मंदिर उद्याने

डॉ. कांचनगंगा गंधे,  ओंकार गरुड
सोमवार, 11 एप्रिल 2022

उद्यानरंग 
 

शैव मंदिराभोवतालची उद्यानं आता पुनर्विकसित केल्यामुळे जास्त आकर्षक वाटतात. मंदिराजवळ सुंदर वासाची नागचाफ्याची झाडं, तर मंदिरापासून लांब पाण्याच्या स्रोताजवळ नारळ, सुपारीची झाडं; शिवाय केळी, चिकू, फणस अशी फळझाडं; मोकळ्या जागेत हिरवळ आणि ठिकठिकाणी मोसमी फुलांचे ताटवे, तसंच तगर, अनंतर, कण्हेर, चांदणी ही नेहमी फुलणारी झाडं लावल्यामुळे ही उद्यानं जास्त आकर्षक आणि आल्हाददायक वाटतात.  

सणवार, व्रतवैकल्य, उत्सव, पूजाअर्चा, चालीरीती, धार्मिक परंपरा, पौराणिक कथा, देवराया, निसर्ग पूजा, निसर्गातल्या अनेक शक्तींना, पंचमहाभूतांना दिलेलं देवत्व, त्यामार्फत सजीव आणि निर्जीव सृष्टीमधल्या प्रत्येकाचं स्वतःचं वैशिष्ट्य जपून त्यांचं एकमेकांशी नातं जुळवून केलेलं निसर्ग संरक्षण, सृष्टीला जीवन देणारा देव आणि सजीव सृष्टीचा वनस्पतींमुळे निसर्गाचा राखला गेलेला समतोल, मंदिरं, मंदिरातल्या पवित्र मूर्ती, प्रत्येक देवासाठी विविध पूजासामग्री अशा अनेकांमधून भारतीय संस्कृतीचं दर्शन घडतं! 

मानवी वस्तीपासून लांब आणि फक्त देवासाठी राखलेलं रान म्हणजे देवराया! प्रत्येक देवराईमध्ये देवता किंवा देवाची पूजा रानातल्या पानांनी आणि फुलांनी केली जाते. यावरूनच देवालयं, मंदिरांची कल्पना आली असावी. ईश्वर साकार आणि सगुण आहे, असं मानून मंदिरात देवाची मूर्ती बसवून, मूर्तीची पूजा करण्याची भारतीय परंपरा आहे. पूजेसाठी विविध रंगांची आणि सुवासिक फुलं, पानं, फळं वापरण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे. हे सर्व मंदिराच्या परिसरात वाढवण्याची पद्धत आहे. त्यातूनच मंदिर-उद्यानं ही संकल्पना विकसित झाली असावी. भक्तांचे सत्संगाचे आणि पांथस्थांचे विश्रांतीचे ठिकाण म्हणजे मंदिर आणि मंदिर-उद्यान!

भारत हा मंदिरांचा देश म्हणून ओळखला जातो. नागर आणि द्रवीड या दोन मुख्य शैलींची मंदिरं भारतात आहेत. त्यात शैव, विष्णू देवता असे देवता-प्रधान प्रकार आहेत. मंदिरं आणि आजूबाजूचं वातावरण मनःशांती देणारं आणि आल्हाददायक ठेवण्यासाठी देववृक्ष, नक्षत्रवनं, पूजेसाठी सुवासिक आणि रंगीत फुलं, फळं ‘देव वाटिके’त वाढवली जातात. पूर्वी ही उद्यानं, नदी, पुष्करणी, पाण्याचे स्रोत, तलाव, तळी यांच्या जवळपास असल्याचे पुरावे आणि नोंदी आहेत. मंदिराजवळ ‘गोशाळा’ बांधतात. दूध, गोबर, पंचगव्याचा पुरवठा शुद्ध आणि मुबलक प्रमाणात होत असल्यामुळे पानं सतत हिरवीगार आणि फुललेली दिसतात. याशिवाय सावली देणारे वृक्ष, रंगीत फुलांचे ताटवे, ध्यानधारणेसाठी लावलेले पवित्र वृक्ष, पायवाटांमुळे ही मंदिर-उद्यानं म्हणजे स्वर्गातली नंदनवनंच वाटतात. अशा या पवित्र आणि उत्साही वातावरणात ध्यानधारणा करताना आपण देवाशी जोडले गेलो आहोत असं वाटतं. ही मंदिर-उद्यानं म्हणजे भारतीयांची मूल्य जपणारी प्रतीकं आहेत असं म्हटलं तर वावगं न ठरावं! 

