धक्कादायक वास्तव

केतकी जोशी
सोमवार, 9 मे 2022

‘ती’ची गोष्ट

मुलींचं शिक्षण, त्यांचं आरोग्य, त्यांना मिळणाऱ्या संधी यामध्ये जास्त गुंतवणुकीची गरज आहे. फक्त आर्थिक गुंतवणूकच नाही तर सरकारबरोबर सामाजिक, स्वयंसेवी संघटना, खासगी क्षेत्रांनीही एकत्र काम केल्यास; भविष्यात कोरोनासारख्या संकटाच्या काळात मुलींचं भवितव्य टांगणीला लागणार नाही. पालक आणि शाळेतील शिक्षकांच्या स्तरापासून यासाठी प्रयत्न करायला हवेत.

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतरची गेली दोन वर्षे आपल्या सगळ्यांसाठीच अत्यंत भयावह गेली. अनेकांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम झाले, अनेकजण मृत्यूच्या दाढेतून परत आले, तर कित्येकांनी आपले जिवलग गमावले. या सगळ्याचा शारीरिक, मानसिक आरोग्यावरही खूप परिणाम झाला. विशेषतः मुलांवरचे तर हे परिणाम अगदी दीर्घकालीन टिकणारे आहेत. कुमारवयातील मुलींवर कोविड आणि लॉकडाउनचे किती गंभीर परिणाम झाले, याबद्दलचा एक रिपोर्ट नुकताच प्रकाशित झाला आहे. ‘सेव्ह द चिल्ड्रन इंडिया’ या संस्थेच्या वतीनं ‘द वर्ल्ड ऑफ इंडियाज् गर्ल्स’ हा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. लॉकडाउनच्या काळातील कुमारवयातील, पौगंडावस्थेतील मुलींबाबतचे धक्कादायक वास्तव या रिपोर्टमधून समोर येतं.

आधीच आपल्याकडे मुलींच्या शिक्षणाबाबत अजूनही फारसा उत्साह दिसत नाही. म्हणजे देशाच्या ग्रामीण भागात मुलींचं शाळा सोडण्याचं प्रमाण अजूनही जास्त आहे. परिस्थिती चांगली नसेल तर मुलांना शिकवायचं आणि मुलींची शाळा बंद करायची हेदेखील अजूनही सर्रास चालतं. खरंतर वयात येणाऱ्या मुलींसाठी शाळा ही फक्त शिक्षणाचं माध्यम नसते, तर त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणारा तो एक महत्त्वाचा घटक असतो. लॉकडाउनच्या काळात सगळ्याच शाळा बंद होत्या. काही काळानं ऑनलाइन शिक्षण सुरू झालं, पण ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं नाही, हे वास्तव आहेच. त्यातही मुलींच्या ऑनलाइन शिक्षणाबाबत फारशी उत्साहाची परिस्थिती नव्हती. लॉकडाउनच्या काळात फक्त भारतातील जेमतेम एक तृतीयांश (३३ टक्के) मुलींना ऑनलाइन शाळांत हजेरी लावता आली. तर ६८ टक्के मुलींना आरोग्य आणि पोषणाच्या अगदी मूलभूत गरजांसाठीही झगडावं लागलं. ऐंशी टक्के मुलींपर्यंत सॅनिटरी नॅपकीनसारख्या स्वच्छतेच्या गरजेच्या गोष्टीही या काळात पोहोचू शकल्या नाहीत. लॉकडाउनच्या काळात सरकारकडून होत असलेला आरोग्याविषयक गोष्टींचाही पुरवठा अगदी मर्यादित  होत होता. त्यातच या काळात अनेकांना आर्थिक चणचण होती, दुकानंही बंद होती. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलींवर झाल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. भारतातील कोविडच्या संकटात, लॉकडाउनमुळे लिंगभेद आणखी ठळक झाले, असंही हा रिपोर्ट अधोरेखित करतो. 

महासाथीमुळे शाळा बंद असल्याने मुलींच्या शिक्षणावर तर परिणाम झालाच, पण अनेक मुलींचं बालपणही हिरावलं गेलं. त्यांना अकाली प्रौढत्व आलं. शाळा बंद म्हटल्यावर मुलींवर सर्रास घराची जबाबदारी टाकण्यात आली. या काळात मुलग्यांना बाहेर खेळायची सहजपणे परवानगी दिली जात होती. पण मुलींना मात्र खेळायला बाहेर पाठवण्याऐवजी घरातली कामं सांगण्यावर भर दिला जात होता. लॉकडाउनच्या काळात आपलं बाहेरचं खेळणं पूर्णपणे बंद झाल्याचं जवळपास ५६ टक्के मुलींनी सांगितलं. तर कोरोनामुळे मुलींच्या लग्नाची शक्यता वाढल्याचं निम्म्यापेक्षा जास्त मुलींच्या आयांनी मान्य केल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलंय. 

