कथा मिलेनियल्सची

मोना शहा
सोमवार, 21 जून 2021

विशेष

‘मिलेनियल्स पॉइज्ड टू लीड’ हे पुस्तक लिहिताना मिलेनियल्स पिढीबद्दल मनात अनेक विचार होते, अभ्यास होता, कारण माझे करिअर या पिढीला घडवण्यात गेले. 

साधारण १९८० ते १९९५च्या दरम्यान जन्मलेली पिढी ही मिलेनियल्स (Millennials) आहे, असे म्हणतात. मी स्वतः जनरेशन एक्स (Generation X) म्हणजे सेंटेनियल्स (Centennials) आणि त्यांच्या आधीची पिढी म्हणजे बेबी बूमर्स (Baby Boomers) यांच्या मधली आहे. म्हणजे माझ्यातील गुण हे दोन्ही पिढ्यांकडून आलेले आहेत; तरी जास्त Gen Xकडे झुकणारी मानसिकता म्हणता येईल. पण मी मिलेनियल्स पिढीतली अनेक मुले, मुली पाहत होते, त्यांचे प्रश्न सोडवत होते, काहींना मार्गदर्शन करत होते. त्या सगळ्या मुलामुलींशी माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्यातील काही गोष्टी मी या पुस्तकात उदाहरणादाखल दिल्या आहेत. 

माझ्या करिअरची सुरुवात कॉर्पोरेटमध्ये झाली असली, तरी मी अनेक ठिकाणी व संस्थांमधून व्यवस्थापन विषयामध्ये व्याख्याने देत होते. कॉर्पोरेट दुनिया सोडून २००० साली मी पूर्णवेळ शिक्षकीपेशाकडे वळले. आता मागे वळून पाहताना कळते की ३० वर्षे मी या क्षेत्रात काम करत आहे आणि अनेक उत्तम असे उच्च शिक्षणातील वेगळे, विशेष अभ्यासक्रम तयार करून ते राबवले आहेत. हे सगळे करत असताना अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी, काही व्यावसायिक आणि कोर्पोरेटमधील लोकांना भेटत होते. त्यांची मानसिकता जाणून घ्यायला वेळ मिळत होता. परंतु पुस्तक लिहिणे हे त्या दरम्यान काही शक्य होत नव्हते. प्राध्यापक, विविध विभागांची प्रमुख ते एका संस्थेची डीन अशा जबाबदाऱ्या सांभाळताना लिखाण करावे लागायचे, पण ते काहीसे रूक्ष, संशोधन पेपर व माझ्या विषयातील अभ्यासक्रमातील पुस्तकी लिखाण एवढ्यापुरतेच मर्यादित होते. या कालावधीत मी हजारो मुलांना शिकवले. त्याच बरोबर माझ्या घरातील दोन्ही मुले आणि कुटुंबातील इतर मिलेनियल्स असे अनेकांना घडवत होते आणि घडताना पाहत होते. 

या पिढीला Millenials असे नाव PEW Research संस्थेने दिले आहे. अमेरिकेमध्येच हे रुजले आणि त्यांच्यावर अधिकाधिक संशोधन सुरू झाले. परंतु जर आपण बारकाईने अभ्यासले तर आशियायी खंडात मिलेनियल्सची लोकसंख्या अधिक आहे. तसेही आपण भारताकडे आशिया खंडातील अधिकाधिक तरुण असलेला, काम करणाऱ्या लोकांचा देश म्हणून पाहत असतो. कुतूहलाची बाब ही आहे की प्रत्येक पिढीचे एक वैशिष्ट्य आहे. या पिढीची जगाने मान्य केलेली काही वैशिष्ट्ये सांगितलीस जातात, ती अशी, 

  • तंत्रज्ञानाचा वापर, तंत्रज्ञान हेच काहीसे खेळण्यासारखेच वापरणे
  • काहीशी आळशी, जराशी स्वार्थी, स्वतःपुरते पाहणारी, सोन्याचा नाही पण चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेली पिढी
  • सर्व जगावर हुकमत आहे अशा भ्रमात असणारी  
  • कामाकडे लक्ष तसे कमीच असणारी 
  • २४/७ जागणारी, मानसिक ताणतणाव, कायम त्रासलेली, ताणाने त्रस्त, मानसिक खच्चीकरण, द्विधा मनःस्थिती अशा अनेक समस्या त्यांच्या पुढे आहेत.
  • नोकरीत कायम स्थित्यंतरे असणारी 

सर्वसाधारपणे या पिढीची अशी काहीशी ख्याती आहे आणि समाज या पिढीकडे उदास नजरेने पाहत आहे. १९८०-१९९५च्या दशकातील पिढीबरोबर काम करताना यातील काही खाणाखुणा जाणवत होत्या, पण त्याच वेळेस अनेकदा विरोधाभासही दिसत होता आणि आश्चर्यही वाटत होते.

या पुस्तकात तुम्हाला हे सर्व वाचायला मिळेल. माझे अनुभव, अभ्यास, काही प्रत्यक्ष मुलांच्या व्यथा, त्यातून त्यांना दिलेले मार्गदर्शन आणि तिथून पुढचे घडलेले एक वेगळे व्यक्तिमत्त्व असा सर्व प्रवास या पुस्तकात वाचायला मिळेल.

जगाचा विचार केला तर मिलेनियल्सची लोकसंख्या आशिया खंडामध्ये सर्वात अधिक आहे. १९८०-१९९५ मधील ही पिढी आता साधारण २५ ते ४० वयोगटातील आहे, जबाबदाऱ्या घेऊन नेटाने पुढे जात आहेत, कमावत आहेत.

