राष्ट्रपती भवनातील मुघल शैलीची उद्याने

डॉ. कांचनगंगा गंधे,  ओंकार गरुड
सोमवार, 20 जून 2022

राष्ट्रपती भवनाच्या सभोवतालच्या उद्यानांचा शिल्पकार सर एडविन ल्युटेन यांच्या पत्नीनं या उद्यानाला ‘स्वर्गीय नंदनवन’ म्हटलं आहे. उद्यानाचं लावण्य वर्णनापलीकडचं आहे. शिस्तबद्ध, भौमितिक उद्यानं, हिरवा रंग आणि विविध रंगफुलांची उधळण डोळ्यांचं पारणं फेडते.

दिल्लीमधल्या राष्ट्रपती भवनाची वास्तू अतिशय देखणी आणि वास्तुकलेची एक उत्कृष्ट कलाकृती! या कलाकृतीला जिवंतपणा आलाय, तो वास्तूभोवतालच्या उद्यानांमुळं! ही उद्यानं म्हणजे राष्ट्रपती भवनाचा आत्मा आहे. जम्मू काश्मीरमधल्या मुघल शैलीतल्या उद्यानांचं बरंचसं प्रतिबिंब यात दिसतं. कल्पकतेनं केलेली भूमितीय आकारातली प्रमाणबद्ध रचना, त्यातले पाण्याचे पाट, त्याभोवतालची हिरवळ, त्यात मधून मधून लावलेली हिरवीगार, लहान- मोठी विशिष्ट आकार देऊन वाढवलेली झाडं, हिरवळीच्या कडेला फुलांचे ताटवे, त्या ताटव्यांना फुलझाडं लावूनच वाढवलेली किनार आहे. तर काही ठिकाणी इंग्लिश उद्यानकलेचा प्रभाव दिसतो, म्हणजेच रंगीबेरंगी फुलझाडं नैसर्गिकरीत्याच वाढली आहे असे वाटावे अशा पद्धतीने त्यांची केलेली पेरणी, मांडणी, विविध प्रकारची कारंजी इथं पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षांत, विशेषतः भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींनी त्यांच्या कारकिर्दीत विविध प्रकारची आणि काळाला अनुरूप अशा उद्यानांची निर्मिती केली. भारतीय परंपरेतल्या पवित्र आणि आध्यात्मिक वैशिष्ट्य असलेल्या वनस्पतींचं उद्यान, नक्षत्र उद्यान, कॅक्टस उद्यान, बोन्साय उद्यान, जैवविविधता उद्यान (बायोडायव्हर्सिटी पार्क), टेरेस गार्डन, म्युझिकल गार्डन, औषधी वनस्पती उद्यान अशी उद्यानं राष्ट्रपती भवनाच्या आवारात पाहणं म्हणजे नेत्रपर्वणीच! 

राष्ट्रपती भवनाच्या परिसरातली सौंदर्यपूर्ण मुघल शैलीतली उद्यानं तयार करण्यात इंग्लिश वास्तुविशारद सर एडविन ल्युटेन यांचा सिंहाचा वाटा आहे. आयताकृती/चौकोनी मुख्य उद्यानं, लांबच्या लांब पसरलेलं ‘परदा’ उद्यान आणि गोलाकार (खोलगट) उद्यान, ही तीन प्रमुख उद्यानं सुरुवातीपासूनच (व्हॉइस रॉय हाऊस, १९२९) राष्ट्रपती भवन परिसरात आहेत.

चौकोनी मुख्य उद्यानात उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम बाजूला पाण्याचे अरुंद पाट (कॅनॉल) फुलीच्या आकारात आहेत. हे पाणी इतकं स्वच्छ, नितळ आणि स्थिर आहे की पाणी गोठलंय की काय, असं वाटतं. इतकंच नाही तर कधी कधी जवळच्या वास्तूचं आणि ताटव्यातल्या फुलझाडांचं प्रतिबिंब त्यात पडतं तेव्हा मृगजळाची आठवण येते. दोन्ही बाजूचे पाट जिथं एकत्र मिळतात, तिथं फुलीच्या मध्यभागी लाल दगडाच्या सहा कमळासारख्या आकारातून जवळजवळ बारा फूट उंच उडणारं कारंजं आहे. पाण्याच्या आवाजानं मन उल्हसित होतं, नवीन ऊर्जा मिळते. कारंजं म्हणजे जीवनचक्राचं प्रतीक आहे. कारंज्यातलं पाणी सुरुवातीला स्थिर, शांत आहे असं वाटत असतानाच उसळून वर येतं, धारा एकमेकांत मिसळतात, खाली जातात आणि पुन्हा उफाळून पाणी वर येतं! उंच गेलेलं पाणी दगडी कमळांच्या पाकळ्यांवरून वाहतं तेव्हा त्याचं सौंदर्य अजूनच विलक्षण दिसतं! सूर्योदय, सूर्यास्ताच्या उन्हातलं त्याचं इंद्रधनुषी लावण्य डोळ्यांना सुखावणारं असतं.

