‘स्टोनहिंज’चे उलगडणारे रहस्य 

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

विशेष ः

इंग्लंडच्या विल्टशायर प्रांतांत स्टोनहिंज नावाचे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथे नवाष्म किंवा निओलिथिक युगातील (इ. स. पूर्व ३५०० ते १२०००) अजस्र दगडांची एक गूढ गोलाकृती रचना आहे. आकाराने मोठे आणि वजनाने अतिशय जड असलेले दगड येथे एका विशिष्ट पद्धतीने उभे केलेले दिसून येतात. या रचनेमधे काहीतरी रहस्य असावे म्हणून ते उलगडण्याचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न चालू आहे. ‘युनेस्को’ने जागतिक वारसा स्थळाचा स्टोनहिंजला दर्जा दिला आहे. स्टोनहिंज संदर्भातील नवीन निष्कर्ष २२ जून २०२० रोजी स्टोनहिंजमध्ये शोधनिबंधाच्या माध्यमातून पुन्हा स्पष्ट करण्यात आले आहेत. 

या रचनेत पूर्वी शंभर दगड होते, आता त्यातले फक्त ४३ शिल्लक आहेत. बाहेरच्या बाजूला जे मोठ्या आकाराचे दगड आहेत ते  वालुकाश्म (Sandstone) प्रकारचे आहेत. आतल्या वर्तुळाकृती रचनेतील दगड लहान आकाराचे अग्निजन्य प्रकारचे असून ते ३०० किमी दूर असलेल्या वेल्स प्रांतातून आणलेले असावेत. बाहेरच्या रचनेतील दगड जवळच्या ३० किमी अंतरावरील प्रदेशातून आणले असावेत. 

पाच हजार वर्षांपूर्वीच्या या विलक्षण गूढ अशा रचनेचे बांधकाम इ. स. पूर्व १४०० पर्यंत चालू असावे, असे कार्बन १४ कालनिश्चितीच्या पद्धतीच्या साहाय्याने लक्षात आले आहे. 

स्टोनहिंज हे कर्क आणि मकर संक्रमणाचे निर्देशन करणारे प्राचीन मानवाने बनविलेले पाषाणशिल्प आहे, असे आज बऱ्याच  संशोधकांना वाटते. या पाषाण शिल्पाचा मुख्य आस मकर संक्रमण दिवसाच्या सूर्यास्त वेळेशी संलग्न असल्याचे दिसून येते. इथल्या त्रिशिला (Trilithon) संरचना केंद्रभागाकडून बाहेर या पद्धतीने बांधण्यात आल्या असून त्यांचा सपाट पृष्ठभाग हिवाळ्यातील मध्यवर्ती सूर्य स्थानाकडे वळलेला दिसतो. 

सूर्याचे उत्तर व दक्षिण दिशेने होणारे संक्रमण (Solstice) ही पृथ्वीवरील ऋतुचक्राच्या संदर्भात एक महत्त्वाची घटना आहे. पृथ्वीवर हे संक्रमण वर्षातून दोन वेळा होते. या संक्रमणांना अनुक्रमे उत्तरायण आणि दक्षिणायन किंवा मकर आणि कर्क संक्रमण असेही म्हटले जाते. ही संक्रमणे अनुक्रमे डिसेंबर आणि जून महिन्यात होतात. सूर्याच्या या बदलत्या मार्गक्रमणाचे पूर्वीपासूनच माणसाला कुतूहल वाटत आले आहे. 

उत्तरायणाचा किंवा मकर संक्रमणाचा दिवस हा उत्तर गोलार्धातील देशांच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा दिवस. सूर्याच्या संक्रमणाचा हा दिवस फार पूर्वीपासून ‘नवीन सूर्याचा दिवस’ मानला जातो. सूर्याच्या संक्रमणाचे किंवा उत्तरायणाचे नेमके ज्ञान माणसाला केव्हा व कसे झाले हे कुणालाही निश्चितपणे माहिती नाही. पण प्राचीन मानवाला अशा तऱ्हेच्या खगोलीय घटनेचे ज्ञान होते हे मात्र निश्चित! त्याने ते जगभरात सगळीकडे वेगवेगळ्या पाषाण शिल्परचना व मंदिरातून अतिशय प्रभावीपणे दाखवून ठेवले आहे. 

सूर्य त्याच्या भासमान भ्रमण मार्गावर प्रवास करताना साडे तेवीस अंश उत्तर अक्षवृत्ताच्या वर आणि साडे तेवीस अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या खाली कधीही जात नाही. आपल्या भासमान भ्रमण मार्गावर प्रवास करताना २१ डिसेंबरच्या दिवशी सूर्य मकर वृत्तावर येतो आणि काही काळ तिथेच थांबल्यासारखा दिसतो. या दिवशी मकर वृत्तावर त्याचे किरण लंबरूप पडतात. यानंतर तो हळूहळू उत्तरेकडे सरकू लागतो. सूर्याच्या या बदलत्या व आनंददायी मार्गक्रमणाचे पूर्वीपासूनच माणसाला विलक्षण कुतूहल वाटत आले आहे. 

