लष्कर भारताचे, सन्मान भारताचा

डॉ. यशवंत थोरात
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

मनापासून

सन १९५३ला कोरियाचं युद्ध संपलं. शांतता कराराचा भाग म्हणून संघ राष्ट्रांकडून दोन संस्थांची निर्मिती करण्यात आली. तटस्थ राष्ट्रांच्या समितीची (एनएनआरसी) आणि शांतीसेनेची (सीएफआय) स्थापना करण्यात आली. युद्धकैद्यांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यासाठीची ही व्यवस्था होती. इतिहासात प्रथमच एका बिगर-गोऱ्या राष्ट्रावर ही जबाबदारी देण्यात आली होती. भारताने लेफ्टनंट जनरल के.एस. थिमय्या यांच्याकडे एनएनआरसीचं नेतृत्व सोपवलं, तर मेजर जनरल एस.पी.पी. थोरात यांना सीएफआयचे प्रमुख म्हणून नेमलं.

युद्धकैद्यांना त्यांच्या मायदेशी पाठवणं हे काही साधंसरळ कार्य नव्हतं. शांतता प्रस्थापित करून हजारो चिनी आणि कोरियन युद्धकैद्यांना त्यांच्या घरी पाठवायचं होतं. परिस्थिती इतकी नाजूक होती की कोणी आपल्या देशात परत जाण्याची इच्छा बोलून दाखवली तर त्याचा मृत्यू अटळ होता. अशा तणावपूर्ण वातावरणात भारतीय सैन्यदलानं शांतता प्रस्थापित करण्याचं काम सुरू केलं. भारतासारखा नवखा प्रजासत्ताक देश ही कामगिरी कशी पार पाडतो, याकडं इतर देश आणि आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमं लक्ष ठेवून होती. तलवारीच्या धारदार पात्यावरून चालण्याइतकं हे जोखमीचं काम आहे याची भारतीयांना जाणीव होती पण अतिशय बिकट परिस्थिती उभी ठाकणार आहे याची मात्र त्यांना कल्पना नव्हती.

२४ सप्टेंबर १९५३. त्यादिवशी सार्जंट वॉंग चू या चिनी युद्धकैद्यानं भारतीय सैन्य दलाकडे मायदेशी परत जाण्याची इच्छा व्यक्त केली. मायदेशी परतण्याची इच्छा अधिकाऱ्यांजवळ व्यक्त करत असतानाच, त्याच्या या निर्णयाच्या विरोधात निदर्शनं आणि रक्तपात होण्याची दाट शक्यता आहे, असंही तो सांगत होता. त्यानं दिलेली खबर खरी ठरली. दुसऱ्याच दिवशी युद्धकैद्यांच्या सर्व छावण्यांमध्ये जोरदार निदर्शनं सुरू झाली. युद्धकैद्यांनी वॉंग चूला परत बोलावण्याची मागणी केली. त्याला अगोदरच घरी पाठवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी त्या युद्धकैद्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी भूक हरताळ सुरू केला. छावणीच्या परिसरात हिंसाचारही सुरू झाला. ही माहिती मिळताच सीएफआयचे कमांडर कैद्यांच्या कंपाउंडकडे धावले. वातावरण तणावपूर्ण असतानादेखील युद्धकैद्यांच्या कंपाउंडचं दार उघडायला लावून ते दहा –बारा सैनिकांसह आत गेले. सार्जंट वॉंग चूला आधीच घरी पाठवण्यात आलं असल्यामुळे निदर्शनं करणं व्यर्थ आहे, हे त्यांनी कैद्यांना समजावून सांगण्याचा  प्रयत्न केला. संतापलेले कैदी काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे कमांडर कंपाउंडच्याबाहेर जाण्यासाठी निघाले. गेटमधून बाहेर पडणार एवढ्यात त्यांना पाठीमागे काहीतरी झटापट झाल्याचा आवाज आला. त्यांनी वळून पाहिलं तर वीसेक कैदी त्यांच्या एका अधिकाऱ्याला धरून ओढत मागे नेत होते. त्या भारतीय अधिकाऱ्याच्या जिवाला धोका असल्याचं लक्षात येताच कमांडर लगेच मागे फिरले आणि दोन अधिकारी आणि काही जवानांसह त्या घोळक्याच्या दिशेने गेले. एवढ्यात इतर कैद्यांच्या एका मोठ्या जमावानी त्यांची वाट अडवली. आणखी जवान आत येऊ नयेत म्हणून बाकीच्या कैद्यांनी कंपाउंडचा मुख्य दरवाजा बंद करून घेतला. सीएफआय दलाचे कमांडर आता जेमतेम दहा बारा भारतीय जवानांसहीत त्या खवळलेल्या कैद्यांच्या कचाट्यात सापडले होते. लाठ्या आणि दगड हातात घेऊन कैद्यांचा तो जमाव त्यांच्या दिशेने पुढे सरकत होता. एकास पन्नास इतक्या फरकाने कैद्यांचे संख्याबळ होते. पण तरीही भारतीय जवानांनी कैद्यांच्या हल्ल्याला तोंड देण्याची तयारी केली. त्या कठीण परिस्थितीत शांत राहणं महत्त्वाचं आहे हे ओळखून कमांडर पुढे झाले आणि कैदी आणि जवानांच्या मधोमध उभं राहून त्यांनी अतिशय शांतपणे एक सिगारेट पेटवली. त्यांच्या या कृतीने कैद्यांचा जमाव भांबावून गेला, जागीच थबकला. त्यांच्याकडून शिव्यांचा भडिमार चालूच होता, पण प्रत्यक्ष हल्ला झाला नाही.

