गंधार न गवसलेला ‘द डिसायपल’

डॉ. केशव साठ्ये
सोमवार, 24 मे 2021

विशेष

गुरुशिष्य परंपरा, शिष्याची शिकण्याची ऊर्मी, सातत्य याचा वेध घेत ‘द डिसायपल’ हा चित्रपट शरद नेरुळकर या तरुण शिष्याच्या संगीत साधनेचा प्रवास पडद्यावर मांडतो. सुमारे दोन तासांचा हा चित्रपट. यातील मुख्य दृश्ये आहेत संगीत साधनेची, तालमीची, मैफलींची, शरदच्या तगमगीची आणि वैफल्याचीही. कॅमेरा अतिशय सहजपणे हे उलगडून दाखवतो. नैसर्गिक दृश्य बांधणी हे या चित्रपटाचे शक्तिस्थळ आहे. डोळे दीपवणारे, क्षणार्धात होणारे दृश्य बदल ही चित्रपटसृष्टीची नेहमीची शैली नाकारून रेंगाळणारी दृश्यमाला वापरायचे धाडस करायला एक आत्मविश्वास लागतो, तो इथे दिसतो.

चैतन्य ताम्हाणे याचा ‘कोर्ट’ या २०१४ साली आलेल्या चित्रपटानंतरचा हा दुसराच चित्रपट. चित्रपट निर्मितीच्या पारंपरिक पद्धतीत स्वतःला बांधून न घेणारा दिग्दर्शक म्हणूनची आपली ओळख त्यानी इथेही जपली आहे. चित्रपटाची सर्व सूत्रे आपल्या हातात केंद्रित करणारे, चित्रपटांवर आपली खास छाप पाडणारे, ‘ऑटर थिअरी’ शैलीचे काही मोजके दिग्दर्शक आहेत त्याच पठडीतील हा चित्रपटकर्मी म्हणता येईल. पटकथा, संकलन आणि दिग्दर्शन या तिन्ही आघाड्या चैतन्यने यात सांभाळलेल्या आहेत. ‘रोमा’, ‘ग्रॅव्हिटी’ सारख्या गाजलेल्या चित्रपटांचा दिग्दर्शक अल्फान्सो क्युरॉन या चित्रपटाचा कार्यकारी निर्माता आहे. एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या दिग्दर्शकाने मराठी भाषेतील चित्रपटाची निर्मिती करणे ही दुर्मीळ घटना म्हणावी लागेल. एका अर्थाने या चित्रपटाच्या यशावर याच घटनेने शिक्कामोर्तब झाले असे म्हणता येईल, आणि तसे झालेही. अलीकडेच व्हेनिस आणि टोरँटो  महोत्सवात या चित्रपटाने उत्तम कामगिरी केली.

आदित्य मोडक या कलावंताने शरद ही मध्यवर्ती भूमिका यात चोख केली आहे. भूमिका नीट समजावून घेतली की वेगळा अभिनय करावा लागत नाही हे आदित्यने इथे दाखवून दिले आहे. प्रत्यक्षात तो स्वतः गेली दहा वर्षे शास्त्रीय संगीत शिकतोय, पण तरीही अगदी सुरुवातीचे धडे गिरविणेही त्यानी छान पेलले आहे. काहीतरी पोटापाण्याचा उद्योग कर या घरच्या भूणभूणीला तोंड देत, गाण्याच्या ध्यासापोटी, वय होऊनही लग्नापासून दूर राहात, लैंगिक ऊर्मींना तोंड देत चाललेला हा भरकटलेला प्रवास आपल्या देहबोलीतून, भावचर्येतून त्यानी कमालीच्या संयतपणे उलगडून दाखवला आहे. त्याचे गुरुजी (अरुण द्रविड, हे ही उत्तम गायक असून  मोगुबाई कुर्डीकर आणि किशोरी अमोणकर यांचे शिष्य म्हणून प्रसिद्ध आहेत) काहीवेळा थोडे अवघडल्यासारखे वाटतात, पण भूमिकेचे नेमके वजन त्यांनी उत्तमपणे पेलले आहे. त्यांच्या अभिनयात संथपणा असला तरी एक वेगळी लय  आहे त्यामुळे गुरुशिष्य केमिस्ट्री पडद्यावर रंगत आणते.

कॅमेरा बोलतो हे आपण अनेकवेळा ऐकले आहे. पण तो कधी स्तब्ध असतो, कधी कुजबुजतो, कधी हळुवारपणे आपल्याशी कानगोष्टी करतो हे मात्र फारसे अनुभवला आलेले नसते. कॅमेरा वापराची ही आगळी दृष्टी आपल्याला इथे अनुभवायला मिळते. कथानकाच्या हातात हात घालून चित्रपटाचा वेग राखणारी दृश्यमालिका हे या सिनेमाचे आणखी एक वैशिष्ट्य. मायकेल सोबोकिंस्की या छायालेखाकाराच्या या चित्रण कौशल्याला दाद द्यायला हवी. 

या चित्रपटात माई (सिंधुताई जाधव) ही ध्वनी माध्यमातून उपस्थित असलेली एक व्यक्तिरेखा आहे. नायकाच्या सर्व सांगीतिक प्रवासाची, प्रयत्नांची, परिश्रमाची ती मुख्य प्रेरणाही आहे. जुन्या जमान्यातल्या या ज्येष्ठ गायिका, त्यांचे संगीत विषयक विचार, चित्रपटातील हा शिष्य हेडफोनवर तन्मयतेने ऐकत असतो. एक प्रकारचा हा वैचारिक रियाजच म्हणता येईल. नुकत्याच दिवंगत झालेल्या सुमित्रा भावे यांनी ही सुमारे आठ मिनिटांची व्यक्तिरेखा आपल्या नेमक्या शब्दफेकीने आणि निवेदन शैलीने उठावदार केली आहे. 

