मिळून साऱ्याजणी - सेतू संवादाचा...

ज्योती बागल
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

विशेष
 

संवाद हे असं माध्यम आहे, ज्यातून अनेक प्रश्न सोडवता येतात. त्यामुळं आपण आधी संवाद साधायला सुरुवात केली पाहिजे. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही याची सुरुवात करू शकता. जेव्हा केव्हा तुम्ही संवाद साधू लागता, त्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं तर मिळतातच पण नव्यानं आणखी प्रश्न पडतात. ते आपल्या असण्याचं महत्त्व आपल्याला सांगत असतात... ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि ‘‘मिळून साऱ्याजणी’’ मासिकाच्या संस्थापक संपादक विद्या बाळ यांचे हे मत... कोल्हापूरमधील एका कार्यक्रमात महाविद्यालयीन तरुणींशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. विद्याताईंनी कधी अशाप्रकारे प्रत्यक्ष, तर कधी ''मिळून साऱ्याजणी''च्या माध्यमातून संवाद सुरूच ठेवला आहे. 

माझा ‘‘मिळून साऱ्याजणी’’ आणि विद्याताईंशी प्रत्यक्ष संबंध २०१६ मध्ये आला. मी इंटर्नशिप करण्यासाठी ''मिळून साऱ्याजणी'' मासिकाची निवड केली होती. त्यानंतर ते फक्त एक मासिक नसून एक सामाजिक चळवळ असल्याचं माझ्या लक्षात आलं. या मासिकरूपी चळवळीची सुरुवात विद्या बाळ यांनी केली. यामध्ये त्यांच्याबरोबर सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते मित्रमैत्रिणी होते. आज या मासिकाबद्दल बोलायचं कारण म्हणजे ‘‘मिळून साऱ्याजणी’’ मासिकानं नुकतीच ३० वर्षं पूर्ण केली असून पाहिल्या अंकापासून आजपर्यंत एकदाही खंड न पडता हे मासिक सुरू आहे. 

‘‘मिळून साऱ्याजणी’’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला ९ ऑगस्ट १९८९ रोजी. वयाची पन्नाशी गाठलेल्या विद्याताईंनी व्यक्तिगत पातळीवर ‘‘मिळून साऱ्याजणी’’ सारखं वेगळं मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला... आणि त्याच दरम्यान त्यांनी घरदेखील सोडलं. विद्याताई आधी स्त्री मासिकात काम करत होत्या. पण कालांतरानं काही कारणास्तव किर्लोस्कर ब्रदर्सनी स्त्री, मनोहर व किर्लोस्कर ही मासिकं बंद करण्याचा निर्णय घेतला... तेव्हा विद्याताई राजीनामा देऊन तिथून बाहेर पडल्या. बाहेर पडल्यावर हातात काही काम नव्हतं. यादरम्यान त्यांना इंग्लंडची एक फेलोशिप मिळाली. ती त्यांनी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी ‘‘ग्रोइंग टुगेदर’’ हा प्रकल्प ग्रामीण भागात सुरू केला. ज्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्त्री-पुरुषांशी त्या वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधू लागल्या. 

इतर मासिकांपेक्षा आशय, विषय वेगळा असणाऱ्या या मासिकाचं नावदेखील खूप वेगळं ठरलं. या मासिकाला साऱ्याजणी असं नाव देण्यामागची भूमिका स्पष्ट करताना विद्याताई सांगतात, ''आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब आपल्या भाषेत नेहमी पडत असतं. जेव्हा आपल्याकडं कोणी एखाद्या कार्यक्रमाचं आमंत्रण द्यायला येतं, तेव्हा ती व्यक्ती म्हणते, ''या सारेजण...'' आणि तेव्हा ''साऱ्या''जणीदेखील जातात. तर साऱ्याजणी म्हटल्यावर त्यात सारेजणपण का येऊ नयेत. महत्त्वाचा भाग म्हणजे त्यात लिंगभाव जागरूकता ही कल्पनादेखील होतीच. म्हणून आम्ही ‘‘मिळून साऱ्याजणी’’ असं नाव ठेवलं. या नावाला तेव्हा बऱ्यापैकी विरोध झाला. अनेकांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी नाव बदलण्याचं सुचवलं. पण आम्ही आमची भूमिका बदलली नाही.'' 

