‘तौते’ आणि अरबी समुद्रातील वादळे  

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 24 मे 2021

विशेष

कोकण किनाऱ्याला आवर्ती किंवा चक्रीवादळाचा तडाखा बसणे ही तशी दुर्मीळ घटना असली, तरी ती अशक्य कोटीतली नक्कीच नाही हे मागच्या वर्षीच्या ‘निसर्ग’ आणि आत्ता आलेल्या ‘तौते’ (Tauktae) या वादळांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. तौते चक्रीवादळ २०२१ वर्षातील पहिले चक्रीवादळ. यानंतर यावर्षी अशी किती वादळे अरबी समुद्रात होतील याचे आत्ताच भाकीत करणे तसे कठीणच आहे.

चौदा मे २०१२ रोजी अरबी समुद्रातील लक्षद्वीप भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. तिथून ते उत्तर वायव्य दिशेकडे सरकले आणि त्याच दिवशी दुपारी अडीच वाजता त्याची तीव्रता वाढून ते तीव्र आवर्त  (Deep Depression) बनले. त्याच रात्री साडेअकरा वाजता त्याची तीव्रता आणखी वाढली आणि त्याचे रूपांतर आवर्ती वादळात (Cyclonic storm) झाले. त्याला ‘तौते’ असे नाव देण्यात आले. त्याचे रूपांतर चक्रीवादळात होईल अशी शक्यताही हवामान खात्याने सांगितली होती. ते १५ मे रोजी सकाळी साडेआठ वाजता आग्नेय अरबी समुद्रात अमिनीदिवीच्या वायव्येला पोचले (१२.८ अंश उत्तर अक्षांश/७२.५ पूर्व रेखांश), १६ मे रोजी संध्याकाळी सात वाजता रत्नागिरीच्या पश्चिमेला ११० किमी अंतरावर, तर १७ मे रोजी दुपारी एक वाजता मुंबईच्या पश्चिमेला १४० किमी अंतरावर पोचले होते आणि वाऱ्याचा वेगही वाढला होता. यानंतर ते गुजरातचा वेरावळ किनारा, रात्री किंवा १८ मे रोजी सकाळी ओलांडेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. हवामान खात्याने आधी चक्रीवादळाच्या मार्गाचा जो अंदाज दिला होता, त्यापेक्षा या वादळाने थोडा मार्ग बदलल्याचेही लक्षात आले. रडारच्या नोंदीवरून हे वादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याला समांतर आणि जवळून गेल्याचे स्पष्टपणे आढळून आले. 
या आवर्ताच्या डोळ्याचा विस्तार २५ किलोमीटर होता. या चक्रीवादळाचे एकूण आयुष्य तब्बल सात दिवसांचे होते. या सात दिवसांत यातील वाऱ्यांचा वेग ताशी ९० ते १२० किमीपर्यंत पोचला आणि हे वादळ अतितीव्र आवर्ताच्या श्रेणीपर्यंत पोचले. मुंबई आणि पालघर किनाऱ्यावर मालमत्तेचे मोठे नुकसान करून झाल्यावर हे वादळ रात्री दहाच्या सुमारास गुजरातच्या दिवजवळ किनाऱ्यावर आले. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १३३ किमी होता अाणि वादळाचा विस्तार ५०० किमी होता. 
हे वादळ गेल्या वर्षीच्या ‘निसर्ग’ वादळाइतके वेगळे नव्हते. निसर्ग वादळ वेगळे अशामुळे होते, की मुळात केरळ नजीक सुरुवात होऊन उत्तरेकडे सरकणाऱ्या त्या वादळाला त्या दिवसांत वातावरणाच्या वरच्या थरात वायव्येकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांनी महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे वळवले होते. अशा घटना फारच दुर्मीळ असल्यामुळे पश्चिम किनाऱ्यावर येऊ शकणाऱ्या भविष्यातील संभाव्य वादळांचा अभ्यास करताना त्याचा विचार महत्त्वाचा होता. तौते वादळाने त्याच्या मार्गात थोडासाच बदल केला. शिवाय ते अतिशय मंद गतीने म्हणजे सरासरी तशी १२ किमी या वेगाने पुढे सरकत होते. त्यामुळे त्यात जास्त बाष्पसंचय होऊन भरपूर पाऊस आणि जोराचे वारे किनारी प्रदेशात जाणवत राहिले. आवर्ती वादळांनी त्यांचा मार्ग असा बदलला, तर ती कशी आणि कोणत्या मार्गाने जाऊ शकतील त्याचा अंदाज घेऊन लोकांना दरवर्षी  जागरूक आणि सतर्क करणे महत्त्वाचे ठरणार आहे.  
