माझं रशियन कनेक्शन

डॉ. राधिका टिपरे
शुक्रवार, 19 जून 2020

विशेष
 

मी युक्रेन देशातील हारकोवच्या (खारकोव) विमानतळावर रात्री दोन वाजता उतरले तेव्हा माझ्या मुलाबरोबर त्याची सासू, माझी विहीण मला घ्यायला आली होती. हसतमुखानं माझं स्वागत करत नीनानं मला मिठीत घेत आनंदानं म्हटलं... ‘ गोऽ राधिका गोऽ...!’ खरं तर तिला ये राधिका ये असं म्हणायचं होतं. पण नीनाचं इंग्लिश हे असं भन्नाट! ती काही तिची आणि माझी पहिली भेट नव्हती. आम्ही त्यापूर्वी तीन वेळा भेटलो होतो आणि तिच्या भन्नाट इंग्लिशची एव्हाना मला चांगली कल्पना होती, त्यामुळं तिचं गो म्हणजे कम होतं हे मला ठाऊक होतं... तर अशी ही माझी विहीण नुकतीच पुन्हा एकदा माझ्याकडं राहून गेली. अर्थातच माझा मुलगा, सून आणि नातू हेही आलेले होते. पण बहुतेक वेळेस आम्ही दोघी एकत्र असायचो. नीनाला इंग्लिश येत नाही यामुळं कुठलीही अडचण आली नाही. कुठल्याही विषयावर बोलायला स्त्रियांना भाषेची गरज पडतेच असं नाही. हातवारे करून बरंच बोलणं पार पाडता येतं. त्यातूनही गरज पडेल तिथं दुभाषाचं काम करायला माझा सात वर्षांचा नातू होताच. त्यामुळं नीनाच्या सहवासातले पंधरा दिवस कसे गेले ते उमजलंच नाही! 

खरं तर नीना माझ्या सुनेच्या आईची कॉलेजपासूनची मैत्रिण. मरीनाचे आईवडील दोघंही आता हयात नाहीत. त्यामुळं मरीनाला आईचं प्रेम देणारी ही तिची मानलेली मावशीच आता माझ्यासाठी माझी विहीणबाई आहे. कारण ती मरीनाला आपल्या मुलीसारखंच पाहते आणि माझ्या मुलासाठी एखाद्या सासूनं जे काही करायला हवं ते सारं काही करते. माझ्या नातवावर ती माझ्यासारखीच माया करते. आज नीना सत्तर वर्षांची आहे. सिव्हिल इंजिनियर असलेली नीना हारकोव (खारकोव) या युक्रेनमधील दोन क्रमांकाच्या मोठ्या शहरातील कार्पोरेशनमध्ये गेली पन्नास वर्षं इंजिनियर म्हणून नोकरी करते आहे. 

नीना मुळची मॉस्को इथली! शिक्षणासाठी हारकोवमध्ये आली आणि तिथल्या वितालीकच्या प्रेमात पडून तिथंच स्थायिक झाली. आताचा युक्रेन देश पूर्वीच्या रशियाचाच एक भाग होता. रशियाच्या फाळणीनंतर ती युक्रेनीयन झाली. नीनाचे यजमान वितालीक तसंच मरीनाचे आई आणि वडील दोघंही कॅन्सरमुळंच अकाली गेले. नीनाला एक मुलगा आहे, जो शहरातच त्याच्या बायकोपोरांबरोबर राहतो. नीना आणि आमची मरीना या दोघींच्यामध्ये सख्ख्या मायलेकींप्रमाणं असलेलं जिव्हाळ्याचं नातं पाहून मला नेहमीच नीनाबद्दल कौतुक मिश्रित आदर वाटत राहतो. असो, तर माझी ही प्रिय विहीण येणार म्हटल्यावर साहजिकच मी तिच्या स्वागतासाठी तयारीला लागले हे सांगणे न लगे!

