प्राचीन  ‘उद्यान साहित्य’

डॉ. कांचनगंगा गंधे, ओंकार गरुड
सोमवार, 14 मार्च 2022

उद्यानरंग 

वेदकाळापासून ते कौटिल्याचे अर्थशास्त्र वात्सायनाचे कामसूत्र, मत्स्य पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, बृहतसंहिता, सुरपाला-वृक्ष आयुर्वेद, सारंगधरांचे उपवन आणि विनोदापर्यंत उद्यानाची रचना, आकार, वृक्ष, फळझाडे, फुलझाडे यांची निवड का आणि कशासाठी करायची याची सविस्तर माहिती मिळते.

मानवाला निसर्गाबद्दलचे, विशेषतः वनस्पतींबद्दलचे प्रेम, आपुलकी, ओढ आणि आकर्षण अगदी पहिल्यापासून आहे. निसर्गातली तत्त्वे, नियम, निसर्गसत्य, वृक्षांची उपयुक्तता, महती, त्यांच्यातली लयबद्धता, त्यांचे जीवनचक्र अशा प्रकारची विविध वर्णने भारतीय प्राचीन वाङ्‍मयात आहेत. वृक्ष सान्निध्यात मनःशांती मिळते, आत्मशुद्धी होते याची अनुभूती ऋषिमुनींना होतीच, म्हणून अनेक वृक्षांना देव-देवतांचे स्थान देऊन त्यांची जोपासना, जपणूक केलेली होतीच. नंतरच्या काळात राजे, महाराजांनीसुद्धा जंगलांशिवाय स्वतःच्या, महाराजांच्या प्रासादाभोवती मन आनंदी ठेवण्यासाठी, विश्रांतीसाठी लता मंडप, लता कुंज तयार करून त्यावर सुवासिक फुलांचे, रंगीबेरंगी वेल वाढवले होते.

वनस्पती जगतातल्या सौंदर्याची भुरळ सर्वांनाच होती. त्याचा आस्वाद आपणही घ्यावा यासाठी अनेकांनी घरासमोर छोटे पाणवठे, तळी मुद्दाम तयार करून त्याभोवती रंगीत फुलझाडे, वेली, मध्यम आकाराचे शोभिवंत वृक्ष लावून निसर्ग स्वतःच्या घराजवळ आणला होता. रंगीत आणि सुवासिक फुलझाडे, विविध ऋतूंमध्ये विविधरंगी बहर येणारी शोभिवंत फळझाडे, भाज्या, ऊस, मोहरी, वृक्ष, ज्या झाडांची फुले, पाने सुवासिक आहेत अशी उपयुक्त झाडे घराभोवती, घरातल्या प्रमुख स्त्रीने लावायची. याशिवाय जाडजूड पण वाकणाऱ्या वेलींचे लता कुंज, लता मंडपही घराजवळ मुद्दाम लावत असल्याचे उल्लेख वात्सायनाच्या ‘कामसूत्रा’त आढळतात. रंगीबेरंगी फुलांच्या आणि हिरव्यागार वेल मंडपाखाली नर्तिकांची त्याकाळची सुंदर शिल्प बेलूरच्या चेन्नाकेशव मंदिरात आहेत.

सम्राट अशोकाने आमराया, वटवृक्ष, देवराया (प्रत्येक देवाला आवडणारा वृक्ष), रस्त्याच्या दुतर्फा सावली देणारे वृक्ष, पाणपोया, विश्राम स्थाने तयार केली होती. सम्राट अशोकाची कार्यपद्धती आणि ‘कामसूत्रा’त वर्णन केलेल्या घराजवळच्या झाडांची मांडणी ही संकल्पना कदाचित मूलभूत धरली गेली असावी. उद्यानविषयीच्या प्राचीन साहित्यात उद्यान (उद् + यान) कसे असावे, त्याची रचना, मांडणी करताना उद्यानाची जागा (स्थळ), आकार, झाडे कशी, कुठे, कोणासाठी, कोणत्या हेतूसाठी लावायची, कोणती झाडे शेजारी-एकत्र लावायची, कोणत्या दिशेला कोणते झाड लावायचे असा सर्वांगिण विचार केलेला आहे. यावरूनच भारतात फार पूर्वीपासूनच बागकाम शास्त्र आणि कला (हॉर्टिकल्चर) जनमानसात रुजलेले असावे. 

कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’त नगर, शहर कसे असावे आणि इतरही व्यवहार कसे करावेत अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याशिवाय जिथे पाण्याची कमतरता असेल तिथे विहिरी, तळी, डबकी मुद्दाम तयार करून त्याभोवती त्या काळचे रहिवासी फळझाडे, फुलझाडांची वाढ करत असल्याचे उल्लेख आहेत. शहराच्या बाहेर काही अंतरावर खेडेगावची वेस सुरू होत असे. ही मोकळी जागा शेतीसाठी नापिक असल्यामुळे तिथे गुरांच्या चाऱ्यासाठी गवताची कुरणे वाढवली जायची. त्यावेळच्या अस्तित्वात असलेल्या अखंड जंगलाशिवाय तीन प्रकारची उपयुक्त जंगले मुद्दाम वाढविली असल्याचे उल्लेख ‘अर्थशास्त्रा’त आहेत. मनोरंजन आणि शिकारीसाठी राखून ठेवलेल्या जंगलात मोठे वृक्ष, प्रत्येक ऋतूत फुलणारे वृक्ष, रंगीबेरंगी झुडपे, गवत, वेली यांचा समावेश होता. तर दुसऱ्या जंगलात सागवान, साल, देवदार, शिसवी, पाईन असे मोठे वृक्ष लावले जायचे. त्यापासून इमारतीसाठी लागणारे लाकूड मिळत असे. याशिवाय डिंक, मध, मेज, फळे, फुले, कंद, सेल्युलोज (दोर तयार करण्यासाठी) ज्या झाडांपासून-वृक्षांपासून मिळायचे अशा अनेकांची मुद्दाम वाढ, जोपासना केली जायची. तिसऱ्या प्रकारचे जंगल सीमेजवळ असायचे, त्यात काही हत्ती मुद्दाम पाळलेले असायचे. अशा जंगलात जंगली हत्ती आले तर त्यांची शिकार केली जायची, या तीनही प्रकारच्या जंगलांत काही जागा साधू, महंत, वेद पठण करणाऱ्या ब्राह्मणांसाठी राखून ठेवल्या होत्या. 

‘मत्स्यपुराणा’तून अनेक नाटकांमध्ये, काव्यामध्ये आणि महाकाव्यांमध्ये वृक्षांचे सौंदर्य, महती, लावण्य आणि प्रशंसा केली आहे. ‘बृहतसंहिते’च्या  

‘वृक्ष आयुर्वेदा’त वृक्षाचा जीवनक्रम कसा असतो याची माहिती आहे. याशिवाय घराभोवती एखादे झाड लावायचे असेल तर ते तिथे लावणे योग्य आहे का, योग्य असल्यास ते कुठे आणि कसे लावावे याचाही विचार केलेला आहे. पारासरांच्या ‘वृक्ष आयुर्वेदा’मध्ये अनेक झाडांचे वनस्पतिशास्त्राच्या दृष्टीने वर्गीकरण केलेले आहे. परंतु उद्यानात घराभोवती ती कशी लावायची याचे स्पष्टीकरण नसले, तरी तिथे झाडे का लावायची याचे महत्त्व पटवून सांगितले आहे. ‘अग्निपुराणा’त घरासमोर छोटे तळे आणि त्याभोवती फुलझाडांची छोटी बाग केली तर प्रसन्न वातावरण तयार होत असल्याचे उल्लेख आहेत. घराभोवती काटेरी कुंपण घातल्यास बागेचे रक्षणही होते, तर ‘सुक्रनीति’मध्ये घराभोवतालची बाग किंवा उद्यान फक्त डाव्या बाजूलाच तयार करावे असे सांगितले आहे. ‘ब्रह्मवैवर्त’ पुराणात आमराया, सुपारी, नारळाच्या बागा त्यांचे उपयोग, त्या कुठे, कशा लावायच्या, त्यांची मशागत कशी करायची, यांचे संदर्भ आहेत. इतर प्रकारचे वृक्ष कुठे लावायचे, त्यांची दिशा निश्चिती केलेली नाही. अनेक प्रकारच्या प्राचीन उद्यान साहित्यात उद्यानाविषयी, त्याच्या रचनेविषयी विविध प्रकारचे संदर्भ, माहिती विस्तृतपणे सांगितल्यामुळे पुढच्या काळात त्याचा वापर करून त्यात सुधारणा केलेल्या दिसतात. 

घराभोवतालची बाग, सार्वजनिक उद्याने, पार्क यांचे सौंदर्य वाढण्यासाठी, झाडांची, वृक्षांची निगा नीट राखण्यासाठी झाडातले, वृक्षांमधले अंतर किती असावे, मधल्या भागात कोणती झाडे, फुलझाडे लावावीत यांचे संदर्भ आहेत.

नंद्यवर्त, स्वस्तिक, मंडप, सर्वतोभद्र अशा आकृतिबंधात, रचनेत झाडे, वृक्ष, वनस्पती लावल्या तर उद्यानांचे सौंदर्य तर वाढतेच पण सर्व झाडांना पाणी आणि योग्य सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे झाडे तरारून येतात. ‘नंद्यवर्त’ हा आकार ‘तगरी’च्या फुलावरून सुचला असावा. फुलांच्या पाकळ्या ठरावीक आणि चक्राकार गतीत असल्यासारख्या दिसतात. फुलाच्या मध्य भागात पाण्याचे तळे किंवा साठा करून, पाकळ्यांच्या जागेत रांगेत झाड लावून त्याच्या शेजारी पाण्याचे पाईप तयार करून झाडापर्यंत आणून सोडले, तर सर्व झाडांना पाणी आणि सूर्यप्रकाश मिळतो. ‘स्वस्तिक’ आकृतिबंधात, रचनेत मध्यभागी पाण्याचा साठा ठेवून स्वस्तिकाच्या सर्व बाजूंना पाण्याचे पाईप जोडून, त्या लगत चारही बाजूंना झाडे, वृक्ष लावून त्यांच्या जवळची जागा चालण्यासाठी ठेवली होती. सर्वात बाहेरच्या बाजूला, सीमेवर छाया देणारे वृक्ष लावले जायचे. अशा प्रकारच्या उद्यानात सौंदर्य आणि मनःशांती, थंडावा यांचा सुंदर मिलाफ असायचा. दगडाच्या, लोखंडाच्या गोलाकार कमानी उभारून त्यावर विविध प्रकारच्या वेली सोडल्या जायच्या.

