वृक्ष-अनुबंध...

डॉ. कांचनगंगा गंधे, ओंकार गरुड
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022

उद्यानरंग 

निसर्गातल्या जैवविविधतेची भुरळ मानवाला प्राचीन काळापासून आहे. राजांनी ‘राजवन’ उभारून, कवी, नाटककारांनी त्यांच्या वाङ्‍मयातून निसर्गाच्या आत्म्याशीच भावनिक नातं जोडलं आहे. वृक्ष, वेली, त्यावर फुलणारी विविध रंगी, मनाला भुरळ पाडणाऱ्या आणि सुगंधी फुलांचा अभ्यास व निरीक्षण करून वृक्षांशी अनुबंध जोडला, तर त्यातून मिळणारा शाश्वत आनंद अमर्याद असेल.

निसर्गाशी मानवाचं नातं अगदी अनादि कालापासून आहे. त्याची सृष्टीतल्या सजीवांशी विशेषतः वनस्पतींशी, झाडा-झुडपांशी, वृक्षांशी, फुलांशी जास्त जवळीक होती. वनस्पतींपासून मिळणाऱ्या अन्नाचा उपयोग प्रथम आदिमानवानं केला. जंगलातल्या अश्वत्थ, वडासारख्या अनेक मोठ्या वृक्षांचं महत्त्व ऋषिमुनींनी जाणलं होतं! त्यांच्या सान्निध्यात एक वेगळीच अनुभूती, आध्यात्मिक आनंद मिळतो हेही त्यांना जाणवलं! जंगलाच्या आतल्या भागात वाघ, सिंहासारख्या बलाढ्य आणि त्यांच्याहीपेक्षा भयंकर हिंस्र पशूंचं वास्तव्य असल्याची जाणीव त्या काळच्या राजांना होतीच. स्वतःच्या शौर्याची ताकद अजमावण्यासाठी अनेक राजे प्राण्यांच्या शिकारीसाठी आणि युद्धात पराक्रम करून आल्यावर विश्रांतीसाठी आसपासची जंगलं, अरण्य ‘राजवनं’ म्हणून राखून ठेवत. राणीच्या प्रासादाजवळ फक्त राजा-राणीसाठी खास ‘प्रमोद्यानं’ होती. त्यात सुगंधी, भरघोस फुलं येणाऱ्या मोहक लतावेलींचे मंडप होते. मंद आल्हाददायक सुवास देणारे पारिजात, सोनचाफा, बकुळ वृक्ष होते. उन्हाळ्यातही हिरव्या पानांमुळे आणि नारिंगी रंगाच्या फुलांमुळे सारा आसमंत चैतन्यानं भारून टाकणारा सीता अशोक, विश्रांतीसाठी मोठे पाषाण, छोटे तलावही होते. तर उद्यानांमध्ये सदैव हिरवेगार असणारे, शीतल छाया देणारे वृक्ष होते. या वृक्षांच्या सावलीत राजे द्यूत खेळत असत आणि नृत्य-गायनाचाही आस्वाद घेत. फक्त सरदार आणि त्यांच्या ललनांसाठी वृक्ष वाटिका होत्या. त्यातही सावली देणारे वृक्ष, सुवासिक फुलांची झाडं, वेली असायच्या. ‘मार्गेषु वृक्ष’ या प्रकाराची सुरुवात सम्राट अशोकाने केली असावी. रस्त्याच्या दुतर्फा, वहिवाटीच्या मार्गावर छाया देणाऱ्या आणि मार्ग सुशोभित करणाऱ्या अनेक वृक्षांचे उल्लेख आहेत.

तेजस्वी/तेजःपुंज शरीर, आत्मिक, शाश्वत आनंदासाठी ऋषी, मुनी, तपस्वी भौतिक सुखाचा, शरीराचा त्याग करून ‘वृंदावना’सारख्या नैसर्गिक निवासस्थानात राहात असल्याचे उल्लेख प्राचीन वाङ्‍मयात मिळतात. याच धर्तीवर पाँडेचरीचा अरविंदाश्रम आहे. तर फक्त देवांसाठी राखून ठेवलेल्या देव उद्यानात छोटी तळी, पाण्याचे साठे, त्यात उमलणारी कमळं आणि भोवताली छोट्या वृक्षांचं जतन केल्याचे उल्लेख मिळतात. तर गावातल्या देवळांभोवती पांढऱ्या चांदणीसारखी फुलणारी तगर, लाल रंगाची, मोठ्या आकर्षक फुलांची जास्वंद, पिवळ्या फुलांचा टिकोमा, पांढरी-तांबडी कण्हेर, मंद सुवासाच्या जाई-जुईचे वेल असायचे. या नंदनवनातल्या देवाची, विशेषतः कृष्णाची, गावावर अनुकंपा आहे आणि तोच गावाचे संरक्षण करतो अशी गावकऱ्यांची अपार श्रद्धा होती.

