खारीच्या वाटा

ल. म. कडू
सोमवार, 12 सप्टेंबर 2022

ज्येष्ठ लेखक, चित्रकार, प्रकाशक ल. म. कडू यांची ‘खारीच्या वाटा’ ही गाजलेली साहित्यकृती आता हिंदी, इंग्रजी, डोगरी, कोकणी, मैथिली, मणिपुरी, नेपाळी, राजस्थानी, बोडो आणि संताली या दहा भाषांमध्ये अनुवादित होत आहे. साहित्य अकादमीच्यावतीने हे अनुवाद होत आहेत. या साहित्यकृतीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. ही कथा आहे एका निसर्गरम्य खेड्यातील किशोरवयीन मुलाची. गावातल्या नदीवर धरण बांधायला सुरुवात झाल्यानंतर या मुलाला कुटुंबासह गाव सोडायला लागते. त्याने पाळलेली एक खार मात्र मागेच राहते. हळव्या किशोरवयातल्या उलथापालथींची ‘खरी’ गोष्ट सांगणाऱ्या या कादंबरीच्या प्रवासाविषयी... 

मी वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत एका निसर्गरम्य अशा खेड्यात वाढलो. चौपन्न साली जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली; तेव्हा मी आठ वर्षांचा होतो. शाळा दाराशी आली, म्हणून शाळेत गेलो. पुढं चारेक वर्षांत गावच मोडला. आमच्या नदीवर धरण होणार होतं. इलाज नव्हता आणि सोय होती म्हणून पुण्यात आलो. शिकलो. स्थिरावलो पण रमलो नाही. शहर तितकंसं भावत नव्हतं. आजही लाल माती खुणावत असते. दऱ्याखोऱ्यातून वाहणाऱ्या हिरव्या वाऱ्याची शीळ ऐकू येते. अजूनही ती नाळ तुटलेली नाही. ओढ कमी होत नाही. जाणं-येणं चालूच आहे. ‘खारीच्या वाटा’ ही बालकादंबरी त्याचा दाखला आहे.

मित्रांबरोबर गप्पा मारताना मी बहुतेक वेळा गावातल्या गमती, नमुनेदार माणसं, शाळा, निसर्ग याबद्दल बोलायचो. शहरी मित्रांना ते नवखं होतं. मजेशीर वाटायचं. आवडायचं. आग्रह व्हायचा. मीही उत्साहाने सांगत जायचो. पुढं पुढं मित्रांचा आग्रह वाढत गेला. काहींनी सुचवलं की, मी या गप्पांचा कार्यक्रम करावा. शाळेतला माझा मित्र अरुण बेलसरे याच्या मते, मी बोलतो ते जसंच्या तसं लिहून काढावं; मात्र माझ्याकडून काहीही झालं नाही. कारण जे काही होतं ते सगळं विस्कळीत होतं. त्याला बांधून ठेवणारा धागा मिळत नव्हता. त्या वेळी माझा तेवढा आवाकाही नव्हता. चाचपडणं सुरू होतं.

मी एका मासिकासाठी चित्रं काढीत असे. त्या संपादकांशी बोललो. त्यांनाही आवडलं. ते म्हणाले, ‘जमेल तसं लिहा. सदर स्वरूपात दर अंकात प्रसिद्ध करू.’ मी होकार भरला खरा, पण वेळ साधू शकलो नाही. मी त्या सदराला ‘भारूड’ असं नावही ठेवलं होतं. पुढं काही वर्षं अशीच गेली. मग ‘साहित्य शिवार’ या दिवाळी अंकाच्या संपादकांनी पिच्छाच पुरवला. अखेर एक लघुकथा लिहून झाली. त्यावेळी चित्रपटगृहात सिनेमाच्या आधी सरकारी योजनांची माहिती देणारी छोटीशी चित्रफीत दाखवीत असत. त्याला ‘भारतीय बातमीपत्र’ किंवा ‘इंडियन न्यूज’ असं म्हणत. गावाकडे ‘इंडिन्यूज’ असा शब्द ऐकला होता. नेहमीच सरकारी योजना कशा कल्याणकारी असून लोक समाधानी आहेत, असं चित्रण केलेलं असायचं. परंतु मी पाहिलेलं वास्तव तसं नव्हतं. धरणासाठी गावातली घरं मोडताना धाय मोकलून रडणारी माणसं डोळ्यापुढं होती. हा धागा पकडून ‘इंडिन्यूज’ नावाची कथा लिहून चित्रासह संपादकांना दिली. तेव्हा विश्वकर्मा प्रकाशनाच्या राजाभाऊ भाटे यांनी एक प्रकल्प सुरू केला होता. जाणकारांचं मंडळ नेमून त्या वर्षीच्या दिवाळी अंकातलं उत्तम साहित्य निवडून ते प्रकाशित करण्याचं ठरवलं होतं. ‘अक्षर दिवाळी’ या नावानं ते पुस्तक रूपात प्रकाशित होत असे. माझी ‘इंडिन्यूज’ ही कथा त्या वर्षीची उत्कृष्ट कथा म्हणून निवडली गेली. हीच कथा ‘साहित्य अकादमी’तर्फे उर्दू भाषेत प्रकाशित झाली. हुरूप आला. मित्र म्हणत होता, ते बरोबरच होतं. लिहायला हवं, असं प्रकर्षाने वाटायला लागलं. तरीही नेमका आकृतिबंध गवसत नव्हता.

