नॉस्टॅलजिया...!

इरावती बारसोडे
सोमवार, 14 जून 2021


विशेष

कोरोनामुळे सध्या मित्रांच्या गाठीभेटींना ब्रेक लागला आहे. पण गेल्या महिन्यात काही मित्रांची तब्बल १७ वर्षांनंतर भेट झाली आणि या भेटीची अख्ख्या जगाला उत्सुकता होती. ही भेट म्हणजे अर्थात ‘फ्रेंड्स रीयुनियन!’

‘फ्रेंड्स’चा सिनेमा येणार, फ्रेंड्स रीयुनियन होणार अशा अफवांना वारंवार धुमारे फुटत होते. शेवटी फ्रेंड्स रीयुनियन खरंच होणार यावर शिक्कामोर्तब झालं. खरंतर कोरोनामुळं हे रीयुनियन जवळपास वर्षभर लांबणीवर पडलं. पण अखेर ‘फ्रेंड्स ः द रीयुनियन’चा एपिसोड २७ मे रोजी जगभरात प्रसारित झाला. 

‘फ्रेंड्स’च्या पहिल्या सीझनचा पहिला एपिसोड २२ सप्टेंबर १९९४ रोजी प्रसारित झाला होता. मॅनहॅटनमध्ये राहणाऱ्या सहा तरुण मित्रांची ही गोष्ट! निर्माती मार्टा कॉफमन रीयुनियन एपिसोडमध्ये मालिकेच्या संकल्पनेविषयी बोलताना म्हणते, ‘त्यावेळी आम्ही आमच्या विशीत होतो. आमचा स्वतःचा असा मित्रपरिवार होता. मग हाच मालिकेचा विषय का असू नये?’... आणि मग याच कल्पनेतून ‘फ्रेंड्स’ तयार झाली. 

दहा वर्षं म्हणजेच २०१४पर्यंत ही मालिका सुरू होती. आज ‘फ्रेंड्स’ मालिका संपून तब्बल सतरा वर्षं झाली आहेत. पण अजूनही या मालिकेची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. त्यावेळी तिशीत असणारे फॅन्स आता पन्नाशीत आहेत... आणि आज विशीत आणि तिशीत असणारी मंडळीही तितक्याच आवडीनं ‘फ्रेंड्स’ बघतात. भारतातही ‘फ्रेंड्स’चा एक वेगळा चाहता वर्ग आहे. ‘पिव्हेट’, ‘उनागी’, ‘हाऊ यू डुइंग?’, ‘कुड आय बी...’, ‘जोई डझन्ट शेअर फूड’... हे शब्द काय आहेत, ते सच्च्या ‘फ्रेंड्स’ फॅनला वेगळं सांगायची गरजच नाही. 

पण असं त्या मालिकेत आहे तरी काय? काळ पुढं सरकला की अनेक मालिका कालबाह्य होतात. त्यांचा वर्तमानाशी संदर्भ लागत नाही आणि नवीन पिढीला त्या बोअरिंग वाटू शकतात. मग ‘फ्रेंड्स’ अजूनही का बघावीशी वाटते? याचं मर्म त्या कथेमध्ये आहे. यात निखळ विनोद आहे. कोणा एकाला हिरो किंवा हिरॉइन न करता ही एका मित्रांच्या ग्रुपची गोष्ट आहे. एकाच ठिकाणी अडकून न राहता ती गोष्ट पुढं पुढं सरकत जाते. काळाबरोबर हे मित्र मोठे होतात आणि त्यांचं स्वतःचे कुटुंबही तयार होते. याचं श्रेय जातं निर्मात्यांना. मार्टा कॉफमन, डेव्हिड क्रेन यांच्या संकल्पनेतून ‘फ्रेंड्स’ तयार झाली. हे दोघं आणि केव्हिन ब्राईट हे या मालिकेचे निर्माते. पहिल्या सीझनपासून मुख्य कलाकारांची घट्ट मैत्री झाली आणि अजूनही ती टिकून आहे. म्हणूनच की काय, पडद्यावरचीही त्यांची मैत्री अगदी हवीहवीशी वाटते!

आजही ‘फ्रेंड्स’चं कुठं ना कुठं स्ट्रीमिंग सुरूच असतं. कधी कुठल्या टीव्ही चॅनलवर, तर कधी कुठल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर. जेनिफर अॅनिस्टन, कोर्टनी कॉक्स, लिसा कुड्रो, डेव्हिड श्विमर, मॅथ्यू पेरी आणि मॅट लब्लांक यांनी अनुक्रमे रेचल ग्रीन, मोनिका गेलर, फीबी बुफे, रॉस गेलर, चॅण्डलर बिंग आणि जोई ट्रिबियानी यांच्या भूमिका केल्या होत्या.

‘द रीयुनियन’
जुने मित्र खूप दिवसांनी भेटल्यावर नॉस्टॅलजियामध्ये हरवून जातात. ‘फ्रेंड्स - द रीयुनियन’ हासुद्धा एक नॉस्टॅलजियाच होता... कलाकारांसाठी, निर्मात्यांसाठी आणि अर्थात प्रेक्षकांसाठीही! जवळपास दोन तासांच्या या एपिसोडमध्ये सर्व काही आहे; गप्पा आहेत, आठवणींना दिलेला उजाळा आहे, चित्रीकरणादरम्यानच्या गमती आहेत, स्क्रिप्ट वाचन आहे, पाहुणे कलाकार आहेत, फॅशन शोसुद्धा आहे... 

