मॉन्सूनवर हवामान बदलाचा प्रभाव वाढतोय

डॉ. रामचंद्र साबळे
सोमवार, 25 जुलै 2022

मॉन्सून लहरी आहे, असे नुसते म्‍हणून आता चालणार नाही. हवामान बदलाकडे दुर्लक्ष केल्यास संपूर्ण विश्‍वातील जनजीवन विस्कळित होईल एवढा मोठा धोका यामुळे निर्माण होऊ शकेल. त्यासाठी योग्य वेळी योग्य उपाययोजनांची गरज आहे.

मॉन्सून हा अरेबियन शब्द असून, त्याचा अर्थ ठरावीक हंगामात निश्‍चित येणारा पाऊस. संपूर्ण आशिया खंडातील विविध देशांत हा पाऊस जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ८० टक्के होतो. ऑक्‍टोबर - नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पावसाला मॉन्सूनोत्तर असे संबोधले जाते. सर्व जीवसृष्टी मॉन्सूनच्या पावसावर अवलंबून असते. १७व्या शतकात औद्योगिक क्रांती झाली. कारखानदारी वाढली. वाहनांची संख्या वाढली. त्याद्वारे बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्‍साइडचे प्रमाण ०.०३६ टक्‍क्‍यांवरून पुढे वाढू लागले. विमानांद्वारे हवेत सोडला जाणारा क्‍लोरोफ्ल्युरोकार्बन थेट काही उंचीवर सोडला जात आहे. कार्बन डायऑक्‍साइडचेही उत्सर्जन गेल्या दशकांमध्ये वाढत गेले. 
आशिया खंडातील ५५ दशलक्ष हेक्‍टर, आफ्रिकेतील ६५ दशलक्ष हेक्‍टर व लॅटिन अमेरिकेतील ८५ दशलक्ष हेक्‍टरवरील वने मानवाने तोडली. अशा प्रकारे माणसाने जगात ४०० दशलक्ष हेक्‍टर जंगलतोड केली. या जंगलांतील वनस्पती कार्बन डायऑक्‍साइड शोषून घेऊन प्रकाशसंश्‍लेषण क्रियेत वापरून तो खोडात, फांद्यात, मुळात साठवत होत्या. त्यांची तोड झाल्याने हवेत कार्बन डायऑक्‍साइडचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सूर्यप्रकाशापासून मिळणारी ऊर्जा उष्णता कार्बन डायऑक्‍साइड धरून ठेवत असल्याने तापमान वाढत आहे. काही ठिकाणी अकस्मातपणे त्यामुळे हवेचे दाब कमी होतात व अतिमुसळधार पाऊस होतो, तर जिथे हवेचे दाब कायम वाढलेले राहतात तिथे दुष्काळी परिस्थिती आढळते. चक्रीय वादळांची संख्याही वाढत असून, काही भागात गारपीट होत आहे. 

अटलांटिकामधील बर्फ वितळणे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून समुद्रकिनारी भागात पाण्याची पातळी वाढून वस्त्यांना धोका निर्माण होणे हे सर्व प्रकार वाढत आहेत. 

हवामान बदलाच्या प्रभावाने हे सर्व घडत आहे. सन २०३०पर्यंत अशा प्रकारचे वाढते प्रकार मानवी वस्त्यांना, शेतीक्षेत्राला धोकादायक ठरू शकतील. वेळीच उपाययोजना न झाल्यास सन २०५०पर्यंत सर्व जीवसृष्टी धोक्‍यात येईल. अन्नसाखळी बिघडेल आणि अन्नसुरक्षा धोक्‍यात येईल, असं या क्षेत्रातले अभ्यासक सांगत आहेत. 

मॉन्सून लहरी आहे असे म्हणण्याइतपत ही बाब आता राहिलेली नसून या बाबीकडे दुर्लक्ष केल्यास संपूर्ण विश्‍वातील जनजीवन विस्कळीत होईल एवढा मोठा धोका यामुळे निर्माण होऊ शकेल. त्यासाठी योग्य वेळी योग्य उपाययोजनांची गरज आहे. यापुढे दारिद्रयरेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण सतत वाढत जाईल. शेती व शेतकरी प्रामुख्याने अडचणीत येईल. त्याचे मुख्य कारण म्हणजे शेतीक्षेत्र उघड्यावर आहे, त्यास प्रामुख्याने मोठी हानी पोचेल.

