वृक्ष आयुर्वेद ः उद्यानशास्त्राचा पाया

डॉ. कांचनगंगा गंधे, ओंकार गरुड
सोमवार, 28 मार्च 2022

उद्यानरंग 

वृक्ष आयुर्वेदात वृक्षांच्या ऋतुचर्येचे वर्णन आहे. त्यातले अनुभव म्हणजे उद्यान कला आणि शास्त्राची गाथा आहे. त्या अनुभवांचा आपण योग्य उपयोग केला तर वृक्ष, बागा, उद्यानांबरोबर आपलं ‘हिरवं नातं’ अधिक दृढ होईल.

माणूस जेव्हा पृथ्वीवर जन्माला आला तेव्हापासून आजतागायत त्याचं त्याच्या जन्माच्या लाखो वर्षं अगोदर जन्माला आलेल्या वनस्पतींशी, वृक्षांशी अतूट नातं जोडलं गेलंय! निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, स्वतःचं जीवन, आरोग्य निकोप आणि निरामय राखण्यासाठी निसर्गातल्या सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये वनस्पतींचं, वृक्षांचं स्थान किती उच्च आहे हे भारतीय ऋषिमुनींना, पूर्वसूरींना अनुभवातून कळलं होतंच! ऋतू बदलात आहार कसा असावा, रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवावी, रोगांवर मात करण्यासाठी कोणत्या औषधी वनस्पती वापराव्यात, वनस्पतिजन्य औषधे कशी करावीत, अशा प्रकारची माहिती, संदर्भ इसवी सन पूर्व सुमारे १२००मध्ये ‘आयुर्वेद’ या अथर्ववेदाच्या उपवेदात आहे.

मानवाचं आरोग्य, जीवन निकोप, निरामय राखणाऱ्या वनस्पतींचं आरोग्य, वाढ, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती, रोग प्रतिबंधक उपाय, त्यांचं पोषण कसं करता येईल याविषयीचा सविस्तर अभ्यास अनेक ऋषिमुनींनी, विद्वानांनी, राजदरबारी असलेल्या जाणकारांनी, राजवैद्यांनी ‘वृक्ष आयुर्वेदा’तून सांगितला आहे. ‘धन्वंतरी निघंटु’, ‘राज निघंटु’, ‘भवप्रकाश निघंटु’, कौटिल्याचे ‘अर्थशास्त्र’, ‘कृषी प्रसार’, ‘अमर कोष’, ‘कृषी सूक्ती’, ‘बृहत संहिता’, ‘सुरपाला’ आणि ‘शारंगधरपद्धती’ मधला ‘उपविनोद’ हे वृक्ष आयुर्वेदाला वाहिलेले भारतीय प्राचीन साहित्य आहे. यात प्रत्यक्ष प्रयोग करून मिळालेले अनुभव आहेत. सुरपाला आणि शारंग पद्धतीमधल्या वृक्ष आयुर्वेदात वनस्पतींच्या, वृक्षांच्या ‘ऋतुचर्ये’चे वर्णन केले आहे. हे अनुभव म्हणजे उद्यान कला व शास्त्राची गाथा आहे. वृक्ष आयुर्वेद म्हणजे वनस्पतींच्या जीवनचक्राविषयीचं प्राचीन शास्त्र आहे. वनस्पतींच्या जीवनातल्या प्रत्येक टप्प्याचे अनेक पैलू यात उलगडून दाखवले आहेत.

उद्यानाचं लावण्य खुलतं ते हिरव्यागार झाडांनी आणि विविध प्रकारच्या विविध रंगी फुलांनी! उद्यान सौंदर्य टिकवण्याची आणि वाढवण्याची कला वृक्ष आयुर्वेदात सांगितली आहे. यात माती परीक्षणापासून ते झाडं, उद्यान निकोप कसं राखावं, त्यासाठी काय करावं याची सविस्तर वर्णनं आहेत.

ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष असेल, पाण्याचे स्रोतही नसतील, गरम वारे वाहत असतील, जमिनीवर मृगजळं दिसत असतील, जमीन उजाड असेल, मातीत वाळूचे, रेतीचे, गारगोट्यांचे (कंकूर) प्रमाण जास्त असेल तो भाग रखरखीत प्रदेश (जंगल भाग)- वाळवंटी भाग म्हणून ओळखला जाई. असा भाग उद्यानासाठी जरी अनुकूल नसला तरी त्यात काटेरी वनस्पती, कमी पाण्यात वाढणारे वृक्ष लावले जात होते. यात मुख्यत्वेकरून शमी, पिळू, रोहितक, असाना, पळस, खैर, बकुळ, साल, धावडा, तिंदुक, गुग्गुळ अशा वृक्षांचा समावेश होता. हे वृक्ष मातीची धूप होऊ नये, वावटळींमुळे माती उडून जाऊ नये यासाठी उद्यानाच्या कडेला ओळीमध्ये त्यांना येणाऱ्या फुलांच्या रंगसंगतीनुसार लावली तर रखरखीत जमिनीतही उद्यान खुलून येतं. शिवाय आता कॅक्टस, सक्युलंटचे अनेक प्रकार लावून उद्यानानं सौंदर्य वाढवता येतं!