“कोरोना काळात मुलींच्या शिक्षणावर फार मोठा परिणाम झाला. ग्रामीण भागात किंवा शहरी भागातसुद्धा अल्पआर्थिक उत्पन्न गटातल्या पालकांकडे स्मार्टफोन असण्याचं प्रमाण मुळात कमी होतं, जिथे स्मार्टफोन होते तिथे तो फोन मुलाला वापरायला मिळायचा, मुलींच्या हातात फोन फार क्वचित मिळत होता. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणात मुली खूप मागे पडल्या,” असं निरिक्षण अलिबागमधल्या कुरुळ येथील सु.ए.सो. माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी यासंदर्भात बोलताना नोंदवलं. “आमचे शिक्षक मुलांबरोबर संपर्कात राहण्यासाठी पालकांच्या मोबाईलवर फोन करत. तेव्हा मुली अतिशय व्याकुळतेने ‘शाळा कधी सुरू होणार?’ असं विचारायच्या. लॉकडाउन काळात घरी राहून मुलींचा अभ्यास तर होत नव्हताच, पण त्यांच्यावरच्या घरकामाचा बोजा वाढला होता. मुलगे बाहेर पडत, खेळत, पण मुलींना मात्र अक्षरशः घरात कोंडून घातल्यासारखी परिस्थिती झाली होती. अनेक ठिकाणी पालकांना रोजगार नाही, खालावलेली आर्थिक परिस्थिती, पुरेसं खायलाप्यायला नाही, त्यामुळे घरात होणारे वादविवाद यात सगळ्यात जास्त मुली भरडल्या गेल्या,” असा अनुभव त्यांनी सांगितला. 

कोरोना आणि लॉकडाउनचे मुलींच्या आयुष्यावर झालेले हे दुष्परिणाम दीर्घकालीन समस्या बनणार आहेत. यासाठी शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था या सर्वांनीच तातडीने मार्ग शोधण्याची गरज आहे, अशी अपेक्षा सुजाता पाटील यांनी व्यक्त केली आहे.

अनेक ठिकाणी कोरोना काळांत शाळा बंद झाल्यावर मुलींचं शिक्षण थांबलं ते सुरूच झालं नाही. काही पालकांनी मुलींना मूळ गावी वयस्कर आजीआजोबांची काळजी घ्यायला पाठवून दिलं, त्या मुली परत शाळेत आल्याच नाहीत. या काळात मुलींच्या बालविवाहांचं प्रमाण वाढलं आहे, हे शासकीय यंत्रणासुद्धा मान्य करत आहेत. 

या रिपोर्टमधल्या काही नोंदी विचार करायला लावणाऱ्या आहेत. कोरोनाच्या आधी बघितला जायचा त्यापेक्षा लॉकडाउनमध्ये आम्ही जास्त वेळ टीव्ही बघायचो, असं पाहणीत सहभागी असणाऱ्या निम्म्या मुलींनी सांगितलं. आधीपेक्षा जास्त घरातली कामं केली, असं ४२ टक्के मुलींनी तर आधीपेक्षा जास्त वेळ मोबाईल गेम खेळल्याचं ३९ टक्के मुलींनी सांगितल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. देशातील विविध राज्यांमधल्या मुलींच्या प्रतिक्रिया या सर्वेक्षणात नोंदवण्यात आल्या आहेत. महासाथीच्या काळात लॉकडाउनमुळे सॅनिटरी पॅडही मिळत नव्हते. त्यामुळे मासिक पाळीच्या वेळेस कापड वापरावं लागलं आणि त्याचा प्रचंड त्रास व्हायचा, अस्वस्थ वाटायचं, असं पाटण्यातल्या एका मुलीनं सांगितलं.

कोरोना किंवा लॉकडाउनची परिस्थिती ही आपल्या नियंत्रणाबाहेरची होती, हे मान्य केलं तरी त्यामुळे अनेक उमलणाऱ्या कळ्यांचा निरागस आनंद हिरावला गेला, हे वास्तवही लक्षात घ्यायला हवं. अनेकींचा बाहेरच्या जगाशी असणारा संपर्क जवळपास पूर्ण तुटला होता. त्यामुळे बाहेरच्या जगात वावरण्यासाठी ज्या गोष्टी शिकणं आवश्यक असतं त्यापासून या मुली वंचित राहिल्या. ग्रामीण, निमशहरी भागांत किंवा शहरांतील गरीब वस्त्यांमधील मुलींवर हे परिणाम जास्त जाणवले. वयात येणाऱ्या मुलींसाठी नियमित व्यायाम, पौष्टिक आहार या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण त्याच या मुलींना कोरोनाच्या काळात मिळाल्या नाहीत. 

मुलींच्या शिक्षणाकडे किंवा आरोग्याकडे अजूनही किती दुर्लक्ष होतं, या गोष्टींना किती दुय्यम लेखलं जातं हेच या रिपोर्टवरून पुन्हा अधोरेखित झालं. त्यामुळे मुलींचं शिक्षण, त्यांचं आरोग्य, त्यांना मिळणाऱ्या संधी यामध्ये जास्त गुंतवणुकीची गरज आहे. फक्त आर्थिकच नाही तर सरकारबरोबर सामाजिक, स्वयंसेवी संघटना, खासगी क्षेत्रांनीही एकत्र काम केल्यास, भविष्यात अशा प्रकारचं संकट आलं तर मुलींचं भवितव्य टांगणीला लागणार नाही. पालक आणि शाळेतील शिक्षकांच्या स्तरापासून यासाठी प्रयत्न करायला हवेत. या वयातील मुलींच्या नेमक्या गरजा ओळखून त्यासाठी काय करणं गरजेचं आहे याचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. मुलींचे हक्क, त्यांचे अधिकार, सुरक्षितता, आरोग्य यावर काम करायला हवं. मुलींनाही त्याची जाणीव करून द्यायला हवी. नवी स्वप्नं, नवी ध्येय घेऊन उमलू पाहणाऱ्या या कळ्या अशा संकटकालीन परिस्थितीमुळे कोमेजणार नाहीत, ही जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे.

संबंधित बातम्या