मूल वयात येतं तसं त्याच्यातली प्रगल्भता, वैचारिकता आणि जबाबदारी वाढत जाते. तसंच ''साऱ्याजणी''च्या बाबतीत म्हणता येईल. या मासिकानं सुरुवातीपासूनच वाचकांचं प्रबोधन करण्याचं काम नक्कीच केलं आहे. पण काही कारणास्तव मागं राहिलेल्यांनाही ते सामील करून घ्यायला विसरले नाहीत. सुरुवातीला ‘‘मिळून साऱ्याजणी’’ची टॅगलाईन ‘‘स्वतःशी नव्यानं संवाद सुरू करणारं’’ मासिक अशी होती. कालांतरानं ती ‘‘स्त्रियांनी आणि पुरुषांनी स्वतःशी आणि परस्परांशी संवाद साधावा यासाठी...’’ अशी झाली. पण यात एलजीबीटी समूह कुठंतरी दुर्लक्षित होतोय हे जाणून स्त्री-पुरुष समता मानणाऱ्या साऱ्याजणीनं यात त्यांचादेखील समावेश असल्याचं सांगण्यासाठी पूर्वीची टॅगलाईन बदलून आता नव्यानं ‘‘ती आणि तो या पलीकडचे सर्व ते यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद व्हावा यासाठी...’’ अशी केली आहे. 

‘‘मिळून साऱ्याजणी’’च्या वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्यं म्हणजे साऱ्याजणीचं मुखपृष्ठ. सुरुवातीपासूनच मासिकाचं मुखपृष्ठ रंगीत असावं असा विद्याताईंचा आग्रह होता. पण इतर मासिकांप्रमाणं बाईच्या आत्मसन्मानाला धक्का लावणारा आग्रह नव्हता. बाईमध्ये काळानुरूप बदल होत असले, तरी बाई ही ''वस्तू'' नाहीये. तिला आत्मसन्मान आहे आणि तीही एक माणूस आहे हेच नेहमी त्यांच्या मनात असल्यामुळं केवळ सुंदर चेहरे मासिकाच्या मुखपृष्ठावर छापून मासिक ''बिकाऊ'' करायचं काम साऱ्याजणीनं कधीच केलं नाही. त्यामुळं सर्व मुखपृष्ठं ही सुंदर आणि अर्थपूर्ण दिसतात. मुखपृष्ठाविषयी सांगताना विद्याताई म्हणतात, ''आम्ही ठरवल्यानुसार सुंदर आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठाची सुरुवात अगदी पहिल्या अंकापासूनच झाली. पहिल्या अंकाचं मुखपृष्ठ होतं ते गोधडीच्या चित्राचं आणि हे मासिकाच्या नावाशी एकदम सुसंगत होतं. कारण गोधडीत आपण विविध रंगांचे, विविध पोताचे, कापडाचे आणि वेगवेगळ्या आकारचे तुकडे वापरतो. हे तुकडे एकत्र करून ते धाग्याने जोडतो... हेच वैविध्य आपल्या समाजातदेखील दिसतं. समाजात असलेला हा वेगळेपणा आणि एकत्रपणा, मुख्यतः मिळून एकत्रपणा या अर्थानं ते अगदीच सुसंगत होतं.'' याचप्रकारे मासिकाचं प्रत्येक मुखपृष्ठ अर्थपूर्ण असेल याकडं साऱ्याजणीनं विशेष लक्ष दिल्याचं दिसतं. त्यांपैकी काहींचा उल्लेख करायचा झाला, तर घागरीनं पाणी भरणाऱ्या मराठवाड्यातील एका मुलाचं छायाचित्र, ग्रामीण भागातील पाणीटंचाईची तीव्रता दाखवताना चार चार हंडे डोक्यावर घेऊन पाणी आणणाऱ्या बाया आणि सोबत शाळेचा गणवेश घातलेल्या त्यांच्या मुली. एक गरीब बाई नदीवर अंघोळ करून बसली आहे आणि तिच्याकडं एकच साडी असल्यानं तिनं अर्धी अंगावर घेऊन अर्धी सुकण्यासाठी जमिनीवर लांबवर पसरली आहे. अशी अनेक उदाहरणं देता येतील. यामध्ये नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी सुंदर स्त्रियांचं चित्र मुखपृष्ठावर दिलंच नाही असं नाही, पण ज्या सुंदर स्त्रियांची चित्रं दिली, त्या केवळ दिसायलाच सुंदर नव्हत्या, तर त्यांचं असणंदेखील तेवढंच सुंदर होतं आणि महत्त्वाचं होतं. म्हणजे आनंदीबाई शिर्के यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक खानदानी सौंदर्य आणि साहित्यिक स्त्री म्हणून एक सुंदर छायाचित्र प्रसिद्ध केलं. एकदा भक्ती बर्वे यांचं, तर एकदा मेधा पाटकर यांचं आंदोलनातील छायाचित्र प्रसिद्ध केलं. स्त्रिया कर्तृत्वानंही सुंदर दिसतात ही त्यामागची भूमिका होती. त्यामुळं विश्वसुंदरीसारख्या स्पर्धांनादेखील साऱ्याजणीनं कधीच पाठिंबा दिला नाही. 

