फेसबुक ते फेकबुक 

गिरीश कुलकर्णी
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

विशेष

फेसबुक नावाचे एक नवीन माध्यम २००४ मध्ये जन्माला आले. हे सोशल नेटवर्किंग माध्यम मार्क झुकेरबर्गने शोधले, तेव्हा त्यामागील मूळ उद्देश असा होता, की सदस्य मंडळी आपले मित्र, नातेवाईक, परिचित आणि आप्तेष्ट यांच्याशी संपर्कात राहू शकतील, तसेच त्यांना या माध्यमाद्वारे शोधून पुन्हा संपर्क प्रस्थपित करू शकतील. हेतू उत्तम आणि त्यामागची भावना उत्तम. फेसबुकचा प्रवास असा सुरू झाला होता.

सुरुवातीची तीन-चार वर्षे हा प्रवास उत्तम सुरू होता. दुरावलेले मित्र, नातेवाईक आणि मित्रांशी पुन्हा संबंध प्रस्थापित करताना जुन्या आठवणी, गमतीजमती उफाळून येऊ लागल्या आणि नेहमीच्या एकसूत्री जीवनात नावीन्य डोकावू लागले. एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण होऊ लागली, कधीतरी प्रत्यक्ष भेटीचे योग जुळून येऊ लागले, एकूण प्रवास एकदम मजेत आणि रमतगमत सुरू होता. जर हाच हेतू आणि भावना अशीच राहिली असती, तर हा लेख इथेच संपला असता. माणूस म्हटले की विविधता, गुणदोष आणि त्यामुळे उद्‍भवणारे सकारात्मक आणि नकारात्मक परिणामही सामोरे येऊ लागले. म्हणजे असे, की फेसबुक फेसबुक न राहता, त्याची भलत्याच दिशेने उत्क्रांती सुरू झाली. 

झाले असे की हळूहळू स्पर्धा, दिखावा, वरचढपणा, शोखी मिरवणे अशा गुणांचा फेसबुकमार्फत प्रसार होऊ लागला. एका लांब न संपणाऱ्या शृंखलेची सुरुवात झाली. मंडळी आपल्या घराचे, मुलांचे, मुलींचे, ‘सौं’चे फोटो पोस्ट लागले. आपण आज कुठे जेवलो, कुठे फिरलो हे या फेसबुकद्वारे प्रकाशित होऊ लागले. सदस्यमंडळी आपल्या लाइक्स आणि कॉमेंट्सचा भडीमार करू लागली. मग जोमात स्पर्धा सुरू झाली, तुला किती लाइक्स मिळाल्या अन् मला किती लाइक्स मिळाल्या, याची चर्चा आणि पद्धतशीर गणना होऊ लागली. ज्याला जास्त लाइक्स आणि कॉमेंट्स तो सर्वात लोकप्रिय, वा रे वा काय ही प्रसिद्धी! काही उत्साही मंडळी आपल्या खासगी गोष्टी जगजाहीर करू लागली, उदाहरणार्थ आपल्या जोडीदारावरचे प्रेम व्यक्त करणे, प्रेमपूर्वक संदेशांची देवाणघेवाण, आभार प्रदर्शन, साधे कोणी नाटकांचे तिकीट काढले की घोषणा आणि जगजाहीर आभार प्रदर्शन, जणू काही नाटकाचे तिकीट नसून एव्हरेस्टची चढाईच सर केली आहे. हे कमी म्हणून की काय आपले वय आणि आकार याचे भान न ठेवता विविध वेषभुषेतले फोटो पोस्ट करण्यासाठी फेसबुक एक उत्तम साधन गणले जाऊ लागले. भले घरी तुमचे कितीही मतभेद, वाद असोत; फेसबुकवर ही मंडळी आपण जणू मराठी कौटुंबिक मालिकेतली पात्र असल्यासारखी आपल्या घरच्या मंडळींना मासाहेब, दादासाहेब, भैय्या अशा नामावलींचा वापर करून संबोधित करू लागली.

जे लोक काही कारणाने सुटीवर जात नव्हते, खवय्ये नव्हते किंवा ज्यांना अशा भौतिक गोष्टीत रस नव्हता ते मागे राहतील तर नवल. अशा लोकांमधून समाज सुधारक, विचारवंत निर्माण होऊ लागले (नव्हे त्यांचा प्रलय आला).

जे फेसबुक एकेकाळी अतिशय सुटसुटीत आणि मर्यादित मजकुराने सजले होते, त्याचा गबाळा आणि गिचमिड्या ग्रंथ झाला. पाने संपता संपेनात. वेगवेगळ्या जाहिराती, जुन्या चित्रपटातील दृश्य, गाणी, खेळाडू, तारकांचे फोटो अशा असंख्य वस्तूंनी फेसबुक भरून गेले. 

