फणी चक्रवाताचा तडाखा 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 13 मे 2019

पाण्यासाठी...
 

हिंदी महासागरात २५ एप्रिल २०१९ ला सुमात्रानजीक विषुववृत्ताजवळ तयार झालेले आणि ३ मे रोजी ओडिशा राज्यातील पुरीच्या किनाऱ्यावर प्रचंड ताकदीने हल्ला करणारे फणी वादळ हे एक अति तीव्र आणि विध्वंसक उष्ण कटिबंधीय वादळ ठरले आहे. या वादळाला दिलेले ‘फणी’ हे नाव, नाव देण्याच्या पद्धतीनुसार बांगला देशाने सुचविले असून त्याचा उच्चार ‘फोनी’ असा आहे आणि त्याचा स्थानिक भाषेतील अर्थ सापाचा फणा (Hood of a snake) असा आहे. 

सामान्यपणे बंगालच्या उपसागरात मे महिन्यात असे चक्रवात अभावानेच निर्माण होतात. अनेक प्रकारे वेगळेपणा असलेल्या या वादळाने जागतिक तापमानवृद्धी आणि हवामानबदल या गोष्टींवर आता शिक्कामोर्तबच केले आहे, असे म्हणायला हरकत नाही. मेमध्ये भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडकणारे गेल्या ५२ वर्षातले हे दहावे वादळ आहे. याआधी मे २००४ मध्ये आणि त्याआधी १९६८, १९७६, १९८२, १९९७, १९९९ आणि २००१ च्या मेमध्ये अशी वादळे आली होती. 

भारताच्या पूर्व किनाऱ्याला सामान्यपणे मॉन्सूनोत्तर काळात ऑक्‍टोबर-नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चक्रवात (Cyclones) अनुभवाला येतात. १९६५ ते २०१७ या काळात अतिविध्वंसक अशी ३९ वादळे होऊन गेली. या काळांतल्या एकूण ५२ पैकी ६० टक्के म्हणजे २३ वादळे ही ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमधली होती. तीव्र वादळात वाऱ्याचा वेग ताशी ४८ ते ६३ नॉट्‌स (Knots) असतो. एक नॉट वेग म्हणजे ताशी १.८ किलोमीटर. अतितीव्र वेग म्हणजे ९० ते ११६ नॉट्‌स आणि विध्वंसक वेग म्हणजे १२० नॉट्‌स किंवा त्यापेक्षा जास्त. फणी वादळाचा समावेश चौथ्या श्रेणीच्या विध्वंसक वादळांत केला गेला. 

पंचवीस एप्रिल रोजी उत्तर हिंदी महासागरांत समुद्रावर वातावरणात सुमात्राच्या वायव्य टोकाजवळ खूप उंचीवर एक चक्रवात निर्माण झाला होता. तो तीव्र होत वायव्येच्या दिशेने सरकत, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या आग्नेयेला २३० किलोमीटर अंतरावर स्थिरावला आणि नंतर उत्तरेकडे सरकून ३ मे रोजी सकाळी ८ वाजता ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकला. ४ आणि ५ मेपर्यंत हे वादळ पश्‍चिम बंगाल आणि बांगला देशात जाऊन दुर्बळ होऊन नष्ट झाले. या वादळाने ओडिशातील गंजम, गजपती, खुर्दा, पुरी, जगतसिंगपूर, केंद्रपाडा, भद्रक, जजपूर आणि बालासोर इथे प्रचंड विध्वंस केला. आत्तापर्यंत या वादळांत २९ जणांचा बळी गेला आहे. एकूण दहा हजार गावे आणि ५२ शहरी भागांचे मोठे नुकसान झाले आहे. ५५३ हेक्‍टर जमिनीची हानी झाली आहे. 

