स्थलांतरित पक्षी वैभव...

ज्योती बागल
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022

विशेष

थंडीचा हंगाम म्हणजे स्थलांतरित पक्षी वैभव अनुभवण्याचा काळ! ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी परदेशी पाहुण्यांचे आगमन होते आणि साधारण मार्चपर्यंत त्यांचा मुक्काम असतो.

पक्षी नियमितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असतात. कारण स्थलांतर हा त्यांच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग असतो. आपल्याकडे विदेशी पक्षी हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात दिसतात. म्हणजेच नोव्हेंबर ते मार्च या काळात त्यांचे महाराष्ट्रात आणि देशातील विविध भागांत वास्तव्य असते. त्यांचे स्थलांतर करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या मूळ रहिवासांच्या ठिकाणी वाढलेली थंडी. ऑक्टोबरपासूनच युरोपात आणि अन्य काही देशांत बर्फ पडून थंडी वाढायला सुरुवात होते, तेव्हा तिथे अन्नाची चणचण निर्माण होते. त्यामुळे हे पक्षी अन्नाच्या शोधात विविध भागांत स्थलांतर करू लागतात. त्याचबरोबर काही पक्षी अंडी घालण्यासाठीसुद्धा स्थलांतर करतात. उदा. चातक पक्षी. हा पक्षी मूळचा आफ्रिकेतला आहे, पण तो जेव्हा स्थलांतर करून भारतात येतो, तेव्हा तो कावळ्याच्या किंवा इतर पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालतो. मग त्यातून पिल्ले होऊन ती थोडी मोठी झाली की ती नैसर्गिक प्रेरणांच्या सहाय्याने आफ्रिकेचा रस्ता पकडून समुद्र ओलांडून निघून जातात.

महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी येणारे पक्षी   
रोहित (फ्लेमिंगो), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क), उघड्या चोचीचा करकोचा (ओपन बिल स्टॉर्क) आणि पांढऱ्या मानेचा करकोचा (वूली नेक स्टॉर्क), अमूर फाल्कन, बहिरी ससाणा (पेरेग्रिन फाल्कन), चक्रवाक (रुडी शेलडन), निरंदाज (डार्टर), चमचा (युरेशियन स्पून बिल), राजहंस (बार हेडेड गूज), शराटी (ग्लासी आयबीस), राखी बगळा (ग्रे हेरॉन), जांभळा बगळा (पर्पल हेरॉन), जांभळा मूर हेन (पर्पल मूर हेन), युरेशियन मूर हेन, कैकर मासेमार गरुड (ऑस्प्रे ईगल), ठिपकेवाला मोठा गरुड (ग्रेटर स्पॉटेड ईगल), गुलाबी मैना (रोझी स्टारलिंग), उत्तरेकडील थापट्या (नॉर्दर्न शॉव्हलर), ब्राह्मणी घार, साधी घार, पांढरा बगळा (ग्रेट व्हाईट इग्रेट), गाय बगळा (कॅटल इग्रेट), छोटा बगळा (लिटल इग्रेट), छोटा पाणकावळा (लिटल कॉर्मोरंट), पांढरा वॅगटेल (व्हाईट वॅगटेल), लहान कानाचे घुबड (शॉर्ट इअर आऊल), कबूतर (रॉक पिजन) आणि असे आणखी बरेच पक्षी महाराष्ट्राच्या विविध पाणथळ प्रदेशांमध्ये, वनांमध्ये पाहायला मिळतात.  

आतापर्यंतच्या अभ्यासातून पक्षी तज्ज्ञांनी मिळवलेल्या माहितीनुसार  या स्थलांतरित पक्ष्यांमधील बरेचसे पक्षी हिमालयीन रांगा, लडाख, सैबेरिया, युरोप, आशिया, अमेरिका, आफ्रिका अशा अनेक ठिकाणांहून येतात. राजहंस पक्षी हा जगातील सर्वात उंचीवरून उडणारा पक्षी असून तो हिमालयातून येतो. शिवाय हा पक्षी न थांबता एकाच वेळी जवळपास दीड हजार किलोमीटरचा प्रवास करतो. येताना त्याचे वजन तीन-चार किलो असते; मात्र इथे पोचता पोचता त्याचे वजन एक-दीड किलो कमी होते. रोहित पक्षी आणि बहिरी ससाणा हे पक्षी गुजरातमधून येतात. बहिरी ससाणा एका तासाला ३५० किलोमीटर या वेगाने प्रवास करतो. त्यामुळे त्याला जगातील सर्वात वेगाने उडणारा पक्षी म्हणतात. सैबेरियाकडून करकोचे येतात. चक्रवाक पक्षी लडाखवरून येतो. त्याचबरोबर कैकर मासेमार गरुड पक्षी अमेरिकेतून येतो, तर गुलाबी मैना युरोपमधून येते. 

