प्रेम आणि क्रांतीचा उत्कट शायर!

लक्ष्मीकांत देशमुख
सोमवार, 7 मार्च 2022

विशेष

मंगळवारी, आठ मार्च २०२२ला महान उर्दू शायर आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळात गीतकार म्हणून नंबर वन राहिलेल्या साहिर लुधियानवीच्या जन्मशताब्दीची सांगता होते आहे. आता त्याच्या मृत्यूलाही चाळीसहून अधिक वर्षे झाली आहेत. पण आजही साहिरच्या काव्याची आणि कवितारूप असणाऱ्या हिंदी फिल्मी गीतांची मोहिनी भारतीय रसिकांवर कायम आहे.

ले दे के अपने पास फ़क़त इक नज़र तो है
क्या देखे जिंदगी किसी की नजर से हम?

असं काय आहे साहिरच्या शायरीत, जी आजही ताजी व अगदी आजची-प्रासंगिक वाटते? मनाच्या अंतरंगात उतरत जाते व तिथे ती स्मरणात घट्ट बसली जाते? याचं उत्तर हे आहे, साहिर हा खऱ्या अर्थानं ‘हर इक पल का शायर’ आहे. तो तारुण्याचा - तरुणाईचा कवी काल होता, आज होता व उद्याही राहणार आहे. तरुणांना प्रेम आणि क्रांतीचं (म्हणजेच बंडखोरीचं) आकर्षण असतं. साहिरनं तर त्याच्या कवित्वानं दुनियेला प्रेम करायला, प्रेम जगायला शिकवलं आणि साऱ्या रसिकांची कोमट सीधीसाधी आयुष्यही रंगीन होऊन गेली. तो तेवढाच प्रखर इन्किलाबी शायर होता. त्यानं शायरीतून बंड करायची प्रेरणा दिली, अन्याय व शोषणाविरुद्ध शब्दांचे आसूड फटकारले आणि एक समताप्रधान, समतावादी खुशहाल जगाचं स्वप्न दाखवलं. ‘वो सुबह कभी तो आयेगी’ म्हणत जणू भारतात स्वातंत्र्योत्तर काळात लोककल्याणकारी व स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक - आर्थिक न्यायाचं राज्य यावं, असं  उदात्त स्वप्न समस्त भारतीयांना दाखवलं आणि एक लोभस आशावाद मनामनात पेरला. आणि ही जनकल्याणची ‘सुबह हमी से आयेगी’ असं सांगत आपणच भारताच्या भवितव्याचे शिल्पकार आहोत, हे त्यानं मनावर बिंबवलं. त्यामुळे एका बाजूला प्रेम, विरह आणि उदासीचा मन विभोर करणाऱ्या ‘मुहब्बत’, ‘इश्क’ आणि ‘जुदाई’ या प्रेमातल्या अक्षरश: सर्व छटांना शब्दबद्ध केलं, तर दुसरीकडे प्रगतीशील लेखक चळवळीचं तत्त्वज्ञान अंगात मुरवून कला ही आम आदमीचा आवाज बनली पाहिजे व लोकांना बदलासाठी क्रांतीप्रवण केलं पाहिजे, अशी इन्किलाबी शायरी केली. प्रेम आणि क्रांतीचं एकाच वेळी उत्कृष्ट व प्रभावी दर्शन साहिरचं कवित्व घडवतं, म्हणून तो कालजयी आहे. त्याचं कारण त्याची स्वतःची जगाकडे पाहायची खास नजर - नजरिया. लेखाच्या प्रारंभीचा शेर साहिरच्या वेगळ्या शायरीचं रहस्य सांगणारा आहे. त्याचा अर्थ - ‘देऊन - घेऊन माझ्याजवळ फक्त माझी नजर आहे. का मग मी दुसऱ्यांच्या नजरेतून जीवनाकडे पाहू?’ असा होतो. केवळ गालिब, प्रेमचंद, शरदचंद्र चटर्जी आणि मर्ढेकरांसारख्या प्रतिभावंतांकडे अशी स्वतःची नजर असते, प्रतिभा असते. साहिर त्याच जातकुळीचा. म्हणून तो आजही प्रासंगिक आहे. त्यामुळे जन्मशताब्दी सांगता प्रसंगी त्याचं स्मरण केलं पाहिजे.