राज्य सरकारने ज्या पद्धतीने या आपत्तीचा सामना करण्यासाठी तयारी केली, ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. अन्यथा इतक्‍या प्रचंड ताकदीच्या वादळाने केवढा हाहाकार माजवला असता, त्याची केवळ कल्पनाच केलेली बरी! आपत्ती प्रतिसाद यंत्रणा आणि हवामान विभागाने दिलेल्या पुरेशा पूर्वसूचनांमुळे आणि प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणावर केलेल्या हालचालींमुळे मनुष्यहानी खूप नियंत्रणात राहिली. मालमत्तेचे जे नुकसान झाले ते आटोक्‍यात ठेवणे महाकठीण काम होते यात शंकाच नाही. या वादळांची पूर्वसूचना देणाऱ्या भारताच्या सक्षम यंत्रणेचा अनुभव यापूर्वी १० ऑक्‍टोबर २०१४ ला आंध्र व ओडिशाच्या किनाऱ्यावर प्रचंड ताकदीने हल्ला करणाऱ्या हुदहूद वादळाच्या वेळीही आपण घेतला आहेच. हवाईदल, ‘एनडीआरएफ’च्या तुकड्या, अग्निशमन यंत्रणा किनारी भागात तातडीने पाठविण्याबरोबरच, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अन्नपदार्थांच्या वितरणाची व्यवस्था, तात्पुरती निवासव्यवस्था या सगळ्याच गोष्टींची पुरेशी तरतूद आधीच करण्यात आली होती. इतक्‍या मोठ्या संहारक वादळाचा सामना करणे केवळ या प्रयत्नांमुळेच शक्‍य झाले यात शंका नाही. 

अनेक दृष्टींनी फणी हे वादळ वैशिष्ट्यपूर्ण होते. बंगालच्या उपसागरावरील आवर्ती वादळांचे आयुष्यमान केवळ ४ ते ५ दिवसच असते. मात्र फणी वादळ तब्बल १० दिवस तयार होत होते. या वादळाचा प्रवासमार्गही (Trajectory) विलक्षण होता. विषुववृत्ताजवळ एप्रिलच्या दरम्यान तयार होऊ लागलेले हे वादळ पश्‍चिमेकडे आणि नंतर उत्तरेकडे व वायव्येकडे सरकू लागले. सुरुवातीला या आवर्ताचे रूपांतर तीव्र चक्रवातात होईल याची खात्री नव्हती. मात्र, ३० एप्रिलला त्याचे रूप पालटले आणि ते अति तीव्र वादळ बनले. हे वादळ मोठा काळ समुद्रावर तयार होत राहिल्यामुळे त्यात आर्द्रता (Moisture) व गतिजन्य ऊर्जा मोठ्या प्रमाणावर वाढत गेली. त्यामुळे त्यात ताशी २४० किलोमीटरपेक्षाही जास्त वेगाचे वारे वाहण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. 

हे वादळ तमिळनाडूच्या किनाऱ्यावर धडक मारील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने केला होता. पण निर्मितीनंतर वादळाने मार्ग बदलला आणि ते ओडिशाच्या दिशेने जाऊ लागले. तमिळनाडूलाच किनाऱ्यावर ते आले असते, तर कमी अंतर पार करावे लागल्यामुळे ते इतके विध्वंसक झाले नसते. बंगालच्या उपसागरात निर्माण होणारी व भारताच्या पूर्व किनाऱ्याकडे सरकणारी वादळे सामान्यपणे दुर्बल असतात. कारण त्यांना मोठे अंतर तोडावे लागत नाही. मात्र, फणी वादळ सुमात्रानजीक निर्माण झाल्यामुळे त्याने जवळजवळ १८०० किलोमीटरचा प्रवास केला व नंतरच ते पुरीच्या किनाऱ्यावर आले. त्यामुळे ते जास्त विध्वंसक झाले. पुरीनंतरही ४ मे रोजी संध्याकाळी बांगला देशात जाईपर्यंत वादळाने जमिनीवरही मोठे अंतर कापले, हे त्याचे एक वेगळे वैशिष्ट्य ठरले. या वादळामुळे भरतीच्या लाटांच्या उंचीत १.५ मीटरनी (Storm Surge) वाढ झाली. ३ मे रोजी ७ मीटर उंचीच्या लाटांमुळे १० किलोमीटर अंतरापर्यंत पाणी किनाऱ्यावर आत घुसले होते. 

या वादळाचे अतिभव्य व भयावह रूप आणि त्याची जलद वाढ उपग्रह प्रतिमांतून लक्षात येतच होती. प्रबळ अभिसरण प्रवाह, भरपूर क्‍युम्युलोनिम्बस ढग आणि विशाल रुंदीचा आवर्त डोळा (Eye of cyclone) अशा जोराच्या या वादळाचे रूपांतर झपाट्याने विध्वंसक आवर्तात झाले आणि ओडिशाच्या किनाऱ्याला अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलन अशा संकटांना सामोरे जावे लागले. वादळाच्या प्रभावामुळे वीज आणि दळणवळण सेवा ठप्प झाली आणि अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. 