या तीस वर्षांत ''मिळून साऱ्याजणी''त तसे खूप बदल झाले नाहीत. त्याचं कारण म्हणजे पहिल्या वीस वर्षांत तरी विद्याताईच संपादक होत्या. पण याला तेवढं एक कारण नसून तेव्हा जमानापण तसा होता. लोक वाचायचे, वाचून पत्र लिहून कळवायचे, जे आता कमी झाल्याचं पाहायला मिळतं. यावर बोलताना विद्याताई म्हणतात, ''वीस वर्षांपूर्वी जमाना खरंच खूप वेगळा होता. तेव्हा लोक अंक वाचून चांगलं, वाईट आवर्जून कळवायचे. त्यातून वाचक चर्चेला आम्हाला अनेक विषय मिळायचे... आणि त्या चर्चांना प्रतिसादही उत्तम मिळायचा. पण आता लोकांना लिहायला सांगितलं, तर ते लिहीत नाहीत. यामागं कारणं अनेक आहेत. जसं की मासिक असल्यानं लिखाण प्रसिद्ध व्हायला वेळ लागतो. शिवाय आता सोशल मीडिया एवढा सहज वापरता येतो, की कोणी लिहिण्याच्या भानगडीतच पडत नाही. आणि लिहिलं तरी ते वर्तमान पत्रासाठी लिहिलं जातं.'' 

हे मासिक फक्त स्त्रियांसाठी नसून हे सर्वांसाठी आहे हे सर्वांना पटावं म्हणून विविध विषयांवर चर्चासत्रं घेतली गेली. यात जाणूनबुजून पुरुषांना आपले वाटतील असे विषय घेतले. जेणेकरून ते याबाजूनं थोडा विचार करतील, व्यक्त होतील. त्यातले काही विषय सांगायचे झाले, तर ''लग्नानंतर बाईच सासरी का जाते? स्त्रीऐवजी पुरुष सासरी गेले तर'', ''तुमच्या घरातील पैसे वापरायची पद्धत कशी आहे?'', ''बाप-लेकीचं नातं'', ''सहजीवनाचा प्रवास'' इत्यादी. 

मासिकापुढचं सर्वांत मोठं आव्हान म्हणजे काळानुरूप बदल करून स्वत:चं अस्तित्व टिकवणं. कारण मासिक हे एका दिवसात घडत नाही. त्यासाठी सतत मेहनत घ्यावी लागते. हेच जाणवतं, आपण ''मिळून साऱ्याजणी'' मासिकाची वाटचाल बघतो तेव्हा. कारण मासिक टिकवायचं असेल, तर जुन्या वाचकांना तोडून चालत नाही आणि नवीन लोकांना त्यात सामील करून घेताना त्यांना अपील होईल असं काही द्यावं लागतं. त्यामुळं जुन्या सदरांबरोबरच नवनवीन प्रयोग मासिकात सुरू असतात. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ''तरुण डॉट कॉम'' हे सदर. 