तुम्ही कोणता रंग पहिल्यांदा पाहता त्यावर तुमचे व्यक्तिमत्व ठरवणे, तुम्ही मागच्या जन्मी कोण होता, कोणत्या प्राण्याशी तुमचे गुण जुळतात, कोणत्या अभिनेत्याशी तुमचे साम्य आहे, रामायण आणि महाभारतातली कोणती व्यक्तिरेखा तुम्हाला शोभून दिसेल, तुमच्या व्यक्तिमत्वाला शोभणारे सुटीचे स्थळ, राजकीय पक्ष अशा अनेक विविध भंपक गोष्टींनी फेसबुक व्यापून गेले. या अतिरेकाचा कंटाळा यायची काही सोय नाही, कारण पंचाईत पुढेच होती; फेसबुकवरचे निष्क्रिय लोक, मागासलेले, अरसिक आणि अडाणी म्हणून ओळखले जाऊ लागले. 

प्रत्येक व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य आहे, की त्यांनी काय करावे, कुठे जावे आणि याला माझा अजिबात विरोध नाही. विरोध दिखावा आणि वरचढपणा दाखवण्याला आहे. सर्वांची परिस्थिती सारखी नसते, इतरांचा विचार करा आणि तुलना, ईर्षा अशा भावनांना शक्य तो आळा घाला. दिखावा हा तुम्हाला वरचढ ठरवत नाही. याउलट तुमच्याबद्दलचा आदर कमी होऊ शकतो आणि नकळत तुम्ही लोकांच्या मस्करीच्या विषय होऊन बसता, याचे भान ठेवणे आवश्‍यक आहे.

फेसबुक सदस्यांचे आपल्या योगदान करण्याच्या पद्धतीवरून विशिष्ट समूहवार वर्गीकरण करता येईल. मनुष्य स्वभावानुसार विविध गुण विशेष आपल्याला अनुभवायास मिळतात. विनोदाचा भाग सोडला तर या मंडळींची चिकाटी आणि उत्साह कौतुकास्पदच. या बहुरंगी बहुढंगी करमणूक केंद्रात जे अव्याहतपणे योगदान देत आले आहेत, त्यांना मानाचा मुजरा करून मी प्रत्येक वर्गांची खास वैशिष्ट्ये आपल्यापुढे मांडत आहे-

समाजसुधारक 
ही मंडळी सतत समाजहितोपदी संदेश पाठवत असतात. समाज सुधारणे, हा यांचा जन्मसिद्ध हक्क असतो आणि तो ते अखंडपणे बजावत असतात. कुठे कोण हरवले आहे, कुठे ट्रॅफिक जॅम झाला आहे, कोणाला देणगी हवी आहे, कोणत्या संस्था काय करतात याची त्यांना इत्यंभूत माहिती असते. सरकारी नियमावली, वीजबिलांचा घोटाळा आणि त्यावर उपाय, आयकर भरायची तारीख अशा असंख्य गोष्टी यांना तोंडपाठ असतात. समाज हा अतिशय बेफिकीर आहे आणि आपले संदेश हे समाज सुधारण्यासाठी रामबाण उपाय ठरणार आहेत याची त्यांना खात्रीच असते. तशी ही मंडळी अतिशय प्रामाणिक उद्देशाने आपले कार्य करत असतात आणि त्या बदल्यात त्यांची काहीही अपेक्षा नसते.

सेलिब्रिटी
ही मंडळी सतत स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवतात. मोठे नेते, अभिनेते, लेखक, खेळाडू यांच्याबरोबर फोटो काढून ते फेसबुकवर टाकत असतात. आपण काय करतो आणि कुठे जातो याची लोक जणू आतुरतेने वाट बघत आहेत अशी यांची प्रामाणिक भावना असते. कुठेही गेले की हे लोक अगदी न चुकता सगळ्या जगाला कळवणार, मग ते न्यूयॉर्क असो किंवा सोलापूर. लोकांना कळले पाहिजे की मी किती व्यग्र आणि मला किती फिरावे लागते आहे. समाजसेवा करतील, पण साऱ्या जगाला त्याची माहिती देऊन, कारण शेवटी हा लाइक्सचा खेळ आहे आणि ते मिळाले नाहीत तर काय मजा अशी त्यामागची प्रामाणिक भावना. या ओघाने आपले विमानतळावर उभे असलेले, हॉटेलमध्ये उतरताना, नवीन ठिकाणी जेवताना, नाटक सिनेमाला जाताना, कुठे लग्न समारंभाच्या पंगतीत बसलेले, मित्रांबरोबर मद्यपान करताना असे विविध प्रकारचे खासगी फोटो टाकून ते जगाला आपले कार्यक्रम सांगतात आणि त्यातून आपले महत्त्व पटवून देत असतात. सुरुवातीला भरपूर प्रतिक्रिया मिळाल्यामुळे असे प्रकार वाढत जातात. हळूहळू प्रतिक्रिया कमी होतात, पण प्रकार मात्र सुरूच राहतात.