वादळाचा जोर ४ तारखेनंतर थोडा कमी झाला. कारण अशा वादळांना टिकून राहण्यासाठी भरपूर उबदार बाष्प आवश्‍यक असते. तीच त्यांची मुख्य ऊर्जा असते. अशी वादळे हा मुख्यतः उष्णकटिबंधीय आवर्ताचा प्रकार आहे. कर्क आणि मकर वृत्तांच्या दरम्यान अशी आवर्ते म्हणजे लघुभार प्रदेशांची बंदिस्त प्रणाली असते. ६५० किलोमीटर इतक्‍या विस्तृत व्यासाची ही आवर्ते म्हणजे उत्तर व दक्षिण गोलार्धात वाहणाऱ्या वाऱ्यांचे प्रचंड भोवरेच असतात. ही वादळे पृथ्वीवरची सर्वांत प्रबळ व विध्वंसक वादळे म्हणून ओळखली जातात. 

काही विशिष्ट गुणधर्मांमुळेच ही वादळे इतकी विध्वंसक बनतात. यातील वाऱ्याचा वेग ताशी १८० ते ४०० किलोमीटर असतो. या वादळाबरोबरच भरतीच्या महाकाय लाटा तयार होतात आणि भरपूर पाऊसही पडतो. यातील अतिशय कमी वायुभारामुळे समुद्राची पातळी उंचावते. 

आकार, विस्तार, वाऱ्याचा वेग, पर्जन्यमान आणि टिकून राहण्याचा कालखंड या सर्वच बाबतीत या वादळात भरपूर विविधता आढळून येते. यांचा सरासरी वेग ताशी १८० किलोमीटर तरी असतोच. समुद्रावर त्यांचा वेग व तीव्रता नेहमीच जास्त असते. मात्र, किनारा ओलांडून जमिनीच्या दिशेने येताना ही वादळे दुर्बळ व क्षीण होतात. किनारी प्रदेशात ती नेहमीच संहारक ठरतात. यांचा केंद्रबिंदू हा अतिशय कमी वायुभाराचा प्रदेश असतो. 

वातावरणात उष्ण व आर्द्र हवेचा पुरेसा व सततचा पुरवठा हे त्यांच्या निर्मितीमागचे मुख्य कारण आहे. जिथे ६० ते ७० मीटर खोलीपर्यंत २७ अंश सेल्शियस एवढे तापमान असते. अशा उष्ण कटिबंधीय, उबदार समुद्रपृष्ठावर त्यांचा जन्म होतो. समुद्रपृष्ठाच्या वर ९ हजार ते १५ हजार मीटर उंचीवर प्रत्यावर्ती अभिसरण असेल, तर अशी चक्रीवादळे तयार होण्याची प्रक्रिया सुलभ होते. 

या वादळांच्या रचनेत काही महत्त्वाचे वर्तुळाकृती पट्टे आढळतात. मध्यभागी मंद वाऱ्यांचा, उच्च तापमानाचा, लघुतम वायुभाराचा प्रदेश असतो. यास आवर्ताचा डोळा (Eye of the cyclone) म्हटले जाते. याच्याभोवती पर्जन्य मेघांचा १० ते २० किलोमीटर रुंदीचा पट्टा असतो. जोराचे वारे, तीव्र उर्ध्वगामी हवा आणि भरपूर पाऊस असे याचे स्वरूप असते. याच्याबाहेर क्रमशः कमी होत जाणारे ढगांचे प्रमाण, क्षीण उर्ध्वगामी हालचाल, अत्यल्प पर्जन्य अशी परिस्थिती असते. 

अशा महाविध्वंसक वादळांची भरपूर माहिती आज उपलब्ध आहे. वादळांदरम्यान ती सतत मिळतही असते. पूर्वी आग्नेय आशिया व आशियातील इतर देशात यांच्या पूर्वसूचनेची यंत्रणा परिणामकारक नसल्यामुळे अशा वादळांपासून मोठे नुकसान होत असे. यावेळी मात्र भारताने या आपत्तीचे नेमके अनुमान करून जीवित आणि वित्तहानी खूपच नियंत्रणात ठेवल्याचे दिसून आले आणि जागतिक स्तरावर भारताच्या या प्रयत्नांचे कौतुकही झाले.

संबंधित बातम्या