या निमित्ताने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील वादळांच्या वृत्ती, त्यांची तीव्रता, स्वरूप आणि मार्ग यांची माहिती घेणे खूपच उपयुक्त ठरेल. गेल्या काही वर्षांत हिंदी महासागराच्या उत्तरेकडील भागात असलेल्या अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील उष्णकटिबंधीय वादळांच्या संख्येत ३२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे भारतीय हवामान खात्याकडून उपलब्ध होणाऱ्या सांख्यिकीतून (Data) स्पष्ट झाले आहे. गेल्या दहा वर्षांत वादळांच्या संख्येतील वाढ त्यापूर्वीच्या दशकातील वादळांपेक्षा ११ टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर २०२०पर्यंतच उत्तर हिंदी महासागरात ३३पेक्षा जास्त वादळे निर्माण झाली. १९८५नंतर इतक्या मोठ्या संख्येने वादळ निर्मिती झाली नव्हती. यातल्या सात वादळांची तीव्रता वाढून त्यांची संहारक वादळे झाली, तीही याच काळात. २०२०मध्ये उत्तर हिंदी महासागरात, बंगालच्या उपसागरात मे महिन्यात ‘उंपून’ (‘अम्फाम’) हे पहिले उष्णकटिबंधीय (Tropical) वादळ निर्माण झाले. त्यानंतर ४ जून रोजी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग आवर्ताचा कोकण किनाऱ्याला जबरदस्त तडाखा बसला होता.
 भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रात सामान्यपणे अशी वादळे अभावानेच होतात. याआधी १० जून ते १७ जून २०१९ या काळात अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या अतितीव्र, आवर्ती, लघुभार  प्रदेशाच्या ‘वायू’ नावाच्या वादळामुळे मॉन्सून आठ दिवस उशिरा सुरू झाला होता. महाराष्ट्रात तो २४ जूनला म्हणजे त्याच्या निर्धारित वेळेनंतर १४ दिवसांनी दाखल झाला होता. पुढच्या काही महिन्यांत ‘क्यार’ आणि ‘महा’ अशी आणखी दोन वादळे अरबी समुद्रावर तयार झाली होती. त्यामुळे पश्चिम किनाऱ्यावर मुसळधार अतिवृष्टीही झाली होती. या वादळांमुळे मॉन्सूनच्या आगमनावर काही परिणाम होतो का ते अजूनही नीटसे समजलेले नाही. मात्र तौते वादळामुळे कदाचित मॉन्सून यावर्षी ३१ मे या दिवशी सुरू होणार नाही असेही भाकीत करण्यात आले आहे.                
वर्ष १९८० ते २०१० या ३० वर्षांत भारताच्या दोन्ही किनाऱ्यांवर दरवर्षी सरासरी तीन वादळे निर्माण झाली. पण २०१०-२०२० या काळातच दरवर्षी चार या प्रमाणात वादळे तयार झाली. वादळांच्या संख्येतील ही वाढ मुख्यतः जमीन आणि पाण्याच्या तापमानात हवामान बदलामुळे झालेल्या वाढीचाच परिणाम असावा असे हवामानशास्त्रज्ञांचे मत आहे.  
उत्तर हिंदी महासागरातील ही उष्णकटिबंधीय वादळे सामान्यपणे एप्रिल ते सप्टेंबर या काळात तयार होतात. जगाच्या या भागातील वादळ निर्मितीला नेमक्या कालसीमा (Time bounds) नसल्या तरी आजपर्यंत आढळलेल्या वादळ निर्मितीतील प्रवृत्ती (Trends) अशाच आहेत. 
उत्तर हिंदी महासागरातील उष्णकटिबंधीय वादळातील वाऱ्यांचा वेग जेव्हा ताशी ६५ किमीपेक्षा जास्त होतो, तेव्हा त्या वादळांचे नामकरण केले जाते. २००० ते मे २००४ या काळात जागतिक हवामान संस्था (WMO)/इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड द पॅसिफिक (ESCAP)च्या पॅनेलवरील सभासद या वादळांना कोणती नावे असावीत ते सुचवत असत. मात्र सप्टेंबर २००४नंतर नवी दिल्लीतील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राकडून ही नावे देण्यात येऊ लागली. मागच्या वर्षीच्या वादळाचे ‘निसर्ग’ हे नाव बांगलादेशने सुचविलेले नाव होते. तौते या चक्रीवादळाचे नाव म्यानमारने ठरवले आहे. ‘तौते’ याचा अर्थ मोठा आवाज करणारी पाल असा होतो.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व वादळे भविष्यात भारताच्या दोन्ही किनाऱ्यांवर येऊ शकणाऱ्या संकटांची पूर्वसूचक आहेत असे म्हणता येईल. उष्णकटिबंधीय वादळांशी निगडित अशा वादळी वारे, भरपूर पाऊस आणि महाऊर्मी (Surge) या नेहमीच्या घटनांची तीव्रताही या वादळांत वाढलेली आढळून येते. त्यांनी ताशी ६० ते २२० किमी वेगाने ही वादळे भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर आक्रमण करतात. मॉन्सूनच्या मार्गक्रमणात अशी लघुभार आवर्ती वादळे गेल्या काही वर्षांपासून अडथळे आणत असल्याचे याआधीच लक्षात आले आहे.               
