सेंटर कोर्टची शताब्दी

विशेष प्रतिनिधी
सोमवार, 18 जुलै 2022

सेंटर कोर्टच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त यंदा सर्व माजी विजेत्या खेळाडूंसह काही खास मंडळींना आमंत्रण होते. यासोबतच काही लहान मुलांना आमंत्रित करून त्यांना ‘तुमच्या मनातील सेंटर कोर्टची पुढील १०० वर्षे’ याबद्दल माहिती देण्यास सांगितले. इतक्या सहज सोप्या पद्धतीने आयोजकांनी पुढच्या पिढीच्या काही प्रतिनिधींना विम्बल्डनने आपलेसे करून घेतले आहे.

विम्बल्डन आणि त्याबद्दलच्या दंतकथा हे समीकरण फार जुने आहे. असाच एक किस्सा सांगितला जातो. खरा-खोटा माहिती नाही, पण बऱ्याचदा ऐकायला मिळतो. सेंटर कोर्टचे तिकीट मिळत नाही म्हणून एका धनिकाने या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या ऑल इंग्लंड क्लबच्या सदस्यत्वाची चौकशी केली. नवीन सदस्य होण्यासाठी असलेल्या प्रतीक्षा यादीत १०० वर्षांहून अधिक काळ थांबावे लागेल असे या धनिकाला थेट न सांगता, ‘सध्या तरी या स्पर्धेच्या एकेरीचे विजेतेपद मिळविणे हाच ऑल इंग्लंड क्लबचा सदस्य होण्याचा त्यातल्या त्यात सोपा मार्ग आहे,’ असे (अर्थातच नम्रपणे) सांगण्यात आले. विम्बल्डन आणि सेंटर कोर्ट यांच्याभोवती जे वलय आहे ते दाखवून देणारा हा प्रातिनिधिक किस्सा. क्रीडा क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या, पवित्र मानल्या जाणाऱ्या मैदानांपैकी एक असणाऱ्या, वलयांकित सेंटर कोर्टची यंदा शताब्दी. 

टेनिसमध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चार ग्रँडस्लॅमपैकी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, अमेरिकन ओपन या स्पर्धांनी आपापल्या सेंटर कोर्टला नावे दिली. पण विम्बल्डनची गोष्टच न्यारी. विम्बल्डन म्हणजे ग्रेट ब्रिटन ओपन नव्हे, तर फक्त विम्बल्डन. तसेच फक्त सेंटर कोर्ट. किंवा खास ब्रिटिश पद्धत म्हणजे ते या स्पर्धेचा उल्लेख विम्बल्डन असाही न करता फक्त ‘द चॅम्पियनशिप्स’ इतकाच करतात. कारण ग्रँड स्लॅमचीही ग्रँड स्लॅम म्हणजे विम्बल्डन. यात वेगळे ते काय सांगायला हवे? अर्थात हा केवळ आविर्भाव नाही, जगातल्या बहुतेक टेनिसपटूंसाठी तरी नक्कीच नाही.

ऑल इंग्लंड क्लबने १८७७च्या नऊ जुलैला विम्बल्डन स्पर्धा भरविण्यास सुरुवात केली. त्याला आता १४५ वर्षे झाली. या पहिल्या स्पर्धेत फक्त पुरुषांसाठी एकेरी स्पर्धा खेळल्या गेल्या, एकूण एकवीस खेळाडू एकेरीच्या या विजेतेपदासाठी खेळले.

या पहिल्या सामन्यानंतर पंचेचाळीस वर्षांनी, म्हणजे शंभर वर्षांपूर्वी, १९२२मध्ये, त्या काळाच्या मानाने अतिभव्य असे सेंटर कोर्ट बांधले गेले. त्यावेळी एक पांढरा हत्ती अशी त्याची संभावना करण्यात आली. टेनिस हा खेळ कधी इतका लोकप्रिय होऊ शकेल का, की ज्यासाठी १५ हजार आसन क्षमतेच्या सेंटर कोर्टची गरज भासेल, असा प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आला. आज या १५ हजार आसन क्षमतेच्या सेंटर कोर्टचे पहिल्या फेरीच्या सामन्याचे तिकीट मिळवायला लोक चार दिवस रांगेत उभे राहतात. क्रीडा क्षेत्रातील सर्वात यशस्वी गोष्टींपैकी एक असेच याचे वर्णन करता येईल. गेल्या शंभर वर्षांच्या प्रवासात सेंटर कोर्टने दुसऱ्या महायुद्धातल्या बॉम्ब वर्षावासह अनेक बरेवाईट क्षण अनुभवले.

