वनं, उपवनं आणि वाटिका

डॉ. कांचनगंगा गंधे, ओंकार गरुड
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022

उद्यानरंग 

रामायण, महाभारतातल्या जंगलांमध्ये विविध प्रकारचे ‘अधिवास’ (हॅबिटॅट) असल्याची नोंद आहे. भारताच्या उत्तरेपासून श्रीलंकेपर्यंत विविध प्रकारची जंगलं, अरण्यं, वनं, उपवन, वाटिका, म्हणजे निसर्ग चित्रलिपीचा सुंदर मिलाफ आहे. जैवविविधतेचे कोठार आहे. तिथल्या जागेचा प्रथम सखोल अभ्यास करून विविध वृक्षांच्या बिया, रोपं, छोटी झाडं लावली तर तिथं तयार होणारी परिसंस्था अधिक सक्षम होईल, समतोल राखला जाईल आणि तिथली हवासुद्धा प्रदूषण मुक्त होईल.

भारतीय प्राचीन संस्कृत साहित्य अनेकार्थांनी खूप समृद्ध आहे. ते सुरू होतं भारतीय संस्कृतीचा मूलाधार असलेल्या वेदांपासून! साऱ्या सृष्टीचं चक्र सुरळीत, योग्य आणि ठरावीक लयीत चालू राहण्यासाठी, सारी सृष्टी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वनस्पती-वृक्षांवरच अवलंबून आहे हेही पूर्वसुरींनी पूर्ण जाणलं होतं! म्हणूनच वेदांमध्ये वृक्षांना पूजनीय मानून त्यांचा आदर केला आहे. त्यांना देव-देवता मानून त्यांची पूजा करून त्यांचा योग्य आदर राखला आहे. ‘अरण्यानी’ या अरण्यदेवतेला उद्देशून ऋग्वेदात तिचे वर्णन एका सूक्तात केले आहे. ‘अनेक प्रकारचा वास येणारी, सुगंधी, विपुल, पण अन्नयुक्त पण शेतकरी नसलेली पशूंची जन्मदात्री’ म्हणजे अरण्यदेवता!

वेदांनंतर येणारी ‘अरण्यके’ ब्राह्मण ग्रंथांशी जोडली गेलेली आहेत. ती अरण्यातच निर्माण झाली. तपःसाधनेसाठी असणाऱ्या तपोवनात मनःशांतीसाठी काही वृक्षांची मुद्दाम जोपासना आणि संवर्धन केलं जायचं! त्यात मुख्यत्वेकरून एखाद्या तपस्व्याप्रमाणे शांत, गंभीर आणि मंदिराच्या सान्निध्यातच आहोत की काय असे वाटणारा, अगणित खांब असल्यासारख्या पारंब्या असलेला धीरोदात्त वटवृक्ष, मंद सुवासाची फुलं देणारा, फुलं उमलली की शंकराच्या पिंडीवर नागाचा फणा असावा असा भास होणारा ‘शिवलिंगी’ वृक्ष; पांढरट - मोतिया रंगाची, देखणी टप्पोरी, मंद, मादक सुवासाची फुलं येणारा ‘सुलतान चंपा’; सोन्यासारखी कांती असलेला, सतेज, मंद पण उल्हसित करणाऱ्या सुवासिक फुलांचा ‘सोनचाफा’; सुवासिक फुलं आणि गोड वासांची वासाच्या फळांनी लगडलेला छोटा ‘धारू’, भगव्या रंगाच्या मखमली फुलांचा बहर आला की अरण्यात ‘अंगार’ पेटलाय असा भास होणारा आणि मधासाठी पक्षी, छोटेखानी प्राण्यांची वृक्षांवर लगबग सुरू झाली की आसमंतात चैतन्य निर्माण करणारा यज्ञिय ‘पळस’ असे वृक्ष असायचेच. अशा अरण्यात ऋषिमुनींनी जंगलातल्या वृक्षांचे लाकूड, फांद्या, झावळ्या वापरून पर्णकुटी आणि आश्रम साकारले. अशा अरण्यात-आरण्यकांमध्येच वैदिक ऋषींनी सांगितलेले आध्यात्मिक ज्ञान आहे. श्रुति-स्मृति-पुराणोक्त वैदिक धर्मात वृक्षांना महत्त्व आहे. देव देवतांचे वास्तव्य विविध वृक्षांवर असल्याचे सांगून त्या वृक्षांशी संबंधित विविध व्रतवैकल्ये सांगितली आहेत. 

