सिनेमाचा मास्टर क्लास 

डॉ. केशव साठये
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

विशेष

भारतीय चित्रपटसृष्टी ही जगभरात एका गोष्टीमध्ये पुढे आहे आणि ती म्हणजे चित्रपटांची संख्या. इथे दरवर्षी वीस भाषांमधून सुमारे १५०० ते १७०० चित्रपट  तयार होतात. ही सगळी उलाढाल सात हजार कोटी रुपयांची आहे. ब्लॉक बस्टर चित्रपटांबरोबर, समांतर, नव्या प्रवाहातल्या सिनेमांनाही लक्षणीय प्रेक्षकवर्ग आहे; याचे श्रेय काही प्रमाणात तरी पुण्याच्या ‘फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या संस्थेला द्यायला हवे. याचे कारण चित्रपटसृष्टीत नावाजलेले गेलेले अनेक लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ इथं घडले, आणि हा सिलसिला थोडा थोडका नाही, उण्यापुऱ्या ६० वर्षांचा आहे. सर्जनशीलता,कल्पकता, हटके करण्याची तळमळ, जुनी पाटी पुसून नवी चित्रलिपी लिहिण्याची विजीगीषु वृत्ती हा इथल्या मातीचा परिणाम असावा असे वाटणारे अनेक चित्रपट इथल्याच विद्यार्थ्यांकडून निर्माण झाले. हे या संस्थेचे कलात्मक संस्काराचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही.

पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी मी १९७९ साली प्रवेश घेतला. चित्रपट रसग्रहण या विषयाचे ‘फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ’ संस्थेतील प्रा.सतीश बहादूर हे आम्हाला तेव्हा फिल्म स्टडिज् हा विषय शिकवायचे. त्यावेळी त्यांना काही शंका विचारण्यासाठी गेलो तेव्हा पहिल्यांदाच या बॉलिवूडचे महाद्वार समजल्या जाणाऱ्या वास्तूचे दर्शन झाले. ‘बहादूर सरांचा विद्यार्थी’ हे माझे येथील प्रवेशाचे मोठे ओळखपत्र होते. थिएटरमध्ये क्वचित दाखवले जाणारे खूप वेगळ्या प्रकारचे सिनेमे इथे मुले पाहतात हे तेव्हा समजले, आणि अधूनमधून मी ही त्यांच्यात सामील होऊ लागलो. 

प्रभात फिल्म कंपनीच्या या परिसराला व्ही. शांताराम, शेख फत्तेलाल, विष्णुपंत दामले, केशवराव धायबर यांच्या उद्यमशीलतेचा आणि सर्जनशीलतेचा अनोखा स्पर्श आहे. या निसर्गरम्य जागेशी अनेक अविस्मरणीय आठवणी जोडलेल्या आहेत. इथल्या तळ्याकाठी व्ही. शांताराम यांच्या सारख्या दिग्दर्शकाला अनेक कल्पना सुचल्या. इथल्या ‘विज्डम- ट्री’च्या छायेत अनेक कलावंतानी बसून चर्चा केल्या. किती चित्रपटांच्या जन्मकथा या वृक्षानी ऐकल्या असतील याची गणतीच नाही. इथे कमालीचा मोकळेपणा आहे. विद्यार्थी आणि शिक्षक गळ्यात गळे घालून कॅन्टीनमध्ये गप्पा मारतात, वाद घालतात, पुन्हा हसतखेळत आपल्या विभागात जातात. इथे पाहिलेल्या अनेक चित्रपटांनी मला सिनेमा म्हणजे; मारामारी, खून आणि बागेतले गाणे या परिघाबाहेर नेले. सिनेमा हे गंभीर आणि कलात्मकतेची मागणी करणारे एक जबरदस्त  माध्यम आहे याची जाणीव या संस्थेने करुन दिली. हिंदी, बंगाली, मल्याळी, इंग्रजी, रशियन, इटालियन, जर्मन असे विविध भाषांमधील जगविख्यात चित्रपटांचा आस्वाद इथे घेता आला.