साहिरचं जीवन आणि शायरी यात एक सुरेख अद्वैत आहे. तो जे जीवन जगला, त्याला जे कडू-गोड - कडवट अधिक अनुभव आले, त्याचंच त्यानं शायरीत रूपांतर केलं आणि ती शायरी आपली वैयक्तिक आणि समूह मनाची आविष्कार करणारी वाटली म्हणून रसिकांनी त्याला आपल्या हृदयात स्थान दिलं. त्यानं आपल्या जीवन व शायरीच्या संबंधांचं मर्म एका शेरमध्ये असं प्रकट केलंय -

दुनिया ने तर्जुबात-ओ-हवादिस की शक्ल में
जो कुछ मुझे दिया है वो लौटा रहा हूं मैं

(जगानं मला जे अनुभव व आघात दिले, ते मी (शायरीच्या रूपात) परत करत आहे.)

साहिरच्या प्रेम आणि क्रांतीच्या काव्याचा आस्वाद घेण्यापूर्वी त्याचा थोडक्यात जीवनवृत्तान्त समजून घेणे आवश्यक आहे. अब्दुल हयी ऊर्फ साहिर हा एका ऐय्याशी जमीनदाराच्या अकराव्या बीवीचा एकमात्र मुलगा होता. नवऱ्याच्या ऐय्याशी व त्रासाला कंटाळून त्याच्या अम्मीनं १९३०च्या दशकात बंडखोरी केली व नवऱ्यापासून घटस्फोट घेत अलग झाली आणि साहिरला पुढील वीस वर्षे गरिबी व अभावाचं जगणं जगावं लागलं. अशिक्षित अम्मीनं अक्षरश: मोलमजुरी करून त्याला वाढवलं. त्यामुळे तो आईशी खूप अ‍ॅटॅच्ड होता. एवढा की त्यानं त्याची किमान अर्धा डझन प्रेम प्रकरणं, त्यापैकी प्रत्येक प्रकरणी ती विवाहात परिवर्तित व्हायची शक्यता असताना, आपल्या आईवरील प्रेमात दुसरी स्त्री वाटेकरी नको, म्हणून त्यानं ऐनवेळी माघार घेतली आणि तो आयुष्यभर अविवाहित राहिला. प्रत्येक मुशायऱ्याला व सत्कार समारंभास तो आईला घेऊन जायचा. ती वृद्धापकालानं १९७६मध्ये  वारली, तेव्हा साहिरची जगण्याची इच्छाच जणू संपून गेली. आणि त्यानंतर अवघ्या चारच वर्षात २५ ऑक्टोबरला तो तिला भेटायला अल्ला घरी निघून गेला. दोन काव्यसंग्रह ‘तलखियाँ’ आणि ‘आओ कि कोई ख्बाव बुने’, युद्ध विरोधी शांतीचा संदेश देणारी ‘परछाईयाँ’ नामक दीर्घ कविता आणि सव्वाशे चित्रपटातली सातशे गीतं तो मागे सोडून रसिकांना दुःखात लोटून निघून गेला. पण त्याच्या काव्याच्या महत्तेमुळे आणि कालजयीत्वामुळे जाणकारांनी त्याला विसाव्या शतकातला उर्दूचा सर्वश्रेष्ठ शायर मानलं. आजही दरवर्षी जगभर त्याच्या जन्मदिनी आणि मृत्यूदिनी रसिक त्याच्या कवितेचे व फिल्मी गीतांचे  कार्यक्रम करतात आणि साहिरची स्मृती जपतात.

आजही साहिर तरुणांचा आवडता शायर आहे, ते त्याच्या प्रेमगीत व शायरीमुळे. जेव्हा आपण ‘कभी कभी’चं ‘कभी कभी मेरे दिल में ख़याल आता है । के जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए । अब के पहले सितारों मे बस रही थी कही । तुझे जमीं मे बुलाया गया है मेरे लिए’, हे गीत कानी पडतं, तेव्हा प्रत्येक तरुणाला वाटतं, अरे हा शायर तर माझी माझ्या प्रेमिकेबद्दलची जी भावना आहे, तीच तर प्रकट करतोय. साहिरचं प्रेम एका बाजूला संयमी आणि घरंदाज आहे, तर दुसऱ्या बाजूला अवखळ व दैहिक पण आहे.

घरंदाज उत्कट प्रेमाचा आविष्कार करण्याची उर्दू काव्याची फार जुनी पण समृद्ध परंपरा आहे. त्याला साहिर पुढे नेत त्याला नव्या भावना व प्रतिमा जोडत कसं प्रकट करतो, ते पाहण्यासारखं आहे. त्याची ही काही रसिली उदाहरणं -

प्यार पर बस तो नहीं है, मेरा लेकिन फिर भी
तू बता दे के तुझे प्यार करू या न करू?

