बौद्ध शैलीतील उद्याने

डॉ. कांचनगंगा गंधे, ओंकार गरुड
सोमवार, 9 मे 2022

उद्यानरंग 

निसर्गाशी एकरूप होणे, सांस्कृतिक महत्त्व असलेले वृक्ष जोपासणे, वनस्पती वैविध्य राखणे, पर्यावरण शुद्ध राखणे, मनःशांती आणि ध्यानधारणेसाठी योग्य झाडांची निवड करून शुद्ध वातावरण राखणे या बुद्धांच्या शिकवणीला अनुसरून स्तूप, विहार, मठ अशा उपासना स्थळांमध्ये बौद्ध शैलीतील उद्यानांची उभारणी भारतात अनेक ठिकाणी केलेली आहे.

ऊर्जेचा स्रोत असलेल्या आणि प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या वृक्षांच्या छायेत तन मन शुद्ध होते. निसर्गाशी संवाद साधला जाऊन प्रसन्नता लाभते, आत्मिक आनंद मिळतो; याची अनुभूती, प्रचिती अश्वत्थ वृक्षतळी तप करणाऱ्या गौतम बुद्धांना आली. त्यांना बौद्घत्व प्राप्त झाले. ज्ञानाच्या या बोधीवृक्षाच्या सान्निध्यात गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली. हा अश्वत्थ बोधीवृक्ष बिहारच्या बोधगया इथल्या महाबोधी विहाराच्या पश्चिमेला आहे. गौतम बुद्धांनी बौद्ध मताचा पहिला उपदेश उत्तर प्रदेशमधल्या सारनाथमध्ये केला. त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी भारतात अनेक ठिकाणी बौद्ध मताचा प्रसार सुरू केला. अहिंसा, सत्य, वैराग्य आणि निसर्गाविषयीची कृतज्ञता यांना प्रोत्साहन देणारी गौतम बुद्धांची शिकवण सार्वत्रिक झाली. गौतम बुद्धांनी उत्तरप्रदेशातल्या ‘श्रावस्ती’मध्ये सर्वात जास्त चातुर्मास व्यथित केले. या काळात अनेक अनुयायांना बौद्ध मताची शिकवण समजावून सांगितली.

सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि धर्माला राजाश्रय दिला. भगवान बुद्धांच्या आयुष्यात ज्या ठिकाणी महत्त्वाच्या आणि मोठ्या घटना घडल्या, त्या ठिकाणी गौतम बुद्धांचा आदरार्थ सम्राट अशोकाने स्तूप, विहार, मठ अशी उपासना स्थळे उभी केली. त्यात बोधीवृक्षाच्या फांद्या, अश्वत्थ वृक्ष वाढवून त्याचे संगोपनही केले. बोधगया, सारनाथ, श्रावस्ती, कुशीनगर या उपासना स्थळांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा आहे. उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमध्ये सम्राट अशोकाने स्तूप आणि तीर्थस्थळ बांधले. या चार पवित्र स्थानांशिवाय भारतात अनेक तीर्थस्थळे बौद्ध मंदिर म्हणून प्रसिद्ध आहेत. लुंबिनी (नेपाळ-भारत सीमेजवळ, गौतम बुद्धांचा जन्म), लेहमधले ‘रेड मैत्रेय मंदिर’- जिथे गौतम बुद्धांचा उंच पुतळा एका भव्य पर्वतावर आहे. आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य आणि आध्यात्मिकता यांचा सुरेख संयोग आहे.

शांत जागा, प्रसन्न वातावरण, निसर्ग सान्निध्यात राहून जप, ध्यानधारणा, अध्यात्म, प्रार्थना यासाठी पूरक उद्याने सम्राट अशोकाने वाढवली. सर्वच बौद्ध उद्यानांमध्ये जमिनीपासून काही उंचीवर संगमरवरी सपाट दगडावर किंवा गोलसर, उभट, चपटे, गुळगुळीत दगड एकमेकांवर रचून त्यावर गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केली जाते. मूर्तीसमोर तळे, तलाव असतो किंवा ते नसेल तर मोठ्या पसरट भांड्यात पाणी ठेवण्याची प्रथा आहे. पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या पाण्याला पुरातन काळापासूनच महत्त्व आहे! पृथ्वीवरचा पहिला सजीव जन्माला आला तो पाण्यातच. शुद्धता, शांतता आणि पारदर्शकता यांचे प्रतीक म्हणजे पाणी! पाणी हेच सर्व सृष्टीचे ‘जीवन’ आहे. निसर्गातल्या जवळ जवळ सर्वच गोष्टी पाण्यात सामावल्या जातात, पाणी सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे वाहत राहते. या पाण्यात विविध रंगांची कमळे वाढवणे हे बौद्ध उद्यानाचे आणखी एक वैशिष्ट्य! कमळ म्हणजे शुद्धता, पवित्रता, पुनर्जन्म आणि लक्ष्मीचे प्रतीक! कमळ चिखलात उगवले तरी ते त्याच्यातील गुणधर्मांमुळे जोमाने वाढते; त्याचा डौलदारपणा, मोहक सौंदर्य देखणे असते म्हणून मन प्रसन्न होते!