पूर्वी ‘नैसर्गिक अरण्यं’ अबाधितच होती. त्यातल्या काही उपयुक्त वृक्ष-वेलींची, फळझाडांची आश्रमाभोवती पण अरण्यातच मुद्दाम जोपासना केली जायची. त्याला नंतर ‘वन’ असं संबोधलं जाऊ लागलं!

अभिजात संस्कृत साहित्यातील आदिकवि वाल्मिकींचे ‘रामायण’ आणि व्यास महर्षींचे ‘महाभारत’ या महाकाव्यात अनेक प्रकारच्या वनांची, उपवनांची, अरण्यांची, वाटिकांची वर्णने आहेत.

अयोध्येच्या दशरथ राजाच्या तिन्ही राण्यांच्या प्रासादाभोवती वनं, उपवनं होती. जाई, जुई, चमेलीच्या मंद वासाची वासाच्या फुलांच्या वेळी, उन्हाळ्यातही मन प्रसन्न ठेवणाऱ्या मोगऱ्यांचे ताटवे, रंगीत फुलझाडेही होती. रात्री, पहाटे उमलणारा, जणू पोवळ्याच्या नदीतून उमलणारा, मंद सुवासाचा पारिजात होता, सुवर्णकांतीचा सोनचाफा प्रासादाभोवतालची शोभा वाढवायचा. प्रासादापासून थोड्या लांब अंतरावर बकुळ, सीता अशोक यांसारखे वृक्ष होते. उन्हाळ्यात सकाळी बकुळाच्या फुलांचा सडा जमिनीवर पडल्यावर सुगंधी रांगोळी काढल्याचा भास व्हायचा. सीता अशोकामुळे प्रासादाचं वैभव अजूनच वाढायचं, अशी वर्णने आढळतात.

तांबूस रंगाच्या कोवळ्या पालवीचे मोठ्या, हिरव्या पानात रूपांतर होताना त्यांच्या रंग-रूपात होणारे बदल विलोभनीय दिसतात. म्हणूनच सीता अशोकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर शरीरात चैतन्य भरल्यासारखं वाटतं! नारिंगी, लालसर रंगाचे, मंद वासाचे फुलांचे गुच्छ उन्हाळ्यात जेव्हा येतात, तेव्हा वृक्षाचं सौंदर्य अवर्णनीय असतं! रामायणात ‘सीता अशोका’चा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे. हिमालयाच्या कौशिकी नदीच्या काठाजवळ या वृक्षाची देवराई होती.  

सीतेला रावणानं ‘अशोक वाटिके’त ठेवलं होतं! ह्या वृक्षाचा पर्णसंभार खूप, थोडा खाली झुकलेला आणि सदाहरित असल्यामुळे सीता रावणाच्या प्रासादात न राहता याच वृक्षांच्या छायेत राहिली होती, असे उल्लेख आहेत. एकेकाळी रानात, वनात, गावात, प्रासादाभोवती मोठ्या संख्येने दिसणारा हा देखणा, डौलदार, औषधी वृक्ष आता दुर्मीळ होत आहे. बागांमध्ये, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना रांगेत हे वृक्ष लावले तर सौंदर्य तर वाढतेच पण विषारी वायू, धूर शोषून घेण्याची क्षमता असल्यामुळे हवा शुद्ध राखली जाईल. 

श्रीरामाच्या वनवासाचा मार्ग म्हणजे निसर्गातल्या अनेक चित्रलिपींचा सुंदर ‘मिलाफ’ आहे. हा मार्ग म्हणजे टेकड्या, पर्वत, शिखरं, दऱ्या, जंगलं, घनदाट अरण्यं, वनं, उपवन, वाटिका, तळी, सरोवरं, नद्या, नाले, समुद्र, विविध प्रकारच्या वनस्पती, वन्यजीव, प्राणी, पक्षी, किडे-मकोडे आणि सूक्ष्म जीवजंतूंचं भांडार आहे. यात प्रत्येकाचं जसं वैशिष्ट्य, वेगळेपण आहे तसं ते सर्वच एकमेकांत गुंतलं आहे. पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीनं या मार्गावर विविध प्रकारच्या ‘पारिस्थितिकी’ (इकोसिस्टीम) अस्तित्वात होत्या.