सगळे घटक जवळ असूनही फोडणी कशी टाकावी ते कळेना. एक एक घटना आठवत होतो. त्यातलीच एक छोटीशी गोष्ट डोळ्यापुढे तरळून गेली... घरामागे परड्यात बेलाचं झाड होतं. बेलफळं पडायची. या झाडाची फळं मोठी आणि गोड होती. त्या शोधात फेरफटका मारत असतानाच एक मुंगूस आणि त्याच्या मागं दोन पिलं सर्रकन् अडुळशाच्या जाळीत गडप झाली. प्रसंग संपला. विचारचक्र सुरू झालं. छोटासा प्राणी, पक्षी असं काहीतरी घेऊन त्याभोवती कथानक गुंफावं का? वीज चमकल्यागत दारातली चिंच डोळ्यापुढं आली. या झाडावर कितीतरी खारोट्या धावपळ करताना पाहिलेल्या. पुढल्या पायांनी खड्डा करून जांभळाच्या बिया कशा पुरून ठेवतात आणि भूक लागल्यावर नेमक्या तिथंच कशा येतात हेही अनेकदा अनुभवलेलं. मुंगूस क्वचित दिसे. खार रोजचीच होती. हिलाच कादंबरीची नायिका बनवली तर? तीच बोलायला लागली तर? त्या अंगानं थोडं लिहूनही पाहिलं; पण फार  पुढं जाईना. खारीच्या अनुभवांना मर्यादा होत्या. ती मानवी भावना कितपत सांगू शकेल? त्यापेक्षा लेखकानेच तृतीय पुरुषी निवेदन करावं असं वाटून तसंही लिहून पाहिलं. तेही मनास येईना. नेमकी दिशाही मिळेना. गाडं अडलं. तिथंच सोडलं. दोनेक वर्ष अशीच सरली.

पिच्छा सुटत नव्हता. मुंगसाची पिलं, कुंपणावरचा बुलबुल, चिंचेवरच्या खारोट्या सतत मला डिवचत राहायच्या. काही सुचत नव्हतं. खट्टू व्हायचो. अशातच अजून एक आठवण जशीच्या तशी डोळ्यापुढं उभी राहिली. आमची शाळा भैरवनाथाच्या मंदिरात भरायची. चहू बाजूंना झाडांची दाटी होती. मधली सुट्टी झाली म्हणून बाहेर पडलो तर कावळ्यांचा कालवा ऐकायला आला. वडाखाली एक साळुंकीचं पिलू पडलेलं होतं. कावळे चोची मारीत होते. आम्ही त्यांना हाकललं आणि तिथंच थांबून राहिलो. पण शाळेची घंटा वाजली. जावं लागलं. कावळे झाडावरच होते. शाळा सुटल्यावर जाऊन पाहिलं तर पिलू जागेवर नव्हतं. काय झालं असेल ते लक्षात आलं. दोन-तीन कोवळी पिसं वाऱ्यावर भुरभुरत होती. हा प्रसंग काळजाला खरचटून गेला. ही घटना आठवून कादंबरीचा आराखडा काहीसा आकार घेऊ लागला. धूसर का होईना, वाट दिसायला लागली. आता मात्र नेटानं पुढं जात राहिलो. वाट स्पष्ट होत गेली. मनःपटलावर कोरलेले काही प्रसंग दाटी करायला लागले. सूर जुळत चालला. मनातल्या मनात जुळवाजुळव सुरू झाली. 

