मरगाईचा ‘मरग्या’

शिवशाहीर डॉ. पुरुषोत्तम ऊर्फ राजू कृष्णाजी राऊत, कोल्हापूर
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

-

आता बाकी दोन्ही रेडं ईरलां पेटल्यालंत. दोघंबि दोन्ही पायांवर हुबारुन दणाणा टक्करा दीत हुतंत, आणि खाली गुढग्यावर वाकून वरची टक्कर झेलंत, उट्टं काढत होतं. देवाच्या रेड्याची सरशी होत होती. 

मरग्या.. पेठंतला  रेडा.. रेडाच... चांदा रेडा ....पंचकल्याणी रेडा.... कपाळावर पांढऱ्या केसांचा चट्टा म्हणजे चांद असल्याला आणि चारी खुराच्यावर गुढग्या पावतूर पांढराट केसांची लव... असा पंचकल्याणी... देवाचा... मरगाईचा रेडा.... आडदांड.... आक्शी दाजीपुरातला गवाच दुसरा... देवाला म्हणून सोडल्याला... पर तेला देवाचं कायबि याड नव्हतं.... ध्याडध्याड टळ्ळुळा साऱ्या गावभर फिरायचा. जनावरच ते. खाण्या-पिण्याभाईर शारीरिक भूक भागली की बाकीचं तसं कमीच ध्येनात रहायचं. देवाला सोडलाय म्हणून देवळात जावं... न् रहावं... तिथंच बसावं... आसलं कायबि न्हाय... टळ्ळूळा हिंडभवरांच....गल्लीत नि आजुबाजूला जवळपास आख्ख्या पेठेत जाईल तेच्या दारात भाकर-तुकडा, शिल्लक भात, निवडलेल्या भाजीच्या देठांसहित... माळवं-बिळवं द्यायचितंच... वर आणि भीतभीत डोईवरच्या चांदाला हात लावून नमस्कार करून... मरगाईच्या नांवानं चांगभलं म्हणीत दरसन घ्यायचित तेचं..... 

पेठेत तर दोन-गिरणीवालं, जाधवांचा जेवंतमामा नि चौगल्यांचा परसुबापू हेंच्याकडं मरग्याचा उल्टा रतीबच... ध्याडभर गावाची पीठं दळून नि सिझनला भातं कांडून झाली की पिठाचा नि कोंड्याचा मरग्याच्या नावाचा वाटा बाजूला ठेवून सांजच्याला तेच्या फेरीची वाट बघत बसत. चौकातल्या रामराव नलवड्यांच्या किराणा दुकानातबि हेचं खातंच. रोज. तेच्याशिवाय काही थोडं दानशूर, भगतबि कळणा, कोंडा, भुसा, पेंड असं कायबाय खुराकाचं पैकं बापू नलवड्याकडं देऊन ते सारं मरग्याला खायला घाला म्हणून सांगून जात.... नि रामरावबापू मरग्या आला की बैजवार देत असे .....