चिनी लोकांनी वर्षभरातल्या सूर्य स्थितीचा अभ्यास करून ‘यांग - यिन’ चक्र मांडले. त्यानुसार मकर संक्रमणाच्या वेळी चीनच्या प्रदेशात रोवलेल्या काठीची सावली खूप मोठी दिसते. या चक्रात सहा समकेंद्रिय वर्तुळे दाखविलेली असतात. त्याचे एकूण २४ भाग दाखवून त्यावर सूर्यप्रकाशाचे प्रमाण दाखविलेले असते. प्रत्येक भाग पंधरा दिवसांच्या काळातील सूर्यप्रकाशाचे प्रमाण किती असेल ते दाखवतो. 

उत्तर गोलार्धात ख्रिसमसचा कालखंड हाही या संक्रमणाशी जोडण्याचा प्रयत्न १६०० वर्षांपूर्वी झाल्याचे उल्लेख आढळतात. नवाष्म  (Neolithic) व कांस्य (Bronze) युगातही हा दिवस फार महत्त्वाचा मानला जात असे. याचे काही पुरावे ब्रिटनमधील याच ‘स्टोनहिंज’ आणि आयर्लंडमधील न्यूग्रांज इथे आढळतात. स्टोनहिंज हे कर्क आणि मकर संक्रमणाचे निर्देशन करणारे प्राचीन मानवाने तयार केलेले पाषाणशिल्प आहे असे आज बऱ्याच संशोधकांना वाटते. या पाषाण शिल्पांचा प्रमुख आस मकर संक्रमण दिवसाचा सूर्योदय (न्यूग्रांज) आणि मकर संक्रमण दिवसाचा सूर्यास्त (स्टोनहिंज) यांशी संलग्न असल्याचे दिसून येते. 

इजिप्तच्या न्युबिअन डेझर्ट भागातील नाबटा किंवा इंग्लंडमधील स्टोनहिंज येथे सापडणाऱ्या प्राचीन अश्मरचना पाहिल्या, की पूर्वीच्या माणसाला अशा संक्रमणांची निश्चित माहिती असावी याची खात्री पटते. नाबटा येथील रचना स्टोनहिंज येथील रचनेपेक्षाही जुनी असून ती ६५०० वर्षांपूर्वीची असावी असा अंदाज आहे. यातील दगडांच्या रचनेतून, उत्तर दक्षिण दिशा आणि संक्रमणाच्या वेळी होणारा सूर्योदय व सूर्यास्त यांच्या जागा नेमकेपणाने दाखविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. 

जगातील काही प्राचीन मंदिरे ही मकर व कर्क या दोन मुख्य ऊर्जा रेषांवर असल्याचे  
दिसून येते. सुमेरिया या प्राचीन संस्कृतीपाशी या दोन रेषा एकमेकांना छेदतात. गेली १२,००० वर्षे या रेषा अस्तित्वात आहेत. या रेषा जगभरातील १२ मंदिरे एकमेकांशी जोडतात. गिझाचे पिरॅमिड, नाझका, माचुपिचू, स्टोनहिंज, बोस्निया पिरॅमिड, भारतातील द्वारकेचे कृष्ण मंदिर, खंबायतचे आखात, हंपी येथील विजयनगर साम्राज्यातील मंदिरे आणि इंडोनेशियातील लालाकोन पर्वत ही पाषाणशिल्पेही याच रेषांवर आहेत. 

इजिप्तमध्ये जे दोन मुख्य पिरॅमिड आहेत त्या दोघांच्या मधे संक्रमणाच्या वेळी अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे नेमके दर्शन इथल्या  स्फिंक्ससमोर उभे राहिल्यावर होते. इजिप्तमधेच असलेले ऑसिरिओन मंदिर असे बांधलेले आहे, की कर्क संक्रमणाच्या दिवशी अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा प्रकाश लिब्यन टेकड्यांतील फटींमधून बाहेर पडून या मंदिराला छेदून जाईल. इथल्या इसेन मॉनेस्ट्रीतील गर्भगृहाची रचना अशी केलेली आहे, की संक्रमणाच्या वेळी त्याच्या पूर्व भिंतीवर सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरण पडतील. याच मठाजवळ चुनखडीत तयार केलेले एक सूर्यतबक (Sundial) आहे. त्यावरून दोन्ही संक्रमण दिवस सहजपणाने ओळखू येतात. 

इंग्लंडमधल्या स्टोनहिंजच्या ईशान्येस तीन किमी अंतरावर दुरिंग्टन वॉल्स ही पाषाणरचना असून त्यात सूर्याची संक्रमणे दाखविणारी सहा समकेंद्रीय पाषाण वर्तुळे सापडली आहेत. जवळच असलेल्या ब्लूहिंज येथील शीलाचक्र, स्कॉटलंडमधल्या लॉकनेस्ट   जवळच्या आणि आयर्लंडच्या सेस्किन पर्वतातील सर्पाकृती या रचनांच्या निर्मितीमागेही उत्तरायण आणि दक्षिणायन सूचित करण्याचाच प्रयत्न दिसतो. 

महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यातील २६ व्या लेण्याची रचना कर्क संक्रमणाच्या वेळेचा सूर्योदय आणि १९ व्या लेण्याची रचना मकर संक्रमणाच्या वेळेचा सूर्योदय दिसावा आणि त्यावेळच्या सूर्यकिरणांनी लेण्यात प्रवेश करावा अशीच केलेली आहे. कर्नाटकातील हंपी इथे असलेली विजयनगर साम्राज्यातील अनेक मंदिरे आणि त्यांचे अवशेष हेसुद्धा सूर्य संक्रमणे सूचित करीत असावीत असे  तज्ज्ञांचे मत आहे. 

जगातील अशी अनेक प्राचीन पाषाण शिल्पांची ठिकाणे (Megalithic sites) ही उत्तरायण आणि दक्षिणायन या संक्रमण दिवसांचे अचूक ज्ञान व्हावे अशा पद्धतीनेच बांधण्यात आली असावीत. स्टोनहिंज येथील रचना हे त्याचे उत्तम उदाहरण असले, तरी ती रचना नेमकी केव्हा आणि कोणी बांधली हे कळणे महत्त्वाचे होते. आज ज्ञात असलेल्या अशा रचनांव्यतिरिक्त अशा प्रकारची अजून अनेक अज्ञात ठिकाणे असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

स्टोनहिंजचे हे प्राचीन अवशेष चार ते पाच हजार वर्षांपूर्वीचे आहेत हे आता नक्की झाले आहे. स्टोनहिंजच्या विल्टशायर मैदानात सर्वत्र वालुकाश्म खडक आहेत. पण इथल्या रचनेतील दगड दोनशे ते अडीचशे किमी अंतरावरील वेल्स भागातून आणले असावेत, असे वैज्ञानिकांना वाटते आहे. इतक्या दूरवरून इतके जड दगड स्टोनहिंज असलेल्या ठिकाणी कदाचित त्यावेळी नदीतून वाहात येत असलेल्या हिमनगांचा वापर करून जलमार्गाने आणले गेले असण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

या रचना सुमारे २५ टन वजनाच्या मोठ्या आणि त्याहून लहान असलेल्या २ ते ५ टनांच्या दगडांचा वापर करून तयार करण्यात आल्या आहेत. त्यातील काही दगडांची उंची ८ ते १३ मीटर आणि व्यास १० मीटर आहे. 

स्टोनहिंजची रचना खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आणि ग्रहणांचे दिवस निश्चित करण्यासाठी केली गेली असावी. त्यादृष्टीने बांधकामाच्या रचनेचे पुन्हा संशोधन केले गेले आणि त्याचा संबंध खरोखरच ग्रह-तारे यांच्याशी आहे का हे तपासले गेले. वर्षातील अयनदिनांशी म्हणजे सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायण स्थितीशी इथल्या शिळांचा संबंध आहे हे नक्की झाले. उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वांत मोठा दिवस २२ जून आणि सर्वांत लहान दिवस २२ डिसेंबर असतो. स्टोनहिंज येथे २२ जून रोजी विशिष्ट दगडामागून सूर्योदय होतो आणि २२ डिसेंबर रोजी विशिष्ट उंच दगडामागून सूर्यास्त होतो. 

स्टोनहिंजच्या परिसरात दहा हजार वर्षांपूर्वी असलेल्या मानवी संस्कृतीचे पुरावे सापडतात. त्याचे संशोधन करताना सुदूर संवेदन, मेटल डिटेक्टर, त्रिमिती लेसर, मेग्नेटोमीटर, कार्बन -१४ कालमापन आदी आधुनिक उपकरणे वापरली आहेत. येथून दीड किमी अंतरावरील प्रदेशाचे उत्खनन केल्यावर वेगळी संस्कृती तेथे अस्तित्वात असावी असे संकेत मिळाले आहेत. स्टोनहिंजची रचना कोणी केली हा प्रश्न अनेक दिवस अनुत्तरित होता. तेथे जाऊन उपासना करणाऱ्या डुईंडस्‌ आणि सेल्टिक लोकांनी ती केली असावी असे म्हणतात. 

पण हे लोक खूपच नजीकच्या काळातील आहेत. या मैदानात ३५० हाडे आणि १२,५०० अश्मयुगीन हत्यारे सापडली. जैविक अवशेषांचे कालमापन केल्यावर ती साडेचार हजार वर्षांपूर्वीची होती असे निष्कर्ष प्राप्त झाले. येथील अवशेषांमध्ये जे मानवी डीएनएचे नमुने मिळाले त्याचे पृथक्करण करण्यात आल्यावर असे लक्षात आले, की आले ते नमुने पश्चिम युरोपमधील शेतकऱ्यांशी जुळणारे आहेत आणि ते तीन हजारपासून आठ हजार वर्षांपूर्वीच्या नवाष्म म्हणजे निओलिथिक काळातील असावेत. याचा अर्थ स्टोनहिंजची रचनाही त्याच काळातील असावी.

संबंधित बातम्या