हापूस आंब्याची निर्यात... 

मिलिंद ग. जोशी
सोमवार, 9 मे 2022

विशेष

भारत सरकारने जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व प्राप्त केले. तसेच जागतिक व्यापार करारामध्ये कृषी क्षेत्राचा समवेश केल्यामुळे आंबा निर्यातीच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. सद्यस्थितीत सुमारे ७० देशांमध्ये आंबा निर्यात केली जात असून जागतिक बाजारपेठांमध्ये आंबा निर्यातीच्या खूप मोठ्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या कृषी पणन मंडळाने निर्माण केलेल्या सुविधा केंद्रांमुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणत्याही देशांना निर्यात करणे शक्य झाले आहे. 

जगभरात आंबा हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. जगामध्ये सुमारे सव्वाशे देशांमध्ये ३४.५६ लाख हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड आहे. त्यापैकी सुमारे ४० टक्के क्षेत्र भारतात आहे. आंबा उत्पादनाच्या बाबतीत भारत आघाडीवर आहे. भारतातील आंबा उत्पादनात उत्तरप्रदेश अग्रेसर असला, तरी महाराष्ट्रातील ‘हापूस’ आणि ‘केसर’मुळे निर्यातीत मात्र महाराष्ट्र आघाडीवर आहे.  महाराष्ट्रातील हापूस आणि केसर आंब्यांची चव जगभर चाखली जाते.  हापूस आणि केसर या दोन्ही जातींच्या आंब्यांना भौगोलिक निर्देशांक (जीआय) मानांकन मिळालेले आहे.  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हापूस बागायतदारांची संख्या मोठी असली, तरी रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतदेखील आंब्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळेच हापूस आंबा ही कोकणाची ओळख आहे. हापूस आंब्याला एक आगळेच तेज, मोहक व मधुर गंध, अवीट गोडी आणि रसरशीत मऊ गर अशी एकाहून एक सरस वरदाने निसर्गाने दिली आहेत. कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम मार्चमध्ये सुरू होत असला, तरी स्थानिक बाजारपेठेत आंब्याला चांगले दर प्राप्त होत असल्यामुळे निर्यातीचा हंगाम मात्र एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होतो व साधारणपणे मेअखेरपर्यंत सुरू राहतो.

महाराष्ट्र आंबा उत्पादनातील एक प्रमुख राज्य असून ५.६६ लाख हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. त्यातून सुमारे ३.३१ लाख मेट्रिक टन आंब्याचे उत्पादन मिळते. महाराष्ट्राची सरासरी उत्पादकता २ मेट्रिक टन/हेक्टर इतकी आहे. तर कोकणात हापूस आंब्याखाली १,१४,८२२ हेक्टर क्षेत्र असून उत्पादन २,७८,०२२ मेट्रिक टन आहे. हापूस आंब्याची उत्पादकता २.४२ मेट्रिक टन प्रति हेक्टर आहे. 