काही दिवसांपूर्वी पुण्याजवळील भिगवण येथील जलाशयात बदक कुळातील दुर्मीळ अशा ‘टुंड्रा बीन गूज’ या पक्ष्याचे दर्शन झाले होते. या वर्षी राष्ट्रात पहिल्यांदाच या पक्ष्याचे दर्शन झाल्याचे पक्षीतज्ज्ञांनी सांगितले. यापूर्वी भारतामध्ये तो केवळ दोनदाच दिसला आहे. तब्बल दहा वर्षांपूर्वी म्हणजे २०११मध्ये उत्तराखंडातील नैनीतालमध्ये हा पक्षी शेवटचा आढळला होता, त्यानंतर यावर्षी भिगवणमध्ये याचे दर्शन झाले. या पक्ष्याचा रंग राखाडी-तपकिरी रंगाचा असतो, तर त्याच्या चोचीवर केशरी रंगाचा ठिपका असतो. तो सायबेरियामध्ये प्रजोत्पादन करतो. याची पंखांसह लांबी १४० ते १७४ सेमी असते आणि वजन १.७ ते चार किलोच्या दरम्यान असते. 

पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध ठिकाणे
    भिगवण पक्षी अभयारण्य (पुणे), राधानगरी वन्यजीव अभयारण्य (कोल्हापूर),नवेगाव बांध (गोंदिया), माळढोक पक्षी अभयारण्य (सोलापुरातील मोहोळ, माढा, करमाळा या तालुक्यांचे वनक्षेत्र), कर्नाळा पक्षी अभयारण्य (रायगड), यावल अभयारण्य (जळगाव), सागरेश्वर अभयारण्य (सांगली), जायकवाडी पक्षी अभयारण्य (औरंगाबाद), नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य (नाशिक)

    याशिवाय पुणे शहराच्या जवळपास पाहिले तर येरवड्याला डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य आहे. तिथे अनेक पक्ष्यांचे दर्शन होते. हडपसरच्या पुढे असलेल्या कवडीपाट गावचे नदीपात्र, लोणावळ्यातील दाट झाडी असलेले प्रदेश, भाटघर धरण, पुरंदर तालुक्यातील वीर धरण, सिंहगड व्हॅली, सासवड रस्ता, ताम्हिणी घाट, दिवे घाट, खडकवासला, पाषाण तलाव इत्यादी ठिकाणी विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे दर्शन होते.

स्थलांतरित पक्षी कुठे थांबतात 
जिथे पाण्याची पातळी कमी आणि जास्त दलदल असते अशा ठिकाणी हे पक्षी वास्तव्यास थांबतात. कारण या पक्ष्यांचे खाद्य दलदल असलेल्या भागातच मिळते. पुणे व सोलापूर जिल्ह्यांदरम्यान असणारा उजनी जलाशय तसा उथळ आहे, त्यामुळे तिथे सूर्यप्रकाश थेट पोहोचत असल्याने विविध पाणवनस्पती, मासे आणि कीटक असे खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते आणि म्हणूनच इथे येणाऱ्या पक्ष्यांची संख्या लक्षणीय असते. म्हणजेच जिथे जिथे दाट झाडी आणि पाणवनस्पती, शेवाळे, मासे, कीटक जास्त असलेली नदीपात्रे आहेत अशा ठिकाणी शक्यतो पक्षी आढळतात.

पक्षी निरीक्षणास जाताना    

  • पक्ष्यांविषयीचा थोडा तरी अभ्यास असावा. त्यासाठी एखादे फिल्ड गाइड आपल्याबरोबर बाळगावे. यामध्ये सचित्र माहिती दिलेली असते. त्यामुळे पक्षी ओळखायला मदत होते. 
  • पक्षी निरीक्षणास जाताना आपल्याबरोबर असणाऱ्या साधनांमध्ये दुर्बीण असायलाच हवी. त्याचबरोबर शक्य झाल्यास चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा आणि पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करण्यासाठी व्हॉइस रेकॉर्डर असावा. 
  • आपल्यामुळे पक्ष्यांना काही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घ्यायला हवी. 
  • पक्षी निरीक्षणासाठी जाताना मोठ्या ग्रुपने न जाता तीन-चार जणांचा गट करून जावे. 
  • सूर्योदय किंवा सायंकाळची वेळ निवडावी, अगदीच दुपारी जाणे टाळावे.  
  • पक्षी निरीक्षण करताना कोणत्याही प्रकारचे आवाज करू नयेत. असे केल्यास पक्षी त्याठिकाणचा अधिवास सोडू शकतात.  
  • पक्षी निरीक्षणास जाताना भडक कपडे घालू नयेत. शक्यतो गवताच्या, झाडांच्या, जमिनीच्या रंगांशी साधर्म्य असेल असे कपडे घालावेत. 