दरम्यानच्या काळात आत अडकलेले कमांडर आणि त्यांच्या बरोबरच्या जवानांच्या जिवाला धोका असल्याचं लक्षात घेऊन बाहेर असलेल्या सहायक अधिकाऱ्यांनी जादा सैनिक मागवून  कंपाउंडला वेढा घातला. असं होणं कमांडरना अजिबात नको होतं, कारण भावनेच्या भरात बाहेरच्या जवानांकडून चुकून एक जरी गोळी झाडली गेली असती तर आत हिंसाचार उसळला असता. प्रत्युत्तरादाखल जर भारतीय सैनिकांनी त्या संतप्त जमावावर गोळीबार केला असता तर सामुदायिक हत्याकांड घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. जगाच्या दृष्टीनं भारतानं आपली विश्वासार्हता गमावली असती आणि देशाची सर्वत्र बदनामी झाली असती. परिस्थिती फारच नाजूक असल्याचं ओळखून कमांडरनी बाहेर असलेल्या सैनिकांना ओरडून सांगितलं की त्यांच्या प्रत्यक्ष आदेशाशिवाय बाहेरून गोळीबार करण्यात येऊ नये.

एवढ्यात जवळचा एक कैदी त्यांच्याशी इंग्रजीत काहीतरी बोलला. ही सुदैवाचीच बाब होती. कारण त्याच्यामार्फत संतप्त कैद्यांशी संवाद साधणं सोपं होणार होतं. इंग्रजीत बोलणाऱ्या त्या कैद्यामार्फत कमांडरांनी त्या जमावाला पकडलेल्या भारतीय अधिकाऱ्याला सोडण्याचं आवाहन केलं. पण जमावानी नकार दिला. त्यांनी पुन्हा समजावून सांगितलं. पण पुन्हा तेच. यात बराच वेळ गेला. तणावामुळे कमांडर थकले होते आणि त्यांना सिगरेटची गरज भासली. परंतु त्यांची सिगारेट केस रिकामी होती. ती रिकामी केस त्या इंग्रजी जाणणाऱ्या चिनी कैद्याला दाखवत कमांडर म्हणाले, “तुम्ही कसले चिनी आहात? गेल्या तासाभरापासून आम्ही तुमचे पाहुणे आहोत आणि आम्हाला साधा कपभर चहा किंवा एखादी सिगारेट द्यावी, असंही तुम्हाला वाटलं नाही? चिनी लोक ज्यासाठी जगभर ओळखले जातात, ते तुमचं परंपरागत आदरातिथ्य कुठे आहे?”

कमांडरांच्या या प्रश्नाने तो चिनी कैदी गोंधळला. त्यानं एकदा कमांडरकडे पाहिलं आणि मग मागं वळून चिनी भाषेत काहीतरी ओरडला. सगळ्या घोळक्यात एकदम चलबिचल झाली. काही कैदी वेगवेगळ्या दिशांना धावले आणि थोड्याच वेळात हातात चहाचे कप आणि सिगरेटची पाकिटं घेऊन परत आले. त्यांनी कमांडर आणि अन्य जवानांची क्षमा मागत त्यांना चहा आणि सिगारेट दिली.