हापूस आंब्याला देशांतर्गत स्थानिक बाजारपेठेत विक्रीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर १९९५च्या जागतिक व्यापार करारामध्ये कृषी क्षेत्राचा समावेश केल्यामुळे जागतिक बाजारपेठही आपणाला खुली झाली आहे. विविध देशांबरोबर एकाच वेळी करार झाल्यामुळे विविध देशांना आंबा निर्यातीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सुरुवातीला देशांतर्गत बाजारपेठेत आंब्याला चांगला भाव मिळतो, परंतु एप्रिल महिन्यापासून बाजारातील आंब्याची आवक वाढली की स्थानिक बाजारपेठेमध्ये तीव्र स्पर्धेमुळे आंब्याचे दर कमी होऊ लागतात. त्यामुळे चांगले दर प्राप्त होण्यासाठी निर्यात हा चांगला पर्याय आहे. निर्यातीमुळे उत्पादकांचा माल एकाच वेळेस स्थानिक बाजारपेठेत आल्यास दर कोसळून नुकसान होण्याची शक्यता कमी होते. तसेच आपल्या देशाला परकीय चलन उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे निर्यातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आंबा उत्पादनात महाराष्ट्राचा दहावा क्रमांक असला, तरी निर्यातीमध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रात उत्पादित होणारे हापूस व केसर हे दोन आंबे निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. इतर प्रजातींशी तुलना केल्यास यांचा दर निश्चितच चांगला असतो. हापूस ही प्रजाती अतिशय नाजूक असून निर्यात प्रक्रियेच्यावेळी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. गेल्या काही वर्षांतील निर्यातीचा अभ्यास केल्यास सुमारे ६० ते ७० टक्के निर्यात महाराष्ट्रातून होते, आणि त्यातून भारताला सुमारे ३०० कोटींचे परकीय चलन मिळते. महाराष्ट्रातून शेतकरी निर्यातदार व्हावेत या दृष्टीने शासन तसेच कृषी पणन मंडळाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत आंबा उत्पादक निर्यातदारांची संख्या खूप कमी असली तरी आंबा उत्पादकाचा निर्यातदार होण्याकडे कल वाढत आहे, ही बाब निश्चितच समाधानाची आहे. 

कोकणातील जांभा दगडापासून तयार झालेल्या मातीत व समुद्र किनाऱ्याजवळील खाऱ्या जमिनीत उत्पादन झालेल्या हापूस आंब्याची गुणवत्ता सर्वोत्तम असते. हापूस आंब्याची कलमे इतर भागात नेऊन लावली तरी त्या कलमांच्या आंब्याची गुणवत्ता अशी सर्वोत्तम नसते. त्यामुळेच हापूस आंब्याला २० ऑक्टोबर २०१८ रोजी भौगोलिक निर्देशांक मानांकन (जीआय) प्राप्त झालेले आहे. त्यासाठी हापूस आंब्याचा व्यवसाय करणाऱ्या सर्वांना, म्हणजेच हापूस आंब्याच्या कलमांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकापासून ते व्यापारी, प्रक्रियादार, विक्रेता व निर्यातदार या सर्वांनी भौगोलिक मानांकन नोंदणी करणे आवश्यक आहे. कोकणातील पाच जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणी हापूस प्रजातीची लागवड केली, तरी त्याची गुणवत्ता सर्वसाधारण असते, त्याला सुवास खूप कमी असतो किंवा नसतो. त्यामुळे अशा आंब्याची हापूस म्हणून विक्री करता येत नाही. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर व ठाणे या जिल्ह्यांतील हापूस आंब्याला जीआय मिळालेले असल्याने येथे उत्पादित होणाऱ्या हापूस आंब्याचीच ‘अल्फान्सो’, म्हणजेच ‘हापूस’ म्हणून विक्री करता येते.

कोकण हापूस आंबा उत्पादक व उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्या., रत्नागिरी; देवगड हापूस आंबा उत्पादक सहकारी संस्था, जामसंडे; केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संस्था, ता. दापोली या संस्थांशी संपर्क साधून  हापूस आंब्यासाठी भौगोलिक सांकेतांक नोंदणी करता येते. 

हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्र 
जगातील कोणत्याही बाजारपेठेत हापूस आंबा निर्यात करायचा असेल, तरी त्यासाठी सर्व आवश्यक सुविधा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने महाराष्ट्रामध्ये  उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला परराज्यात जावे लागत नाही. आयातदार देशांच्या निकषानुसार आंबा निर्यात करताना विशिष्ट प्रक्रिया करणे आवश्यक असते. यामध्ये ‘प्राथमिक प्रक्रिया’, ‘उष्ण बाष्प प्रक्रिया’ (व्हीएचटी), ‘उष्णजल प्रक्रिया’, तसेच ‘विकीरण प्रक्रिया’ यांचा समावेश होतो. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत नवी दिल्लीतील अपेडा आणि रत्नागिरीतील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सहकार्याने रत्नागिरीतील नाचणे येथे; तर अपेडा आणि देवगड आंबा उत्पादक संघ यांच्या सहकार्याने जामसंडे येथे हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर वाशीतील विकीरण सुविधा केंद्राच्या आवारातील भाजीपाला प्रक्रिया निर्यात सुविधा केंद्र आंब्याच्या प्राथमिक प्रक्रियेसाठी प्रमाणित करण्यात आले आहे. 