विम्बल्डन म्हटले की सर्वात प्रथम आठवते ती तेथील खास ब्रिटिश शिस्त. ती सुरेख दिसणारी हिरवळ, पांढऱ्या शुभ्र पोषाखातील खेळाडू, प्रेक्षकांची अगदी शिस्तबद्ध टाळ्या वाजवायची पद्धत. एकंदरीतच साऱ्या खास ब्रिटिश परंपरा. पण याच ब्रिटिशांनी परंपरांना चिकटून राहतानाच, विम्बल्डनच्या सेंटर कोर्ट आणि एकूणच सामने होतात त्या अन्य कोर्टवरही कालसुसंगत असे बदलही केले, आणि स्वीकारलेही, यासाठी त्यांचे कौतुकही करायला हवे. 

एकीकडे पांढऱ्या शुभ्र पोषाखाची सक्ती नको, ही एकेकाळचा आघाडीचा टेनिसपटू आंद्रे आगासीची मागणी धुडकावून लावणाऱ्या संयोजकांनी २००९ साली सेंटर कोर्टवर पूर्णपणे उघडता येणारे असे छत बांधून घेतले, आणि लंडनचा लहरी पाऊस कितीही बरसला तरी किमान उपांत्य आणि अंतिम सामन्यात त्याचा व्यत्यय येणार नाही याची खबरदारी घेतली. 

आता सेंटर कोर्टवर आणि पुढे २०१९साली कोर्ट क्रमांक एकवरही छत बांधले गेल्यावर सायंकाळचे सामने खेळवावेत, अशी मागणी जोर धरू लागली. पण यावर ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या ऑल इंग्लंड क्लबने स्पष्टपणे सांगितले, की टेनिस हा विशेषतः मोकळ्या मैदानात आणि नैसर्गिक उजेडात खेळायचा खेळ आहे. बस्स...  इतकेच स्पष्टीकरण. 

अर्थात विम्बल्डन स्पर्धा खेळली जाते तो असतो जून-जुलैचा काळ, म्हणजे रात्री ९ वाजेपर्यंत सामने खेळता येतील इतका सूर्यप्रकाश असतो. शिवाय सेंटर कोर्ट आणि कोर्ट क्रमांक एकवरचा एखादा सामना लांबला तर छत बंद करून प्रकाशझोतात तो पूर्ण करायची सोय आहेच. मात्र यातील खास ब्रिटिश शिस्त वाखाणण्याजोगी आहे. सामना कितीही रंगतदार अवस्थेत असला, तरी रात्रीचे ११ वाजले की मात्र तो बंद करावा लागतो. कारण, सामना त्यापेक्षा जास्त वेळ लांबला, तर मध्यरात्री सेंटर कोर्टवरून बाहेर पडणाऱ्या सुमारे १५ हजार लोकांच्या, त्यांच्या वाहनांच्या आवाजाचा स्थानिकांना त्रास होईल म्हणून. खरंच, जगातील अव्वल क्रीडास्पर्धांतील एक अशा स्पर्धेतील अत्यंत उत्कंठावर्धक असा एखादा सामना, ज्याकडे कोट्यवधी क्रीडारसिक टेलिव्हिजन आणि आता हातातल्या मोबाईल वरूनही लक्ष ठेवून असतात, तो केवळ स्थानिक नागरिकांचा विचार करून थांबवला जाऊ शकतो? हे ग्रेट ब्रिटन वगळता अन्य किती देशात होऊ शकेल? 

या सेंटर कोर्टच्या अशा खास परंपरा आहेत. उदाहरणार्थ, पुरुष एकेरीतील गतविजेता खेळाडू पहिल्या दिवशी सेंटर कोर्टवरील पहिला सामना खेळणार, तर दुसऱ्या दिवशी महिला एकेरीतील गतविजेती खेळाडू पहिला सामना खेळणार. त्यामुळे किमान पहिल्या दिवशी कोणाचा सामना आहे, आणि दुसऱ्या दिवशी कोणाचा सामना आहे, हे एक प्रकारे एक वर्ष आधीच निश्चित झालेले असते. (अर्थातच गतविजेता खेळाडू दुखापतग्रस्त वगैरे नसेल तर.) महिला एकेरीत २०२१ साली विजेतेपद मिळवणारी ऑस्ट्रेलियाची अॅश बार्टी आता निवृत्त झाली असल्याने, यंदा आयोजकांनी चक्क तिलाच विचारले, की यावर्षी दुसऱ्या दिवशी कोणत्या महिला खेळाडूचा सामना प्रथम ठेवावा. बार्टीने अव्वल मानांकन असलेल्या इगा स्विआटेकचे नाव सुचवले, आणि त्यानुसार यंदा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सेंटर कोर्टवर स्विआटेकच्या सामन्याने झाली.

