एका ‘फोन हॅक’चे महाभारत! 

महेश बर्दापूरकर
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

विशेष
 

सोशल मीडिया प्रत्येकाच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. सुख-दुःखाबरोबरच प्रेमाच्या आणि खूपच खासगी गोष्टीही या माध्यमातून केल्या जातात. त्यात व्हॉट्सअॅप हे माध्यम सर्वाधिक आघाडीवर आहे. जगभरात दीडशे कोटी लोक त्याचा वापर करतात व त्यातील ४० कोटी फक्त भारतात आहेत! आपले टेक्स्टिंग व त्यातही ‘सेक्स्टिंग’ कोणी चोरून पाहात असेल, अशी शंका कोणालाही येत नसणार. मात्र, जगातील दोन सर्वाधिक श्रीमंत लोकांमध्ये झालेल्या संवादातून एकाचा फोन हॅक होऊन त्याचे खासगी आयुष्य चव्हाट्यावर आणल्याची घटना, त्यात जगातील सर्वांत मोठ्या देशाच्या अध्यक्षाचे हितसंबंध आणि यातून सुरू झालेले राजकारण नक्कीच हादरवून टाकणारे, सामान्य माणसाच्या मनात आपले खासगी आयुष्य जपले जाते आहे ना, अशी शंका उपस्थित करणारे आहे. 

जगातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या ‘ॲमेझॉन’चा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेफ बेझॉस आणि सौदी अरेबियाचा सुलतान महंमद बिन सलमान ऊर्फ एमबीएस हे दोघे चांगले मित्र. त्यांच्यात व्हॉट्सॲपवर २०१८ मध्ये अनेकदा संवाद झाल्याचे पुरावेही आहेत. मात्र, एमबीएसने चॅट करताना बेझॉस यांना ४.४ एमबीची एक फाईल पाठवली. यात सकृतदर्शनी व्हिडिओ, अरबी भाषेत मजकूर आणि स्वीडनचा ध्वज दिसत होता. बेझॉस यांनी आपल्या ‘मित्रा’ने पाठवलेली ही फाईल ओपन केली आणि घात झाला. बेझॉस यांचा ‘आयफोन एस’ हा स्मार्टफोन हॅक झाला आणि त्यातील सगळी खासगी माहिती चोरली गेली. बेझॉस यांचे अमेरिकेतील एक वृत्तनिवेदिका आणि कलाकार लारा सँचेझबरोबर अनैतिक संबंध होते आणि फोनच्या माध्यमातून ते उघड झाले. ‘नॅशनल एन्क्वायरर’ या अमेरिकेतील दैनिकाने ते मसाला लावून छापले. त्याचा परिणाम बेझॉस यांची पत्नी मॅकेन्झी यांनी घटस्फोटाची मागणी केली. बेझॉस यांनी पोटगी म्हणून ३५ अब्ज डॉलरची रक्कम पत्नीला दिल्यावर सर्वांचेच डोळे पांढरे होण्याची वेळ आली... हा झाला इतिहास.

हे प्रकरण आता नवनवे रंग घेते आहे. त्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचे परिमाणही मिळत आहे. बेझॉस यांचा संसार मोडल्यानंतर खरेतर हे प्रकरण संपायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही. त्याची साखळी त्यानंतर घडलेल्या काही घटनांशी जोडली जाऊ लागली. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये जमाल खागोशी नावाचा ‘वॉशिंग्टन पोस्ट’चा पत्रकार इस्तंबूलमधील सौदी दूतावासात मारला गेला, ही ती घटना. त्याच्या हत्येमागे सौदी सुलतान एमबीएस असल्याचा संशय लगेचच घेतला गेला, कारण एमबीएसला सत्तेवर येण्यापासून रोखण्याच्या बातम्या देण्यात खागोशीचा आघाडीवर होता. अमेरिकेतील पत्रकार मारला गेल्यावर त्या देशात तीव्र प्रतिक्रिया उमटली व अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हत्येचा निषेध केला. एमबीएसने या हत्येमागे आपली योजना असल्याचे मान्य केल्यावर मात्र ट्रम्प शांत झाले. (ट्रम्प यांच्या मूग गिळून गप्प बसण्यामागे त्यांचा जावई आणि एमबीएसचा दोस्ताना, हे कारण असल्याचे अमेरिकेसह सर्व जगाला समजायला वेळ लागला नाही.) बेझॉस यांच्याकडे ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे मालकी हक्क आहेत आणि खागोशी त्याच वर्तमानपत्रात एमबीएसविरोधात बातम्या लिहीत होता. याचे पुरावे गोळा करण्यासाठी एमबीएसने चाल रचली आणि आपल्या मित्राचा, बेझॉस यांचाच फोन हॅक केला.  त्याच्या हाती बेझॉस यांची खासगी छायाचित्रे लागली आणि त्याने ती स्वतःचीच मालकी असलेल्या ‘नॅशनल एनक्वायरर’मध्ये छापून आणली. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात राळ उठवत असल्याने त्याच्या मालकावर आलेले बालंट ट्रम्प यांच्यासाठीही फायद्याचा सौदा ठरले आणि एक साखळी पूर्ण झाली. 

हे सर्व झाले जगातील तीन सर्वांत शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांतील राजकारण व सुडाचे फलित. यामध्ये आपल्यासारख्या सामान्य माणसांचे काय? जेफ बेझॉस यांची संपत्ती ११५ अब्ज डॉलर (सुमारे आठ हजार अब्ज रुपये) आहे. ते जगातील कोणतीही वस्तू विकत घेऊ शकतात किंवा गोष्टी हव्या तशा मॅनेजही करू शकतात. मात्र, व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडियाचा वापर करताना तेही दीडशे कोटी ग्राहकांप्रमाणेच ‘सामान्य व्यक्ती’ ठरतात. आपल्यालाही स्मार्टफोनवरून ट्विट करताना, व्हॉट्सॲप टेक्स्‍टिंग करताना, व्हिडिओ ओपन करताना, ते शेअर करताना सावध राहावेच लागेल. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीच्या आयुष्याचा डोलारा एक छोटी फाईल उद्‍ध्वस्त करू शकते, यावरून सामान्यांनी धडा तर नक्कीच घ्यायला हवा... 

ता. क. :- ‘द पोस्ट’ हा स्टीव्हन स्पिलबर्ग यांचा अमेरिकेच्या व्हिएतनाम युद्धावर बेतलेला चित्रपट आणि या घटनाक्रमात विलक्षण साम्य आहे. वर्तमानपत्रांनी नागरिकांच्या मताविरोधात जाणाऱ्या घटनांची माहिती निर्भीडपणे उघड केल्यास बलाढ्य सरकारलाही नमते घ्यावेच लागते, याचे उदाहरण ‘वॉशिंग्टन पोस्ट’नेच घालून दिले होते. याच वर्तमानपत्राचे मालक-संपादक सरकारच्या दबावाला बळी न पडता प्रकरण तडीस कसे नेतात, याला सर्वाधिक महत्त्व येते. ‘फोन हॅक’सारखा नागरिकांच्या खासगी आयुष्याच्या रक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय वर्तमानपत्रे किती हिरिरीने मांडतात, यावर येणाऱ्या पिढीचे भवितव्य ठरणार आहे. 

संबंधित बातम्या