बौद्ध उद्यानांमध्ये ध्यानधारणा, जपजाप्य, मनःशांतीसाठी पवित्र आणि धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व असलेले वृक्ष लावतात. उद्यानांचे सौंदर्य वाढवण्यासाठी विस्तीर्ण हिरवळ, हिरवळीच्या कडेला हिरवेगार आकर्षक बैठे कुंपण, फुलझाडांचे ताटवे, ठिकठिकाणी वाढवलेल्या विविध तऱ्हेच्या बांबूच्या बेटांमुळे उद्यानाची शोभा वाढते. याशिवाय काही फळझाडे, प्रत्येक ऋतू निरनिराळे बहरणारे वृक्ष, त्याभोवती ध्यानधारणेसाठी बांधलेले पार, पायवाटा आणि असे बरेच काही स्तूपाभोवती, मुख्य मठाच्या आवारात लावल्यामुळे बौद्ध उद्याने सौंदर्य, मनःशांती आणि शुद्ध, निकोप, प्रसन्न वातावरण यांचा त्रिवेणी संगमच! 

मनःशांती आणि ध्यानधारणेसाठी योग्य अशा अश्वत्थ-बोधीवृक्षाला जेवढे सांस्कृतिक महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीनेही आहे. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. याच्या पानात बाष्प धरून ठेवण्याची क्षमता अधिक असल्यामुळे पिंपळाची सावली थंडगार असते. शिवाय धुळीचे कण, वातावरणातले घातक वायू शोषून घेण्याची क्षमता असल्यामुळे या वृक्षाभोवती शुद्ध हवा असते. पिंपळाचे एक झाड दरवर्षी वातावरणातला १६४५.३३५ किलो कार्बन खोडात साठवू शकते. पानात हरित द्रव्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे कर्बग्रहणाच्या क्रियेत बाहेर पडणाऱ्या प्राणवायूचे प्रमाणही वाढते. सहाजिकच भोवतालचे वातावरणही शुद्ध होते. शिवाय पानात असलेले ‘आयसोप्रिन’ हे सेंद्रिय संयुग प्राणवायूचा साठा असलेल्या ओझोन थराचे गुणधर्म कमी होऊ देत नाही. पिंपळ जरी सदाहरित वृक्ष असला तरी त्याची पानगळ होते, पण अगदी थोड्याच अवधीत फांद्यांवर कोवळ्या पानकळ्या दिसतात. या चविष्ट पानांचा आस्वाद घेण्यासाठी छोटे मोठे किडे, मुंग्या, मुंगळे, पोपट, साळुंक्यांसारखे पक्षी वृक्षावर दिसतात. कोवळी, मुलायम, लुसलुशीत, तांबूस पालवी सूर्योदयाच्यावेळी जास्त चमकते, तर सूर्यास्ताच्यावेळी ती सोन्याची असल्याचा भास होतो. पिंपळाच्या जमिनीलगतच्या खोडाला धुमारे फुटतात, ते वाढतात त्यामुळे अश्वत्थ ‘चिरंजीवी’ आहे.

विस्तीर्ण हिरवळ हे बौद्ध उद्यानाचे आणखी एक वैशिष्ट्य! पिवळ्या आणि निळ्या रंगाचे मिश्रण असलेला, डोळ्यांना शांतता देणारा हिरवा रंग! हिरवा रंग जीवन, नावीन्य, पुनर्जन्म यांचे प्रतीक आहे. तर पिवळ्या रंगात प्रतिष्ठा, गौरव ऊर्जा भरलेली आहे आणि निळ्या रंगात आकाशाएवढी अथांगता! बौद्ध मतांशी सहमत असलेला, शांतता मनःशांती देणारा रंग!

हिरवळीच्या शांत वातावरणात सावली देणारे, सांस्कृतिक महत्त्व असलेले सदाहरित वृक्ष आणि त्याभोवती ध्यानधारणेसाठी पार बांधणे हे बौद्ध उद्यानाचे आणखी एक वैशिष्ट्य! ज्याच्या नावातच दुःख नष्ट करण्याचे सामर्थ्य आहे असा ‘सीता अशोक’ हा मध्यम उंचीचा, सदाहरित वृक्ष हिरवळीच्या मध्यभागी, चारही बाजूंना किंवा एका ओळीत लावला तर उद्यानाचे सौंदर्य वाढते. सीता अशोकाच्या पालवीचे बदलते रंग फार सुंदर दिसतात. सुरुवातीला पांढरट-करडा, नंतर तांबूस-जांभळट-किरमिजी असे रंग बदलत जाऊन पोपटी आणि नंतर हिरवा रंग येतो. एप्रिल-मेच्या उन्हाळ्यात नारिंगी-लालसर फुलांचे, मंद सुवासाचे गुच्छ येतात तेव्हा आसमंत विलक्षण दिसतो! भुंगे, सूर्यपक्षी असे किडे, पक्षी मध खायला येतात तेव्हाही वातावरण सचेतन असल्याची जाणीव होते.