पाण्याच्या पाटाच्या बाजूला दुर्वांचे, हिरवळीचे गालिचे डोळ्यांना थंडावा देणारे, सुखावणारे! निसर्गाच्या रंगात एकरूप होणारे गालिचे! नवजीवन, नवनिर्माण, पुनरुज्जीवन, सुपीकता, सुंदरता आणि नवऊर्जेशी नातं असलेले हिरवेगार गालिचे, हे या उद्यानांचं वैभव. त्या गालिच्यांना किनार आहे ती रंगीबेरंगी, मनमोहक फुलझाडांची. ही किनार, हे वाफे शिस्तबद्ध, कधी एकरंगी फुलांचे, तर कधी रंगीबेरंगी फुलांनी डवरलेले!

काही वाफ्यांमध्ये विविध रंगांच्या फुलझाडांची लागवड शंकूच्या (पिरॅमिड) आकारात केली असल्यामुळं ते वाफे आकर्षक दिसतात. मुघल शैलीतली फुलझाडांची शिस्तबद्ध मांडणी आणि इंग्लिश उद्यान शैलीतही नैसर्गिक मांडणी, यांचा सुंदर मिलाफ इथं पाहायला मिळतो.  

कमी, अधिक उंचीची फुलझाडांची निवड करताना फुलांचा बहर, फुलांचा आकार, फुलांची रंगसंगती अशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो. वाफ्यात जेव्हा फुलझाडं फुलतात, तेव्हा विविधरंगी लाटा मोहात पाडतात. वाफ्यातल्या फुलांचा रंगमंच वर्षभर बदलता असतो, त्यासाठी देश-विदेशातून फुलझाडं मागवली जातात. हंगामी फुलझाडं, वार्षिक, द्वैवार्षिक अशांची सुरेख सांगड घातल्यामुळं राष्ट्रपती भवनातलं उद्यान सतत फुललेलं दिसतं, चैतन्यानं भरलेलं असतं. पिवळ्या फुलांचा कॅलेन्ड्युला; पांढरा, केशरी, जांभळा, गुलाबी रंगाचा अॅन्टीऱ्हीनम; पांढरा अॅलिसम, नाजूक, तलम पाकळ्यांची विविध रंगातली पॉपी; उभ्या दांड्यावर जांभळी, पांढरी, गुलाबी फुलं येणारा लार्कस्पर; पिवळा, गुलाबी, पांढरा, त्यावर गुलाबी रेषा असणारा गझिनिया; विविध रंगातला दांड्याच्या टोकावर येणाऱ्या टप्पोऱ्या फुलांचा जरबेरा, हाताच्या पंजाएवढा मोठा असलेला रंगीबेरंगी ‘स्पेथ’ असलेला अॅन्थुरियम; गुलाबी, पांढरी, किरमिजी, पिवळी, लाल फुलं येणारा पोर्ट्युलाका; बारीक फुलांचा गुच्छामध्ये पांढरी, जांभळी, गुलाबी फुलं येणारा व्हर्जिना; फुलं आपल्याकडेच बघत आहेत का काय असं वाटणारा, जणू नाक, डोळे असणारा पॅन्सी, अशी अनेक तऱ्हांची फुलझाडं वाफ्यात लावली जातात. याशिवाय डेलिया, अॅस्टर, कार्नेशन, शेवंती, ल्युपिन, झेंडू, नेमेसिया, राल्व्हिया, कॉसमॉस, स्वीट विल्यम, स्वीट पी, सिनेरारिया, ट्रायफोलियम अशी अनेक प्रकारची वार्षिक फुलझाडं उद्यानांमध्ये बघायला मिळतात. ट्युलिप, नार्सिसस, फ्रेसिया, ग्लॅडिओला, एशियाटिक लिली, आयरिस, डॅफोडिल, आयाक्सिया, रॅननक्युलस असा नेत्रदीपक, दिमाखदार फुलसोहळा थंडीच्या मोसमात रंगलेला असतो.

उद्यानात फुलांमुळे सतत विविध रंगांची उधळण होत असली, तरी उद्यानाचा गाभा असलेली हिरवाई टिकून राहिली आहे ती लांबच्या लांब पसरलेली हिरवळ, सदाहरित वृक्ष आणि वेलींमुळे!

मादक वासाची फुलं येणाऱ्या बकुळीची झाडं पाण्याच्या पाटाच्या बाजूनं आणि उद्यानात लावली आहेत. झाडांची मशरूमसारखी छाटणी केल्यामुळं बागेला वेगळीच ‘गहराई’ आली आहे.

