लाखमनसबदारी ‘स्टॅच्यू’ 

महेश बर्दापूरकर 
सोमवार, 5 एप्रिल 2021

विशेष

पर्यटन स्थळ विकसित होतं, म्हणजे नक्की काय याची आदर्श उदाहरणं भारतात तुलनेनं खूपच कमी आहेत. संबंधित ठिकाणाच्या इतिहास, भूगोल आणि संस्कृतीचा योग्य वापर करीत, दळणवळणापासून निवासापर्यंतच्या सर्व सुविधा तत्पर आणि अद्ययावत ठेवल्यास पर्यटक अशा स्थळाला भेट देतातच.

सरदार वल्लभभाई पटेलांचा १८२ मीटर उंचीचा जगातील सर्वांत मोठा पुतळा, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असलेलं गुजरातमधील केवडिया हे ठिकाण अशा पद्धतीचं आदर्श पर्यटन स्थळ आहे. पुतळा हे मुख्य आकर्षण ठेवत त्याच्या जोडीला अनेक उद्यानं, साहसी खेळ, जंगलात तंबूमध्ये राहण्याची सुविधा, रिव्हर राफ्टिंग, धरणाचं विहंगम दर्शन, रेल्वेपासून वॉटर प्लेनपर्यंतची दळणवळणाची साधनं अशा अनेक सुविधांमुळं हे ठिकाण आदर्श पर्यटन स्थळ ठरतं आहे आणि उद्‍घाटनानंतर काही महिन्यांतच पन्नास लाख पर्यटकांचा टप्पाही ओलांडला गेला आहे. केवडियामध्ये दोन दिवस फेरफटका मारून तेथील स्थळांचा घेतलेला हा धावता आढावा...

स्टॅच्यू ऑफ युनिटी 
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे केवडियातील सर्वांत मोठं आकर्षण. नर्मदा नदीच्या पात्रात आणि सरदार सरोवराजळ असलेल्या या पुतळ्याच्या आतून साधारण १३० मीटर उंचीपर्यंत जाण्यासाठी जगातील सर्वांत वेगवान लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत. इथं दोन लिफ्ट असून, एका लिफ्टमधून २५ लोक प्रवास करू शकतात आणि अर्ध्या मिनिटात तुम्ही पुतळ्याच्या छातीपर्यंत पोचता. तेथून केवडिया परिसराचं विहंगम दृश्‍य दिसतं. या पुतळ्याचं अनावरण ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. संध्याकाळी तिथं होणारा लेझर, लाइट अँड साउंड शो हे मोठं आकर्षण आहे. वल्लभभाई पटेलांच्या जीवनचरित्रापासून त्यांच्या पुतळ्याच्या निर्मितीपर्यंतचा प्रवास त्यात दाखवला जातो. त्याच्याच बाजूला असलेल्या ‘युनिटी ग्लो गार्डन’मधील प्रकाशानं उजळलेल्या प्राणी-पक्षी-झाडं यांच्या प्रतिकृती डोळे दिपवून टाकतात. 

राफ्टिंगचा थरार
सरदार सरोवरा परिसरात विकसित करण्यात आलेल्या या भागात धरणातील पाणी ‘गोडबोले गेट’मधून नियंत्रित करून रिव्हर राफ्टिंगची व्यवस्था उभारली गेली आहे. पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात उभारण्यात आलेल्या धबधब्यांच्या मदतीनं इथं पाच किलोमीटरचं राफ्टिंग करता येतं, त्याचबरोबर ॲम्फी थिएटर, नर्सरी, मुलांसाठी नैसर्गिक रंगांच्या मदतीनं पेंटिंगची सोय, निसर्गशिक्षण व तंबू आणि ट्री-हाऊसमध्ये राहण्याची सोय याच परिसरात करण्यात आली आहे. सरदार सरोवर नौका विहार आणि नदीच्या पात्रातून रिव्हर क्रूझचा प्रवास करीत स्टॅच्यू ऑफ युनिटीचा अनोखे दर्शन घेण्याची सुविधाही येथे उपलब्ध आहे.

जंगलसफारी 
केवडियामध्ये जंगलसफारीचा आनंदही घेता येतो. इथं पक्ष्यांसाठी कृत्रिम तलाव उभारण्यात आला असून, जगभरातल्या विविध देशांतून आणलेले पक्षी पाहायला मिळतात, तसंच वाघ-सिंह, विविध जातींची हरणं, गेंडा, झेब्रा, जिराफ हे प्राणी पाहण्याची संधीही मिळते. मोकळ्या जागेत फिरणारे प्राणी काचेच्या भिंतीमागून पाहण्यातला थरार इथं अनुभवायला मिळतो. या जंगलाची सफर घडवून आणण्यासाठी खास बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून, ही सफर मुलांसह मोठ्यांनाही रोमांचित करते. 