आज भलेही ग्रामीण शहरी असा फरक जास्त प्रमाणात दिसत नसेल. मात्र, साधारण २०-२२ वर्षांपूर्वी तो फरक नक्की खूप मोठ्या प्रमाणात जाणवत होता. तेव्हा विद्याताई दोन प्रकारचं संपादकीय लिहीत असत. एक शहरी वाचकांसाठी आणि एक ग्रामीण स्त्रियांसाठी. ''ग्रोइंग टुगेदर''मुळं विद्याताई ग्रामीण भागाशी जोडल्या गेल्या होत्या. काही काळानं त्या प्रकल्पाचा कालावधी तर संपला, पण त्यांनी हा संवादाचा सेतू तुटू न देता झुंजूमुंजू नावाच्या सदरातून सुरू ठेवला. ज्यामध्ये ग्रामीण भागात चालणारे प्रयोग, तेथील यशस्वी स्त्रियांच्या कथा, काही फसलेले प्रयोग असं सर्व प्रकारचं लिहिलं जायचं.

मासिक एवढं उत्तम असतानादेखील थोडंफार मागं पडल्याचं जाणवतं. कारण नव्वदच्या दशकानंतरच्या जागतिकीकरणामुळं परिस्थिती खूप बदलली. सगळ्याच गोष्टी ''मार्केट ओरिएंटेड'' झाल्या. प्रत्येक गोष्टीची जाहिरात करताना त्याचा आपल्या मनावर होणारा आघात आणि मारा भयानक असतो आणि तोच ''मिळून साऱ्याजणी''नं इतरांप्रमाणं करायचं टाळलं. त्याचा फटका मासिकाच्या वाढीला बसला. 

''मिळून साऱ्याजणी''चा ''सावित्री जोतिबा समता'' उत्सव हा कार्यक्रम दरवर्षी १० आणि ११ मार्चला पुण्यातील फुले वाडा इथं साजरा होतो. त्यामध्ये ''सावित्री जोतिबा समता सहजीवन'' हा पुरस्कार दिला जातो. तसंच वर्धापनाचा प्रत्येक कार्यक्रम हा समाजभान देणारा असतो. आपण बोलतो तसं वागलं पाहिजे हे विद्याताईंच्या आणि ''मिळून साऱ्याजणी''च्या भूमिकेतून स्पष्ट होतं. 

''मिळून साऱ्याजणी''च्या महाराष्ट्रभरच नाही, तर देशात आणि परदेशातही प्रतिनिधी मैत्रिणी आहेत. ज्यांच्या माध्यमातून ''मिळून साऱ्याजणी'' मासिक आज सर्वांपर्यंत पोचू शकलं आहे... आणि आज या मासिकाचा प्रत्येक अंक आपल्याला ई-स्वरूपात वाचायला मिळणार आहे. हे काम ''मिळून साऱ्याजणी''चे मित्र मंदार जोगळेकर यांनी केलं आहे. 

मासिकाच्या एकूणच प्रवासावर बोलताना विद्याताई म्हणतात ''आमच्याकडं आर्थिक भांडवल नाही, पण लोकांकडून जे प्रेम मिळतंय ते खूप आहे... आणि हे प्रेमच आम्हाला तारून नेणारं भांडवल ठरलं आहे. यात अनेक मित्र-मैत्रिणींची, वाचकांची मोलाची साथ मिळाली आहे...''

मी २००५ पासून ‘‘मिळून साऱ्याजणी’’मध्ये काम करते. मला स्वतःला मी हाडाची व्यवस्थापक आहे असं कधीच वाटलं नाही. पण विद्याताईंच्या आणि गीतालीताईंच्या प्रेमळ आणि कणखर पाठिंब्यामुळं ‘‘मिळून साऱ्याजणी’’मध्ये मी कुठलंही काम करू शकते हा विश्वास माझ्यात निर्माण झाला. त्यामुळं मी एवढी वर्षं व्यवस्थापक म्हणून काम करते आहे. या सर्व गोष्टींचा मला माझ्या वैयक्तिक आयुष्यातही खूप उपयोग होतो. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावं, लोकांशी कसा संवाद साधावा हे कळायला मदत झाली. मी आधी खूप भावनिक होते, पण इथं काम करण्यामुळं माझ्या एकूणच स्वभावाला, वागण्याला आणि विचारांना आकार मिळाला आहे. 
- मानसी घाणेकर, व्यवस्थापक, मिळून साऱ्याजणी