तिकडं मावाळतीला पेठ जरा संपली की तिकडलं रक्काळं नि म्होरली शेतवड या माळरानांवरबि मरग्याचीच चौथाई. हुभ्या वल्या, वाळल्या वैरणीनं भरल्यालं माळरान आसू द्या, नाहीतर हुबं पिक आसू द्या. एकबि शेतकरी शेतात आलेल्या मरग्याला हाकलून अगर हुसकून लावण्याचं धाडस करत नसे. मारायची गोष्ट लैच लांबची.... असा कधीच येसन ना घातल्याला, आणि ना मुर्कि माहीत असल्याला, गावभर बेबंद हुंदाडणारा मरग्या तसा भला दांडगा, मांदालल्याला हुता. बघताच भीती वाटावी असा ....पर मारकुटा नव्हता. पेठेच्या समद्या गल्ल्यांतनं अगदी दसऱ्याच्या छबिन्याच्या हत्तीगत मस्त झुलत जायचा. आणि माजाला आला की पेठंतलं गोठं हुडकत राती गोठ्याला लावल्याली कुप्पाटं नाकाडानंच हुंडारुन गोठ्यात शिरायचा... मग झालंच....दावं तोडूस्तवर हंबारत्याल्या म्हशींचा दंगा ऐकून म्हशीवाल्यांची तारांबळ उडायची. हेला मारावा? की हुसकावा? कोडंच... एकदा एका म्हशीच्या मालकानं या लाडात वाढलेल्या देवाच्या रेड्याला एखादी हलकीच काठी मारली.... बस्स... मरग्यानं डूक धरलाच. सरनायकाच्या कुमारचा वास जरी आला तरी नाकाड फेंदारुन मरग्या तेच्या अंगावर जायचा... तेचि पाठ धरायचा, मग काय? कुमारला बोळं-बोळकांडं बघून, झुकवून, कुणाच्या तरी घरात घुसून सुटका करून घेतल्याशिवाय दुसरा वावच नसायचा. पण असल्या आक्शि बघताक्षणी धडकी भरणाऱ्या या मरग्याच्या गळ्यात गल्लितलंच एक बारकं पोरगं, अपंग हुतं खरं ते... गल्लीतल्या गवळ्याचा अरण्या वो, ते बाकी मरग्याच्या गळ्याला मिठ्ठी मारून लोंबकाळायचं, तेचं कान वडायचं, तोंडावरनं हात फिरवायचं, फुल्ल दंगामस्ती करायचं. आणि असंच कायबाय बडबडायचं, ‘आडि डाटील्ड- वडा डाटील्ड’ असं ना शेंडा, ना बुडका बडबडत मरग्या बरोबर खेळायचं..... मरग्या बाकी गप्पच... अगदी एखाद्या वांड आणि आबंड पोरांचं नटखट नखरं गुमान नि कौतुकानं सोसणाऱ्या बापागत, हे सारं गपगुमान सहन करायचा. समद्या पेठेत हेचा आचिंबा असायचा.... ‘च्या..? या अरण्याचं नि या मरग्याचं काय हाय...? समजत न्हाय,’ ..कारण तसा मारकुटा नसणारा मरग्या अगदीच काही शामळूबि नव्हता ...टक्करी जर लागल्या तर झुंझार लढाऊ योद्धाच जणू.... 

मागं एकदा रक्काळ्याच्या परतांगळ्यात ... खरं म्हणजे दोन-तीन पेठंतलं म्हशीवालं, सकाळच्या धारा झाल्या की जनावरांस्नी वैरण खायला घालायचे. दुपारी दोनच्या फुडं भागातल्या एकेकाच्या म्हशी साळुंक्याचा शाहज्या गोट्याच्या पत्र्यांवर काठी आपटून, ‘मामी ऽऽऽऽ म्हशी सोडा,’ असं आरडतंच शे-दीडशे म्हशींचा पुठ्ठा गोळा करून पार तिकडं बुरजाकडंवर, हत्तीगवतागत जाड गवतावर म्हशी चालायला घेऊन जायचा. एका म्हशीला महीन्याला दोन रुपये, आणि सांज झाली की येतायेता रक्काळ्यातल्या समाधीजवळच्या परिट घाटा म्होरनं पाण्यात बुचकाळूनच जेच्यातेच्या घरात आणून सोडायचा. काळ्याकरंद म्हशी आक्शी झकास दिसायच्या. अगदी दिवेलागणीला कधीकधी या असल्या तुकतुकीत म्हशींच्या पाठीवर बसून गल्लीत येण्यात लैच मज्जा असायची. त्या परताळ्यात म्हशींची दलंच्या दलं चरत असायचीत. .....इरिकेशनचा लिलावच व्हायचा वर्षाला. म्हशीला दोन रुपये नि रेडा, रेडकू नि गाय फुकट. रक्काळ्यातलं पाणी आटून, मोकळं रान ते मिरगानं परत पाणी येऊतोवर. म्हसरं हाकायला चिवकाठ्याची काठी. दिवाळी पाडव्याला भगव्या आविलपेंटनं  रंगिवल्याली. ती घेऊन ज्या त्या दलाचा राखणदार तंबाखू चोळत म्हशींवर बारीक नजर ठेवून असत. तसं आख्ख्या गावात गवळगल्ली नि नदीकडंची एक-दोन गवळी घरं सोडली तर पेठंतल्या गवळगोठ्यात रेडं कमीच. गोठा मोठा करायला मरग्या हुतांच. समद्यां दुभत्या म्हशी नि तरण्याबांड रेड्याच. आणि रेडा झालाच तर एकतर बाजारात... नाहीतर एखाद्याचा मरगाईला सोडायचा.