महाराष्ट्रावर हवामान बदलाचा प्रभाव अधिक पडतोय महाराष्ट्र राज्याचा विचार करता हवामान बदलाच्या प्रभावात वाढ होताना दिसून येत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती. चक्रीवादळांच्या संख्येत वाढ होते आहे. गारपीट, भूस्खलनाचे वाढते प्रकार, अतिवृष्टीने जमिनीवरची माती खरवडून वाहून जाणे, शेतांतील काढणीस आलेल्या अथवा पेरणी केलेल्या पिकाची हानी होणे, महापुरात होणारी मनुष्यहानी, वित्तहानी, जनावरे वाहून जाणे, वाहने वाहून जाणे, शेती नापीक होणे, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढणे आणि शासनावर त्याचा भार पडणे अशा प्रकारच्या घटनांमध्ये या पुढे वाढ होत जाईल अशी भीती वाटते.

महाराष्ट्रातील डाळिंबासारखे पीक वाढत्या कीड व रोगांच्या प्रादुर्भावाने संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. अवेळी आणि अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कीड आणि रोगांच्या वाढत्या प्रमाणामुळे कीटक व जंतूनाशक फवारण्यांचे प्रमाण वाढते आहे. खतांचे भाव गगनाला भिडले आहेत. मशागतीचा खर्च वाढतो आहे. ग्रामीण भागातील शेतमजूर शहरी भागांत स्थलांतर करीत आहेत. शेतमजूरीचे वाढते दर आणि शेतमजूरांची वाढती कमतरता यामुळे शेतीक्षेत्र पुरते अडचणीत आले आहे. या साऱ्याचा परिणाम म्हणून अन्नधान्य उत्पादन धोक्यात येऊन अन्नसुरक्षा पुरती कोलमडण्याची भीती आहे. यावर त्वरित उपाय शोधणे गरजेचे झाले आहे.
 
हवामान बदल रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना
महाराष्ट्रातील परिस्थितीचा विचार करता - 
१) वृक्षलागवडीवर भर देणेः महाराष्ट्रात जंगलाखालील क्षेत्र केवळ १७ टक्के आहे. जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ३३ टक्के असावयास हवे. त्यासाठी उघडेबोडके डोंगर, कुरणे, 
माळरानावर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. 
२) सौरऊर्जानिर्मितीः महाराष्ट्रात भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे. हवामान बदलाचे परिणाम रोखण्याचा एक भाग म्हणून अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचा विचार व्हायला हवा. कोळशापासून वीजनिर्मितीचे प्रमाण कमी व्हावयास हवे. बऱ्याचशा उघड्या माळरानावरील जमिनीवर अशा प्रकारचे प्रकल्प उभारणे आणि सौरऊर्जेस चालना देणे आता गरजेचे आहे. 
३) पवन ऊर्जानिर्मितीः महाराष्ट्रात अशा प्रकारचे प्रकल्प सध्या काही भागात सुरू आहेत. मात्र या प्रकारच्या प्रकल्पांमध्ये वाढ करण्यास अद्यापही प्रचंड वाव आहे. त्यासाठी त्याचा बारकाईने अभ्यास करून उचित ठिकाणी त्यांची खासगी संस्थाद्वारे उभारणी करणे शक्‍य आहे. सरकारच्या योग्य त्या परवानग्या घेऊन या कामास गती मिळाल्यास चांगली वीजनिर्मिती होईल. 
४) इलेक्‍ट्रिक वाहनांमध्ये वाढ करणेः सध्या पेट्रोल व डिझेलवरील वाहने विजेवर चालल्यास कार्बन उत्सर्जन कमी होईल. त्यासाठी तशा प्रकारच्या गाड्यांच्या निर्मितीस चालना देऊन कारखानदारी वाढवणे गरजेचे आहे. 
५) घरांच्या छतावर सौरऊर्जानिर्मितीः घरांच्या छतावर सौरऊर्जानिर्मिती करण्यास ग्रामीण व शहरी भागांतही प्रचंड वाव आहे. सौरऊर्जा ग्राम अशा प्रकारच्या योजना यापुढे आखून सौरऊर्जा निर्मितीस चालना देणे गरजेचे आहे. 
६) प्रदूषण कमी करणेः वायुप्रदूषणामध्ये कार्बन डायऑक्‍साइड, मिथेन, नायट्रस ऑक्‍साइड व इतर घातक वायूंचे प्रमाण वाढत आहे. ते कमी करण्याच्या योग्य त्या उपाययोजना आखण्याची नितांत गरज आहे. 
७)आपत्कालीन परिस्थितीचे हवामान अंदाज व त्यावर त्वरित कार्यवाही करणारी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. 
(लेखक ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व 
दक्षिण आशिया फोरम ऑन ॲग्रिकल्चर मेटिरॉलॉजीचे संस्थापक सदस्य आहेत.)  

संबंधित बातम्या