प्रेमाचा काळ हा अल्पजीवी असतो, म्हणून तो उत्कटतेनं भोगायचा असतो. साहिर या भावनेला पाहा कसं शब्दरूप देतो,

    हम आज तो जी ले जी भर के । 
कल क्या हो किसी को इल्म नही
    एक और रसिली सुबह सही । 
एक और नशिली शाम सही

    पारंपरिक भारतीय मानसिकतेमध्ये प्रेमातही पुरुषाला वर्चस्व हवं असतं व त्याचं प्रेम तिला मिळालं म्हणजे ती धन्य झाली, असंच भारतीय खास करून उर्दू काव्यात विपुलतेनं आलं आहे. पण साहिर प्रेमातही समता मानणारा आहे. आपलं प्रेम तिच्यासाठी बेडी होता कामा नये, अशीच त्याची सच्ची भावना आहे. 
 
  तू मुझे छोड के, ठुकरा के भी जा सकती है 
    तेरे हाथ मे मेरा हाथ है, जंजीर नही

आणि तिला असंही मनापासून म्हणतो की,
    ये ना समझो तुम्हारा मुकद्दर हूं मैं
    मै समझता हूं तुम मेरी तकदीर हो

असं लिहिणारा साहिर हा माझ्या माहितीनुसार पहिला भारतीय कवी आहे. पण त्याच वेळी प्रेम केवळ प्लॅटॉनिक आणि मानसिक नसलं, तर ते दैहिक पर असतं. असं साहिरचं प्रेम हे आजच्या काळाला अनुरूप असं दैहिक व संवेद्य सेन्शुअसही आहे. 

    तपते दिल पर यूं गिरती है तेरी नजर से प्यार की शबनम
    जलते हुए जंगल पर जैसे बरखा बरसे रूक रूक थम थम

त्याच्या आसक्तीपूर्ण नरजेनं तिच्या देहात रोमांच फुलतात आणि तिच्या तप्त देहावर तो पावसासारखा थांबून थांबून बरसतो आणि पेटलेल्या देहाचं जंगल विझतं. हे साहिरनं किती प्रभावीपणे शब्दबद्ध केलं आहे. या काव्यातल्या प्रतिभा शरीर संगाचं अत्यंत नजाकतीनं सूचन करतात. पण नंतरच्या काळात समाज अधिक मोकळा झाला, तेव्हा नव्या काळातील तरुणाईच्या दैहिक प्रेमाचं वर्णनही साहिर तरुणाहून तरुण होत व्यक्त करतो, त्यामुळे तो तरुणांना आपला शायर वाटतो.

    तेरे होठ मेरे होठ सिल गये तो क्या हुवा?
    दिल की तरह जिस्म भी मिल गये तो क्या हुवा?

प्रेमातलं शारीरिक मिलनाचं थेट पण तरीही उत्कट वर्णन करणारं हे गीत मग तरुणाईला का आवडणार नाही? म्हणून त्याच्या शब्दांतून तरुणाई समाजाला आव्हान देत धीटपणे विचारते,

    प्यार कर लिया तो क्या प्यार है खता नही
    तेरी मेरी उम्र मे किसने ये किया नही?

पण साहिरच्या प्रेमगीताचा खरा आत्मस्वर आहे तो, विरहाचा, प्रेमभंगाच्या व्यथेचा आणि अवघं जीवन घेरून टाकणाऱ्या उदासीचा एकटं जगताना ती सोबत नाही, ही व्यथा तो फार नजाकतीनं व्यक्त करतो.

    कही ऐसा न हो, पाँव मेरे थर्रा जाए । 
और तेरी मर्मरी बाहों का सहारा न मिले
    अश्क बहते रहे खामोश सियास (काळ्याकुट्ट) रातों मे । 
और तेरी रेशमी आँचल का सहारा न मिले

आणि विरहाचं दुःख हलकं व्हावं म्हणून स्वतःच्या मनाची समजूत घालत तो म्हणतो,

    उन्हे अपना नही सकता मगर इतना भी क्या कम है
    को कुछ मुद्दत हसीन ख्वाबों मे खोकर जी लिया मैंने

पण जेव्हा त्याला प्रेमभंगाचं व विरहाचं दुःख असह्य होतं, तो
म्हणतो,

    मुहब्बत तर्क (सोडणे) की मैने गिरेबाँ सी लिया मैंने
    जमाने अब तो खुश हो जहर ये भी पी लिया हमने

खरंतर साहिरच्या प्रेम-विरहाच्या शायरीचे व त्यातील विविध भावनांचे किती तरी दाखले देता येतील. पण ही मोजकी उदाहरणेही साहिर हा प्रेमाचा किती उत्कट शायर होता, हे समजून यायला पुरेशी आहेत.