भारतात विविध देवदेवतांची अनेक मंदिरं आहेत. शिव, विष्णू, दुर्गा आणि सूर्यमंदिरं विशेष प्रसिद्ध आहेत. प्रत्येक देवासाठी ठरावीक प्रकारची फुलं, पानं, फळं वाहण्याची प्रथा आपल्याकडे आहे. यामुळेच वनस्पती जपल्या जातात. श्रीशंकराची पूजा मुख्यत्वेकरून ‘शिवलिंग’ आणि ‘शिवमूर्ती’ या स्वरूपात करतात. बिल्व पत्र, फळं, धोतरा फुलं, रुईची फुलं, पिवळी कण्हेर फुलं, बोरं, रुद्राक्ष आणि चंदनाच्या खोडाचं गंध यांनी शंकराची पूजा करतात. शंकराच्या मंदिर-उद्यानात या सर्व वनस्पती, वृक्ष लावतात. याशिवाय नारळ आणि केळी पाण्याजवळ लावली जातात. पाण्यात कमळंही वाढवतात. बेल हा पवित्र वृक्ष शंकराच्या मंदिर परिसरात लावलेला असतो. बेलाच्या पानांचं त्रिदल शंकराला वाहतात. त्रिदल म्हणजे ब्रह्मा (सृष्टीकर्ता), विष्णू (सांभाळकर्ता/पालनकर्ता) आणि महेश (संहार, दोष घालवणारा - शिव) अशी श्रद्धा आहे. पवित्र मानला जाणारा बेलाचा वृक्ष छायाही देतो आणि औषधी आहे. मंदिर-उद्यानात हा वृक्ष हिरवळीच्या कडेला लावतात.

पांढरा धोतरा या झुडुपाची फुलं, फळं कडू आणि विषारी असतात. वामन पुराणात पांढऱ्या धोतऱ्याच्या फळांचा हार करून शिवाला अर्पण करावा असं सांगितलं आहे. ही वनस्पती विषारी असली तरी आयुर्वेदात अनेक औषधांमध्ये त्याचा उपयोग करतात. या जातीच्या अनेक उप-जाती उद्यानात लावतात. गुलाबी, जांभळी फुलं येणारा धोतरा उद्यानाची शोभा वाढवण्यासाठी लावतात. धोतऱ्याप्रमाणे जमिनीत कुठेही वाढणाऱ्या रुईची फुलं शंकराला वाहतात. जांभळ्या फुलांना ‘रुई’ आणि पांढरी फुलं येणाऱ्या झाडाला ‘मांदार’ म्हणतात. ही दोन्ही झाडं औषधी आहेत. त्यांच्या धुरामुळे घातक जिवाणूंचा नाश होतो. ज्या जमिनीत प्रदूषण जास्त असते, तिथं हे झाड जोमानं वाढतं; त्यामुळं हल्ली पर्यावरणाऱ्या दृष्टीने प्रदूषण निर्देशक म्हणून या झाडाचा वापर उद्यानात करतात.

पिवळी कण्हेर - बिट्टी या सदाहरीत झुडुपाची पिवळी फुलं छोट्या तुतारीसारखी दिसतात. हिरव्या हिरवळीच्या कडेनं ही झाडं लावली तर उद्यानाची शोभा वाढते. परंतु या झाडाचे सगळेच भाग विषारी आहेत.