प्रवासी  
ही मंडळी कायम कुठे ना कुठे फिरत असतात. बहुतेक ही मंडळी गडगंज श्रीमंत असावीत किंवा फोटो शॉपमध्ये अतिशय वाकबगार असावीत. कारण टाकलेला प्रत्येक फोटो यश चोप्रा आणि करण जोहरच्या चित्रपटांना लाजवेल अशा प्रेक्षणीय स्थळी, उंची पोशाख आणि वेशभूषा करून. उदा. समुद्र किनाऱ्यावरचा फोटो म्हणजे काळा चष्मा आणि रंगीबेरंगी अर्धी पँट पाहिजेच. या मंडळींना आपले खासगी क्षणसुद्धा फेसबुकवर जाहीर करण्यात अतिशय आनंद  होत असतो. तुम्ही जर फेसबुकवर फोटो टाकले नाहीत, तर तुम्ही अमक्या ठिकाणी गेलाच कशाला असा प्रश्न मला एकाने केल्याचे चांगलेच स्मरणात आहे.

बहुरूपी 
हे सदस्य आपले विविध रूपात आणि पेहरावातले फोटो अगदी नियमितप्रमाणे टाकत असतात. भर उन्हाळ्यात जाकीट, समारंभात सूट बूट, सणासुदीला पारंपरिक पोशाख आणि हे कमी म्हणून हातात मद्याचा पेला, बाजूला महागडी गाडी (कधी कधी दुसऱ्याचीसुद्धा). ही मंडळी कुठे फिरायला गेली, की त्यांचे स्थानिक पेहरावातले फोटो हमखास दिसणार. रंगीबेरंगी चष्मे, टोप्या चढवलेले बहुढंगी फोटो तर यांची अवांतर खासियत. व्यायाम करताना, कार्यालयात काम करताना, पेपर वाचताना, कार्ये अनेक आणि त्यानुसार पोशाखही अनेक. ही मंडळी स्वतःला मनापासून कलाकार मानत असतात आणि हे फोटो पाहून अनेक कलेजे खलास होत असावेत अशी यांची प्रामाणिक कल्पना. 

जहाल
हे सदस्य राष्ट्र प्रेमी, धर्म प्रेमी आणि ज्वलंत अभिमानाने पेटून उठलेले असतात. विशिष्ट धर्म आणि नेत्याचे गुणगान ही एकमेव भावना प्रज्वलित ठेवून, त्यांचे संदेशवहन अखंड सुरू असते. इथपर्यंत ठीक आहे पण दुसऱ्या धर्म आणि नेत्यांबद्दल आक्षेपकारक संदेश पसरवणे, जो कोणी आपले मत व्यक्त करेल त्याला देशद्रोही ठरवले जाणे असे प्रकार सर्रास सुरू असतात. विखारी आणि अगदी खालच्या पातळीवर जाऊन विशिष्ट नेत्याबद्दल व्यक्तिगत ताशेरे ओढले की या मंडळींना अतिशय आनंद होत असावा. 

फिल्मीस्तान 
मंडळी आनंदाने चित्रसृष्टीत वावरत असतात, आपले खासगी आयुष्य लोकांपुढे सुरस आणि रम्य पद्धतींनी मांडणे, स्वर्ग म्हणजे काय आणि आम्ही कसे हे सुख अनुभवतो आहे हे या ना त्या पद्धतीने लोकांपुढे आणणे, उंची भोजन, महागडे कपडे घालून फिरणे हा आपला रोजचा कार्यक्रम आहे, हे ते सतत जाहीर करत असतात. अर्थात उद्देश वाईट नसतो, फक्त आपली वाहवा करून घेणे, मोठेपणा दाखवणे आणि त्यात आनंद मिळवणे ही त्यामागची निर्मल भावना.

खवय्ये 
ही मंडळी रोज असंख्य पाककृती टाकत असतात. त्या पाककृती आणि इतर व्हिडिओही एकदम भन्नाट. कुठे एक वयस्क माणूस शंभर लोकांसाठी चुलीवर चित्रविचित्र पदार्थ करत असतो, खेडेगावातल्या आजीबाई पास्ता शिजवत असतात, विदेशी गोरा माणूस मिरचीचा ठेचा वाटत असतो, हाय काय आणि नाय काय. कांद्याची खीर, मिरचीचा हलवा असे न ऐकलेले पण खरेच अस्तित्वात असलेले पदार्थ तुम्हाला इथेच पाहायला मिळतील... आणि हो पदार्थ केल्यावर त्यांचे अगदी पंचतारांकित हॉटेलला लाजवतील असे फोटो टाकायला अजिबात विसरायचे नाही. 

गमतीचा भाग वेगळा, पण या सर्व मंडळींचे फेसबुक ते फेकबुक या प्रवासात अतिशय महत्त्वाचे योगदान आहे हे मान्य करण्यावाचून चालणार नाही. मंडळी आहेत म्हणून तर फेसबुक आणि त्यातली गंमतसुद्धा टिकून आहे हे विसरूनही चालणार नाही.

संबंधित बातम्या