पारितोषिक वितरण समारंभाला इंग्लंडच्या राणीची, किंवा राजघराण्यातील कोणाची तरी उपस्थिती ही विम्बल्डनची आणखी एक खास अशी जपलेली परंपरा. स्टेफी ग्राफकडून १९९३च्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर राणीच्या गळ्यात पडून ढसढसा रडणारी याना नोवोत्ना आजही अनेकांना आठवत असेल. 

ऑस्ट्रेलियाच्या पॅट कॅशने १९८७मध्ये पुरुष एकेरीचा अंतिम सामना जिंकल्यावर थेट प्रेक्षागृहात धाव घेऊन आपल्या कुटुंबीयांना आणि प्रशिक्षकांना मिठी मारली. हीच पुढे परंपरा झाली, आणि आज बहुतेक विजेते कोर्ट मागील कठड्यावरून काहीशी कसरत करत प्रेक्षागृहात आपल्या कुटुंबीयांकडे धाव घेताना दिसतात.    

भारतीयांचा विम्बल्डनशी ऋणानुबंध जडला तो साधारण ८०च्या दशकाच्या मध्यानंतर. दूरचित्रवाणी त्यावेळी  हळूहळू अगदी घराघरात नाही, पण बऱ्यापैकी पसरू लागली होती. बोर्ग-मॅकेन्रोची खुन्नस ही अनेक भारतीय टेनिस चाहत्यांची विम्बल्डनच्या सेंटर कोर्टची पहिली आठवण. डोक्यावर बर्फ ठेवल्याप्रमाणे शांत असणारा बोर्ग, आणि त्याच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा मॅकेन्रो. मग त्यानंतर अनेकदा (चार वेळा) अंतिम फेरी गाठूनही विम्बल्डन एकदाही जिंकू न शकलेला इवान लेंडल, त्यानंतर अगदी सहज सुंदर असा ग्रासकोर्ट वरील नैसर्गिक खेळ करणारी बोरिस बेकर आणि स्टीफन एडबर्ग ही द्वयी, पुढे तब्बल सात वेळा ही स्पर्धा जिंकणारा पीट सॅंप्रास, पांढऱ्या शुभ्र पोषाखाच्या सक्तीबद्दल आयोजकांवर टीका करणारा, पण नंतर याच विम्बल्डनच्या प्रेमात पडणारा आगासी ते सध्याचे आणि सार्वकालीन महान खेळाडू रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच.

महिला खेळाडूंबद्दल बोलायचे, तर माजी नंबर वन ख्रिस एव्हर्ट लॉईड, या स्पर्धेत तब्बल नऊ वेळा एकेरीचे विजेतेपद मिळवणारी मार्टिना नवरातिलोवा, तिच्यापुढे जबरदस्त आव्हान उभे करत तिला मात देणारी स्टेफी ग्राफ या सुरुवातीच्या प्रमुख आठवणी. (आता पन्नाशीच्या पुढे असणारे अनेक भारतीय टेनिस चाहते आजही यांच्या पुढे जायला तयारच नाहीत.) अर्थात त्याकाळी फक्त उपांत्य आणि अंतिम सामनेच पाहायला मिळायचे, त्यामुळे वारंवार अंतिम फेरीत खेळणारे खेळाडू आणि सेंटर कोर्टच माहीत होते. आता खास विम्बल्डनला वाहिलेल्या वाहिन्या आल्या आणि अनेक अन्य खेळाडूंची आणि कोर्टाची ओळख भारतीय क्रीडा रसिकांना झाली. सेंटर कोर्टच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त यंदा सर्व माजी विजेत्या खेळाडूंसह युक्रेन व अन्य देशातील निर्वासित, तसेच विम्बल्डन गावात राहणाऱ्या काही स्थानिक लोकांना खास आमंत्रण होते. यासोबतच काही लहान मुलांना आमंत्रित करून त्यांना ‘तुमच्या मनातील सेंटर कोर्टची पुढील १०० वर्षे’ याबद्दल त्यांना काय वाटते ते विचारण्यात आले. त्या मुलांनी केलेल्या सूचनांपैकी निवडक सूचना ऑल इंग्लंड क्लब अमलात आणेल.

इतक्या सहज सोप्या पद्धतीने पुढच्या पिढीच्या काही प्रतिनिधींना विम्बल्डनने आपलेसे करून घेतले आहे. आपल्या आणि आपल्या मित्रांच्या सूचनांची कितपत अंमलबजावणी झाली, हे पाहायला ही मुले एकदा तरी विम्बल्डनला येतील; आणि जो एकदा आला, तो या स्पर्धेच्या कायमचा प्रेमात पडला, याची आयोजकांना खात्री आहे.

संबंधित बातम्या