विष्णू आणि सूर्य

डॉ. कांचनगंगा गंधे, ओंकार गरुड
सोमवार, 25 एप्रिल 2022

उद्यानरंग 

सृष्टीचा पालनकर्ता, सांभाळकर्ता विष्णू आणि सृष्टीचं चक्र सतत, एका लयीत फिरवणाऱ्या सूर्य देवाचं महत्त्व फार पूर्वीपासून आपल्या पूर्वसुरींना माहीत होतं. ह्या देवांच्या पूजेसाठी लागणारी फुलझाडं, वृक्ष-वेली, शोभिवंत फुलांची झुडपं मंदिर-उद्यानात वाढवली तर मंदिराचं पावित्र्य तर वाढतेच, शिवाय ज्या काळात या मंदिरांची उभारणी केली, बांधली गेली त्या काळची अनुभूती येईल.

पृथ्वीवरच्या सृष्टीचे पालनपोषण, संरक्षण, जतन करणाऱ्या विष्णूची मंदिरे आणि मंदिर-उद्याने भारतात फार पूर्वीपासून आहेत. विश्वाचे/सृष्टीचे वैश्विक कार्य सुरळीत चालण्यासाठी पालनकर्त्या विष्णूने पृथ्वीवर दहा अवतार (दशावतार) घेतले. मंदिरांत मूर्तीच्या रूपाने ही विविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात. मंदिर म्हणजे परमेश्वराची पूजा करण्याचे पवित्र स्थान, परमेश्वर आणि माणूस यांच्यातला दुवा, जिथे आंतरमन देवाशी भक्तिभावाने जोडले जाते ती वास्तू! निसर्ग म्हणजेत परमेश्वर असे आपली भारतीय संस्कृती सांगते. निसर्गातल्या पाना-फुलांनी, फळांनी देवाची पूजा करायची ही आपली परंपरा! प्रत्येक देवाला वेगवेगळ्या पाना-फुलांनी सजवायचे, पूजा करायची ही आपली रीत! त्यातूनच मंदिर-उद्यानं विकसित झाली.
विष्णू अवतार ‘धन्वंतरी’नी आयुर्वेदाची रचना केली. त्यात अनेक वनस्पतींचे औषधी गुणधर्म आणि त्याचे मानवाच्या दृष्टीने आरोग्याचे महत्त्व सांगितले आहे. सर्व औषधी वनस्पतींमध्ये ‘तुलसी’ चराचरांचे रक्षण करते म्हणून तिला पवित्र तर मानले आहेच, पण तिचे योग्य संगोपन, जतन होण्यासाठी आपल्या पूर्वसुरींनी विष्णूच्या पूजेत तिला मानाचे स्थान देऊन पृथ्वीचा रक्षणकर्ता विष्णूचा ‘तुलसी’शी स्वतंत्र संबंध जोडला. प्रत्येक विष्णू मंदिरात वृंदा (तुलसी) वन - ‘तुलसी राई’ असतेच. विष्णू मंदिर केंद्रस्थानी ठेवून सभोवताली राम तुळस, कृष्ण तुळस, वन तुळस, अमृता तुळस, कापूर तुळस, त्रिगुणी तुळस असे तुळशीचे अनेक प्रकार लावलेले आढळतात. पानांनी डवरलेली तुळस म्हणजे जणू जीवनदायिनी! इतर वनस्पतींप्रमाणे ती सूर्यप्रकाशात प्राणवायू हवेत सोडतेच, पण पहाटे (ब्राह्म मुहूर्त) आणि संध्याकाळी (सूर्यास्तानंतर) तुलसीच्या पानातून ‘ओझोन’ बाहेर पडतो, जो प्राणवायूचा स्रोत आहे. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे ‘ओझोन’चे विघटन प्राणवायू आणि ‘आण्विक ऑक्सिजन’ (नेसेंट ऑक्सिजन)मध्ये होते. नेसेंट ऑक्सिजन हवेतले सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड, नायड्रोजन डायॉक्साईडसारखे घातक वायू शोषून घेतो, हवा शुद्ध करतो. नेसंट ऑक्सिजन हवेत फार काळ राहू शकत नाही, तो दुसऱ्या नेसेंट ऑक्सिजन बरोबर एकत्र होऊन प्राणवायू (ऑक्सिजन) तयार करतो. त्यामुळे वातावरण शुद्ध राखण्यासाठी तुलसी फार मोलाची आहे. शिवाय तिच्यात असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे आणि शरीरात काही विकार उद्‍भवल्यास शरीर पूर्वस्थितीस आणण्यासाठी तुलसी अत्यंत उपयुक्त आहे. तुलसीचे हे महात्म्य ओळखूनच विष्णुमंदिराभोवती तुलसीचे राई-वृंदावन असते. त्यामुळेच उद्यानातील हवा स्वच्छ, प्रदूषण मुक्त राहते. म्हणूनच विष्णूला तुळशीच्या पानांचा हार घालण्याची घालण्याची प्रथा आहे. बेलुरच्या ‘चेन्नाकेशव’ मंदिरातही विष्णूच्या मूर्तीस हळदीचा लेप लावून तुळस आणि कमळाच्या माळा घालण्याची प्रथा आहे. या मंदिरातील विष्णूची मूर्ती ‘केशव’ रूपात आहे.

