...काळच ठरवेल!

हेमा देवरे
सोमवार, 14 मार्च 2022

विशेष

युक्रेन या प्रांताचे स्वतंत्र देशात झालेले रूपांतर आम्ही फार जवळून पाहिले. माझ्या पतींची युक्रेनमधील भारताचे पहिले राजदूत म्हणून नियुक्ती झाली आणि आम्ही दोघांनी मिळून कीव्ह या युक्रेनच्या राजधानीत दूतावासाची मुहूर्तमेढ घातली. नव्याने स्वतंत्र झालेल्या युक्रेनमध्ये तेव्हा जल्लोषाचे वातावरण होते, कारण स्वतंत्र प्रणालीच्या युक्रेनला सोव्हिएत युनियनच्या वर्चस्वातून मोकळीक मिळाली होती.

युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेली धुमश्चक्री जागतिक चर्चेचा विषय झाली आहे. त्यावर उलटसुलट मते व्यक्त केली जात आहेत.

रशियाला युद्धाचे बिगूल वाजवायला भाग पाडणाऱ्या देशांमध्ये युक्रेनबरोबर अमेरिका व पाश्चिमात्य देशही आहेत. गेली काही वर्षे ही राष्ट्रे युक्रेनला युरोपीय महासंघ आणि नाटो (उत्तर अटलांटिक करार संघटना) सभासदत्वाची अनेक आमिषे दाखवत राहिली. रशियाला आपल्या शेजारच्या युक्रेनमध्ये नाटोला येऊ देणे कधीही पटण्याजोगे नव्हते. जर्मनीने तो मुद्दाही चर्चेतून काढून टाकला होता. तरीही युक्रेनने आपला हेका सुरू ठेवला. रशियाने आक्रमणाची धमकी दिली, काही महिन्यांपासून आपल्या फौजाही युक्रेनच्या सरहद्दीवर आणून ठेवल्या तरी युक्रेन बधला नाही. अमेरिकेने युक्रेनला भुलवले. ते आपले सैन्य पाठवणार नाहीत हे युक्रेनला कळले नव्हते का? मग रशियाला लढाईशिवाय पर्याय उरला नाही, असे म्हणणारा रशिया समर्थकांचा एक मतप्रवाह!

तर, काहीतरी सबब काढून युक्रेनमधल्या युरोपधार्जिण्या सरकारची उचलबांगडी करून रशियाच्या बाजूने असलेली राजवट पुतीन यांना पुन्हा आणायची आहे, एवढेच नव्हे तर युक्रेनसह इतर छोट्या देशांना हळूहळू आपल्या आधिपत्याखाली आणून गोर्बाचेव्हने गमावलेला सोव्हिएत युनियनचा लाल तारा परत प्रस्थापित करायचा आहे, असे म्हणणारा दुसरा मतप्रवाह त्यासाठी दोन उदाहरणे देतो. एक, रशियाने २०१४मध्ये बळकावलेला युक्रेनचा क्रीमिया हा प्रांत (जो पूर्वी रशियाचा भाग होता आणि १९५४मध्ये ख्रुश्चेव्ह यांनी युक्रेन प्रांताला बहाल केला होता) आणि दोन, रशियाच्या सरहद्दीच्या दोनेत्स्क व लुगान्स्क या प्रांतांमध्ये गेली काही वर्षे फुटीरवाद जिवंत ठेवून काही दिवसांपूर्वीच त्यांना स्वतंत्र देश म्हणून रशियाने घोषित केल्याची घटना!

रशिया अलीकडे सामरिक व आर्थिकदृष्ट्या निष्प्रभ होऊ लागला होता. जगातले अमेरिकेबरोबरचे तुल्यबळ स्थान त्याने गमावले होते. चीन-अमेरिका समीकरणात त्याला कुठेही वाव मिळत नव्हता. त्यामुळे आपले लष्करी सामर्थ्य दाखवून युक्रेनच्या बाबतीत अमेरिकेला गप्प राहण्याचा इशारा पुतीन यांना द्यायचा होता, अशी तिसरी विचारधारा.

मात्र जगाला दिसते आहे ते रशियाने युक्रेनवर केलेले युद्धाचे वार व तिथल्या निरपराध जनतेची झालेली होरपळ! युक्रेन आणि रशिया यांच्यातली तफावत वाढत जाण्याचे कारण युक्रेनच्या इतिहासात असू शकेल का, ही विचार करण्याजोगी बाब आहे.