अतिशय चिकाटी असूनही मुळातच प्रतिभेत कमी पडणारा शरद अनेक अपयशी प्रयत्नांचा धनी होत कोलमडून जातो, निराश होतो. गुरुजींनाही त्याच्या या कमकुवत बाजूची जाणीव असते पण त्यांचाही इलाज नसतो. एका मैफिलीत सूर न गवसल्यामुळे हा शिष्य गाता गाता व्यासपीठ सोडून चालू लागतो आणि शास्त्रीय संगीत विश्वाला  कायमचा रामराम ठोकतो. हा चित्रपटातला महत्त्वाचा प्रसंग दिग्दर्शकाने दूरदृश्यातच टिपला आहे. प्रेक्षकांच्या मागून कॅमेरा हे सर्व पाहत असतो. दालनात निर्माण झालेली अस्वस्थता, थोडी लगबग आणि सन्नाटा या मिश्रणातून चित्रपटातील या उत्कर्षबिंदूला कमालीचा उठाव येतो. खचाखच भरलेली समीप दृश्ये नाहीत, गुरूंच्या चेहेऱ्यावरील भावना दाखवणे नाही, शरदच्या शस्त्रे खाली ठेवण्याच्या क्षणांशी त्याच्या मुद्रेवरील भावांशी संबंध जोडण्याची धडपडही इथे दिसत नाही. फारच ताकदीने हा भाग प्रेक्षकांच्या मनावर बिंबवला जातो.

पण एकेठिकाणी मात्र दिग्दर्शकाने केलेली दृश्यरचना त्याच्या नैसर्गिक शैलीशी विपरीत अशी आहे. माईंचे संगीत विषयक विचार शरद रात्रीच्या वेळी मोटारसायकलवरून फिरत ऐकत असतो. हे दृश्य चित्रपटात तीन-चार वेळा येते. मुंबईसारख्या सदा सर्वकाळ गजबजलेल्या शहरात हा मोटारसायकल चालवत असताना एकही वाहन दिसू नये, किंवा कधी ती दिसली तर ती थिजलेली दिसावीत हे विसंगत वाटते. शिष्याला अतिशय महत्त्वाची शिकवण देणारे माईंचे कथन यावर प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित व्हावे म्हणून दिग्दर्शकला अशी सूअरिअल (surreal) दृश्य मांडणी करावीशी वाटली असेलही. मात्र त्यासाठी वास्तवाशी एवढी तडजोड करून मुंबईचे नैसर्गिक वातावरण असे कचकड्याचे करण्याशी गरज नव्हती.

रसिक जाणकार श्रोते तसेच बाजारशरण व्यवस्थेमुळे निर्माण झालेले भुरटे श्रोते, गाण्याला टाळी देण्याऐवजी तबल्याला टाळी देणारे महाभाग यांचाही वेध यात प्रभावीपणे घेतला गेला आहे. शास्त्रीय संगीताच्या पोशाखी कार्यक्रमांच्या बुजबुजाटाचा धिक्कारही इथे पाहायला मिळतो. भारतीय शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी लाभलेला हा सिनेमा, या निमित्ताने शास्त्रीय संगीताच्या परंपरा, अंधश्रद्धा, उदात्तीकरण यावरही स्पष्ट आणि सडेतोड भाष्य करतो.  

तरल दृश्यभाषा आणि ध्वनी माध्यमाचा उत्तम उपयोग करूनही हा चित्रपट शिष्य याचा नेमका अन्वयार्थ टिपण्यात कमी पडतो. सामान्य माणसाचे खुजेपण त्याच्या लढाया, त्याचे अपेक्षित पराभव यातून प्रेक्षकांनी आपले भावविश्व तपासून पाहावे अशी दिग्दर्शकाची इथे अपेक्षा असेल तर त्यात वावगे काहीच नाही. गाणे शिकणे, शास्त्र शिकणे आणि ते आपल्यात उतरवणे हे त्याला जमत नाहीये, ही कलाक्षेत्रातील मुख्य समस्या नव्हे.

अतिशय तयारी असूनही अपयशाचे धनी झालेले गायक- वादक याच संगीत विश्वात आपण पाहिले आहेत. किंबहुना अतिशय चांगली दाद मिळूनही, मैफिली गाजवूनही एक कलावंत म्हणून हवे ते न सापडल्याचे दुःख, वेदना ही कलाकाराची खरी शोकांतिका असते.हे सर्वच कलाप्रकारांना लागू आहे. हे मानस सरोवर फार थोड्यांच्या नशिबी येते त्याचाही उच्चार यात करता आला असता, पण तसे होत नाही. शास्त्रीय संगीतातील सिद्धांत, गुंतागुंत, ताणेबाणे, नीट समजून घेण्यात आणि त्या मांडण्यात हा चित्रपट कमी पडतो, पण असे असले तरी एक वेगळ्या शैलीचा आणि दृश्यांमधून बोलणारा सिनेमा पाहिला हे समाधान यातून नक्की मिळते.  

(हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी व्यासपीठावर पाहता येईल.)

संबंधित बातम्या