सदाहरित आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला नीम- कडुलिंब वातावरणात गारवा निर्माण करतो. हवेतले दूषित वायू शोषून घेण्याची क्षमता असल्यामुळे मनःशांतीसाठी आवश्यक असलेली शुद्ध हवा कडुलिंबाच्या भोवती असते. याशिवाय रुंद, पण लांबट पानांचा मध्यम उंचीचा अर्जुन वृक्षही उद्यानात लावतात. वृक्षाच्या शेंड्याकडे पाने थोडी मोठी असतात आणि पसरलेल्या फांद्यांमुळे त्याची सावली रुंद, भव्य असते. बौद्ध शैलीच्या उद्यानात ‘साल’ वृक्षाला महत्त्व आहे. असे म्हणतात की साल वृक्षाच्या छायेत गौतम बुद्धांचा जन्म आणि मृत्यूही झाला. हा वृक्ष उंच आणि सरळसोट वाढतो आणि टोकाकडे पानांचे छत्र असल्यासारखे दिसते.

हिरवळीच्या कडेला, मधूनच पायवाटा केलेल्या असतात. पायवाटांवर कुंती (कामिनी), पुत्रंजीवा, मेंदी अशा काही झाडांची कुंपणे वाढवतात. कुंती वृक्षाच्या फांद्या एकात एक गुंतलेल्या असल्यामुळे त्याचा उपयोग कुंपण म्हणून करतात. या वृक्षाच्या फांद्या कापून छोटे झुडूपही तयार करतात. याची पाने गडद हिरव्या रंगाची आणि चकचकीत असतात. संत्र्याच्या वासासारखी, पण पांढरी मोतीया रंगाची फुले एप्रिल-मेमध्ये येतात, तेव्हा कुंतीचे कुंपण पांढऱ्या फुलांनी भरून जाते, तेव्हा मन उल्हसित होते. मनाची एकाग्रता वाढते. पुत्रंजीवा या छोट्या वृक्षांच्या फांद्या लोंबत्या असतात, पण तांबट आणि दाट पानांमुळे छोटे कुंपण करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. फुलांचा मंद सुवास येणाऱ्या आणि हिरव्या पानांच्या मेंदीचे कुंपण खूप दाट वाढते. शिवाय फांद्या छाटून झाडाला हवा तो आकारही देता येतो. फुले आणि फळे खायला पक्षी येतात. त्यामुळे ध्यानधारणेसाठी नैसर्गिक शांत, पोषक वातावरण मिळते! ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी उद्यानाच्या कडेला एका रांगेत चकचकीत, हिरव्या रंगाची पाने असलेली लिंबाची झाडे लावतात.

विस्तीर्ण हिरवळीत भगवी, पांढरी, तांबडट- जांभळट फुले येणाऱ्या हंगामी फुलांचे ताटवे वाढवतात. भगव्या रंगाची फुले वैराग्य दर्शवते! तांबड्या आणि पिवळ्या रंगांच्या मिश्रणाने तयार झालेला भगवा रंग वैराग्याबरोबर ऊर्जा, आनंद, माया, दया, सर्जनशीलता आणि संतुलन यांचे द्योतक आहे. बौद्ध परंपरेत भगव्या रंगाइतकेच पांढऱ्या रंगाला महत्त्व आहे. पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहेच, शिवाय या रंगातून सकारात्मक ऊर्जा मिळते. शुद्धता, निष्पापपणा, चांगुलपणा, तेज यांचे द्योतक आहे. तांबडट-जांभळ्या रंगांची फुले धैर्य, गती आणि आनंद देतात. बौद्ध विचारांमध्ये मातीला महत्त्व आहे. संजीव सृष्टीचे, विशेषतः वनस्पतींचे जीवनचक्र सतत कार्यरत ठेवण्याचे काम मातीतले सूक्ष्म जिवाणू आणि मातीत लपलेली जीवसृष्टी करत असते. बौद्ध शैलीच्या उद्यानात रंगीत फुलझाडे लावण्यासाठी मातीच्या कुंड्यांचाही वापर करतात.

भारतात आणि परदेशातही बौद्ध मंदिरे आणि बौद्ध शैलीतील उद्याने आहेत. आग्नेय आशियातून बौद्ध धर्माचे अनुयायी भारतातील मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी येतात. बोन्साय कलेचा उगमही बौद्ध मठात झाल्याचे उल्लेख आहेत. बौद्ध मतांच्या विचारसरणीला अनुसरून बौद्ध उद्याने भारतात अनेक बौद्ध मंदिरांत, विशेषतः सारनाथ, सांचीच्या वैशिष्ट्यपूर्ण स्तूपांभोवती वाढवली आहेत. 

पाश्चात्त्य देशांमध्ये बौद्ध उद्यानांमध्ये गुळगुळीत, लांबट, भव्य दगड, छोटे गुळगुळीत दगड वापरून केलेले विविध आकार, दगडांचे वैशिष्ट्यपूर्ण पण त्या जागेचे वेगळेपण दाखवणारे दिवे आणि प्रादेशिक झाडे, वृक्ष लावून बौद्ध मताच्या उद्यानाची वैशिष्ट्ये जपलेली आहेत.

संबंधित बातम्या