आर्यलंड, जर्मनी, नेदरलँड, फ्रान्स, डेन्मार्क, स्वीडन, स्वित्झर्लंड, पोलंड, इटली, स्पेन, बेल्जियम, पोर्तुगाल, रोमानिया, ऑस्ट्रिया, मॉरिशस, रशिया, द. कोरिया इत्यादी देशांमध्ये आंबा निर्यातीसाठी उष्ण बाष्प प्रक्रिया अथवा उष्णजल प्रक्रिया आवश्यक आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अजेंटिना, मलेशिया या देशांतील निर्यातीसाठी प्राथमिक प्रक्रियेनंतर विकीरण प्रक्रिया बंधनकारक आहे. न्यूझिलंड व जपान या देशांसाठी उष्ण बाष्प प्रक्रिया बंधनकारक आहे. अमेरिका, जपान व द. कोरिया या देशांसाठी निर्यातीपूर्वीची प्रक्रिया संबंधित देशाच्या फायटो अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करणे बंधनकारक आहे. ब्रिटनसाठी निर्यातीकरिता अपेडा प्रमाणित सुविधा केंद्रामध्ये प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

अपेडा, नॅशनल प्लान्ट प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन (एनपीपीओ), डायरेक्टर ऑफ मार्केटिंग ॲण्ड इन्स्पेक्शन व कृषी विभागाचा प्रतिनिधी यांच्या मार्फत तपासणी करून प्राथमिक निर्यात सुविधा केंद्र प्रमाणित केले जाते. तीन मिनिटांची उष्णजल प्रक्रिया व एक तासाची उष्णजल प्रक्रिया सुविधा एनपीपीओ व अपेडामार्फत प्रमाणित केली जाते. सुविधा केंद्र प्रमाणित असल्याशिवाय प्रक्रिया केलेला आंबा महत्त्वाच्या बाजारपेठात निर्यात करता येत नाही. काही वेळा विविध देशांचे प्रतिनिधी आंबा हंगामात सुविधा केंद्रांना भेटी देऊन सुविधा केंद्रांची तपासणी/पाहणी करतात. विकिरण सुविधेकरिता भारत सरकारच्या नॅशनल प्लान्ट प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन (एनपीपीओ), अणुऊर्जा नियामक मंडळ (एईआरबी) व अणुऊर्जा विभाग (डीएई), यांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच अमेरिकेतील आंबा निर्यातीसाठी सुविधा केंद्र यूएसडीए फास मार्फत प्रमाणित करणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियात आंबा निर्यातीसाठी कृषी विभागामार्फत सुविधा प्रमाणित करणे आवश्यक आहे. पारंपरिक बाजारपेठांव्यतिरिक्त, म्हणजेच जपान, न्यूझीलंड यांसारख्या देशांमध्ये राज्यातून कृषीमालाची निर्यात आत्तापर्यंत होत नव्हती. याचे मुख्य कारण म्हणजे जपान व न्यूझीलंड या देशांमध्ये कृषीमालाची निर्यात करायची झाल्यास त्या कृषीमालावर ‘व्हेपर हिट ट्रिटमेंट’ प्रक्रिया करणे बंधनकारक होते. पूर्वी भारतामध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या देशांमध्ये कृषीमालाची निर्यात करण्यास मर्यादा येत होत्या. कृषी पणन मंडळामार्फत अपेडाच्या आर्थिक सहकार्याने जपान येथून व्हीएचटी मशिनची आयात करण्यात आली. या मशिनची उभारणी वाशी येथील भाजीपाला मार्केट आवारामध्ये केलेली आहे. या व्यतिरिक्त कृषी पणन मंडळाने या ठिकाणी प्रीकूलिंग, कोल्ड स्टोअरेज, ग्रेडिंग पॅकिंग लाईन इत्यादी अनुषंगिक अत्याधुनिक सुविधांची उभारणी केली आहे. सद्यस्थितीत आंबा उत्पादक व खासगी निर्यातदारांमार्फत या सुविधांचा पूर्ण क्षमतेने व्यावसायिकरीत्या वापर करण्यात येत आहे. जागतिक स्तरावर मेक्सिको, थायलंड, पाकिस्तान, ब्राझील, नेदरलँड, पेरू हे प्रमुख आंबा निर्यातदार देश आहेत. निर्यातीमध्ये मेक्सिकोचा वाटा १४.१० टक्के, पेरूचा १२.१० टक्के, ब्राझील व थायलंडचा वाटा ११.४० टक्के, नेदरलँडचा वाटा ११ टक्के, तर भारताचा वाटा मात्र ५ टक्के आहे. या बाबीचा विचार करता, निर्यातीला खूप मोठा वाव आहे. कोरोनापूर्व काळात भारतातून होणाऱ्या सुमारे ४९,६५८ मेट्रिक टन आंबा निर्यातीपैकी सुमारे २९,८८४ मेट्रिक टन आंबा महाराष्ट्रातून निर्यात केला जात होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमान भाड्याच्या दरात झालेली वाढ, वाहतुकीवरील निर्बंध, बाजार समित्यांतील कमी आवक यांमुळे निर्यातीला मर्यादा आल्या. शासनामार्फत मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘शेतीमाल निर्यात सनियंत्रण कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला होता. या कक्षात आरटीओ, पोलिस, एनपीपीओ, कस्टम विभागातील अधिकारी कार्यरत होते. या कक्षामार्फत निर्यातीतील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याने काही प्रमाणात निर्यात करणे शक्य झाले.