पद्म पुराण, स्कंद पुराण, वामन पुराण, अग्नी पुराण, नारद पुराण, शिव पुराण, कलिका पुराण, भविष्य पुराण, गरुड पुराण, नरसिंह पुराणात कोणती फुलं कोणत्या देव-देवतांना अर्पण करायचे याचे ही उल्लेख आहेत. दूर्वा, केळी (रंभा), लाल-पांढरी फुले गणेशासाठी; तर सरस्वती देवीसाठी सुगंधी जाई, कुंदा, मांदार आणि निळे कमळ (कुमुद). विष्णूसाठी तुळस, शंकरासाठी बेल. याशिवाय रंगीत आणि सुगंधी वासाच्या फुलांचेही उल्लेख आहेत. फुलं येणारी झाडं शाश्वत आनंदासाठी, आत्मशांतीसाठी मोठ्या योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे जतन करणं हे प्राचीन काळापासून आहे. आत्ताच्या विविध प्रकारच्या उद्यानांची, बागांची मूलभूत संकल्पना यातूनच उदयाला आली असावी.

प्राचीन वाङ्‍मयातल्या या वनस्पती वैभवानं रामायण, महाभारत या दोन महाकाव्यानंतरच्या कालखंडातल्या अनेक कवींना भुरळ घातली असावी. म्हणूनच भास, कालिदास भवभूति, बाणभट्ट, भारवी, माघ, राजशेखर, श्रीहर्ष, जयदेव यांसारख्या कवींनी आपल्या काव्यात अनेक वृक्षांचा, रंगीत फुलं, वेळींचा उल्लेख पार्श्वभूमी म्हणून केला आहे. नुसतं वर्णन वाचूनच त्या वृक्षांचं लावण्य, सौंदर्य डोळ्यांसमोर तरळतं आणि आपोआपच त्या सर्वांशी भावनिक नातं जोडलं जातं!

कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ या नाटकात कण्व मुनींच्या आश्रमाभोवती अनेक प्रकारच्या वृक्षांची, फुलझाडांची, फुलांची वर्णनं आहेत. याशिवाय पाण्यात वाढणाऱ्या निळ्या, तांबड्या, पांढऱ्या, सोनेरी कमळांच्या अनेक प्रकारांचे/जातीचे उल्लेख आहेत. आश्रमात राहणाऱ्या सर्वांचंच त्या सगळ्यांवर अतोनात प्रेम होतं! त्यांची योग्य निगाही राखली जात होती. कण्व मुनींची शकुंतला जेव्हा पतिगृही जायला निघाली तेव्हा तिला वस्त्र, अलंकार आणि सौंदर्य प्रसाधनं या वृक्ष, लता, वेलींमार्फतच पुरवली. वृक्षही प्रेम करणाऱ्यांविषयी कृतज्ञ होते. आपण जर वृक्षांची नीट काळजी घेतली, त्यांचं जतन केलं तर तेही आपल्याला भरभरून देतात हे आपण आजच्या काळात लक्षात ठेवायला पाहिजे.

कालिदासाच्या ‘केतुसंहारम्’मध्ये निरनिराळ्या ऋतूत बहर येणाऱ्या फुलांचे सुंदर वर्णन आहे. यात विशेषतः, वसंतऋतूच्या सौंदर्याचं भरभरून वर्णन केलं आहे. आम्रमंजरी आणि तिचा दरवळणारा, उत्साह वाढवणारा सुवास, पळस, शाल्मली, सोनचाफा, मोह अशा अनेक वृक्षांच्या फुलांचं, वसंतऋतूतल्या निसर्गरंगांचं वर्णन आहे. ‘कुमारसंभव’, ‘रघुवंशात’ही सदाहरित तिलक (दहा ते बारा फूट वाढणारा), मोह, पळस, पारिजात यांचे उल्लेख आहेत. पारिजातकाला तर स्वतःचं तेज असलेला स्वर्गीय ‘कल्पवृक्ष’ म्हटलं आहे. चंदनाचे वृक्ष भारताच्या दक्षिणेकडे जास्त प्रमाणात असल्याचे उल्लेख आहेत. यावरूनच भारताच्या कोणत्या भागात, कोणत्या प्रकारचे वृक्ष केव्हा फुलतात याचा अभ्यास कालिदासाने केला होता. परंतु हे वृक्ष बागेत, उद्यानात, अरण्यात किंवा अन्यत्र कुठं आहेत यांचा स्पष्ट उल्लेख नाही.