गोडबोले गेट! 
सरदार सरोवर धरणाच्या कालव्यांव्यतिरिक्त खालील बाजूला असलेल्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी तेथील टोपोग्राफिचा उपयोग करून तीन छोटी तळी बांधण्यात आली आहेत. या तळ्यांतून पाणी नियंत्रित करण्यासाठी ‘गोडबोले गेट’चा वापर होतो. या भागात फिरताना या गेट्सचा उल्लेख स्थानिक व गाईड्सच्या तोंडी सारखा येत होता. अनेक ठिकाणांहून माहिती घेतल्यानंतर ‘गोडबोले गेट’ ही महाराष्ट्रातील कंपनी असल्याचं स्पष्ट झालं. कंपनीचा फोन नंबर मिळवून संचालक प्रशांत गोडबोले यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘बहुतांश धरणांचे दरवाजे विजेवर चालतात. मात्र, ‘गोडबोले-गेट’ना वीज लागत नाही, ते वॉटर प्रेशरवर काम करतात. माझे वडील प्रभाकर गोडबोले यांचं हे संशोधन असून, त्यांना १९८७ मध्ये त्याचं पेटन्‍ट मिळालं. तळी भरल्यानंतर हे दरवाजे आपोआप उघडले जातात. या दरवाजांमध्ये सुधारणा करून आम्ही ते मॅन्युअली उघडण्याची सुविधाही दिली आहे. याचा उपयोग करून रिव्हर राफ्टिंगसाठी पाणी पुरवलं जातं. महाराष्ट्रात १८ ठिकाणी, तसंच देशभरात शंभरपेक्षा अधिक ठिकाणी गेट बसवली आहेत.’’

फुलपाखरू आणि कॅक्टस गार्डन
फुलपाखरांना आकर्षित करणारी झाडे लावून अगदी मोकळ्या जागेत विविध जातींची हजारो फुलपाखरे पाहण्याची संधी केवडियातील फुलपाखरू उद्यानात मिळते. जगभरातील विविध जातीची फुलपाखरे एकत्र बागडताना पाहून मन प्रसन्न होते. त्याच्याच जोडीला जगभरातील वाळवंटांतून आणलेले शेकडो प्रकारचे कॅक्टस असलेले गार्डनही वेगळे ठरते. काचेच्या प्रचंड आकाराच्या ड्रोनमध्ये तापमान नियंत्रित करून हे कॅक्टस वाढविण्यात आले आहेत. याच्या जोडीला १७ एकरांत पसरलेलं आरोग्य वन हे शेकडो प्रकारच्या आयुर्वेदिक रोपांचं उद्यानही मोठं आकर्षण आहे.  

टेंट सिटी
केवडियात तळ्याच्या काठी उभारण्यात आलेली ‘टेंट सिटी नर्मदा’ हे निवासासाठीचं मोठं आकर्षण आहे. येथे २५० आरामदायी (पूर्णपणे वातानुकूलित) तंबू उभारण्यात आले असून, त्यात लक्झरी, डीलक्स व स्टॅण्डर्ड असे प्रकार आहेत. निबिड जंगल असलेल्या परिसरात अशा तंबूंमध्ये राहण्याचा थरारक अनुभव येथे घेता येतो. 

चिल्ड्रन न्यूट्रिशन पार्क 
‘मुलांनी फास्ट फूड टाळून पौष्टिक अन्न खावं,’ हा संदेश देण्यासाठी केवडिया परिसरात न्यूट्रिशन पार्क उभारण्यात आलं आहे. या पार्कमध्ये शेतात पिकणारी धान्ये आणि भाजीपाल्यापासून घरातच पौष्टिक पदार्थ कसे तयार करावेत, कोणत्या ऋतूत कोणती फळं व भाज्या खाव्यात याची माहिती टॉयट्रेनमधून प्रवास घडवून आणत देण्यात येते. पौष्टिक पदार्थ ओळखण्यासाठीचे खेळ, थ्री डीच्या माध्यमातून पदार्थांची ओळख करून देणे असे प्रयोगही इथं करण्यात आले आहेत. हे जगातील अशा प्रकारचं पहिलंच पार्क असून, शेवटी ‘सेव्हन डी’ शोच्या माध्यमातून भारतातील सर्व खाद्यसंस्कृतींची अनोखी सफरही घडवून आणली जाते.

संबंधित बातम्या