भारतातील या वादळांचे अतिभव्य व भयावह रूप आणि त्यांची जलद वाढ उपग्रह प्रतिमांतून सहजपणे लक्षात येते. प्रबळ अभिसरण प्रवाह, भरपूर क्युम्युलोनिम्बस ढग आणि विशाल रुंदीचा आवर्त डोळा (Eye of Cyclone) असे गुणधर्म असलेल्या या वादळांचे रूपांतर झपाट्याने विध्वंसक आवर्तात होऊ शकते आणि भारताच्या दोन्ही किनाऱ्यांना अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलन अशा संकटांना सामोरे  जावे लागते. वादळाच्या प्रभावामुळे वीज आणि दळणवळण सेवा ठप्प होते आणि अनेक वेळा बरीच जीवित आणि वित्त हानीही होते.  
अशा वादळांना टिकून राहण्यासाठी भरपूर उबदार बाष्प आवश्यक असते. तीच त्यांची मुख्य ऊर्जा असते. अशी वादळे हा मुख्यतः उष्णकटिबंधीय आवर्ताचाच प्रकार आहे. कर्क आणि मकर वृत्तांच्या दरम्यान अशी आवर्ते म्हणजे लघु भार प्रदेशांची बंदिस्त प्रणाली असते. ६५० किलोमीटर इतक्या विस्तृत व्यासाची ही आवर्ते म्हणजे उत्तर व दक्षिण गोलार्धात वाहणाऱ्या वाऱ्यांचे प्रचंड भोवरेच असतात. ही वादळे पृथ्वीवरची सर्वात प्रबळ व विध्वंसक वादळे म्हणून ओळखली जातात. 
काही विशिष्ट गुणधर्मामुळेच ही वादळे इतकी  विध्वंसक होतात. बऱ्याच वेळा यातील वाऱ्याचा वेग ताशी १८० ते ४०० किमी असतो. या वादळाबरोबरच भरतीच्या महाकाय लाटा तयार होतात आणि भरपूर पाऊसही पडतो. यातील अतिशय कमी वायुभारामुळे समुद्राची पातळी उंचावते. आकार, विस्तार, वाऱ्याचा वेग, पर्जन्यमान आणि टिकून राहण्याचा कालखंड या सर्वच बाबतीत या वादळात भरपूर विविधता आढळून येते. समुद्रावर त्यांचा वेग व तीव्रता नेहमीच जास्त असते. मात्र किनारा ओलांडून जमिनीच्या दिशेने येताना ही वादळे सामान्यतः दुर्बळ व क्षीण होतात. किनारी प्रदेशात ती नेहमीच संहारक ठरतात. यांचा केंद्रबिंदू अतिशय कमी वायुभाराचा प्रदेश असतो.
वातावरणात उष्ण व आर्द्र हवेचा पुरेसा व सततचा पुरवठा हे त्यांच्या निर्मितीमागचे मुख्य कारण आहे. जिथे ६० ते ७० मीटर खोलीपर्यंत २७ अंश सेल्सिअस एवढे तापमान असते, अशा उष्णकटिबंधीय, उबदार समुद्रपृष्ठावर त्यांचा जन्म होतो. समुद्रपृष्ठाच्या वर ९ हजार ते १५ हजार मीटर उंचीवर प्रत्यावर्ती अभिसरण असले, तर अशी चक्रीवादळे तयार होण्याची प्रक्रिया सुलभ होते. या वादळांच्या रचनेत काही महत्त्वाचे वर्तुळाकृती पट्टे आढळतात. मध्यभागी मंद वाऱ्यांचा, उच्च तापमानाचा, लघुत्तम वायुभाराचा प्रदेश असतो. यास आवर्ताचा डोळा म्हटले जाते. याच्या भोवती पर्जन्य मेघांचा १० ते २० किमी रुंदीचा पट्टा असतो. जोराचे वारे, तीव्र उर्ध्वगामी हवा आणि भरपूर पाऊस असे  याचे स्वरूप असते. याच्या बाहेर क्रमशः कमी होत जाणारे ढगांचे प्रमाण, क्षीण उर्ध्वगामी हालचाल, अत्यल्प पर्जन्य अशी परिस्थिती असते. दरवर्षी येणाऱ्या अशा विध्वंसक वादळांची भरपूर माहिती वादळादरम्यान आजकाल सतत मिळत असते. तौते वादळाच्या सगळ्या प्रवासातही वायुभारातील बदल, वाऱ्यांचा वेग, त्यांची दिशा, आवर्ताचा विस्तार आणि त्याचा मार्ग अशी अनेकविध प्रकारची माहिती प्राप्त झाली आहे. भविष्यात अशा आपत्तींचे निवारण करण्याच्या योजना तयार करताना या माहितीचा चांगला उपयोग होऊ शकतो. 

वादळाचा प्रकार     वाऱ्याचा वेग (किमी/तास)      
लघुभार (Low Pressure)    <३१                    
आवर्त (Depression)    ३१-४९
तीव्र आवर्त (Deep Depression)    ५०-६१
आवर्ती वादळ  (Cyclonic Storm)    ६२-८८
अतितीव्र आवर्त  (Severe Cyclonic Storm)    ८९-११८
अत्युच्च तीव्रतेचे वादळ (Very Severe Cyclonic Storm)    ११९-२२१
महावादळ  (Super Cyclonic Storm)    >२२१ 

संबंधित बातम्या