विहीणबाईंच्या जोडीनं जवळजवळ चार वर्षांनी नातू भारतात आला होता. मुळातच तो कॅनडामध्ये राहत असल्यामुळं माणसांची इतकी गर्दी पाहायची त्याला सवय नाही. त्यामुळं मुंबईच्या विमानतळावरून पुण्याच्या घरी पोचेपर्यंत वाटेत त्याला दिसलेली माणसांची आणि वाहनांची गर्दी पाहून महाशय सटपटून गेले होते. त्यात कर्कश्श आवाजातील हॉर्न ऐकून स्वारी चक्क वैतागून गेली होती. पुण्याच्या घरी पोचल्यानंतर मला म्हणाला, ‘आजी इंडिया इज मेसी... सो मेनी पिपल एव्हरीव्हेअर... आजी, सो मच हाँकिंग...’ अर्थातच आजीकडं त्याच्या या तक्रारींवर कुठलाही उपाय नव्हता. मरीना, माझी सून पुण्यातील रस्त्यानं चालायला इतकी घाबरते, की विचारता सोय नाही. चालायला जागाच नाही अशी तिची तक्रार असते. आपल्याकडं रस्त्यावरून कुठल्याही दिशेनं येणारी आणि कुठल्याही दिशेला बेगुमानपणे जाणारी वाहनं आणि माणसं पाहूनच ती घाबरून जाते. रिक्षात बसायला तर ती तयारच होत नाही कारण तिला भीती वाटते, की आपण रिक्षातून खाली पडू! याउलट नीना आणि माझा नातू यांना रिक्षात बसायचं एवढं आकर्षण वाटतं, की कार असूनही त्यांना रिक्षातून चक्कर मारून आणावी लागते. या भेटीत आम्ही सर्वजण अंदमानच्या हॅवलॉक बेटावर चार दिवस राहून आलो. तिथं दुचाकी भाड्यानं मिळतात. या तिघांनाही या दुचाकीवर बसायचं प्रचंड आकर्षण वाटत होतं, त्यामुळं सारंगनं स्कुटी भाड्यानं घेऊन या सर्वांना मनसोक्त फिरवलं. गंमत म्हणजे नीना आणि मरीना दोघीही त्यांच्या आयुष्यात प्रथमच दुचाकीवर बसल्या होत्या. 

युक्रेनमधील लोकांचा आहार आपल्यापेक्षा खूप वेगळा असतो. मिरची हा प्रकार या मंडळींना अजिबात चालत नाही, परंतु तरीही माझ्या नातवाला मात्र आपल्यासारखं जेवण आवडतं. सुरुवातीला मरीनाला वाटायचं, हे काय रोज रोज वरणभात आणि पोळीभाजी खायची. आता मात्र तिनं ही गोष्ट मनापासून स्वीकारली आहे. कारण तिच्या लेकाला आपल्याप्रमाणेच गरमगरम वरणभात त्यावर साजूक तुप आणि जोडीला पापड या गोष्टी अतिशय प्रिय आहेत. त्याला पोळी मनापासून आवडते... म्हणजे मी कॅनडात गेले की त्याच्यासाठी रोज पोळी लाटावीच लागते. आपली तूप साखर पोळीची गुंडाळी... बटाट्याची भाजी आणि पोळीही तितकीच प्रिय. आपले कांदेपोहे करण्यात आता मरीना पटाईत झाली आहे. शिवाय मेथीची लसणाच्या फोडणीची भाजीही करते. तिनं केलेली रशियन पद्धतीची सॅलड्स मात्र लाजवाब असतात. आता ही मंडळी इकडं आल्यानंतर, ‘आता स्वयंपाक काय करू?’ याची मला अजिबात काळजी वाटत नाही, कारण मटकीची उसळ, वांग्याचं भरीत, बटाट्याची भाजी या बिनातिखटाच्या भाज्यांबरोबर गरमागरम पोळी नीनालाही आवडते आणि मरीनालाही. नीना तर आता मटकीची उसळ आणि बटाट्याची भाजी मिटक्या मारत खाते. थालीपीठ हीसुद्धा तिची फेवरीट डीश झालीय. तिला आपला चिवडाही मनापासून आवडतो... जाताना आठवणीनं बांधून द्यावा लागतो. तर हे असं सगळं तिला मनापासून आवडलं की मिठी मारून म्हणते, ‘राधिका, आय लव्ह यू...’  या एकाच वाक्यात ती तिच्या मनातील भावना व्यक्त करू शकते.

नीनाला ताजमहाल पाहायचा होता म्हणून दिल्लीला जायचं ठरलं. बरोबर घरचाच दुभाष्या होता कारण त्यालाही ताजमहाल पाहायचा होता. तो इंडियात जाणार हे कळल्यानंतर एडमंटनमधील त्याच्या वर्गमित्रांनी त्याला सांगितलं होतं, की इंडियात गेल्यावर त्यानं ताजमहाल पाहायला हवा. ममा आणि पापाला सोडून दोन आज्यांच्या बरोबर स्वारी पहिल्यांदाच एकट्यानं प्रवासाला निघाली होती. पण स्वारी मजेत होती...! विमानतळावर गेल्यावर तो आपल्या ‘बाबा नीना’ ला काही सांगायचं झालं तर रशियन भाषेत समजावून सांगायचा. ते पाहून सर्वांनाच भारी कौतुक वाटायचं. रशियन भाषेत आजीला बाबुश्का म्हणतात व आजोबांना जेदुश्का. लहानपणी त्याला बाबुश्का म्हणता यायचं नाही. त्यामुळं तो नीनाला बाबानीना म्हणायला लागला. 