रीयुनियन एपिसोडमध्ये निर्मात्यांच्या नजरेतून ‘फ्रेंड्स’ कशी तयार झाली हे कळते. संकल्पना, कास्टिंग करताना आलेल्या अडचणी, प्रेक्षकांच्या आवडीखातर कथेमध्ये करावे लागणारे बदल इ. अनेक गोष्टी निर्मात्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात. मालिकेच्या समाप्तीबद्दल बोलताना मार्टा कॉफमन म्हणते, ‘जेव्हा मित्रच तुमचं कुटुंब असतात, तो काळ आम्हाला मालिकेतून दाखवायचा होता, आणि जेव्हा तुमचं स्वतःचं कुटुंब तयार होतं, मुलं होतात तेव्हा तो काळ संपतो. म्हणूनच मालिका संपवायची हीच योग्य वेळ होती.’

या एपिसोडसाठी मोनिका आणि रेचलचा फ्लॅट, त्यांच्या समोरचा जोई आणि चॅण्डलरचा फ्लॅट, सेंट्रल पर्क कॉफी शॉप पुन्हा नव्यानं उभारण्यात आलं. एपिसोडची सुरुवात शेवटच्या एपिसोडच्या शेवटच्या सीनपासून होते, जेव्हा या फ्रेंड्सनी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. त्यानंतर एकेक कलाकार सेटवर येऊन दाखल होतो आणि जुन्या आठवणींमध्ये हरवून जातो. 

फ्रेंड्सचे ब्लूपर्स हासुद्धा एक मजेशीर भाग आहे. कितीही वेळा बघितले तरी हसायला येतेच. हे ब्लूपर्स फॅन्ससाठी नवीन नाहीत. ज्यांनी मालिका बघितली आहे, त्यांनी ब्लूपर्सही बघितलेले आहेत. पण काही न पाहिलेल्या गोष्टीसुद्धा पाहायला मिळतात. तिसऱ्या सीझनमध्ये ‘द वन व्हेअर नो वन इज रेडी’ हा एक अतिशय विनोदी आणि अविस्मरणीय एपिसोड आहे. या एपिसोडमध्ये जोई आणि चॅण्डलर एका खुर्चीवरून भांडत असतात. या भांडणात जोई उडी मारून खुर्चीवर बसतो. प्रत्यक्षात मात्र त्या उडी मारण्याच्या नादात मॅटचा हात खांद्यातून निखळला होता आणि त्याला रुग्णालयात न्यावं लागलं होतं. 

चौथ्या सीझनमध्ये ‘द वन विथ द एब्रियोज’ या भागामधील क्विझ गेम अतिशय विनोदी आहे. चॅण्डलर आणि जोईच्या म्हणण्यानुसार ते दोघे रेचल आणि मोनिकाला जास्त ओळखतात आणि या वादातून चौघांमध्ये पैज लागते. मुली पैज हरतात आणि त्यांना त्यांचं मोठं अपार्टमेंट मुलांना द्यावं लागतं. हा क्विझ गेम रीयुनियन एपिसोडमध्ये पुन्हा खेळण्यात आला आणि त्यानिमित्तानं काही पाहुण्या कलाकारांनीही हजेरी लावली. 

फॅन्सनी अनंत वेळा ‘फ्रेंड्स’ पाहिली असली, तरी यातील मुख्य कलाकारांनी मात्र पूर्ण मालिका पाहिलेली नाही. लिसा कुड्रो आणि डेव्हिड श्‍विमर यांनी काही सीझन्स पाहिले नसल्याचं सांगितलं. श्‍विमरने तर गेल्या १७ वर्षांत ‘फ्रेंड्स’ बघितली नाही, पण आता मुलीनं बघायला सुरुवात केल्यामुळं मीही बघतोय असं सांगितलं. 

रॉस आणि रेचलची प्रेमकहाणी पडद्यावर तर गाजलीच. पण खऱ्या आयुष्यातसुद्धा पहिल्या सीझनच्या दरम्यान आम्ही एकमेकांकडे आकृष्ट झालो होतो अशी जाहीर कबुली दोघांनीही दिली. त्यामुळं अर्थातच फॅन्सना आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला. 

जेनिस, रिचर्ड, जुडी आणि जॅक गेलर अशा महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या मॅगी व्हीलर, टॉम सेलक, ख्रिस्टिना पिकल्स, एलियट गोल्ड यांनी प्रत्यक्ष हजेरी लावली. तर गन्थरची भूमिका साकारणारा जेम्स मायकल टायलर झूमच्या माध्यमातून उपस्थित राहिला. त्याशिवाय रीस वीदरस्पून, किट हॅरिंग्टन, डेव्हिड बेकहॅम, मलाला युसुफझाई, बीटीएस बँड, लेडी गागा, मिंडी कॅलिंग या प्रसिद्ध मंडळींचे बाइट्सदेखील एपिसोडमध्ये आहेत. 

‘फ्रेंड्स’मध्ये काही भन्नाट पोषाख बघायला मिळतात. भन्नाट अशासाठी की या पोषाखांमुळं विनोदनिर्मिती झाली. अशा पोषाखांचा खास फॅशन शो यावेळी करण्यात आला. त्यामध्ये रेचलचा गुलाबी रंगाचा ब्राइड्स मेड ड्रेस, रॉसच्या लेदर पँट्स, हॉलिडे अर्माडिलो, स्पडनिक हे तर होतेच. पण स्वतः मॅटने चॅण्डलरचे सगळे कपडे घालून रँपवर पुन्हा एकदा लंजेस करून दाखवले (हा प्रकार काय आहे, हे पाहण्यासाठी मूळ एपिसोडच बघायला हवा!). 

संबंधित बातम्या