वृक्ष आयुर्वेदात जमीन दलदलीची, चिखलाची, नदीकाठची असेल, तर तिचा उल्लेख ‘अनुपा देसा’ असा केला आहे. ह्यात केळी, तमाल, नारळ, चंदन, सुपारी, हिंताळा, कदंब, सप्तपर्णी असे वृक्ष लावल्यास उद्यानाची शोभा वाढते आणि या झाडांच्या मधे, त्यांच्या सावलीत रंगीबेरंगी फुलझाडं लावता येतात. चिखलात, पाण्यात, कृत्रिम तळ्यात कमळ आणि पाणवनस्पतीही वाढवता येतात. तर सर्वसाधारण जमिनीत (साधारण देसा) पाणी शोषून घेण्याची आणि ती धरून ठेवण्याची योग्य क्षमता असते, शिवाय माती आणि रेतीचं प्रमाण झाडाच्या वाढीला उपयुक्त असतं, शिवाय हवा खेळती राहत असल्यामुळे अशा जमिनीत झाडं जोमानं वाढतात. म्हणून अशा प्रकारची माती, जमीन उद्यान तयार करण्यासाठी अगदी योग्य मानली आहे. अशा प्रकारच्या जमिनीत सर्व प्रकारची, म्हणजे जमिनीलगत वाढणाऱ्या दूर्वा, हरळीसारखे गवताचे प्रकार (द्रुम), लता-वेली, गुल्म (लहान झुडपं) आणि वनस्पती-मोठे  वृक्ष लावता येतात. जास्मीन, माधवी लता, जाई-जुईचे वेल आणि त्यांचे मंडपही घालता येतील. त्याशिवाय सदाहरित कडुलिंब, अशोक, तिंदूक, पुन्नाग, चंपक, शोभेचे डाळिंब असे वृक्ष लावून उद्यानाची शोभा वाढवता येते.

उद्यानामध्ये वनस्पती, झाडं, वृक्ष लावताना योग्य आणि विविध पद्धतींचा, तंत्रज्ञानाचा वापर केला तर थोड्याच दिवसांत उद्यान बहरून येतं! बियांपासून रोपं करताना अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते. चाफा, जाम, पुन्नागा, नागकेशर, चिंच, कवठ, बेठ, प्रियांगा, आंबा, मोर अशा प्रकारच्या वृक्षांचे पुनरुत्पादन बियांपासूनच करावे लागते. काही प्रकारच्या बियांची उगवणक्षमता कमी असते, काहींना अंकुर फुटण्यासही अनेक दिवस लागतात. अशा बिया रुजत घालण्यापूर्वी शेणात मिसळून दोन-तीन दिवस ठेवून, त्या पूर्णपणे वाळल्या की १० दिवस दुधात भिजत घालून नंतर त्या पाण्यातून बाहेर काढून मग रुजत घालाव्यात. तर काही बियांना चंदन, धूप यांची धुरी दिली तर त्या लवकर रुजतात. काही बिया रुजायला घालण्याअगोदरच रोगांना बळी पडतात, अशा बिया गाईच्या दुधात ९० दिवस भिजत घालाव्यात. परंतु रोज गाईच्या शेणात नारळाच्या जातीतल्या बियांचे तेल मिसळून त्यात काही काळ तशाच ठेवून मग परत दुधात ठेवाव्यात. नंतर पाण्यात धुऊन रुजत घातल्या तर बियांचं रोगांपासून संरक्षण होतं आणि उगवणक्षमता वाढते, उगवण क्रिया जलद होते. बिया रुजत घालण्याअगोदर शेणात दोन-तीन ठेवल्या तर त्या लवकर रुजतात. बिया रुजत घालताना त्या जमिनीत वाफे करून किंवा छोट्या पसरट भांड्यात माती आणि शेणखत घालून अंधाऱ्या जागेत ठेवाव्यात. जास्वंद, कवठी चाफा, सोनचाफा, देवचाफा अशा शोभिवंत झाडांचं पुनरुत्पादन खोडांवर गुट्या बांधून केल्यास उद्यानाची शोभा कमी कालावधीतच वाढते. वेलींचे पुनरुत्पादन करायचे झाल्यास वेलीचा छोटा तुकडा तोडून त्याचा एक भाग द्रव शेणखतात दोन-तीन दिवस बुडवून ठेवल्यास त्याला मुळे फुटतात.

झाडांचं, वृक्षांचं पोषण योग्य प्रकाराने होऊन ती जलद आणि तजेलदार दिसावीत यासाठी वृक्ष आयुर्वेदानं अनेक प्रकारची खतं आणि ‘जल’ सांगितली आहेत. द्रवरूप खतं झाडांवर, मुळाशी फवारल्यास परिणाम चांगला आणि जलद मिळतो. खतांमध्ये गाईचे शेण आणि गोमूत्र एकत्र करून त्यात पाणी मिसळून सात ते आठ दिवस ठेवल्यास रासायनिक बदल घडतात. झाडाच्या वाढीसाठी पोषक असलेले बॅक्टेरिया आणि इतर पोषक मूल्ये वाढतात.