पेठंतला एक हौशी कम् व्यावसायिक गवळी जोधबामामा शिपेकर गवळी, सरदार तालमी जवळचाच... तेंच्या गोठ्यांत बाकी दोन-तीन रेडं असायचंच. ‘मोहन’, ‘अजिंक्य’ ही असली नावं.. चांगलं खाऊन-पिऊन मस्तावल्यालं... आणि झुंजत्यालंबि.... हे महत्त्वाचं. दरसाली गांधी मैदानात नि दिवाळीच्या पाडव्याला रेड्यांच्या टक्करी ठरलेल्याच गांधी मैदानात व सागर माळावर. जोधबामामा गवळ्याच्या रेड्यानं शील्डं आणलं नाही असं हुयीतच नव्हतं... दरसाली गल्लीत हालगी घुमायचीच.... मरग्या, देवाचा रेडा त्यो, असल्या जत्रंत नि टक्करित कंदीबि गेला नव्हता. आनं तेला टक्करीत घालणार तरी कोण? ..तेला नेणार तरी कोण? पर परताळ्याल्या कैक म्हशीच्या दलात, बाकी सगळ्या रक्काळ्यावर नेहमीच या मरग्याचा ‘होल्ड’ असायचा. पार अगदी जुन्या वाशी नाक्यापासनं ते इराणी खणीपर्यंत म्हशींचं तांडंच्या तांडं रक्काळ्यातल्या बुरजाकडंवर आबादान चरत असायचंत ....यात परतेक प्रकारची म्हस. चांदी, पंचकल्याणी, डोळं घारशी, भारकांड, भोरी, ठुसकी, आखूड शिंगाची, मोठ्या शिंगाची, खडी कोचारी, टोकी शिंगटाची, फत्ताडी, शिंगमेटी, चक्री, एक ना अनेक.... अन् नावं तरी काय एकेकींची? ... धोंडी, सुंदरी, कल्याणी, बिजली, पैंजण, चांदणी, बावरी, पांडव  ....मरग्याला तिथं ‘चॉईस’ होती... म्हणूनच या रंकाळ्यावर ‘होल्ड’च तेचा. तसं बाकीच्या गवळ्यांचं एक-दोन बाकीचे रेडंबि असायचंत रंकाळ्यात पर ते व्यावसायिक. तेंचं मालकबि सदैव जागरूक. एकदा असंच ‘चॉईस’ हुडीकताना गवळ्याच्या ‘मोहन’ रेड्यात नि मरग्या रेड्यात खडाजंगी सुरू झाली. टक्करच... तसं मागं एकदा गांधी मैदानात अश्याच चाललेल्या शिपेकराच्या मोहन नि गवळ गल्लीतल्या रेड्याच्या टक्करीत देवाचा रेडा कसा काय घुसला... आणि चालू असलेल्या झु़ंजीत घुसून जे बुधवारातल्या गवळ्यांच्या रेड्याच्या अंगावर गेला. गवळ्यांच्या रेड्यानं एक-दोन ढुश्या देऊन बघितलं, ताकद आजमावली नि जे थेट मागं घरचा रस्ता धरला ...डा़ंडारलंच... ते रस्ता मिळेल तिकडं भरकाटलं. सवयीच्या रस्त्यानं थेट पंचगंगेकडं उधाळलं ....सगळं पब्लिक मागनंच... वरुणतीर्थ सोडून नदीकडं. तसं इकडं जोधबामाचा मोहन रेडाबि बुचकुळ्यात पडला. पर, आज मात्र परताळ्यात वरसाभरात तगडा झालेला तो मोहन, देवाच्या रेड्याच्या चांद्या डुयीला डुई लावून ताकदीनं रेटारेटी करिता व्होता. ‘चॉईस’ साठीच लढत होता, झुंझत होता. झुंज फारच रंगत चालल्याली. देवाचा रेडा म्हणजे जरा कमी ‘गवा रेडा’च आणि त्यात तवाचा वचपा काढायला ईरंला पेटल्याला. साऱ्या रक्काळ्यातल्या दलदलीतनं दैतागत नाचत हुता. दोघांच्याबि शिंगटांच्या खडकडाटाने रक्काळ्यातली समदी म्हशीवाली त्या झुंजीभवती जमली.... शाहज्या, शिवज्या, रामा, जाल्या, रावश्या, धोंडीराम, साळोख्याचा ह्याला, दिनकर, शंक्या समदिच हुती, पर समद्यांच्याच हातातल्या काठ्या हातातच खिळल्याल्या. कोण आडीवणार? पुढं कोण जाणार?... कुणाला हाटीवणार?...एकानं तसं जरा धाडसच केलं. रावताचं जाल्या टक्करीत गेलं नि दोनदा खाडखाड काठी बडीवली... तीबि गवळ्याच्या रेड्याच्या अंगावर... म्होरं मरगाईचा रेडा...देवाचा रेडा... तेला कसं मारावं?...मग दोन-चार बहाद्दरांनी म्होरं हुयीत थोडं धाडस दाखवलं नि दोन्ही रेड्यांच्या शिंगावर काठ्या मारून झुंज सोडवायचा तसा लांबूनच प्रयत्न केला पण ... दोन्ही बाजूला दोघं रेडं उधाळलंत नि पुन्हा दोन्ही रेडं चांगलं गुडघाभर पाण्यात जाऊन पुन्हा डोस्क्याला डोस्कं लावून झुंजायला लागलंत, रक्काळ्यात... आता झाली का पंचाईत?...आता कुणी उतरायचं पाण्यात? दलदलीतनं....सगळाच झोमकाळा...जमल तेवढं पाण्यात उतरून वरडावरडी करण्यापलीकडं कायबि हातात राहिलं नव्हतं.  