विष्णूला तुळशीच्या माळेप्रमाणे कमळाच्या माळाही पूजेच्यावेळी घालतात. विष्णूच्या नाभीमध्ये, पाण्यात उगवून वर आलेल्या कमळातून सृष्टीकर्ता ‘ब्रह्मा’ प्रकट झाले अशी आख्यायिका आहे. ब्रह्मदेवाने कमळाची स्वर्ग, पृथ्वी आणि आकाश अशा तीन भागात विभागणी केली. कमळ हे शुद्धता, पवित्रता, दैवी शक्ती, दैवी जन्म, समृद्धी, सौंदर्य, ज्ञान, शिक्षण, पुनर्जन्म आणि लक्ष्मीचे प्रतीक मानतात. विष्णू मंदिरासमोरच्या उद्यानात पुष्करणी, तळे किंवा तलावात निळी, तांबडी, गुलाबी, जांभळी किंवा पांढरी कमळे वाढवतात. उद्यानाचे सौंदर्य उद्यानाचं सौंदर्य त्यामुळे खुलूनही येते. तलावात वाढणाऱ्या कमळांमुळे तिथे गोड्या पाण्याची छोटी परिसंस्था तयार होते. पाण्यातले काही जलचर, पाणवनस्पती आणि मधूनमधून जलचरांना खाण्यासाठी येणारे पाणपक्षी यामुळे मंदिराभोवतीच्या उद्यानांत एक वेगळीच अनुभूती मिळते, उत्साह वाढतो.

पारिजात, रुई, आंबा, मोगऱ्याचे वेल, सोनचाफा, देवचाफा अशी झाडे, वृक्ष लावले तर विष्णूच्या पूजेसाठी रोज ताजी फुले मिळतात. कर्नाटकातल्या तामिळनाडूमध्ये श्रीरंगम येथे, कावेरी आणि कोल्लीडॅम नद्यांनी वेढलेल्या बेटावर ‘रंगनाथस्वामी’ ह्या भव्य मंदिरात विष्णूची स्वयंभू मूर्ती आहे. हे मंदिर १,१०० वर्षांपेक्षाही जुने आहे. वास्तुकला, स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आता, पूर्व दिशा सोडून इतर तीनही दिशांना सोनचाफ्याची झाडे लावलेली आहेत. त्याच्या आतल्या रांगेत ओळीने नारळाची झाडे लावली आहेत, त्यामुळे वारा अडवला जातो आणि धुळीचे प्रमाणही कमी होते. मंदिरासमोरच्या पुष्करणीमध्ये कमळे वाढविली आहेत. या उद्यानातली सोनचाफ्याची फुले आणि नारळ देवपूजेत वापरतात. मंदिर परिसरात असलेल्या रथ-शिल्पात विविध प्रकारची शिल्प आहेत. मध्यभागी आदिशेष/शेषनागावर बसलेल्या श्रीविष्णूच्या शिल्पाजवळ केळीचे घड लगडलेल्या झाडांचे शिल्प आहे. केळीचा नैवेद्य विष्णूला त्या काळापासूनच दाखवण्याचा प्रघात आहे. मंदिर परिसरात, मंदिराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत केळीची झाडे लावली असल्याचे उल्लेख सापडतात. रथ-शिल्पामध्ये आणि इतरही शिल्पांमध्ये भगवान विष्णूबरोबर पत्नी लक्ष्मी देवता आणि कमळाची शिल्प पाहायला मिळतात.

ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतीक असलेल्या कमळाशिवाय बकुळ, जुई, जाई, चमेली, मालती, वासंती, केवडा, चंपा अशी वासांची फुलेही विष्णूला पूजेवेळी वाहतात. केवड्याच्या पानांपेक्षा केवड्याच्या कणसाला (नर फूल) जास्त सुवास येतो. याशिवाय सीता अशोक, कदंब, आवळा यांचीही झाडे मंदिर-उद्यानात लावतात. देवपूजेला लागणाच्या फुलांबरोबर फळांचीही झाडे, वृक्ष परिसरात लावल्यामुळे वैविध्य जपले जाते; पर्यायाने येणारे पक्षी, कीटक, किडे, छोटे प्राणी यांमुळे मंदिर-उद्यानामध्ये परिसंस्थेचा समतोलही सांभाळता जातो आणि परिसराची शोभा वाढते.

ओडिशामधल्या पुरी शहरात जग्गनाथाचे मंदिर आहे. विष्णूचा आठवा अवतार श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा ह्या मंदिरात केली जाते. जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा या तीन मूर्ती मंदिर परिसरातल्या कडुलिंबाच्या लाकडापासून (दास लाकूड) तयार केल्याचे उल्लेख आहेत. जगन्नाथाच्या नाकातले अलंकार दवणा (नागदवणा) झुडपाच्या फुलांपासून केलेले आहेत. फुले सुगंधी आणि औषधी आहेत. त्या झाडाच्या वासाने किडे, डास जवळपास फिरकत नाहीत. मंदिर-उद्यानात दशमुळ ही औषधी वनस्पती लावलेली आहे. त्यापासून फुलुरी हे सुगंधी तेल काढतात, ते देवपूजेत वापरले जाते! देवाला फुलांचे हार करताना पूर्वी केळ्याच्या सोपटापासून तयार केलेला दोरा वापरत असत. आता फक्त सणाच्या वेळेस करण्यात येणाऱ्या हारांना हा दोरा वापरतात. मंदिर परिसरात बांबूच्या विविध प्रकारांची लागवड केलेली आहे. वासाची फुले, जास्वदींच्या फुलांचे अनेक ताटवे आहेत. याशिवाय दुर्मीळ होत असलेल्या झाडांची जोपासना उद्यानात केली जाते.

आंध्र प्रदेशातले तिरुपती बालाजी मंदिर ‘भूलोकीचा वैकुंठ’ या नावानेही ओळखले जाते. मंदिर-उद्यानातही विष्णूला प्रिय असलेली झाडे लावली आहेत. या मंदिर-उद्यान मूळ मंदिरापासून लांब आहे. इथे चंदनाची अनेक झाडे लावली आहेत. मूर्तीची पूजा पंचामृताने केली जाते. हे पंचामृत तिथे असलेल्या गोशाळेत तयार केले जाते. याशिवाय सुगंधी फुले, तुळशीचे पूजा केली जाते. बालाजीच्या कपाळावर कापराच्या पावडरीने तयार केलेले गंध लावतात. यासाठी कापराच्या झाडांचे जतनही या मंदिराकडून केले जाते. या मंदिरात पूजेनंतर होणाऱ्या निर्माल्याचे खत केले जाते, त्यामुळे त्या परिसरातील मंदिर-उद्याने सतत हिरवीगार आणि टवटवीत दिसतात.