 मी इथे दोन पिढ्यांचा एकत्र विचार करते, १९४६-१९६४मध्ये जन्मलेले बेबी बूमर्स आणि १९६४-१९८०मध्ये जन्मलेले जनरेशन एक्स. या सर्व पिढ्यांचा इतिहास दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या नंतरचा आहे. बेबी बूमर्स, जेन एक्स यांनी काय पाहिले तर, सामाजिक मूल्ये बदलताना पाहिली, जगातील शांततेसाठीचा लढा पाहिला, वसाहतवादाचा अंत पहिला, जागतिक गरिबीची वाढ पाहिली, भांडवलशाहीचा उदय पाहिला, तसेच शीतयुद्ध अनुभवले, शिक्षणाच्या क्षेत्रातील वाढ पाहिली, महिलांचे  कार्यक्षेत्र वाढलेले पाहिले, जन्मदर घसरलेला आणि त्यासोबत आर्थिक राहणीमान खूप वाढलेले पाहिले. तसेच या पिढीने पर्यावरण आणि नैसर्गिक स्रोताचा ऱ्हासही पाहिला. काही अंशी ते स्वतः या सगळ्या कर्माला कारणीभूत ठरले. तंत्रज्ञानाचा विकास, जन्मदर अजून कमी झाला होता, छोटे कुटुंब सुखी कुटुंब हा नारा सगळीकडे होता, उत्पादन क्षेत्राकडून सेवा क्षेत्राकडे प्रवास होत होता. 

पॉइज्ड टू लीड का?
मिलेनियल्स पिढीची मानसिकता आधीच्या पिढीपेक्षा काहीशी वेगळी आहे. आज जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे मिलेनियल्सला जागतिक तापमानवाढ आणि अनेक नैसर्गिक संकटांनाही तोंड द्यावे लागत आहे. याही पिढीची काही वैशिष्ट्ये आहेत. अगदी उदाहरण द्यायचे झाले, तर स्वतःच्या उद्दिष्टांसाठी लढणारी, बौद्धिकदृष्ट्या ध्येयाकडे वाटचाल करणारी, सहजतेने सांघिक व्यवस्थेत काम करणारी, स्वतःबद्दल योग्य दिशा असलेली अशी ही पिढी होती. आपण या दोन्ही पिढ्यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर लक्षात येते की या पिढीला अधिक ताणतणाव आहेत. प्रचंड स्पर्धा आहे आणि त्यातसुद्धा जागतिक स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. अपेक्षांचे ओझे आहे; पालकांच्या टोकाच्या अपेक्षा असलेली ही पिढी आहे. 

या पुस्तकात असा सर्व अंगाने या पिढीचा विचार केला आहे. हे लिहिताना छोटे मोठे माझे प्रत्यक्ष काम करतानाचे अनुभव, तसेच गोष्टी, तत्त्वे मांडण्यात आली आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मी फक्त माझ्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे अनुभव नाही, तर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे काही युवक माझ्या संपर्कात आहेत अशा काही युवकांचे अनुभव लिहिले आहेत.

 या नवीन पिढीची तुलना आपण मागील पिढीशी करत असतो. या पिढीबद्दल अनेक मते ऐकायला मिळतात. पण माझे वैयक्तिक मत अतिशय वेगळे आहे. मिलेनियल्स या पिढीच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांची नेतृत्व स्वीकारण्याची तयारी, त्यांची क्षमता, पात्रता वाढवणेही महत्त्वाचे आहे. आपण फक्त मिलेनियल्सचा विचार केला तर प्रत्येक खंड, प्रांत, देश, विदेशातले मिलेनियल्स भिन्न आहेत. कारण त्यांच्या येथील वातावरण, पालकत्व वेगळे आहे. तरीही गोळाबेरीज केली तर जागतिक स्तरावर या पिढीत सारखेपण पाहायला मिळते. ही पिढी निसर्गप्रेमी आहेत, सांघिक दृष्टिकोन बाळगणारी आहे, सद्‍भावना पूर्ण आणि अधिक गुणवत्ता असणारी पिढी आहे. मानवता हा सगळ्यात महत्त्वाचा गुण त्यांच्यामध्ये दिसतो आणि तो मला अधिक भावला, हे या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल.

 मिलेनियल्स खूप मोठी स्वप्न घेऊन जन्माला आलेले आहेत. तुलनेने मिलेनियल्सकडे आर्थिक सुबत्ता पिढीजात आलीच आहे, अर्थात त्याचा उपयोग कसा करायचा हे त्यांच्या हातात आहे. जगण्याच्या अनेक पातळ्यांवर या पिढीला तोलले जात आहे; गर्विष्ठ, कोणतेही उद्दिष्ट नसलेले, वैचारिक पातळीचा अभाव असलेले अशी अनेक विशेषणे लावली जातात. पण मला असे वाटते की या पिढीबरोबर काम करण्याचा आनंद, उत्साह, उमेद या पुस्तकाबरोबर निश्चित कमी होणार किंवा संपणार नाही. मला असे वाटते की मी काही इथेच थांबणार नाही. मी त्यांच्याबरोबर काम करतच राहणार आहे आणि तुम्हीसुद्धा तीच उमेद बाळगून नवीन पिढीबरोबर काम करण्यास तयार असाल. अगदी खरे सांगायचे तर हे जग त्यांना चालवायचे आहे, आपण फारतर मार्गदर्शक किंवा एक टेकू आहोत!

संबंधित बातम्या