एम.एस. सत्थ्यूचा ‘गर्म हवा’, अदूर गोपालकृष्ण यांचा ‘स्वयंवरम्’ यांच्या जोडीला ‘बायसिकल थिव्ज्’, ‘राशोमान’, ‘रोमन हॉलिडे’, स्वीडिश दिग्दर्शक इंग्मार बर्गमनचा ‘वाइल्ड स्ट्रॉबेरीज’, ‘गॉन विथ द विंड’, किती नावे घ्यावीत? चित्रपट पाहणे हा एकतर्फी प्रकार इथे नव्हता. तर त्यावरच्या चर्चा या सिनेमापेक्षा अधिक मौल्यवान असत. अनेक नवे दृष्टिकोन समजत. समोर असूनही न दिसलेले चित्रपटातील पैलू लक्षात आल्यावर होणारा आनंद शब्दात व्यक्त करता येत नसे. एकदा मी बहादूर सरांच्या सिनेमाच्या तासाला बसलो होतो. त्यांच्या सर्वात आवडत्या दिग्दर्शकाचा, सत्यजित रे यांचा ‘पथेर पांचाली’ हा सिनेमा ते समजावून सांगत होते. प्रत्येक रीळ झाल्यावर सरांचे त्यावरचे भाष्य, काही वेळा एक रीळ दोनदा दाखवून ते त्यातील व्याकरण ते समजून सांगत असत. हा मास्टर्स क्लास हे या संस्थेचे फार मोठे वैभव आहे. सत्यजित रे श्रेष्ठ दिग्दर्शक का आहेत, याचे मला असलेले कोडे हा ‘तास’ झाल्यावर सुटलेले होते.  

जया भादुरी, डॅनी डॅन्झोप्पा, नसरुद्दिन शहा, विधू विनोद चोप्रा, मणी कौल, गिरीश कासारवल्ली, ओम पुरी, डेव्हिड धवन, रेहाना सुलताना, नरेश बेदी, श्रीराम राघवन, मिथून चक्रवर्ती, राजकुमार हिरानी, राजकुमार राव अशी मोठीच्या मोठी यादी इथल्या फिल्म विभागाच्या माजी विद्यार्थ्यांची आहे. पटकथा उलगडून दाखवणारे आर.एस. पुर्थी, सिनेमाच्या अनावश्यक भागाला कात्री कशी लावायची याचे धडे देणारे आर.के. रामचंद्रन, दृश्य टिपण्याची युक्ती सांगणारे कुलकर्णी सर, दिग्दर्शकाला चित्रपटाचा कप्तान का म्हणतात याचे रहस्य उलगडून दाखवणारे ऋत्विक घटक, आणि अभिनय म्हणजे अचूकता, शिस्त, लवचिकता आणि देहबोली यांचा सुंदर मिलाप हे सोदाहरण पटवून देणारे प्रोफेसर रोशन तनेजा हे येथील गुरुजन म्हणजे या संस्थेचा पाया पक्का करुन वाट उजळत ठेवणारे दीपस्तंभ आहेत. 

सरकारी नोकरी सोडून कलेच्या ओढीने प्रवेश घेतलेले अदूर गोपालकृष्णन, अभिनय शिकण्यासाठी आलेले पण उत्तम मनोरंजनाची हमी देणारे चित्रपट दिग्दर्शक झालेले सुभाष घई, बिहारमधून संस्थेत अभिनयासाठी दाखला झालेला बिहार राज्यातला पहिला विद्यार्थी शत्रुघ्न सिन्हा, संस्थेत प्रवेश घेतेवेळी चाचणी परीक्षेत ब्लॅंक झालेली शबाना आणि मग लगेच त्या अवस्थेचा सादरीकरणासाठी तिने करून घेतलेला उपयोग इथल्या वास्तूने पाहिला आहे . मृणाल सेन यांच्याबद्दल काय माहिती आहे? या प्रश्नाला मुलाखतीच्या वेळी उत्तर देताना विद्यार्थ्याने सांगितलेली इत्यंभूत माहिती, आणि त्यानंतर दिलेले, ‘पण मला त्यांच्या धाटणीचे सिनेमे बनवायचे नाहीत,’ हे बाणेदार उत्तरही याच संस्थेत ऐकायला मिळू शकते, आणि त्यावर कडी म्हणजे स्वतः सेन निवड समितीत असूनही या स्वतंत्र विचार करणाऱ्या मुलाला प्रवेश देण्याचा त्यांचा उमदेपणा हाही इथल्याच कलासक्त मातीचा करिष्मा म्हणावा लागेल. रेसुल पुकुट्टी इथला विद्यार्थी. त्याच्या ध्वनी मुद्रण कौशल्यावर तर ऑस्करनेही शिक्कामोर्तब केले आहे. मृणाल सेन, श्याम बेनेगल, गिरीश कार्नाड, अदूर गोपाल कृष्णन, यू आर अनंत मूर्ती, महेश भट अशा दिग्गजांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषवले आहे. सिनेमाकडे आधुनिक दृष्टीने पाहणारा कलावंत शेखर कपूर सध्या अध्यक्षपदी विराजमान आहे. 

