोमूत्र वापरले जायचे! हल्लीच्या उद्यानातल्या फुलझाडांनाही हेच खत ‘सेंद्रिय खत’ म्हणून वापरले जाते!

ऋषिमुनींनी निसर्गातल्या सर्व घटकांबरोबरच वनस्पतीसृष्टीतील विपुलता, औदार्य, नित्यनूतन निर्मिती करण्याची क्षमता, सौंदर्य यांची अप्रत्यक्षपणे जाणीव करून दिली. वनस्पतीसृष्टी ही औषध तयार करण्यासाठी, स्वास्थ मिळविण्यासाठी तर आपल्याला उपयोगी आहेच, पण मनःस्वास्थ्य टिकवण्यासाठी सुंदर फुलझाडांचीही आवश्यकता असते हेही वेदांमधून सांगितले आहे !

(डॉ. कांचनगंगा गंधे या वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. ओंकार गरुड हे लखनौ येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे वरिष्ठ उद्यान अधिकारी आहेत.)

संबंधित बातम्या