उंच, सरळसोट वाढणारे सायप्रस वृक्ष आणि रुंद व हिरव्या पानांचे चायना ऑरेन्ज वृक्ष एकाआड एक लावले आहेत. सायप्रस वृक्ष मृत्यू आणि त्यानंतरच्या जीवनाचं प्रतीक मानतात, तर चायना ऑरेन्ज हे नवनिर्माण आणि जीवनातल्या चांगल्या, आनंददायी उत्सवाचं प्रतीक मानतात. जीवन म्हणजे नवनिर्माण, वाढ आणि मृत्यू हे या वृक्षलागवडीतून ध्वनीत होतं! याशिवाय दगडी तुळयांचे आकर्षक कुंज आणि सदैव टवटवीत आणि हिरवेगार असणारे पुत्रजींवाचे छोटेखानी वृक्ष हे स्वास्थ आणि शांततेची अनुभूती देतात. याशिवाय थुजा, गोल्डन ड्युरांटा यांमुळे बागेची शोभा अवर्णनीय होते. रातराणी, मोगरा, मोतिया, जुई, गुलाबाच्या वासानं उद्यानाचा आसमंत सुवासानं भरून जातो. पारिजात, पेट्रीया (निळी - जांभळी फुलं), संक्रांत वेळ (भगव्या रंगाची फुलं), हेडेरा, टिकोमा, रंगून क्रिपर, वेली गुलाबांमुळं उद्यान सतत टवटवीत दिसतं!

फुलांचा राजा असलेल्या गुलाबाचं उद्यान हे राष्ट्रपती भवनातल्या उद्यानाचं आणखी एक वैशिष्ट्य! या उद्यानाला सर्व बाजूंनी बारा फूट उंच भिंत आहे, त्यामुळे हे उद्यान बंदिस्त आहे. म्हणूनच याला ‘परदा’ उद्यान असंही नाव आहे. उद्यानाच्या मध्यभागी लाल दगडाची मोठी कमान आहे. त्यावर वेली गुलाब, पेट्रीया, बोगनवेल असे सुंदर फुलांचे वेल पसरवले आहेत. उद्यानात गुलाबाच्या १५९ प्रकार - जाती वाढवल्या आहेत. आकर्षक, सुगंधी आणि वैशिष्ट्यपूर्ण गुलाब जाती एकत्रित पाहाव्यात त्या त्याच उद्यानात! अँडोरा, ब्लॅक लेडी, मृणालिनी, ताजमहल, आयफेल टॉवर, बेलामी, ओक्लाहामा (ब्लॅक रोझ), पॅराडाईज, ब्लू मून, लेडी एक्स, राजा राम मोहन रॉय, लिंकन, जवाहर, मदर टेरेसा, जॉन एफ केनेडी, एलिझाबेथ, अर्जुन, भीम त्या त्यापैकी काही जाती! हिरवा गुलाब आणि केशरी-गुलाबी रंगाचा अॅन्जेलिक गुलाब हे आणखी वैशिष्ट्य!

‘गोलाकार, खोलगट, फुलपाखरू उद्यान’ म्हणजे राष्ट्रपती भवनाच्या परिसरातील शिरपेच! या उद्यानाच्या मध्यभागी एक कारंजं आहे, त्याभोवती कुंड्यांमधून फुलझाडं लावली आहेत. लांबून बघितलं तर पंख पसरलेली फुलपाखरं आहेत असा भास व्हावा, अशा प्रकारे कुंड्यांची रचना केली आहे. कारंज्याभोवतीच्या तळ्यात कमळं आहेत. तळ्याभोवती कॅलेन्ड्युला, झेंडू लावल्यामुळे या गोलाकार उद्यानाला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त होतं! या उद्यानात छोट्या झाडांपासून उंच झाडांपर्यंत बरीच झाडं लावली असली, तरी ती सर्व शिस्तीत लावल्यामुळं मुघलशैली उद्यानांचं वैशिष्ट्य इथंही जपलं आहे. या उद्यानात फुलझाडांचे पार-कट्टे असावेत असं वाटतं. काही सुगंधी, आकर्षक फुलांचे ताटवेही दिसतात. गोलाकार उद्यानात छोटे छोटे गोलाकार वाफे करून त्यात रंगीत फुलझाडं लावल्यामुळं हे उद्यान वैशिष्ट्यपूर्ण झालं आहे. त्यात मुख्यत्वेकरून हंगामी फुलझाडं आहेत, यात फ्लॉक्स, पॅन्सी, अॅलिसम निळा, पांढरा आणि गुलाबी छटा असलेला मॅथीओला (स्टॉक) हे फुलझाडांपैकी अतिशय देखणे फूल गोलाकार उद्यानात लावलेलं आहे. याशिवाय डेलिया, जास्मीन, डेझी, शेवंती, ट्युलिप अशी अनेक फुलझाडं लावली आहेत. या उद्यानात अनेक सुवासिक झाडं आहेत, त्यांच्या फुलांपासून अत्तर काढण्यासाठी छोटा कारखानाही इथं आहे. मुघल शैलीतली ही तीनही उद्यानं राष्ट्रपती भवनाचं नुसतं सौंदर्यच वाढवत नाहीत, तर जगभरातल्या उत्कृष्ट उद्यानांमध्ये याची गणना केलेली आहे. (क्रमश:)

(डॉ. कांचनगंगा गंधे या  वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. ओंकार गरुड हे लखनौ येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे वरिष्ठ उद्यान अधिकारी आहेत.)

संबंधित बातम्या