वनस्पतींच्या वाढीसाठी जरी सूर्यप्रकाश आणि मोकळी जागा आवश्यक असली, तरी झाडांचे वादळ, वारा, पाऊस, वणवा यांपासून संरक्षण करावेच लागते. यासाठी पूर्वीच्या बागकाम तज्ज्ञांनी काही तंत्र आणि योजना केल्या होत्या. मोठ्या वृक्षांच्या रांगांमधल्या जागेत छोटी फुलझाडे लावली जायची. फळझाडे उद्यानाच्या मध्यभागी लावून त्याभोवती कमी उंचीची भिंत घालून कडेला खंदक खणले जायचे.

उद्यानांसाठी कोणती जागा योग्य आहे, त्याचा आकार कसा असावा, याविषयीची सखोल माहिती ‘बृहतसंहिता’ आणि सुरपालाच्या ‘वृक्ष आयुर्वेदा’त सांगितली आहे. उद्यानासाठी जागा निश्चित करण्याअगोदर तिथली माती सुपीक आहे का नाही याचा अभ्यास केला जायचा. याशिवाय पाण्याची सोय झाले तरच उद्यान करावे असे नमूद केलेले आहे. घराच्या चारही बाजूला वृक्ष, वेली लावल्या तर घराचे सौंदर्य अनेक पटींनी वाढते असे सुरपालाच्या साहित्यात लिहिलेले आढळते.

‘मत्स्यपुराण’, ‘कामसूत्र’, ‘सुरपाला’, ‘सारंगपद्धती’मध्ये उपवन-विनोद या साहित्यात उद्यानाच्या मध्यभागी छोटे तळे, वाहते झरे आणि त्यात विविध प्रकारची कमळे वाढवावीत, काही तळी फक्त राजहंस, बदके यांच्यासाठी राखून ठेवावी असे उल्लेख आहेत. उद्याने उत्तर, पूर्व, पश्चिम दिशेला असावीत. सहसा दक्षिण दिशेला बागा, उद्याने तयार करू नयेत, असेही सांगितले आहे. झाडांची, वृक्षांची रचना अशा रीतीने करावी, की एका झाडाची सावली दुसऱ्या झाडावर पडू नये.

उद्यानाची रचना करताना कोणती झाडे कुठे लावावीत याचे सविस्तर वर्णन सुरपालाच्या साहित्यात आहे. फळबागांच्या कडेला पाम, केळी यांची लागवड करावी. त्यांच्या तंतुमय मुळांमुळे आणि भूमिगत खोडामुळे जमिनीतली माती वाहून जात नाही. पूर्वेच्या बाजूला बांबू, करवंदांच्या जाळ्या लावल्या जात. चविष्ट फळे येणारा, पानझडीचा आठ ते दहा फूट उंच वाढणारा वृक्ष दक्षिणेला ओळीत लावावा. तर आंबट गोड बोरे, कवठ यांचे वृक्ष पश्चिमेला लावायचे, असे उल्लेख आढळतात. उद्यानाचे संरक्षण करण्यासाठी काटेरी कुंपण घालून आतल्या भागात एरंड, कॉर्डिया, अर्जुन यांसारखी मध्यम उंचीची झाडे लावल्यास फुले आल्यावर व उद्यानाची शोभा वाढते.

सुरपाला आणि ‘उपवन विनोदा’त प्रत्येक उद्यानात पवित्र तुळशीचा एक भाग राखून ठेवायला सांगितला आहे. याशिवाय बेल, आवळा, आंबा, कडुलिंब, वड, फणस, चारोळी, अशोक यांसारखे काही वृक्ष आवर्जून लावायला सांगितले आहेत. याशिवाय कोणत्या दिशेला कोणते झाड लावावे म्हणजे त्याची वाढ चांगली होते, ठरावीक वृक्षांशेजारी विशिष्ट झाडे, फुलझाडे लावली तर ती चांगली जोपासली जातात, त्यांना खते कोणती द्यायची, पाणी किती आणि केव्हा घालायचे यांचाही सविस्तर अभ्यास प्राचीन उद्यान साहित्यात केलेला आहे.
(क्रमश:)
(डॉ. कांचनगंगा गंधे या
 वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. 
ओंकार गरुड हे लखनौ येथे भारतीय 
पुरातत्त्व सर्वेक्षणाचे वरिष्ठ उद्यान अधिकारी आहेत.)

संबंधित बातम्या