मुलांसाठी लिहायचं म्हटल्यावर पहिली शाळा पुढं आली. तो साठेक वर्षांपूर्वीचा काळ. तेव्हाची जिल्हा परिषदेची शाळा. मजेशीर घटना. मुलांचा स्वाभाविक वात्रटपणा. अर्थात एवढं पुरेसं नव्हतं. मला एकूणच तो परिसर, तिथल्या चालीरीती, शेतीभाती, झाडंझुडपं, सण, जत्रा, भंडारा असा ग्रामसंस्कृतीचा पट मांडायचा होता; परंतु हेही भान होतं, की याचा वाचक किशोरवयीन आहे. राक्षस, पऱ्या, जादूच्या गोष्टीतला फोलपणा या वयात त्याच्या लक्षात आलेला असतो. आता तो वास्तववादी साहित्याकडे वळायला लागतो. त्याच्या तरल संवेदनांचा कोश विस्तारत असतो. एकूणच मुलांसाठी लिहिणं ही जोखीम असते. शब्द, प्रसंग विचारपूर्वक मांडायला हवेत. प्रचलित चौकटीतलं वाङ्मय सोडून काहीतरी निराळं वास्तव त्यांच्यापुढं ठेवायला हवं; हाही विचार पक्का होता. मुलांना निव्वळ उपदेशाच्या मात्रा आवडत नाहीत. शिवाय जे सांगायचं ते रंजकपणे सांगायला हवं होत; मात्र विषय न भरकटता! स्वतःशीच उलटसुलट विचार, घुसळण होत असताना एका टप्प्यावर कथानक पक्कं झालं. आराखडा उभा राहिल्यावर प्रथम कादंबरीच्या शेवटाचा विचार मनात आला. भारावलो होतो. अचानक काही शब्द सुचले, की ज्यांनी कादंबरीचा शेवट होतो. सुरुवात तिथून झाली. शब्द असे होते... ‘लुकीचे डोळे नेहमीच पाण्यानं टचटचून भरलेले असायचे.. बहुधा ते पाझरले असतील.. चिंचेचं एखादं तरी पान ओलं झालं असेल..’ आता सुरुवात करून शेवटापर्यंत पोहोचायचं होतं. या लेखनाचं गारूडच असं होतं, की मला स्थळ, काळ यांचं भानही उरलं नव्हतं. कसले संदर्भही नको होते. इतर वाचन टाळलं होतं. गावाकडील फेऱ्या वाढल्या होत्या. वाचायला परिसर होता; माणसं होती. अक्षरांशिवाय वाचन! मुळात मला शेतीची आवड आहे. पारंपरिक अवजारं, गाई, बैल हे आजही मी बाळगून आहे. कुत्रा, मांजर, कोंबड्या हा गोतावळा निराळा. मातीत हात घातल्यावर आलेली अनुभूती ज्याची त्यालाच ठाऊक. त्या सर्जनातला आनंद शब्दात  मांडता येत नाही. त्यामुळं लेखनात आलेले बारकावे मला सहज उपलब्ध होते. फक्त मांडणी बाकी होती. योजलं होतं, तसं लेखन करून झालं. पुढं काही काळ जाऊ दिला. तेवढ्यात काहीबाही सुचत राहायचं; ते तिथं तिथं लिहीत गेलो. नको वाटलं ते काढून टाकलं. असं करता करता अंतिम स्वरूप आलं; मात्र त्यासाठी संपूर्ण हस्तलिखित पाच वेळा लिहावं लागलं. 

स्वतःचं समाधान होईल इतपत लेखन झालं होतं. तरी वाटायचं, हे वाचकांना आवडेल का? एखाद्या जाणकाराच्या नजरेखालून ते जायला हवं. ‘राजहंस प्रकाशना’च्या दिलीप माजगावकरांना वाचायला दिलं. लेखन उत्तम झाल्याचा अभिप्राय मिळाला. हे पुस्तक मी माझ्या ‘गमभन प्रकाशना’तर्फे करणार होतो; पण त्याचवेळी असंही वाटलं, की हे ‘राजहंस’नं केलं तर ते सर्वदूर पोहोचेल. मी तसं बोललो आणि माजगावकरांनीही तयारी दर्शविली. त्यांच्याच सूचनेनुसार चित्रं काढली आणि कादंबरीचं ‘लुकी’ हे नाव बदलून ‘खारीच्या वाटा’ असं ठेवलं. ‘खारीच्या वाटा’ला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आवृत्ती निघाली. महाराष्ट्र शासन, भैरूरतन दमाणी, बी. रघुनाथ असे महत्त्वाचे पुरस्कार मिळून २०१७साली साहित्य अकादमीनेही दखल घेतली. आता अकादमीतर्फे हे पुस्तक अन्य भारतीय भाषांधूनही अनुवादित होणार आहे.

 

 

संबंधित बातम्या