आर्यनला, माझ्या नातवाला माझ्याबरोबर जंगलात जाऊन जंगलातील टायगर पाहायचा होता. पण मरीनाच्या मनात भीती असल्यामुळं तिनं काही ताडोबाला जाण्यासाठी परवानगी दिली नव्हती. त्यामुळं दिल्लीतील ट्रीपमध्ये त्याला वाघ दाखवण्यासाठी झूमध्ये घेऊन गेले. आर्यननं झूमधील त्या वाघाला पिंजऱ्याच्या जवळ फेऱ्या मारताना पाहिलं आणि त्याचा चेहरा कसनुसा झाला. त्याला बंदिस्त वातावरणातील तो वाघ पाहणं अजिबात आवडलं नव्हतं हे मला जाणवलं. तो मला म्हणाला ‘आजी, आय वाँट टू सी टायगर लाईक यू सी देम इन जंगल, नॉट लाईक धीस...’ नंतर तो झूमधील इतर प्राणी पाहण्यासाठीसुद्धा थांबायला तयार होईना. त्याला बंदिस्त वातावरणातील प्राणी पाहण्यात स्वारस्य उरलं नाही, त्यामुळं आम्ही अर्ध्यातूनच बाहेर आलो. दिल्लीतील अक्षरधाम मंदिर मात्र नीनाला फार आवडलं. विशेष म्हणजे तिथं होणारा प्रकाश आणि कारंजाचा कार्यक्रम नीनाला आणि आर्यनला अतिशय आवडला. मला त्या कार्यक्रमातील बोलण्याचा मतितार्थ इंग्रजीतून त्याला समजून सांगावा लागायचा आणि त्याच्या मतीप्रमाणं जमेल तेवढं तो नीनाला रशियनमधून समजावयाचा... दोघंही आपल्या भारतीय पौराणिक कथासंकल्पनांचं ते सादरीकरण पाहून भारावून गेले होते.

दोन दिवसांची दिल्लीची भटकंती झाल्यानंतर आम्ही आग्र्याला पोचलो. ताजमहाल पाहून तिचं एक स्वप्न पुरं झालं होतं. पण ताजमहाल पाहिल्यानंतर ती मला म्हणाली, ‘राधिका, मला ताजमहालपेक्षा दिल्लीतील ते हिंदू मंदिरच खूप आवडलं...!’ ताजमहाल आणि आग्राफोर्ट पाहून झाल्यानंतर दुसरे दिवशी भल्या सकाळी आम्ही फतेहपूर सिक्रीच्या वाटेला लागलो. फतेहपूरच्या वाटेवर असताना वाटेत उंट दिसला. आर्यननं आयुष्यात पहिल्यांदा उंट पाहिला होता. त्याच्याकडं त्याच्या ममाचा छोटासा कॅमेरा होता, त्यामुळं तो त्याला आवडलेल्या प्रत्येक गोष्टीचे फोटो घेत राहायचा... मग काय आधी उंट, मग गाढव, बकऱ्या, मेंढ्या त्यानंतर म्हैस असे वेगवेगळे सर्व प्रकारचे प्राणी दिसल्यानंतर त्यांचे फोटो घेणं अपरिहार्य होतं. त्या संध्याकाळी पापाचा फोन आल्यानंतर उत्साहानं पहिली गोष्ट काय सांगितली असेल, तर ‘पापा, टुडे आय सॉ थ्री डाँकीज...अँड ऑल्सो अ कॅमल.’  माझ्या घरी येणारी ही परदेशी पाखरं केवळ पंधरा दिवसांसाठीच आली होती. पंधरा दिवसांच्या त्यांच्या सहवासात काय करू आणि काय नको अशी माझी अवस्था होऊन गेली होती. पूर्वी लेकासाठी खायला हे कर ते कर असं वाटून मी सतत रांधत असायची, पण आता त्याच्यापेक्षा नातवासाठी काय करू काय नको असं होऊन जातं. 

पंधरा दिवस कापरासारखे उडून गेले! खूप खरेदी झाली... नीनानं तिच्या मुलासाठी, नातवांसाठी आणि सुनेसाठी खूप खरेदी केली. भारतातून जाताना ती नेहमी तिच्या नातवांसाठी अननस घेऊन जाते. सुदैवानं त्यांच्या देशात त्याला आडकाठी नाही, कारण तिथं अननस प्रचंड महाग असतो. गंमत म्हणजे रशियन भाषेतही अननसाला अननसच म्हणतात. साखरेला साखर म्हणतात. रशियन भाषेत बरेच मराठी शब्द आहेत... मला या गोष्टीचं राहून राहून आश्‍चर्य वाटतं! परतीचा दिवस जवळ आला आणि सामानाची बांधाबांध सुरू झाली. ही वेळ आली की काळीज कातर होऊन जातं! ज्यांची मुलंबाळं परदेशी राहतात त्या आईबापांचं दु:ख कुठच्या शब्दात सांगावं? आता हे सगळं अंगवळणी पडलं आहे म्हणा! वयोमानानुसार पूर्वीप्रमाणे विमानतळापर्यंत जाण्याचा अट्टाहास करवत नाही... वियोगाचं दु:ख सोसवत नाही... त्यामुळं घरातून निघतानाच पोरांना पोटाशी धरून कोरड्या डोळ्यांनी निरोप द्यायची आता सवय करून घेतली आहे!

संबंधित बातम्या