पण साहिर मला व माझ्यासारख्या समाजमनाचं भान व जाण असणाऱ्या शेकडो रसिकांना व जागरूक नागरिकांना प्रिय आहे, आपला वाटतो तो त्याच्या इन्किलाबी -क्रांतीच्या कवितांमुळे. क्रांती म्हणजे बंडखोरी, समाज बदलणे व शोषण मुक्ती, बंधुता, समता प्रस्थापित करणारा समाजवाद आणि सेक्युलॅरिझम होय.

साहिरनं भारतातील गरिबी जवळून पाहिली होती. अन्न व निवारा या प्राथमिक गरजापण भागत नाहीत, अशी करोडो कुटुंब स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतरही भारतात आहेत,

    ऐसा बने समाज, मिले सबको अनाज । 
    जागे सबका नसिब, ना हो कोई गरीब

साहिरचं १९६४चं हे ‘बहुरानी’ सिनेमातलं गीत आजही कालबाह्य झालं नाही, हे आपलं दुर्दैव म्हटलं पाहिजे.मुंबईच्या फूटपाथवरील झोपलेले काही बेघर एका अभिनेत्याच्या कारखाली चिरडून मारले गेले, तेव्हा मला साहिरचं एक गीत आठवत होतं -

    खोली भी छिन गई है, बेंचे भी छिन गई है
    सडको पे घुमता है, अब कारवाँ हमारा
    रहने को घर नही, सारा जहाँ हमारा

आजही भारतात एक फार मोठा वर्ग स्वतःच्या हक्काच्या घरात अंगावर थंडीच्या बचावासाठी गरम पांघरूण घेऊन भरल्या पोटी झोपण्याच्या आर्थिक परिस्थितीत नाही, हे साहिरचं फार भेदकपणे सांगतो, 

    कितने घर है जिनमे आज रोशनी नही
    कितने तन-बदन है, जिन मे जिंदगी नही
    आज है यी तो ऐसे आज को बदल डालो
    जुल्म और लूट के रिवाज को बदल डालो
    समाज को बदल डालो

साहिरला स्वतंत्र भारतात शोषण मुक्त समाज हवा होता. जात, धर्म, लिंग आणि रंगाच्या आधारे जी असमानता आहे, ती मिटवून या भारतभूमीवर समतेचा स्वर्ग उभारायचा होता. त्यासाठी त्याला लोकांच्या मनात आशेचा दीप पेटवायचा होता आणि एका सुंदर सुखी पहाटेचं स्वप्न दाखवायचं होतं आणि सांगायचं होतं, ‘वो सुबह कभी तो आयेगी!’

पण साहिरच्या काळात हे समाजवादी समतेचं स्वप्न साकार झालं नाही व आज तर जागतिकीकरणामुळे माणसापेक्षा पैशाला जास्त महत्त्व प्राप्त झालं असताना फारच कठीण वाटतं. अशा वेळी आत्मगौरवात व भूतकाळातील सुवर्णयुगात रममाण होत स्वतःला मोठं समजणाऱ्या समाजाला साहिर निर्दय प्रामाणिक होत सांगतो, ‘जिथं स्त्रीला जगण्यासाठी देह विकावा लागतो, तो देश मोठा कसा?’  म्हणून साहिरचा रोकडा सवाल होता, ‘जिन्हे नाज है हिंद पर वो कहाँ है?’

पण साहिर हा रोमँटिक व स्वप्नाळू क्रांतिकारी कवी होता, म्हणून त्यानं भारतीयांना प्रेरणा देणारं एक चिरंजीवी गीत लिहिलं - ‘वो सुबह कभी तो आयेगी’ त्यात त्यानं भारतीयांना जगण्याची प्रेरणा देत एका समतेच्या स्वर्गाचं स्वप्न दाखवलं,

    इन काली सदियों के सरसे, 
जब रात का आँचल ढलकेगा
    जब दुख के बादल पिघलेंगे, 
जब सुख का सागर छलकेगा
    जब अंबर झूम के गायेगा, जब धरती नगमे गायेगी
    वो सुबह कभी तो आयेगी
    मजबूर बुढापा जब सुनी राहों मे धूल मे न फेकेगा
    मासूम लडकपन जब गंदी गलीयों मे भीक न मांगेगा
    हक माँगनेवालों को जिस दिन सुली ना दिखाई जायेगी
    वो सुबह कभी तो आयेगी!

संबंधित बातम्या