‘गुगल डूडल’ची कहाणी

इरावती बारसोडे
सोमवार, 9 मार्च 2020

विशेष
 

इंटरनेटचा अगदी नियमित वापर करणाऱ्या किंवा न करणाऱ्यांनासुद्धा ‘गुगल’ हा शब्द नक्कीच माहीत असतो. एखादी गोष्ट शोधायची असली, की ‘गुगल कर ना’ हा शब्दप्रयोग वापरला जातो. म्हणजे काय, तर ‘गुगल’वर शोध! ‘गुगल’ हे सर्च इंजिन काय वाट्टेल ती माहिती पुरवते. हल्ली गुगलशिवाय पान हालत नाही, असे म्हटले तरी चालेल. याच गुगलचा ‘गुगल डूडल नावाचा प्रकारही फार इंटरेस्टिंग आहे. ‘गुगल’च्या लोगोमध्ये काही खास प्रसंगानिमित्त तात्पुरत्या केलेल्या इनोव्हेटिव्ह बदलांमधून ‘गुगल डूडल साकार होते.
आत्ताचे डूडलचे ताजे उदाहरण म्हणजे, २९ फेब्रुवारीला सर्वत्र दिसणारे ‘लीप ईयर’ स्पेशल डूडल. २०२० हे वर्ष आहे ‘लीप ईयर’. शनिवारी म्हणजे २९ फेब्रुवारीला ‘गुगल’वर गेला असाल, तर तुम्हाला तिथे लीप ईयरचेच डूडल पाहायला मिळाले असेलच. ‘गुगल’ शब्दातल्या पहिल्या O मध्ये २८ तारीख होती. दुसरा O मोठा आणि पिवळ्या रंगाचा होता, त्यामध्ये २९ तारीख होती; २ आणि ९ दोन्ही आकड्यांना डोळे होते, पाय होते आणि ते हसतही होते. तर, g मध्ये १ ही तारीख होती आणि हा अख्खा शब्द छोट्या-छोट्या उड्याही मारत होता. 
फक्त लीप ईयरच नाही, तर आत्तापर्यंत गुगलने असे अनेक गमतीदार, इनोव्हेटिव्ह डूडल्स प्रसंगानुरूप सादर केले आहेत. पण ‘गुगल डूडल म्हणजे काय? तर, ‘गुगल’चा लोगो ठरलेला आहे. खरे पाहिले तर लोगोमध्ये सहसा कोणीही बदल करत नाही. पण गुगलच्या लोगोमध्ये ठराविक तारखांना, खास व्यक्तींच्या स्मरणार्थ, ठराविक गोष्टी, प्रसंग, देशांचे राष्ट्रदिन साजरे करण्यासाठी बदल केला जातो. हेच असते ‘गुगल डूडल. यामध्ये इमेज असते, ॲनिमेशन असते आणि पाच-सहा स्लाइड्सचा स्लाइड शोसुद्धा असतो. 
गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सरगे ब्रिन यांनी १९९८ मध्ये ‘गुगल डूडल’ला जन्म दिला. त्याचे झाले असे, की या दोघांना नेव्हाडा डेझर्टमध्ये होणाऱ्या बर्निंग मॅन फेस्टिव्हलला जायचे होते. त्यावेळी त्यांनी गुगलच्या कॉर्पोरेट लोगोमध्ये बदल केला. त्यांनी गुगल शब्दाच्या दुसऱ्या ‘O’ मागे एक चित्र काढले, जेणेकरून गुगल वापरणाऱ्यांना हे कळावे, की संस्थापक ऑफिसमध्ये नाहीत. हे पहिले डूडल. ते अतिशय साधे असले, तरी त्यातूनच खास क्षणांना गुगलच्या लोगोमध्ये बदल करण्याची संकल्पनेने जन्म घेतला. दोन वर्षांनंतर २००० मध्ये लॅरी आणि सरगे यांनी त्यावेळी तिथे इंटर्न असलेल्या डेनिस वाँग याला ‘बॅस्टिल डे’साठी डूडल तयार करायला सांगितले. त्या डूडलला युजर्सकडून खूपच छान प्रतिसाद मिळाला. त्यामुळे डेनिस वाँगला मुख्य डूडलर म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर ‘गुगल’च्या होमपेजवर सातत्याने नवनवीन डूडल्स दिसू लागली. 
आत्तापर्यंत ‘गुगल’ने जवळपास चार हजार वेगवेगळी डूडल्स तयार केली आहेत. डूडल्स तयार करण्यासाठी त्यांची वेगळी टीम आहे. त्यामध्ये डूडलर्स म्हणून ओळखले जाणारे इलस्ट्रेटर्स आहेत आणि इंजिनिअर्सही आहेत. डूडलसाठीच्या नवीन कल्पना गुगलच्या कर्मचाऱ्यांबरोबरच गुगल युजर्सकडूनही येतात. तुम्हीही इलस्ट्रेटर असाल, तर तुम्हीही तुमची कल्पना ईमेलद्वारे त्यांच्याकडे मांडू शकता. गुगलतर्फे ‘गुगल फॉर डूडल अशी स्पर्धाही घेण्यात येते. त्यामध्ये जिंकलेल्याचे डूडल गुगलच्या होमपेजवर प्रसिद्ध केले जाते. काही डूडल्स जगात सर्वत्र दिसतात, तर काही डूडल्स त्या-त्या देशामध्ये दिसतात. उदा. भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे डूडल हे फक्त भारतात दिसते. तसेच इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यदिनाचे डूडल हे इंडोनेशियामध्येच दिसते, आपल्याकडे दिसत नाही. शिक्षक दिन, बाल दिन यांसारखे दिवस प्रत्येक देशात वेगवेगळ्या तारखांना असतात. या दिवसाचे डूडल एकच असते, परंतु ते वेगवेगळ्या तारखांना त्या-त्या देशात झळकते. डूडल अमुक एक प्रकारचेच असते असे नाही. यामध्ये चित्रे, रंग, इलस्ट्रेशन स्टाइल, ॲनिमेशन या सगळ्यामध्ये खूप विविधता पाहायला मिळते आणि या सगळ्या विविधतेमधूनही संदेशसुद्धा पोचतो आणि ‘Google’ ही अक्षरेही ठळकपणे दिसतात, हे विशेष!