‘कुनाप्पा जल’ या द्रवरूप खताचा उल्लेख वृक्ष आयुर्वेदाच्या सर्व साहित्यात आहे. यात थोडे मांस, मांस धुतलेले पाणी, मोहरीची किंवा तिळाची पेंड, चवळी किंवा मुगाच्या डाळीचा लगदा, दूध आणि मध एकत्र करून पिंपात किंवा जमिनीत खड्डा करून सात-आठ दिवस ठेवल्यास हे पोषक खत तयार होते. याशिवाय साम्यगव्य (हिरवी पानं + गाईचं शेण), अमृतपाणी (गूळ + गाईचं शेण), भस्म पाणी (लाकडाची राख + गोमूत्र), जैविकतिका (गाईचं शेण + गोमूत्र + मध + अग्निहोत्र भस्म + पाणी) अशी अनेक पोषक खतं वृक्ष आयुर्वेदात आहेत.

बाग, उद्यानातली झुडपं बाराही महिने फुलली तर उद्यानाला एक वेगळीच शोभा येते, बाराही महिने उद्यान बहरते दिसते. यासाठी तिळाची पेंड, बावडिंगाची फलं, उसाचा रस आणि गाईचं शेण एकत्र करून त्याचं पाणी तयार करून ७-८ दिवसांनी थोडं झाडाच्या मुळाशी फवारलं तर बाराही महिने झाडांना फुलं येतात. फुलं किंवा फळं गळत असतील तर हिंगाचं पाणी करून झाडाच्या मुळापाशी घालावं, किंवा हिंगाचे खडे, पावडर झाडाच्या मुळापाशी घालून मातीवर काही दिवस अच्छादन घातल्यास चांगला परिणाम दिसून येतो. बिनबियांच्या फळांसाठी जेष्ठमधाची पेस्ट, साखर, कुष्ठ आणि मोहाची फुलं एकत्र करून मुळांना लावावे किंवा मुळांपाशी ठेवावे. झाडांना जखम झाली तर वड, औदुंबर यांची साल, गाईचे शेण, मध आणि तूप एकत्र करून जखमेवर लावल्यास काही दिवसांत जखम भरून येते. झाडं उन्हामुळे जळली तर त्यावर चिखल आणि कमळाची पेस्ट एकत्र करून लावावी.

मनुष्याप्रमाणे वनस्पतींमध्येही वात, कफ आणि पित्त दोष आढळतात, त्यामुळे त्यांच्यात काही विकार, दोष आढळतात. जमीन बरेच दिवस कोरडी राहिली तर वनस्पतींमध्ये वात विकार होतात. तेव्हा ‘कुनाप्पा जल’ तयार करून झाडावर फवारावे. खारट पाण्यामुळे, आम्ल धर्मीय जमिनीमुळे झाडांची पानं पिवळी पडतात, हा पित्त विकार दूध, मध, जेष्ठमध आणि मोहाची फुलं एकत्र करून त्यात पाणी घालून त्याची निवळी झाडांवर फवारल्यास पित्त विकार दूर होतो. वनस्पतींच्या कफ विकारात फुलं, फळं उशिरा येतात. झाडांना अतिथंड पाणी घातलं गेलं तर हा विकार होतो. तो कमी करण्यासाठी पांढऱ्या मोहरीची पेस्ट किंवा हिंग आणि पाणी घालून ते मुळापाशी घालावं. त्याशिवाय तीळ कुठून त्यात लाकडाची राख आणि पाणी घालून ते झाडांना, मुळांना द्यावं हे देण्याअगोदर मुळांभोवतीची माती काढून नवीन कोरडी माती घातल्यास कफ विकार कमी होतो.

किडे, अळ्या झाडांची पानं खातात. ते नाहीसे करण्यासाठी कमीत कमी सात दिवस झाडांवर थंड पाण्याचा फवारा मारावा. मोहरी, वावडिंगाची फळं, बेहड्याची पावडर एकत्र करून, जाळून त्याचा धूर झाडाजवळ करतात. किंवा वावडिंगाची फळं कुटून पावडर करून त्यात तूप, पाणी आणि मीठ घालून झाडावर फवारावं!

एकंदरीतच, हजारो वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेलं वृक्ष आयुर्वेद किती प्रगत होतं! त्या सर्वांचा योग्य वापर केल्यास उद्यान, बागा, त्यातल्या वनस्पतींशी, वृक्षांशी पूर्वापार चालत आलेलं नातं अजूनच दृढ होईल.

 

(डॉ. कांचनगंगा गंधे या वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. ओंकार गरुड हे लखनौ येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे वरिष्ठ उद्यान अधिकारी आहेत.)
 

संबंधित बातम्या