बाणभट्टाच्या ‘कादंबरी’ आणि ‘हर्षचरितम्’ या गद्यकाव्यात आणि कवी माद्याच्या ‘शिशुपालवधा’त चंदनाचे आणि चंदन उटीचे संदर्भ आहेत. कवी मावाने सूर्योदयाच्या वेळेस उमलणाऱ्या कमळाचं आणि त्याचवेळेस मिटणाऱ्या कुमुदाचं सुरेख वर्णन केलं आहे. सकाळी आणि रात्री उमलणाऱ्या कमळांच्या वेगवेगळ्या जाती आहेत हेही लक्षात येतं.

राजशेखर या संस्कृत कवी, नाटककारानं ‘कर्पूरमंजरी’मध्ये वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळ्या फुलांच्या बहरांचं वर्णन तर केलेलं आहेच, पण ते का असावं असाही अप्रत्यक्षपणे उल्लेख आढळतो. त्यांनीच लिहिलेल्या ‘काव्यमीमांसा’मध्ये फुलांच्या उपयोगाप्रमाणे त्यांचं वर्गीकरण केलं आहे. यात शोभेची सौंदर्याची, अन्न म्हणून उपयोगी पडणारी, अत्तर- सुगंध देणारी, मध, फळं तसेच, पूजेसाठी लागणाऱ्या फुलांचा उल्लेख केला आहे. शोभेसाठी दुपारी उमलणारी बंदुका, अन्न म्हणून उपयोगी पडणारी स्थलकमल, बकुळ आणि मालती ही सुगंध देणारी; ज्यापासून मद्य मिळते अशा शिरीषासह, खजूर, फणस, जांभूळ, आंबा, चारोळी या फळं देणाऱ्या वृक्षांचा उल्लेख आहे. याशिवाय पूजेसाठी जाई, पारिजातकाचंही वर्णन आहे. राजा हर्षच्या ‘नैशादिव्यचरीतम्’मध्ये कमळ, सुगंधी पाणलिली - ‘कुव्यालय’, चाफा यांचा समावेश आहे. पाणिनीच्या ‘अष्टध्यायी’मध्ये वड, पिंपळ, पळस, शमी, कदंब अशा अनेक वृक्षांचे उल्लेख आढळतात. अश्वघोषनं लिहिलेल्या ‘नंदनवना’त सिध्दार्थ गौतमानं पाहिलेल्या वृक्षांचे आणि कमळांचं सुंदर वर्णन केलं आहे.

याशिवाय अनेक प्राचीन साहित्यात गुलबर-पांढरट रंगाचा कचनार, पिवळ्या फुलांचा अमलतास, गुलाबी कॅशिया, जांभळ्या रंगाचा नाम, लाल - भगवा कॉर्डिया, पिवळ्या रंगाची गणेरी, लाल फुलांचा पांगारा, रंग बदलणारा भेंड, केशरट रंगाचा क्रिटाव्हिया अशा अनेक वृक्षांचे आणि मधुमालती, जाईच्या निरनिराळ्या ऋतूत फुलणाऱ्या विविध जाती; अबोली, कोरांटी, रानजाई अशा प्रकारच्या वेली, झुडपांचे उल्लेख आहेत.

निसर्गात असलेल्या सुंदरतेची वर्णन प्राचीन वाङ्‍मयात आहेत. कवींनी, नाटककारांनी विशेषकरून वृक्ष, वेली, त्यावर फुलणारी विविध रंगी, मनाला भुरळ पाडणाऱ्या आणि सुगंधी फुलांचा अभ्यास व निरीक्षण करून वृक्षांशी अनुबंध जोडला, तर त्यातून मिळणारा शाश्वत आनंद अमर्याद असेल.

(डॉ. कांचनगंगा गंधे या वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. 

ओंकार गरुड हे लखनौ येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे वरिष्ठ उद्यान अधिकारी आहेत.)

 

संबंधित बातम्या