सृष्टीचे चक्र ज्याच्यामुळे अनादि काळापासून आजतागायत त्याच लयीत सतत फिरत आहे आणि अजूनही अबाधित आहे, आणि सूर्याची महती आपल्या पूर्वसूरींनी जाणली. सूर्य हाच पृथ्वीचा आणि सृष्टीचा कर्ता करविता आहे याची जाण आपल्या पूर्वसूरींना, ऋषिमुनींना होती. सूर्याची उपासना करण्यासाठी सूर्य मंदिरे बांधली. यात सूर्यदेवतेची पूजा केली जाते. ओडिशातल्या बंगालच्या उपसागराजवळ पुरी जिल्ह्यातल्या कोणार्कमध्ये असलेले सूर्यमंदिर हे सर्वात जुने सूर्यमंदिर म्हणून ओळखले जाते! पूर्वी ते चंद्रभागा नदीच्या जवळ होते, असे पुरावे पुरातत्त्व विभागाला आणि जीवाश्मांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना मिळाले. या परिसरात पूर्वी नारळ-जातीतली अनेक झाडे होती. शिवाय तिथे दलदलीचा भाग होता आणि तो भाग जलपर्णी आणि इतर पाणवनस्पतींनी भरलेला होता. शास्त्रज्ञांच्या मते तिथे चंद्रभागा नदीचे अस्तित्व होते! त्यामुळे समुद्राचे खारे पाणी आणि नदीचे गोडे पाणी सूर्यमंदिर परिसरात होते! ह्या मंदिर परिसरात खाऱ्या पाण्याची आणि गोड्या पाण्याची अशा दोन्ही परिसंस्था होत्या.

सूर्य हा २७ नक्षत्रे आणि १२ राशींचा अधिपती. सूर्य मंदिर परिसरात त्या नक्षत्रांशी आणि राशींशी संबंधित वृक्ष लावले पाहिजेत. आवळा, औदुंबर, जांभूळ, खैर, कृष्ण अगरू, बांस (बेन, बांबू), अश्वत्थ, नागकेशर, वड, पिंपळ, शाल्मली, साग, फणस, शमी, कदंब आंबा, नीम, धूप, सीता अशोक असे वृक्ष लावले पाहिजेत. मंदिर-उद्यानात नक्षत्र वन लावायचे झाल्यास, खगोलशास्त्राचा आधार घेऊन त्याची आखणी केली तर ते योग्य होईल. कोणते नक्षत्र उद्यानाच्या कोणत्या जागेवर/स्थानावर उभे राहिले असता दिसते, तिथे त्या नक्षत्राचा वृक्ष लावला तर तो नक्कीच चांगला वाढेल हेच शास्त्रीय दृष्ट्याही बरोबर आणि योग्य आहे. कोणार्कच्या सूर्यमंदिराच्या परिसरातल्या समुद्राच्या बाजूच्या जागेत आता सुरूची झाडे लावली आहेत. या झाडाच्या खोडात वायची सिलिका आहे. समुद्रावरून येणाऱ्या खाऱ्या वाऱ्याची गती सुरूच्या झाडांमुळे कमी होईल आणि मंदिराच्या दगडांनाही संरक्षण मिळेल; कारण मिठाचे खारे कण शोषून घेण्याची क्षमता सुरूच्या झाडांमध्ये आहे. मंदिराचे सौंदर्य वाढवण्यासाठी शोभिवंत, रंगीत फुलझाडे आणि लॉन लावल्यामुळे कोणार्क मंदिराचे सौंदर्य अजून वाढले आहे.

जम्मू काश्मीरमधले मार्तंड सूर्य मंदिर जगप्रसिद्ध आहे. या भागात नोव्हेंबर ते मार्चपर्यंत बर्फ पडत असल्यामुळे या उद्यानात सफरचंद, अक्रोड आणि चिनार वृक्ष लावते आहेत. सूर्य मंदिरांचे प्रवेशद्वार नेहमीच पूर्व दिशेला असते. गुजराथमधील मोढेरा, मार्तंड आणि कोणार्क सूर्यमंदिरांशिवाय भारतात अनेक सूर्य मंदिरे आहेत. त्या त्या भागातली झाडे, वृक्ष, वृक्ष वेली, रंगीत फुलझाडे लावली तर मंदिरे आणि उद्यानांमधले अनुबंध जास्तच दृढ होतील.

(डॉ. कांचनगंगा गंधे या वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. 
ओंकार गरुड हे लखनौ येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे वरिष्ठ उद्यान अधिकारी आहेत.)

संबंधित बातम्या