बर्ड काउंट
पक्षी  मोजण्याच्या तशा अनेक पद्धती आहेत. काही ठिकाणी महिन्यातून एकदा बर्ड काउंट घेतला जातो, तर काही ठिकाणी वर्षातून एकदा. त्यातली एक पद्धत म्हणजे स्थलांतरित पक्ष्यांचे मोठे फोटो काढून नंतर त्यात असणारे पक्षी मोजले जातात. आणखी एक पद्धत म्हणजे अभयारण्यात असलेल्या वेगवेगळ्या पॉइंटवर माणसे लक्ष ठेवून असतात आणि दिवसभरात किती व कोणते पक्षी दिसले त्याचा आढावा घेतला जातो. पक्ष्यांचा आणखी सखोल अभ्यास करण्यासाठी अलीकडच्या काळात पक्ष्यांच्या पायात वाळा (रिंग) अडकवून त्यांना सोडून दिले जाते. जेणेकरून ते कुठेही गेले तरी त्यांचे लोकेशन कळते.  

वाशी खाडीकिनारी नयनरम्य फ्लेमिंगोंचा गुलाबी गालिचा 
दरवर्षी ऐन गुलाबी थंडीत वाशी खाडी किनारी परदेशी रोहित म्हणजेच फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन होते. हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो दाखल झाल्याने खाडी किनाऱ्याला गुलाबी बहार येते. थंडीची चाहूल लागली की साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या कालावधीत हे पक्षी जलाशयावर विणीच्या हंगामासाठी दाखल होत असतात. मार्च-एप्रिलपर्यंत वास्तव्य करून नंतर आपल्या मायदेशी परततात. लालबुंद चोच, गुलबट पंख, लांबसडक मान, उंच असणारे पाय असे त्यांचे लोभस रूप असल्यामुळे त्यांना संस्कृतमध्ये ‘अग्निपंख’ असेही संबोधले जाते. 

वाशी खाडीवरून प्रवास करताना अतिशय मनमोहक दृश्य दृष्टीस पडते. मुंबई, ठाणे, नवी मुंबईला विस्तीर्ण खाडी किनारा लाभला आहे. खाडी किनाऱ्यांवरील गाळात शेवाळ मुबलक प्रमाणात असल्यामुळे शेवाळ खाद्य असणाऱ्या फ्लेमिंगोंना येथील वातावरण पोषक ठरते. उथळ व जास्त गाळ अशा ऐरोली, वाशी, नेरुळ, सीवूड इत्यादी खाड्या ही त्यांची आवडती जागा ठरली आहे. फ्लेमिंगोंचे वाढते वास्तव्य लक्षात घेता ठाणे ऐरोली खाडी पट्ट्याला फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. सध्याचे वातावरण पाहता पावसाचे आगमन  लांबणीवर पडलेले दिसून येते. त्यामुळे जून, जुलैपर्यंत येथील वातावरण पोषक असल्यामुळे पक्षी अधिक काळ इथेच थांबत असल्याचे दिसून येते, असे ठाणे येथील पक्षी अभ्यासक अविनाश भगत यांनी सांगितले.
- मिलिंद तांबे,  मुंबई

सध्या भारतामध्ये पक्ष्यांचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन प्रकारचे अधिवास आहेत. त्याचप्रमाणे गावाबाहेरच्या टेकड्या, माळराने, नदीपात्रे अशा ठिकाणी शेकडोंच्या संख्येत पक्षी असतात. त्यामुळे अशा ठिकाणांचा शोध घेऊन त्या गावाने तिथे पक्ष्यांच्या अधिवासासाठी पोषक वातावरण निर्माण करून ते टिकवणे आवश्यक आहे. यामुळे केवळ पक्ष्यांचे अधिवास सुरक्षित होतील असे नाही, तर त्या गावात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारदेखील निर्माण होईल. पक्ष्यांचे आहेत ते अधिवास जतन करणे आणि ज्यांना संरक्षण नाही त्यांना कायद्याने संरक्षण मिळवून देणे, यासाठी कार्य करणे आवश्यक आहे.
- सौरभ देशपांडे, पक्षी अभ्यासक, पुणे  

मी गेली तीन-चार वर्षे पर्यटकांना पक्षी दाखवण्याचे, त्यांची माहिती सांगण्याचे काम करत आहे. मागच्या वर्षी पाणी असल्याने फार पक्षी नव्हते, पण त्या तुलनेत यावर्षी नक्कीच जास्त पक्षी बघायला मिळत आहेत. इथे पक्षी निरीक्षणासाठी बरेच लांबून लोक येतात. पक्षी दाखवताना आम्ही शक्य तेवढ्या लांबून दाखवतो, जेणेकरून पक्षी विचलित होणार नाहीत.
- अक्षय गवारे, पक्षीमित्र, भिगवण.

संबंधित बातम्या