या संस्थेशी माझा संबंध पुढे विविध भूमिकेतून आला. कधी विद्यार्थी म्हणून आलो. कधी इथल्या टीव्ही विभागामध्ये लेक्चर्स दिली तर कधी फिल्मच्या मुलांना मल्टी कॅमेराने कलागारातील (studio) चित्रण कसे करायचे याचे धडे दिले. इतकेच काय इथल्या एका प्रशिक्षण वर्गाच्या फिल्ममध्ये कामही केले. इथल्या प्राध्यापक निवड समितीचा सदस्य म्हणून चांगले शिक्षक निवडण्यास मदतही केली. त्यामुळे या संस्थेशी माझे नाते नेहेमीच असे बहुपदरी आणि सौहार्दपूर्ण राहिले आहे.

गेल्या सहा दशकांमध्ये संस्थेने चित्रपट आणि दूरचित्रवाणी शिक्षणात नवे नवे मानदंड निर्माण केले आहेत. अभिनय, दिग्दर्शन, लेखन, छायालेखन, ध्वनी अशा विविध शाखांमध्ये अनेक विद्यार्थी संस्थेने घडवले आहेत. आजही या संस्थेत प्रवेशासाठी रांगा लागतात. काहीशे जागांसाठी हजारो अर्ज भारतभरातून आणि परदेशातूनही येतात. दिग्दर्शन, साऊंड डिझाईन, छायालेखन, पटकथा लेखन, अभिनय, संकलन अशा अनेक विषयांबरोबरच  टेलिव्हिजन निर्मिती, डिजिटल माध्यमे यांचाही समावेश अभ्यासक्रमात आहे. 

‘फिल्म इन्स्टिट्यूट’ ही केवळ प्रशिक्षण संस्था नाही. तर तो भारतीय चित्रपट विश्वात प्रवेश करण्याचा एक अधिकृत थांबा आहे. प्रभात फिल्म कंपनीचा देदीप्यमान वारसा लाभलेली, मायानगरीचा दरवाजा उघडणारी ही गुरुकिल्ली आहे. पारंपरिक अभ्यासक्रमासोबत चित्रपट आणि दूरचित्रवाणी या माध्यमांसाठी आवश्यक कौशल्ये मिळावीत अशी अनेकांची इच्छा असते. पण प्रत्येकालाच इथे प्रवेश मिळणे अवघड असते. हे लक्षात घेऊन संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी ‘स्कीलिंग इंडिया इन फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन’ (स्कीफ्ट) ही एक अफलातून संकल्पना गेल्या चार वर्षांपासून अमलात आणण्यास सुरुवात केली आहे. याचसोबत संस्था भारतभर चित्रपट निर्मिती, लेखन, छायालेखन, रसग्रहण असे विविध अभ्यासक्रम आयोजित करते. देशातील त्रेचाळीस शहरांमध्ये संस्था पोहोचली आहे. इतकेच काय भारतीय सैन्यदलापर्यंतही ही चित्रविद्या नेण्यात संस्था यशस्वी झाली आहे. पाच दिवसांपासून ते ४५ दिवसांपर्यंतचे हे कोर्सेस आजपर्यंत दहा हजार जणांनी पूर्ण केले आहेत.

दृकश्राव्य विषयांचे ज्ञान जनसमुदायापर्यंत घेऊन जाणारा हा उपक्रम जगातला सर्वात मोठा शैक्षणिक प्रकल्प मानला जातो. सहा दशकांचा प्रवास करत डिजिटल युगाशी सुसंगत असा हा फिल्म इन्स्टिट्यूटचा प्रवास  विज्डम ट्रीच्या साक्षीने सुरू आहे. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संचाचा पडदा केवळ देखणा नाही तर अर्थपूर्ण व्हावा या निष्ठेची आणि तळमळीची ही एक चिरंजीवी पटकथाच आहे.

संबंधित बातम्या