‘चित्रकूट’ पर्वताच्या पायथ्याशी असलेलं जंगल थोडं विरळ होतं. इथेच ऋषिमुनींनी पर्णकुटी बांधल्या होत्या. भोवताली औषधी वनस्पती, फुलझाडं, फळझाडं, कंदमुळं, आश्रम/पर्णकुटी साकारण्यासाठी लागणारा बांबू, कळक, पाम होते. आंबा, फणस, चारोळी, आवळा, बोरांच्या विविध जाती, लोध्र, कदंब, अमलतास, कांचन अशी नैसर्गिकरीत्या वाढत असलेली झाडं आणि काही मुद्दाम लावली झाडं होती. चित्रकूटच्या आतल्या भागात जंगल दाट आणि भयावह होतं! कडुलिंबासारखे सदाहरित वृक्ष होते पण पळस, भूर्ज अशा पानगळी वृक्षांचं वर्चस्व अधिक होतं, म्हणूनच हे जंगल ‘पानगळीचं जंगल’ म्हणून आता ओळखतं जातं! या जंगलात ‘उप-जंगलं’- ‘उप-वन’ होती, त्यात एकाच प्रकारची अनेक झाडं, वृक्ष होते. करढाई, सकई (सलई), खैर, बांबू अशी उप-वनं होती. जंगलात पाण्याचे स्रोतही होते, त्यामुळे हिरवाई तर टिकून होतीच, शिवाय पाणवनस्पती, कमळांमुळे पाणपक्षी, प्राणीही इथे आश्रयाला होते. म्हणूनच ‘जलचर पारिस्थितीकी’चा समतोल राखता जात होता. या जंगलात विविध वनस्पती, वृक्ष होते, शिवाय तृणभक्षी, मांसभक्षी प्राणीही होते. सर्वांना अन्न भरपूर आणि योग्य प्रमाणात मिळत होतं. त्यामुळे हे जंगल ‘परिपूर्ण’ होतं!

रामायणातलं ‘दंडकारण्य’ पानगळीचं पण घनदाट जंगल म्हणूनच ओळखलं जायचं! मोठ्या वृक्षांबरोबर दंडा - त्रिना, दर्भ (कुश) अशा प्रकारच्या गवतांचे प्रकारही होते. हिंस्र पशू, पक्षी, सतत ओरडणारे किडे, कीटक यामुळे दिवसासुद्धा दंडकारण्य भयावह होतं!

‘पंचवटी’चं जंगल दंडकारण्याचं उप-अरण्य आहे. जंगलात ‘पाच वड’ एकत्र आहेत म्हणून पंचवटी नाव पडलं असावं! शिवाय साल, ताडी पाम, तमालपत्र, सीता अशोक, केतक, आंबा, चंदन, फणस, पुन्नागा, खैर, शमी, पळस असे वृक्ष ‘उष्णकटिबंधीय शुष्क पानगळी’चे निदर्शक होते. तुळस, कमळं, पाणवठ्याजवळ होतीच, त्यामुळे ‘जलचर पारिस्थितिकी’ही या भागात होती. त्यामुळेच हे जंगल आल्हाददायक होतं! 

‘पंपा’ सरोवर आजही पवित्र मानलं जातं! आजूबाजूला अनेक प्रकारचे वृक्ष होते, माधवी लता, महिका अशा सुंदर फुलांच्या वेली, कमळं, लिली होती. यातल्या वृक्षांमुळे सरोवराच्या आजूबाजूचं जंगल ‘शुष्क व दमट पानगळीचं जंगल’ म्हणून ओळखलं जातं!

‘किष्किंधा’ भागातल्या अरण्यात रक्तचंदन, अशोक, मुचकुंद, पळस, बकुळ असे मोठे वृक्ष तर चाफा, सोनटक्का, केतकी, जाई, जुई, मालती अशा सुगंधी वनस्पतीही होत्या. श्रीलंकेतील ‘अशोक वाटिका’ ही सदाहरित वाटिका आहे. यात सीता अशोकाची झाडं, जास्त प्रमाणात आहेत. शिवाय सप्तपर्णी, नागकेशर, बकुळ, रक्तचंदन, चंदन या वृक्षांचं संवर्धन अशा प्रकारे केलं आहे की ही वाटिका म्हणजे नैसर्गिकरीत्या वाढलेलं अरण्य वाटावं!

महाभारतातही अनेक अरण्यांची, जंगलांची, वनांची, वृक्षांची अनेक वर्णने आहेत. त्या सर्वांचं योग्य संवर्धन, जतन व्हावं म्हणून ‘शांती पर्वात’ वृक्षांना पंच ज्ञानेंद्रिये असतात, ते सजीव आहेत, त्यांना जीव आहे असेही नमूद केले आहे. महाभारतात उल्लेख केलेली अनेक झाडे, वृक्ष यांची रामायणातही नोंद आहे. ‘हस्तिनापूर’ जंगलाच्या आवारात होते, पण तिथले वृक्ष अबाधित होते. ‘इंद्रप्रस्थ’मध्ये मात्र बाग, उद्यान आणि कृत्रिम तलाव अशी मुद्दाम आखणी करून त्यात विविध प्रकारची छोटी, मोठी झाडं, वृक्ष लावले होते.

