वाढत्या भूस्खलन घटनांचे संकट       

डॉ. श्रीकांत कार्लेकर      
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

विशेष
 

या वर्षी सर्वत्र सुरू झालेल्या दमदार पावसामुळे पश्‍चिम महाराष्ट्राच्या डोंगराळ भागात, सह्याद्रीत आणि कोकणात अनेक ठिकाणे भूस्खलन प्रवण झाली आहेत. मनुष्यवस्तीपासून दूर, दुर्गम भागात काही ठिकाणी भूस्खलनाच्या, दरडी कोसळण्याच्या आणि जमीन खचण्याच्या लहान-मोठ्या घटना घडल्याच्या बातम्या रोज आपल्यापर्यंत पोचत आहेत. माळशेज घाट, पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस मार्ग, चिपळूण जवळचा परशुराम घाट या अगदी अलीकडच्या माहीत झालेल्या घटना. पण दुर्गम प्रदेशात अशी जी भूस्खलने दूर, डोंगर-दऱ्यांत आणि लहान प्रमाणावर झाली आहेत, त्यांना फारशी प्रसिद्धी मिळालेली नाही. 

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आढळून येणारी भूस्खलनाची ही क्रिया तशी नेहमीचीच घटना असली, तरी यावर्षी अशा घटनांत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लहानमोठ्या दरडी कोसळणे, जमीन खचणे, जमिनीला भेगा पडणे या नैसर्गिक भूस्खलन घटनांबरोबरच मनुष्यनिर्मित बांधकामे पडणे, धरणे फुटणे अशा घटनांतही वाढ होते आहे. 

या वर्षीच्या प्रचंड पावसानंतर अनेक ठिकाणचे डोंगर व डोंगर उतार पाण्याने संपृक्त झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांत विदारण झालेल्या आणि कुजलेल्या खडकात त्यांच्या क्षमतेपेक्षा खूपच जास्त पाणी मुरले आहे. त्यामुळे लहान मोठ्या दरडी ठिकठिकाणी कोसळल्या आहेत. एवढेच नाही तर रस्ते, पायवाटा, शेतजमिनी यांना दोन ते तीन मीटर खोल भेगा पडल्या आहेत. जमीन खचण्याबरोबरच नदीमार्गही बदलले आहेत. कोकणात काही ठिकाणी तर नदीपात्रांचे किनारे कोसळून पात्रे रुंदावली आहेत. नदीचा तळ खचण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

अशी जोराची वृष्टी किंवा अतिवृष्टी हे भूस्खलनामागचे एकमेव कारण आहे असे वाटत असले तरी ते तसे नाही. गेल्या काही वर्षांत इथल्या जमिनी व डोंगर उतारांची भरपूर झीज व विदारण झाले आहे. क्षतिग्रस्त आणि भुसभुशीत झाल्यामुळे त्यांची स्थिरता संपून गेली आहे. डोंगराळ भागात जिथे रस्ते काढणे, त्यासाठी दगडांच्या खाणी खोदणे, जंगले कमी करणे, नदीमार्गात बंधारे घालणे अशी कामे झाली आहेत किंवा सुरू आहेत त्याच्या जवळपासच्या भागात जमिनी खचणे, भूजल व पृष्ठजल प्रवाह बदलणे, दरडी कोसळणे अशा घटना वाढीस लागल्या आहेत. 

सह्याद्रीत डोंगराळ प्रदेश व खोल घळ्या यांमुळे अनेक लहान दरडी कोसळण्याच्या घटनेचे परिणाम फार दूरवर जाणवत नाहीत. मात्र, जवळपासच्या शेतजमिनीवर होणाऱ्या भरड पदार्थांच्या संचयनामुळे तेथील जमिनीची प्रत बिघडते. कोसळणाऱ्या दरडीमुळे नदी नाल्यांचे मार्गही बंद होतात व पाणी इतरत्र वाहून प्रदेश क्षतिग्रस्त होतो. गेल्या काही वर्षांपासून पश्‍चिम महाराष्ट्रातील डोंगराळ भागातील अनेक गावे जमीन खचणे, जमिनीला भेगा पडणे, दरडी कोसळणे अशा घटनांमुळे त्रस्त आहेत.