भारतातून प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती, ब्रिटन, सौदी अरेबिया, कतार, अमेरिका, कुवेत, ओमान या देशांना आंबा निर्यात होतो. भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीतील जास्त वाटा संयुक्त अरब अमिराती व युरोपीय देशांचा आहे. भारतातील हापूस आंबा प्रामुख्याने परदेशामध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांकडून आंबा खरेदी केला जातो. 

भारत सरकारने जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व प्राप्त केले. तसेच जागतिक व्यापार करारामध्ये कृषी क्षेत्राचा समवेश केल्यामुळे आंबा निर्यातीच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. सद्यस्थितीत सुमारे ७० देशांमध्ये आंबा निर्यात केली जाते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिराती, अर्जेंटिना, जपान, द. कोरीया, रशिया, मॉरिशस, न्यूझीलंड व युरोप या बाजारपेठांमध्ये आंबा निर्यातीच्या खूप मोठ्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे निर्यातीसंदर्भात पाच दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम पुण्यातील मुख्यालयामध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित केला जातो. त्यात निर्यातीसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले जाते; तसेच सुविधा केंद्रांना भेटी देऊन सुविधा केद्रांतील सर्व प्रकियांची तपशीलवार माहिती दिली जाते. कृषी पणन मंडळाने निर्माण केलेल्या सुविधा केंद्रांमुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणत्याही देशांना निर्यात करणे शक्य झाले आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, स्वतः निर्यातदार व्हावे व आपली प्रगती करावी.
(लेखक महाराष्ट्र राज्य कृषी पणन 
मंडळ, विभागीय कार्यालय, रत्नागिरी 
येथे सहाय्यक सरव्यवस्थापक आहेत.)
(छायचित्रे सौजन्य ः मिलिंद ग. जोशी )

संबंधित बातम्या