आता बाकी दोन्ही रेडं ईरलां पेटल्यालंत. दोघंबि दोन्ही पायांवर हुबारून दणाणा टक्करा दीत हुतं, आणि खाली गुढग्यावर वाकून वरची टक्कर झेलत, उट्टं काढत होतं. देवाच्या रेड्याची सरशी होत होती. शिंगटाच्या आदिमधी बसल्याल्या तडाख्यानं गवळ्याच्या रेड्याची मानगूट आणखी गळ्याची सालटं जाऊन जखमा झाल्यात्या... आणि परत त्यावर शिंगाटाचा तडाखा बसला की जखम वाढतच होती.. रगताच्या धारा वरगळुन रंकाळ्यातली दलदल लालावल्याली होती. काठावरनं झुंज बघत बसल्याला हरेकजण. जवळपास तास हुयीत आला. कोणंच मागं हाटंना. जोधबामामा बाकी आपल्या रेड्याची झाल्याली गत बघून घायकुतीला आला व्हता... हिकडं झुंज सुरू झालीती नि तिथलंच याक गल्लीतलं म्हसरं राखाय आल्यालं प्वार, रावताचं सुन्या, झुंज बघून रक्काळ्यातनं पायाला भिंगरी बांधून थेट गल्लीत.....गवळ्याच्या घरलाच गेलं हुतं ...दारातनं आरडंतच तेनं घरात सांगतानाच आखंड गल्लीत ऐकू जाईल असं नरड्याचि घाटी फुलवुन वराडलं, ‘वैनि...वैनि...परताळ्यात आपल्या रेड्याची नि मरगाईच्या रेड्याची झुंज लागलिया.....तास झाला, लैच घुमलिया... आपला रेडा फेपालल्लाय.’ एका दमात पाच-सा वाक्यात सारा समाचार सटासट सांगून रिकामं झालं... ‘आता रं माझ्या दैवा’, असं म्हणत वैनी कपाळावर हात मारून माटृदिशी खालीच बसल्या... ‘काय चूक झाली गं आई आमची? आई मरगुबाई अशी कशी कोपलिस?...’ असं म्हणत सारं घरातलं वातावरणच बदाललं... त्यातनंबि हिमतीनं उठून घरातलं हळदी-कुंकू, कापूर, खडीसाखर, वटी, नारळ आणि लेकीसुनांना बरोबर घेऊन वैनिंनी थेट मरगाईचं देऊळ गाठलं. ते ईब्लिस पोरटं सुन्या, वैनीला मंदिराकडं जात्याली बघून तसंच तिकडं रक्काळ्यात गेलं...हिकडं झुंज लैच जोरात चालल्यालि.. राधानगरी रोडवरनं जाणा-येणाराच न्हाई तर पेशल गाड्यातनं माणसं रक्काळ्यात उतरून परतांगळ्यात पसारल्यालं, जुंधळं पसारल्यागत....