रशिया आणि युक्रेन दोन्ही सोव्हिएत युनियनच्या विभाजनातून बाहेर निघालेले मोठे देश. दोघांचा चेहरामोहरा सारखा, भाषा जवळची, चालीरीतीही सारख्या. पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमध्ये धान्याचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेला युक्रेन हा प्रांत रशियनांना परका नव्हता, रशियन नेत्यांनी युक्रेनी मुलींशी लग्न करण्याची प्रथाही जुनी; त्यावेळच्या वैभवसंपन्न, पोलादी शक्तीच्या सोव्हिएत युनियनमध्ये युक्रेन या प्रांताचे असलेले महत्त्व आम्ही स्वचक्षुर्वे पाहिले होते. पूर्ण सोव्हिएत युनियनला धान्याचा पुरवठा करणे, देशासाठी शस्त्रास्त्र व रॉकेटची निर्मिती करणे आणि अण्वस्त्रे आपल्या भूमीवर जतन करणे ही कामगिरी युक्रेन प्रांत बजावत असे. मॉस्कोतल्या ‘गस्तनित्सा उक्रायना’ (युक्रेन हॉटेल) या आलिशान हॉटेलमध्ये त्या काळात भारतीय सरकारी पाहुण्यांना ठेवण्यात येत असे. सोव्हिएत युनियनच्या औपचारिक भेटींमध्ये युक्रेन प्रांताच्या किव्ह या सुंदर राजधानीचाही समावेश होत असे.

या प्रांताचे स्वतंत्र देशात झालेले रूपांतर आम्ही फार जवळून पाहिले. माझ्या पतींची युक्रेनमधील भारताचे पहिले राजदूत म्हणून नियुक्ती झाली आणि आम्ही दोघांनी मिळून किव्ह या युक्रेनच्या राजधानीत दूतावासाची मुहूर्तमेढ घातली. नव्याने स्वतंत्र झालेल्या युक्रेनमध्ये तेव्हा जल्लोषाचे वातावरण होते, कारण स्वतंत्र प्रणालीच्या युक्रेनला सोव्हिएत युनियनच्या वर्चस्वातून मोकळीक मिळाली होती. अर्थात अशी स्वतंत्र राजवट  अनपेक्षितपणे पुढ्यात पडल्यावर, पायाभरणीपासून ती प्रस्थापित करण्याची फार मोठी जबाबदारी युक्रेनवर येऊन पडली होती. एखाद्या प्रांताचा अचानकपणे देश व्हावा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे आगमन व्हावे, यात काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण होणे सहाजिकच होते.

त्यात सोव्हिएत युनियनच्या काळात युक्रेनमध्ये तयार होणारा सर्वोत्तम माल मॉस्कोला रवाना होत असल्यामुळे युक्रेनचे खजिने रिकामे झाले होते. त्यातून तिथल्या चलनाचे अवमूल्यन झाल्यामुळे बँकांमध्ये खडखडाट होता. प्राध्यापक, अभियंते, डॉक्टरांसारखा उच्च मध्यमवर्ग एका रात्रीत गरिबीत ढकलला गेला होता. पीएचडी असलेली माझी रशियन शिक्षिका व तिचा उच्चशिक्षित नवरा या सुस्थितीत असलेल्या जोडप्याकडे त्यांच्या मुलाकरिता बूट घ्यायला पैसे राहिले नाहीत, कारण ‘रीवना’ या नोटांचे तोपर्यंत मूल्य संपले होते. चांगल्या चांगल्या घरातल्या एकेकट्या म्हाताऱ्या बायका रस्त्यावर खायला ब्रेडची मागणी करताना दिसत. क्रेरॉटिक या हमरस्त्यावर दुकाने आतून रिकामी होती. एकेकाळी वैभवशाली असणाऱ्या वेलबुट्टीने सजलेल्या सुंदर इमारतींची छपरे गेलेली होती किंवा त्यांच्यावर अवकळा आली होती.

चेर्नोबिलच्या स्फोटानंतरची शहरावरची भीषण छाया अजूनही उतरलेली नव्हती. नवजात अर्भकांमध्ये कॅन्सरचा अंश आढळत असे. पिण्याच्या पाण्यात अण्विक अंश उतरण्याची लोकांना भीती वाटायची आणि कित्येक लोक मैलोन मैल जाऊन झऱ्यांचे ताजे पाणी आणून पिताना दिसत असत.

पूर्वीच्या दिमाखदार किव्हचे प्राचीन सौंदर्य मात्र कायम टिकून राहिले होते. हिरव्यागार वृक्षांनी सजलेला क्रेशॅटिकचा हमरस्ता, शहराच्या मध्यभागी वाहणारी नेपर नदी, तिथले बोटीवरचे तीन भारतीय राजपुत्र आणि राजकुमारीचे भव्य दगडी शिल्प (फार पूर्वी व्यापाराच्या निमित्ताने समुद्रमार्गे हे तीन राजपुत्र किव्हला आल्याची दंतकथा होती), शहरात जागोजागी विखुरलेली सोनेरी कळसांची चर्च... तिथल्या विस्कळित जीवनात ही दृश्ये दिलासा देऊन जात असत.