कमांडरनी नंतर त्यांच्या आठवणीत लिहिलंयः ‘त्या एका वाक्याने जादूची कांडी फिरावी तशी स्थिती क्षणार्धात बदलली, आणि तिथलं संघर्षमय वातावरण एकदम निवळलं. त्या एका उत्स्फूर्त वाक्यानं चिनी लोकांच्या मनातल्या त्यांच्या परंपरेविषयीच्या अभिमानाला हात घातला आणि आपली चूक सुधारण्याची त्यांच्यात स्पर्धा लागली.’ 

कमांडरनी जमावाला ताब्यात घेतलेल्या भारतीय अधिकाऱ्याला सोडून देण्यास सांगितलं. पुन्हा बोलणी सुरू झाली. पण आता वातावरण भारताच्या बाजूनं झुकलं होतं. वॉंग चूला परत बोलावणं शक्य नसलं, तरी कैद्यांचं तशी मागणी करणारं निवेदन आपण एनएनआरसी पुढे मांडू असं आश्वासन कमांडरनी दिलं. कैद्यांनी ते मान्य केलं आणि कुठलीही अनुचित गोष्ट न घडता प्रश्न मिटला. 

त्यावेळी नेमकं काय घडलं याचा उल्लेख कमांडरना नंतर बहाल केलेल्या सरकारी मानपत्रात करण्यात आला आहे. त्या मानपत्रात म्हटलं आहे, “आपल्या या कृतीनं मेजर जनरल थोरातांनी केवळ कैद्यांच्या ताब्यात असलेल्या मेजर ग्रेवाल या अधिकाऱ्याची सुटका केली, एवढंच नव्हे तर संभाव्य हिंसाचार शिताफीने टाळून अनेकांचे प्राणही वाचवले. जनरल थोरात यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ही जी कामगिरी बजावली तिचे सर्वांकडून कौतुक झाले. ते तिथून निघाले तेव्हा तिथल्या कैद्यांनी त्यांना मानवंदना दिली. थोरातांची कामगिरी भारतीय लष्कराच्या सर्वोच्च परंपरेला साजेशी होती.” 
‘तुम्ही आपला जीव धोक्यात घालून मेजर ग्रेवाल यांना वाचवायला का गेलात?’ असा प्रश्न नंतर अनेकांनी त्यांना विचारला. प्रत्येकवेळी त्यांचं उत्तर एकच होतं, “ही काही फार मोठी गोष्ट नव्हती. माझ्या जागी भारतीय सेनेतला दुसरा कोणताही कमांडर असता, तर त्यानं हेच केलं असतं. कोणत्याही कमांडरने स्वतःच्या डोळ्यांदेखत आपल्या सहकाऱ्याला कुणी पळवून नेलेलं सहन केलं नसतं. शिवाय त्यावेळी माझ्या जिवाला असलेल्या धोक्याबद्दल विचार करायला वेळ कुठे होता? ती एक नैसर्गिकरीत्या घडलेली सहजकृती होती. आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आपण फार

विचारपूर्वक करत नाही, त्या सहजपणे घडून जातात.” 

एकदा माझ्या नातवाला, राघवला, ही गोष्ट सांगत असताना तो म्हणाला होता, “आबाजी, आपल्या बड्या आबाजींनी जे काही केलं ती खरोखर मोठी गोष्ट होती. त्याबद्दल त्यांना कोरियामध्ये पदक वगैरे मिळालं का?”