विविध प्रकारच्या खडकांचे खोलवर झालेले विदारण (Deep weathering),  जंगलांची तोड, दगडांच्या खाणींचे वाढते प्रमाण याचबरोबर प्रदेशात होत असलेले नवीन रस्ते, नवीन बांधकामे यांमुळे डोंगर उतार व त्यावरील मातीचा थर यांचे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडले आहे. थोड्याशा पावसानेही आता डोंगर उतारांवरून भूस्खलन सहजपणे होण्यासारखी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण होत आहे. आधीच क्षतिग्रस्त झालेल्या भूभागाचा या परिस्थितीत टिकाव लागणे कठीण झाले आहे.

सगळ्या निसर्गाचा इतक्‍या वर्षांचा समतोलच जणू बिघडला आहे. वनस्पती, भूजल आणि पाणी यावर होणाऱ्या मानवी आघाताचे परिणाम ठिकठिकाणी आता अगदी स्पष्टपणे, दृश्‍य स्वरूपात दिसू लागले आहेत. अशा घटना एकाएकी घडताना दिसत असल्या, तरी त्यापूर्वी त्या प्रदेशात बराच मोठा काळ आपत्ती पोषक अशी परिस्थिती निर्माण होत असते. दरड कोसळण्यासारख्या घटनेत नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही घटकांचा समावेश असतो. वर्षानुवर्षे डोंगराळ प्रदेशात टिकून असलेले संतुलन माणसाच्या अविवेकी हस्तक्षेपानंतर कसे एकाएकी बिघडते ते आपण अनेक वेळा यापूर्वीही पाहिले आहे. निसर्गातील सर्वच घडामोडी अतिशय शिस्तबद्ध आणि कालबद्ध असतात. ऋतुचक्र, झीज व भर होण्याचे चक्र, झाडे सदाहरित व पानझडी होण्याचे चक्र अशा अनेक नैसर्गिक घटना अतिशय आखीव रेखीव आणि शिस्तबद्ध असतात. यात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे मात्र ही घडी लगेच विस्कटू लागते आणि त्याचा परिपाक भूस्खलनासारख्या आपत्तीत होतो. 

भूस्खलन, भेगा पडणे, डोंगरावरून माती वाहून येणे, दगड धोंड्यांची घसरण असे अनेकविध प्रकार यात आढळून येत असले, तरी त्या सर्वांनाच दरड कोसळणे (landslide) असे म्हटले जाते. 

या वर्षीच्या भूस्खलनाच्या घटनांतून असे दिसते, की अनेक ठिकाणी भूस्खलनानंतर तीन ते चार मीटर उंचीचे, पाण्याने संपृक्त झालेले, विदारीत, जंगल विरहित डोंगरमाथे एकाएकी कोणतीही पूर्वसूचना न देता ठिकठिकाणी खाली घसरले आहेत. दरड कोसळून खाली आलेली दगडधोंड्यांची रास ३०-४० मीटर अंतर डोंगर उताराला अनुसरून निर्बंधपणे घसरत जाताना अनेक ठिकाणी दिसली आहे.      

डोंगराळ भागातील पर्यावरण संवेदनशील असल्यामुळे इथे दरडी कोसळण्याच्या संकटाची शक्‍यता नेहमीच जास्त असते. ती लक्षात ठेवूनच इथे विकास कामे करणे गरजेचे असते. वृक्षतोड, खाणकाम, रस्ते, सपाटीकरण आणि या सगळ्यातून होणारी डोंगर-दऱ्यांची हानी, प्रदेशाला येणारा कमकुवतपणा, पडणाऱ्या भेगा, बदलणाऱ्या भूजल पातळ्या, तयार होणारे नवीन भूस्खलन प्रवण प्रदेश या सगळ्या गोष्टींचा पावसाळ्यापूर्वीच शास्त्रशुद्ध विचार करणे आता आवश्‍यक झाले आहे.  