सुरुवातीला डूडल्स फक्त काही सणांपुरती मर्यादित असायची. परंतु, आता हा आवाका वाढला आहे. आता आइस्क्रीम संडेपासून विविध क्रीडा स्पर्धांपर्यंत अनेक विषयांवर डूडल्स तयार केली जातात. या डूडलवर क्लिक केले, की त्या विषयासंबंधीची थोडक्यात माहितीही मिळते. भारताच्या स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताकदिनालाही वेगवेगळी डूडल्स असतात. कैफी आझमी हे आपल्याकडील नावाजलेले कवी आणि गीतकार. १४ जानेवारीला त्यांची १०१ वी जयंती होती. तेव्हाही गुगलने वेगळे डूडल तयार केले होते. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाला एक गोंडस ऑक्टोपस शिक्षक चष्मा घालून विद्यार्थ्यांना  
शिकवतो आहे, असे ॲनिमेटेड डूडल होते. हे डूडल प्रत्येक देशातील शिक्षक दिनाला वापरण्यात आले. भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक विक्रम साराभाई यांची १०० वी जयंतीही गुगल डूडलच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. मुंबईतील पवन राजुरकर यांनी हे डूडल तयार केले होते. गेल्या वर्षी १९ जुलैला मानवाने चंद्रावर पाऊल टाकले, त्याला ५० वर्षे झाली. अर्थातच गुगलने डूडल बदलून ही बाब साजरी केली. बॉलिवूड नावाजलेले अभिनेते अमरीश पुरी यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त २२ जूनला गुगलने पुण्यातील देबांगशू मौलिक यांनी तयार केलेले डूडल वापरले होते. गेल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्याही वेळी प्रत्येक टप्प्याच्या मतदानादिवशी बोटाला शाई लावलेल्या हाताचा समावेश असलेले डूडल वापरण्यात आले होते. होळीच्या दिवशी चेन्नईतील छाया प्रभात यांनी काढलेले रंग खेळणारे लोक असलेले रंगीबेरंगी डूडल वापरण्यात आले. तर, १२ मार्चला वर्ल्ड वाइड वेब अर्थात इंटरनेटला ३० वर्षे पूर्ण झाली. तो दिवसही गुगल डूडलच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. १९ मे २०१८ रोजी ब्रिटिश राजघराण्यातील प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचे शाही थाटामाटात लग्न झाले होते. त्या दिवशी खास डूडल तयार करण्यात आले होते. अर्थात ते फक्त युनायटेड किंग्डममध्ये दिसले. 
व्यक्तिपर डूडल्सही अनेकवेळा तयार केली गेली आहेत. भारतातील अनेक दिग्गजांवर डूडल आहे. आर. के. नारायण, बाबासाहेब आंबडेकर, कामिनी रॉय, मुथुलक्ष्मी रेड्डी, हिमालय सर करणारी पहिली भारतीय महिला नैना सिंग रावत, राजा राम मोहन रॉय, शास्त्रीय नृत्यांगना मृणालिनी साराभाई, चित्रपटसृष्टीतील दादासाहेब फाळके, मोहम्मद रफी, मधुबाला, राजकुमार, आर. डी. बर्मन या व इतर प्रसिद्ध आणि दखल घेण्याजोग्या भारतीय व्यक्तिमत्त्वांवर आधारीत डूडल्स गुगलच्या होमपेजवर झळकली आहेत. त्याचप्रमाणे इतर देशांतील अशाच नामांकित व्यक्तींवर आधारित डूडल्सही वेळोवेळी तयार केली जातात. एमेलिया एअरहार्ट, नेल्सन मंडेला, इक्बाल बानो, बीथोव्हेन, व्हिक्टर ह्युगो अशा आपल्याला माहीत असलेल्या आणि नसलेल्या विविध क्षेत्रातील अनेक परदेशी व्यक्तींची डुडल्सही आहेत. 
बर्लिनची भिंत, आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप, फुटबॉल वर्ल्डकप, व्हॅलेंटाइन डे, पहिला टेस्ट क्रिकेट सामना, ख्रिस्मस, बालदिन, शिक्षक दिन, महिला दिन, नववर्ष, निवडणुका, शाळेचा पहिला दिवस, कामगार दिन, मदर्स डे, चंद्रावर पाण्याचा शोध, हिपहॉपचा जन्म आणि अर्थातच गुगलचा वाढदिवस अशा नानाविध विषयांवर आत्तापर्यंत डूडल्स तयार करण्यात आली आहेत. दर वर्षी ठराविक तारखांना डूडल होमपेजला दिसतेच, पण दर वर्षी ते वेगळे असते, एकदाही पुनारावृत्ती होत नाही. ही सगळी डूडल्स बघायलाही मजा येते. अगदी सुरुवातीपासूनची डूडल्स इंटरनेटवर सहज बघायला मिळतात. कुठे बघायची? गुगल करा ना...!

संबंधित बातम्या