“नाही”, मी म्हटलं. “उलट त्याबद्दल त्यांना खूप बोलणी खावी लागली. त्यांच्या प्रसिद्ध न केलेल्या डायरीत २६ सप्टेंबरची एक नोंद आहे. त्यावरून असं दिसतंय की त्या दिवशी सैन्य मुख्यालयातून तत्कालीन सीजीएस मेजर जनरल जे. एन. चौधरी यांचा त्यांना फोन आला. संकोचलेल्या स्वरात ते म्हणाले, “सर, तुमच्या त्या कृत्याबद्दल लष्कर प्रमुख आणि पंतप्रधानांची नाराजी पोहोचविण्यास मला सांगण्यात आलं आहे”. कमांडर चकितच झाले, कारण त्यांना हे अपेक्षित नव्हतं. जनरल चौधरींनी पंतप्रधानांचा संदेश वाचून दाखविला, “थोरात यांच्यासारखे फार थोडे अधिकारी आपल्याकडे आहेत. अशा स्थितीत त्यांनी आपला जीव आणि भारतीय सेनेचा सैन्यदलाचं भविष्य पणाला लावलेला लावून ‘मर्दुमकी’ दाखवायला जाणं देशाला परवडणारं नाही.” मेजर जनरल चौधरींनी लष्कर प्रमुख जनरल राजेंद्र सिंग यांनी केलेली एक हळुवार टिपणीही कमांडरांच्या कानावर घातली, “परमेश्वरासाठी असलं कृत्य पुन्हा करू नकोस, शंकर.” ते ऐकून कमांडर निराशेनं  फोन ठेवणार इतक्यात जनरल चौधरी हसत म्हणाले, “सर, मी हे सांगायला विसरलो की असामान्य शौर्याबद्दल राष्ट्रपतींकडून आपल्याला ‘अशोक चक्र (श्रेणी २)’ बहाल करण्यात येणार आहे आणि आपल्या गुणवत्तापूर्ण देशसेवेबद्दल भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ हा किताब देण्यात येणार आहे. आपण ज्या रीतीनं परिस्थिती हाताळली त्याचं पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना खूप कौतुक आहे. या वयात आणि आपल्या पदावरील अधिकाऱ्यास वैयक्तिक शौर्याबद्दल सन्मानित केले जाणे ही खूप मोठी गोष्ट आहे. भारतीय सैन्यदलांच्या इतिहासात असे यापूर्वी घडले असेल मला वाटत नाही. याचा सर्वांनाच आनंद आहे, अभिनंदन!”

त्या दिवशीच्या आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमात एक हेडलाईन झळकली होती, “Thorat quells rebellion with 'smoke', Combines the sang -froid of Sandhurst with the principles of Ashoka".

 अचानकपणे मी भानावर आलो. तिकडून कर्नल मिश्रा मी अजूनही फोनवर आहे का असं विचारत होते. “थोरात साहेब कोरियात असतानाचे काही फोटो, कात्रणे तुम्ही देऊ शकाल का?” 

“हो, हो. पण मला थोडा वेळ द्या,” मी म्हणालो.

त्या सायंकाळी मी कोरियातील युद्धासंबंधी विचार करत असताना माझ्या लक्षात आलं की ‘विचारशील प्राणी’ म्हणून असणारा माणसाचा लौकिक शंकास्पद आहे. मानवी इतिहास हा शांततेपेक्षा लढाया, युद्ध आणि रक्तपात यांनी भरलेला आहे. जगातील धनवान आणि सत्तावान लोकांनी इतिहासाच्या सारीपटावर भूदल आणि नौदलांना खेळलेलं आहे. आजवर अनेक राष्ट्रांनी युद्ध पुकारलेली आहेत, असंख्य माणसं मारली गेली आहेत, स्त्रिया विधवा झाल्या आहेत, मुलं पोरकी झाली आहेत. हे वारंवार घडलेलं आहे. परंतु इतकी युद्ध आणि इतका विध्वंस होऊनही मानव जातीनं शांततेची आशा सोडून दिलेली नाही. माणसा-माणसांत आणि देशादेशांतील सौहार्दाची आस आजही तशीच आहे.

संघर्षातून माणसाचं एक रूप जरी दिसत असलं तरी सलोख्यातून त्याची दुसरी बाजूही अनेकदा पुढे येत गेलेली आहे. नेमकं हेच कोरियात घडलं. कमालीच्या युद्धखोरीच्या वातावरणात भारतासारख्या तरुण आणि सार्वभौम देशाचे प्रतिनिधी म्हणून गेलेल्या अधिकारी आणि सैनिकांनी शांतते ची संकल्पना अगदी चिकाटीनं उचलून धरली - स्वतःसाठी नव्हे – तर भारताच्या सन्मानासाठी!  

(उत्तरार्ध)

(लेखक नाबार्डचे माजी अध्यक्ष आहेत)

(अनुवाद: डॉ. रघुनाथ कडाकणे)

संबंधित बातम्या