कदंब वृक्ष आणि बासरीचं अतूट श्रीकृष्णाचं नातं आहे. सदाहरित असलेला कदंब शंकूच्या आकाराचा आणि डौलदार वृक्ष आहे. वर्षाऋतूत चेंडूसारखी गोल, लांब दांड्यावर लटकणारी मंद, मादक वासाची फुलं आली की तो अजूनच देखणा दिसतो. बागेची, उद्यानाची आणि रस्त्याच्या दुतर्फा जागेची शोभा वाढवण्यासाठी हा वृक्ष योग्य आहे. बासरीसाठी लागणारा कळक, कार्णिकार, खदिर, विभीतक, शमी, पुन्नाग, आम्रतक, अस्वस्थ, रोहितक अशा वृक्षांचेही उल्लेख आहेत.

पांडव वनवासात शमी वृक्षाला खूप महत्त्व आहे. या काटेरी वृक्षाचे ‘काष्ठ’ खूप कठीण असल्यामुळे हा वृक्ष लवकर तुटत नाही. रामायणात जसे गवत प्रकारांना, उसाता (इक्षु:) महत्त्व दिले आहे तसे महाभारतात श्रीकृष्णाने भगवद्‍गीतेत ध्यानासाठी दर्भाचे (कुरा भवन) आसन सुचवले आहे. हे गवत ‘नैसर्गिक संरक्षक’ (नॅचरल प्रिझरव्हेट्विह) आहे, त्यावर घातक जिवाणूंची फार वाढ होत नाही. त्यामुळे ध्यानधारणेसाठी आवश्यक असलेली एकाग्रता मिळत होती. पर्यावरणाच्या दृष्टीने गवतांच्या प्रकारांना खूप महत्त्व आहे. ती जमिनीत वाढत असल्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहून जाण्याचं प्रमाण कमी होतं!

देवी पुराणात नऊ पवित्र वनांचा उल्लेख आहे. कुरु वन, निमिषारण्य, उत्पारण्य ही वनं जास्त पवित्र मानतात. याशिवाय द्वैत वन, त्यातलं द्वैत सरोवर, कामय्या जंगल, मधु जंगल आणि वनांचे पण उल्लेख आहेत.

श्रीकृष्ण, अर्जुनाने खांडव वन कसं आणि किती वेळा जाळलं याच्या अनेक कथा आहेत. ह्या वनात हिंस्र पशू, विषारी नाग, साप, प्रचंड आकाराचे पक्षीही होते. मोठे वृक्षही होते. निसर्ग नियमांनुसार आणि आत्ताच्या पर्यावरणशास्त्राच्या नियमानुसार कोणत्याही परिसंस्थेमध्ये क्षमतेच्या पलीकडे सजीव सृष्टीचं, विशेषतः प्राण्यांचं प्राबल्य वाढलं की त्यांच्यात स्पर्धा, तणाव वाढतो. जो शक्तिमान तो टिकतो, पण त्यालाही अन्न न मिळाल्यास तोही सजीव टिकत नाही. परिसंस्थाही नष्ट होऊ शकते. 

एखाद्या गोष्टीचा नाश ही निर्मिती आणि बदलाची नांदी असते. या पृथ्वीवर शाश्वत, कायमस्वरूपी असं काहीच नसतं, पण त्यात सूक्ष्म बदल हळूहळू घडतात. खांडव वन जळून खाक झालं तरी त्यातून हळूहळू नवनिर्मिती झाली. प्रथम जमिनीलगतची छोटी झाडं वाढायला लागली. पण सर्वच वनस्पती पूर्वीच्या जंगलातल्या, वनासारख्या नव्हत्याच!

नाशातूनही काही नवीन घडू शकतं, वन जाळलं गेलं तरी नवनिर्मिती होते ही संकल्पना आजही ‘शेती’मध्ये काही ठिकाणी पिकं घेण्याअगोदर राबवली जाते.

(डॉ. कांचनगंगा गंधे या वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. 

ओंकार गरुड हे लखनौ येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे वरिष्ठ उद्यान अधिकारी आहेत.)

संबंधित बातम्या