रुद्राक्ष या सदाहरित वृक्षाच्या फळांच्या माळा करून शंकराला वाहतात, गळ्यातही घालतात आणि जपमाळा म्हणूनही वापरतात. शिव-पुराणात रुद्राक्षाचं महत्त्व सांगितलं आहे. हा वृक्ष उद्यानामध्ये ओळीनं, कुंपणाच्या अलीकडं लावल्यास सावली मिळते. त्या छायेत ध्यानधारणा केल्यास मनःशांती मिळते. दक्षिण भारतात शंकराला सहसा रुद्राक्ष वाहत नाहीत. चंदनाच्या खोडाचं गंध-लेप मात्र शिवलिंग, शिवमूर्तीला लावण्याची परंपरा आहे. चंदन हा सदाहरित, मोठा वृक्ष आहे. ज्या मंदिर-उद्यानांचा परिसर विस्तीर्ण आहे, तिथं मोठ्या प्रमाणात हे वृक्ष लावतात. वृक्षाच्या खोडाचा मधला भाग- गाभा सुवासिक असतो. वृक्ष लावल्यानंतर जवजवळ तीस वर्षांनंतर गाभा सुवासिक होतो. 

शिवाला, विशेषतः महाशिवरात्रीला, बोरांचा प्रसाद दाखवतात. बोरं पौष्टिक आणि औषधी आहेत. हा वृक्ष उद्यानाच्या कुंपणाच्या जवळ, मंदिरापासून लांब लावतात, कारण त्यांची फळं खायला पक्षी, माकडं येतात.

शंकराच्या अनेक मंदिरांपैकी काही मंदिरांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. तमिळनाडूमधल्या तंजावरमध्ये ‘बृहदेश्वर’ हे एका दगडात कोरलेलं शिवमंदिर म्हणजे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरासमोरच्या नंदीची उंची तेरा फूट आणि लांबी १६ फूट आहे. या शिवमंदिराला २०१०मध्ये दोन हजार वर्षं पूर्ण झाली. मंदिर आणि मंदिर-उद्यानं विस्तीर्ण आहेत. हिरवळ, फुलांचे ताटवे आणि वृक्षांमुळे ते जास्त भव्य आणि सुंदर दिसते.

तमिळनाडूमधल्या अरियालूरमधलं ‘गंगाई कोंडा छोलापूरम्’ हे शंकराचं भव्य मंदिर दगडाचं असून त्यात अनेक सुंदर शिल्प आहेत. मंदिर-उद्यानाची व्यवस्था भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे आहे. मध्यप्रदेशातलं ‘खजुराहो मातंगेश्वर’ शिवमंदिर अनेक जुन्या मंदिरांपैकी एक आहे. त्याचा आराखडा आणि रचना बरीचशी ब्रह्म मंदिराशी मिळती-जुळती आहे, पण हे मंदिर भव्य आहे. मध्य भारतातलं सर्वात पवित्र मंदिर म्हणून हे ओळखतं जातं. मंदिरात आठ फूट उंचीचं, चमकत्या पिवळ्या चुनखडीचं शिवलिंग आहे. त्याला रोज दुधाचा अभिषेक करून बेलाची पानं आणि फुलांनी पूजा करतात. ओडिसामधल्या भुवनेश्वरमध्ये ‘लिंगराज’ हे मंदिर प्रसिद्ध आहे. हा देव पूर्वी आंब्याच्या वृक्षाखाली होता. लिंगराजाची शिव आणि विष्णू म्हणून पूजा केली जाते.

शैव मंदिराभोवतालची उद्यानं आता पुनर्विकसित केल्यामुळे जास्त आकर्षक वाटतात. मंदिराजवळ सुंदर वासाची नागचाफ्याची झाडं, तर मंदिरापासून लांब पाण्याच्या स्रोताजवळ नारळ, सुपारीची झाडं; शिवाय केळी, चिकू, फणस अशी फळझाडं; मोकळ्या जागेत हिरवळ आणि ठिकठिकाणी मोसमी फुलांचे ताटवे, तसंच तगर, अनंतर, कण्हेर, चांदणी ही नेहमी फुलणारी झाडं लावल्यामुळे ही उद्यानं जास्त आकर्षक आणि आल्हाददायक वाटतात.  
(क्रमश:)

(डॉ. कांचनगंगा गंधे या वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. 
ओंकार गरुड हे लखनौ येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे वरिष्ठ उद्यान अधिकारी आहेत.)

संबंधित बातम्या