भूस्खलन, पूर, वादळे यांसारख्या आपत्तींची पूर्वसूचना निसर्ग नेहमीच आधी देत असतो. त्या पूर्वसूचना किंवा पूर्वसंकेत ओळखणे आणि आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी नेमलेल्या शासकीय अधिकाऱ्याकडे आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांपर्यंत त्यासंबंधीची माहिती वेळेत पोचविणे याकडे मात्र आपण अजून तितकेसे गांभीर्याने बघत नाही ही वस्तुस्थिती आहे. काही वेळा आजूबाजूच्या भूप्रदेशात घडलेले बदल ही आपत्तीची पूर्वसूचना आहे, हे आपल्याला कळत नाही किंवा त्याची सहजपणे जाणीव होत नाही हे जितके खरे आहे, तितकेच ती कळूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याची वृत्तीही आहे हेही तितकेच खरे आहे. 

निसर्ग देत असलेले भूस्खलन आपत्तीचे पूर्वसंकेत नेहमीच अगदी स्पष्ट असतात असे नाही. ते कळण्यासाठी आजूबाजूच्या प्रदेशाची थोडी माहितीही असणे गरजेचे असते. डोंगराळ भागात राहणाऱ्यांनी आजूबाजूच्या प्रदेशात फिरून घराजवळच्या डोंगर उतारांची, नदीनाल्यांची पूर्ण माहिती करून ठेवणे नेहमीच उपयोगाचे असते. परिसरात अनपेक्षित व एकाएकी जाणवणारे भूजन्य आवाज यावर लक्ष असावे. नदीजवळ स्थान असेल, तर प्रवाहाच्या आवाजातील बदलाचा मागोवा घ्यावा. खेड्यातील वाड्या-वस्त्यांमधील अनेक स्थानिकांना डोंगर उतार, त्यावरील खाचरे, सपाटी यात बदल झाले तर लगेच लक्षात येतातही. आपल्याकडे अशा जमिनीशी निगडित असलेल्या भूजन्य बदलांची दखल व नोंद शासकीय पातळीवर आजही घेतली जात नाही. आपल्या सगळ्या यंत्रणा आपत्ती घडून गेल्यावर जाग्या होतात. 

निसर्ग मात्र पूर्वसूचना देण्याचे काम नेहमीच इमाने इतबारे करीत असतो, असे अनेक आपत्ती स्थानांच्या अभ्यासानंतर लक्षात आलेले आहे. भूस्खलन या आपत्तीबाबतीत निसर्ग किती विविध प्रकारे पूर्वसूचना देत असतो ते पुढील गोष्टींवरून सहज लक्षात येईल.  

  •     भूस्खलन होण्याआधी डोंगराळ परिसरातील प्रदेशाला भेगा पडणे, डोंगर उतारांना तडे पडणे.   
  •     उतारावरून दगडधोंडे, चिखल, माती हळूहळू खाली घसरू लागणे.   
  •     उतारावर असलेल्या झाडांची मुळे उघडी पडू लागणे.   
  •     डोंगर उतारावर काही भागात उतार एकदम तीव्र होणे.   
  •     क्वचित प्रसंगी परिसरात खडक फुटण्याचे आवाज येणे. 
  •     जमिनीची पाणी धारण क्षमता संपल्यामुळे झाडे अचानक उन्मळून पडणे.   
  •     डोंगराळ प्रदेशातील असे भाग जे कधीच ओलसर नव्हते, तिथे ओलावा दिसू लागणे.   
  •     भेगा, तडे याचबरोबर जमिनीला फुगवटा दिसू लागणे.   