गेली १० वर्षं मी साऱ्याजणीची संपादक म्हणून काम करत आहे. या मासिकाबरोबर माझा संबंध मासिक निघण्याआधीपासून होता. म्हणजे अशा प्रकारचं मासिक निघावं या चर्चांमध्ये मीदेखील होते. नंतर १९९९ मध्ये मी आणि शोभा भागवत सल्लागार संपादक म्हणून काम बघू लागलो. नारी समता मंचबरोबर काम करत असताना मी विद्याताईंसोबतच होते. ''मिळून साऱ्याजणी''च्या सुरुवातीच्या काळात मी पूर्णवेळ देऊ शकत नव्हते, कारण माझी नोकरी होती. पण स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर २००९ पासून मी संपादनाच्या कामात सक्रिय सहभाग घेतला. मिळून साऱ्याजणीची संपादकीय जबाबदारी सांभाळताना सुरुवातीला जमेल की नाही असं थोडं वाटलं. कारण विद्याताईंनी मासिकाला त्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं आणि मलाही तसंच काम करायचं होतं. आज या टप्प्यावर वाटतं ते यशस्वीपणे करते आहे. 

मी जेव्हा संपादकीय जबाबदारी घेतली, तेव्हा मासिकाच्या मूळ उद्देशाला धक्का न लावता यात काही बदल करण्याचा प्रयत्न केला. त्यातलं एक म्हणजे मिळून साऱ्याजणीकडं एक ब्राह्मणी मासिक म्हणून पाहिलं जायचं. त्यासाठी मी सर्व जाती, वर्गातील लोकांना सामावून घेण्याची सुरुवात केली. आधी पण ते होतंच, पण नंतर मी कार्यालयीन कामातदेखील ब्राह्मणेतर कर्मचारी असावेत यावर भर दिला. तसंच लेखकदेखील सर्वच स्तरावरील असावेत यावर लक्ष दिलं. पण पूर्णपणे बदलून चालणार नव्हतं. कारण मासिक टिकवणंदेखील गरजेचं आहे. म्हणून जुन्या वाचकांना सांभाळत सांभाळत नवीन काही करण्यावर भर दिला. तसंच राजकीय विषयावर लिहिणं, बोलणं मला गरजेचं वाटलं. म्हणून त्याप्रकारचं लिखाण मासिकातून देऊ लागलो. १९९९ मध्ये आम्ही राजकारण गेलं चुलीत असं एक चर्चासत्र घेतलं होतं. अशा विचार आणि कृतीतून पुढं जाण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. यामध्ये मी व्यापक दृष्टिकोन ठेवून लेखन घ्यायला सुरुवात केली. जातीविषयी बोललं पाहिजे, लिहिलं गेलं पाहिजे, जास्तीत जास्त त्या गोष्टीचं विश्लेषण केलं पाहिजे. म्हणजे गोष्टी आणखी स्पष्ट होतात. यावर माझा भर आहे. 

सध्या ''मिळून साऱ्याजणी''त तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी ''युथ कनेक्ट'' ही संकल्पना राबवत आहोत. यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर तरुणांना बोलतं आणि लिहितं करण्याचा आमचा उद्देश आहे. आपल्याकडं अंकात छापण्यासाठी पानांच्या मर्यादा येतात. पण युथ कनेक्टच्या माध्यमातून तरुण ऑनलाइन असलेल्या पोर्टलवर लिहू शकणार आहेत, व्यक्त होऊ शकणार आहेत. ही तर सुरुवात आहे. गरजेनुसार हळूहळू त्यातही बदल होतील.
- गीताली वि. मं., संपादक, मिळून साऱ्याजणी

संबंधित बातम्या