देवाच्या रेड्यानं पाक घोसळून टाकल्याला गवळ्याच्या रेड्याला...आता तर मानंवरची कातडी  म्होरल्या दोन्ही पायांवर लोंबकळत आलंतित. सालटं निघालितीत. रगताच्या धाराच. जोधबामामा गवळीबि जातिवंत गवळी .. मोठा सरधावान माणूस.....समोर दिसतंय पोरावानी हौसंनं पाळल्याला नि वाढीवल्याला, शिवाय मिळकतीची दौलत असल्याला आपला ‘मोहन’ धापाललाय, मातेरं व्हाय लागलंया तेचं... पर...देवाच्या रेड्याला असां कसां हटवायचा? आणि तेबि मारून?... काय करावं?.... ‘देवानंच निस्तरावं हे... तेनंच रचलिया ही करणी  सारी...’ असं म्हणत डोळ्यातलं पाणी डोळ्यातच आटवत ...आई मरगुबाईची आण भाकत.... ‘रेडा सोड.. सोड आई.. सुटू दे झुंज,’ म्हणीत हात जोडून आबाळाकडं मोठ्या आशेनं डोळं लावीत बघत व्हता....इकडे वैनी देवळांत पोचल्या देवीला हळदकुंकू वाहून कापूर लावला, वटी भरली नि हात जोडून एकदा साकडं घातलं नि डोस्क्यावरील घंटा ढाण-ढाण बडवायला सुरुवात केली..... ‘आई सोडव... आई सोडव...’ 

तिन्ही सांजंला त्या घंटीचा आवाज पार तिकडं रक्काळ्यात किणकिणत कानातनं साठवतंच ते ईब्लिस पोरं सुन्या थेट रक्काळ्यात आलं... ऐशीनं...आतापावतुर ते परताळ्यात पोचल्यालं... समोर बघतंय कि जोधबामा हात जोडून धावा करत्याला... नि ...चिखलात झुंजत्यालं ते दोन दैत्यच... सुन्या बघतंय तवरच एकाएकी दोन्ही रेड्डयांची एकमेकांत आडाकल्यालि शिंगटं सुटलीत... आपसूकच सुन्या जोधबामामाच्या कानात पुटपुटलं, ‘आबा, आईनं ऐकली वो... वैनीची हाक...’ जोधबामामानं त्या पोरांकडं बघितलं नि, ‘काय रं?’ असं मान हुंडरून ईचारलं... ‘खरंच आबा, वैनी मरगाईच्या देवळात गेल्यात... वटी भरायला, तेंचीच हाक ऐकलि बघा की... आबा झुंज सुटली की...’

जोधबामानं सुन्यावरनं नजर तशीच रक्काळ्यात टाकली तर... दोन्ही रेडं बाजूला हुईत हुतंत. देवाचा रेडा मुस्काड हालवत हालवत तिकडं बुरुजाकडं माघारी माघारी जात होता... आणि तेच्यास़ंग निकरानं लढल्याला घरचा रेडाबि दमल्याला, खरं फेसाळलेल्या तोंडानं, शाब्बासकीच्या अपेक्षेने मालकाकडे पहात होता.... बाकीची समदी बरोबरची म्हशीवाली लगुलग पाण्यात गेलीत. मरग्या पार तिकडं लांब गेलाता.. जोधबामांच्या रेड्याला पाण्याभाईर काढलं ...जे ते म्हणीत व्हतं, ‘...तसं लैच मोठं मैदान गाजिवलं बाबा हेनं.... खरंच, मरग्या रेड्याबरोबर तीन तास झुंजणं म्हंजी?...काय चेष्टा का काय?’ 

समदी मोहनला भाईर काढून दवाखान्यात न्यायची तयारी करत हुतीत नि हिकडं ते सुन्या धापलंत, फापलंत देवळांत पोचल्यालं. ते देवळाच्या दारातनंच आराडलं, ‘...वैनिऽऽऽऽ झालं... झुंज सुटलीऽऽऽऽ’ घाट थांबली... वैनिंनी मागच्या सुन्याकडं बघतच पुढं मरगाबाईला हात जोडलं...

 

संबंधित बातम्या