डोंगर पायथ्यापासून दूर सपाट भागात अशा तऱ्हेच्या पूर्वसूचना अभावानेच दिसून येतात. त्यामुळे तिथे जास्त जागरूक राहावे लागते. एखाद्या ठिकाणी भूस्खलन होऊन गेले असले, तर त्या ठिकाणी पुन्हा कधीही भूस्खलन होणार नाही असे समजू नये. उलट असा प्रदेश भूस्खलन प्रवण म्हणूनच ओळखावा. भूशास्त्रीय, भूरूपिकदृष्ट्या तो अस्थिर, विदारीत आणि कमकुवत झाला असल्याचे ते लक्षण असते. त्यामुळे अशा ठिकाणी भूस्खलनाची प्रक्रिया पुनर्जागृत होऊ शकते. पूर्वी भूस्खलन झालेल्या प्रदेशानजीक, डोंगर उताराच्या माथ्यावर किंवा पायथ्याशी, डोंगरावरून वाहणारे ओढे, नदी प्रवाह यांत तीव्र उताराच्या भागात भूस्खलन होण्याची शक्‍यता नेहमीच जास्त असते. 

भूस्खलन होण्यापूर्वी माती आणि विदारीत खडक उतारावरून घसरू लागण्याची प्रक्रिया इतकी संथ असते, की ती नित्याच्या निरीक्षणाशिवाय लक्षात येणे कठीण असते.  

वर सांगितलेल्या सगळ्याच पूर्वसूचना भूस्खलनाआधी मिळतातच असेही सांगता येत नाही. जोराची वृष्टी किंवा अतिवृष्टी असेल, तर पूर्वसूचना मिळायला वेळही मिळत नाही. या सूचना आजूबाजूच्या भागातील लोकांपर्यंत तातडीने पोचाव्यात यासाठीही काही योजना तयार ठेवता येतात. गाव पातळीवर लोकांचे गट तयार करून त्यांच्याकडे निसर्गातील बदलांची निरीक्षणे करण्याची जबाबदारी सोपवता येते.  

उताराच्या माथ्यावर व खाली वस्ती असेल तर तिथल्या लोकांना कमी वेळेत, तातडीने, इतरत्र निवारा उपलब्ध होईल याची सोय करून ठेवावी. माती घसरणे, भेगा पडणे अशा गोष्टी आढळल्यास तिथे संरक्षक भिंती बांधाव्यात. अशा जागांच्या जवळ कुठेही दगडांच्या खाणी, रस्ते यांना मनाई करावी. उताराच्या पायथ्याजवळ असलेल्या घरांभोवती लाकडाच्या ओंडक्‍यांचे कुंपण, उतार व घर यामधल्या भागात खणलेले चर आणि उताराभोवती वड, पिंपळाची लागवड अशा योजनांचाही विचार हितावह ठरतो. 

भूस्खलनाचा मोठा धोका असलेल्या इतर अनेक देशात अशा योजना अस्तित्वात असल्याची आज अनेक उदाहरणे आहेत. निसर्ग देत असलेल्या पूर्वसूचनांचा गांभीर्याने विचार करून त्यानुसार केलेल्या उपाययोजनांमुळे भूस्खलनामुळे होणारी जीवित आणि वित्त हानी कमी करण्यातही त्यांना यश आले आहे. आपल्याकडे भूस्खलन प्रवण प्रदेशात, गाव पातळीवर, नैसर्गिक पूर्वसूचनांबद्दलची अशी जागृती नक्कीच फायद्याची ठरेल आणि गावे पावसाळ्यात नेहमीच येणाऱ्या भूस्खलन आपत्तीपासून वाचवता येतील यात शंका नाही. सध्याच्या वाढत्या भूस्खलन घटनांच्या पार्श्‍वभूमीवर अशी जागृती प्राधान्यक्रमाने करणे किती गरजेचे आहे ते यंदाच्या जागोजागी दिसून येणाऱ्या भूस्खलन घटनांवरून लक्षात येईल.  

संबंधित बातम्या