या परिस्थितीतदेखील युक्रेनी लोकांच्या चेहऱ्यावर आनंद होता, खरी सुरुवात झाल्याचा! युक्रेनी संस्कृतीची पाळेमुळे किती प्राचीन आहेत, याची प्रत्येक नागरिकाला जाणीव होती. बाराव्या शतकात ‘किव्हन रूस’ अशी राजवट अस्तित्वात होती. किव्ह त्याची राजधानी होती. याचा त्यांना सार्थ अभिमान होता. रशियन संस्कृती आणि धर्म ‘किव्हन रूस’मधून रशियाच्या इतर भागांमध्ये पसरले हे सर्वश्रुत आहे. त्यानंतर शतकानुशतके परकीय आक्रमणे सोसल्यावर १९२०मध्ये युक्रेनने सोव्हिएत युनियनमध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला. तर १९९१मध्ये तो स्वतंत्र देश झाला. युरोपीय मानसिक घडणीच्या युक्रेनी लोकांची स्वतंत्र वृत्ती आशियाई संस्कृतीकडे कललेल्या रशियापेक्षा नेहमी वेगळी राहिली.

युक्रेनने आपल्या देशाची नवी ओळख लोकशाही पद्धतीने करून द्यायला सुरुवात केली. आत्तापर्यंत युक्रेनमध्ये सहा वेळा लोकशाही मार्गाने अध्यक्षीय निवडणुका झाल्या. रशियामध्ये मात्र लोकशाही नावापुरतीच राहिली. पुतीन यांनी जी सत्ता बळकावली ती आजतागायत. गेल्या वीस वर्षांत युक्रेनचा युरोप, अमेरिकेकडचा कल अधिक वाढत गेला. इंग्रजी भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळवले. पश्चिम युरोपिय देशांशी जवळीक साधली. तरीही युक्रेनी लोकांचे भारतीय नृत्य संगीतावरचे पूर्वीपासून असलेले प्रेम यत्किंचितही कमी झाले नाही. बॉलिवूडचे चित्रपट बघून त्यामधली नृत्ये आत्मसात करणाऱ्या युक्रेनी मुली आजही इथे आहेत. कथ्थक, भरतनाट्यम नृत्यांचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्या घेत आहेत. भारतीय विद्यार्थ्यांनीही इथे फार मोठे योगदान दिले. इथल्या विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांची संख्या सुरुवातीच्या हजार बाराशे विद्यार्थ्यांपासून आज वीस हजारांवर गेली 
आहे.

युक्रेन व भारताचे संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण राहिले आहेत. युक्रेनच्या सुरुवातीच्या कठीण दिवसांत त्यावेळचे भारताचे संरक्षण मंत्री शरद पवार यांनी युक्रेनला भेट देऊन त्यांच्याकडून संरक्षण क्षेत्रात सहकार्यासंबंधीची प्रथम पावले उचलली होती. तर तेव्हाचे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनीही युक्रेनला उच्चतम स्तरावर औपचारिक भेट देऊन या देशाबद्दलची भारताची आस्था दर्शवली होती.

आज युक्रेनचे भवितव्य धोक्यात आले आहे. पण पुतीन यांच्या आक्रमणाला न घाबरता, शरणागती न पत्करता युक्रेनी जनतेने त्याला निकराने तोंड दिले आहे. युक्रेनचे अध्यक्ष जनतेला आवाहन करत राहिले आणि जनतेने त्यांना मनापासून प्रचंड प्रतिसाद दिला. प्रशिक्षण नसतानाही युक्रेनी महिला ज्या तऱ्हेने लढायला उभ्या राहिल्या, ती दृश्ये विस्मयकारक होती. युक्रेनच्या या लढाईत भारतीय विद्यार्थ्यांनी प्रचंड झळ सोसली आहे. भारताला जाऊन परत येण्याचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. विद्यापीठांनी शिक्षणात सूट द्यायला नकार दिला. नंतर परिस्थिती जलद गतीने चिघळत गेली. हवाई वाहतूक बंद झाली. भारताला परत येण्याचा मार्ग खुंटला. वीस हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य युक्रेनच्या भवितव्याशी जोडले गेले आहे. भारतीय विद्यार्थ्यांना सहीसलामत परत आणणे हे भारत सरकार समोरचे एक आव्हान ठरलेे.

युक्रेनची परिस्थिती फार दारुण झाली आहे. तो विनाशाकडे झुकताना दिसत आहे. तर पुतीनने आपला हट्ट सुरू ठेवला आहे. याच रशियाने संयुक्त राष्ट्रात अनेक वेळा भारताच्या बाजूने कौल दिला आहे, हा इतिहास आहे. अनेक देशांनी पुतीनना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे आणि युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. भारताचे दोन्ही देशांबरोबर सलोख्याचे संबंध आहेत. या संघर्षात आत्तापर्यंत भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. खुद्द रशियातही पुतीन यांच्या विरुद्ध निदर्शने झाली आहे. युक्रेन रशियामधली बोलण्यांची फेरी यशस्वी होणार की नाही, युद्धाची सांगता कशी होईल, याचे निदान करता येत नाही.

‘मोडेन पण वाकणार नाही,’ हा युक्रेनचा बाणा बरोबर होता की चूक हे आता काळच ठरवेल!

संबंधित बातम्या