युरोपातली सायकल संस्कृती

मृणाल तुळपुळे
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

पूर्वी सायकलींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आता मात्र वाहनांच्या गर्दीतून सायकल चालवणे म्हणजे कसरतच ठरते. पण युरोपमधील अनेक देशात सर्रास सायकली वापरल्या जातात. या सर्वात वरचा नंबर कोपनहेगनचा व त्याच्या खालोखाल अ‍ॅमस्टरडॅमचा लागतो. डेन्मार्कची राजधानी असलेले कोपनहेगन हे आज सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाते. डेन्मार्क व नेदरलँड्स या दोन्ही देशात लोकसंख्येपेक्षा सायकलींची संख्या जास्त असून तिथे सायकल संस्कृती चांगलीच रुजली आहे.

युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने ३ जून हा दिवस जागतिक सायकल दिवस म्हणून जाहीर केला. सायकल दिवस पाळणे ही संकल्पना अगदी नवीन म्हणजे दोन वर्षांपूर्वी सुरू झाली आहे. जगातील सायकल संस्कृती वाढवणे व जास्तीत जास्त लोकांना सायकल वापरण्यास उद्युक्त करून त्यायोगे त्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरूस्त ठेवणे हा सायकल दिवस पाळण्यामागचा मुख्य उद्देश आहे.  

तसे बघितले तर सायकल हे वाहन शेकडो वर्षांपासून वापरात आहे. सायकल चालवणे हे अतिशय सोपे असून त्याचे अनेक फायदे आहेत. सायकलची किंमत इतर वाहनांच्या तुलनेत खूपच कमी असते व ती वापरण्याचा खर्च जवळजवळ नसतोच. इंधन लागत नसल्यामुळे आजच्या प्रदूषणयुक्त वातावरणात सायकलींचा वापर पर्यावरण पूरक ठरतो. सायकल चालवल्यामुळे शरीराला उत्तम व्यायाम होऊन स्नायू बळकट होतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सायकल चालवणे हा एक परिणामकारक उपाय आहे.

अशी ही बहुगुणी सायकल कोणे एके काळी आपल्या पुण्याची ओळख होती. त्या काळात पुणे हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे. त्यावेळी रस्त्यावर बहुतांश वाहने म्हणजे सायकली असत. हळूहळू त्या सायकलींची जागा स्कूटर व मोपेडनी घेतली. आजसुद्धा पुण्याच्या काही भागात लोक सायकली चालवताना दिसतात, मात्र रस्त्यावरची वर्दळ, रिक्षा, मोठ्या गाड्या, बस अशा वाहनांच्या गर्दीतून सायकल चालवणे म्हणजे कसरतच ठरते.

युरोपमधील अनेक देशात सर्रास सायकली वापरल्या जातात. त्यात बर्लिन, प्राग, ब्रसेल्स, बार्सिलोना, डब्लिन, झुरिक या शहरांचा सामावेश आहे; मात्र या सर्वांत वरचा नंबर कोपनहेगनचा व त्याच्या खालोखाल अ‍ॅमस्टरडॅमचा लागतो. डेन्मार्कची राजधानी असलेले कोपनहेगन हे आज सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाते. डेन्मार्क व नेदरलँड्स या दोन्ही देशात लोकसंख्येपेक्षा सायकलींची संख्या जास्त असून तिथे सायकल संस्कृती चांगलीच रुजली आहे. 

डेन्मार्कला जाण्याच्या आधीपासूनच तेथील जगप्रसिद्ध डॅनिश पेस्ट्रीज, उत्तम बियर व सायकल संस्कृती याबद्दल खूप काही ऐकले होते. त्याची प्रचिती कोपनहेगनला पोचल्या-पोचल्याच आली. आम्ही ज्या हॉटेलमध्ये रहात होतो, त्याच्या बाहेर एका स्टँडवर पाच सहा सायकली ठेवल्या होत्या. त्या सायकली हॉटेलमध्ये राहाणाऱ्या लोकांना वापरण्यासाठी ठेवल्या होत्या. ‘When in Rome behave like a roman,’ या उक्तीनुसार कोपनहेगनला येणारे लोक स्थानिक लोकांप्रमाणेच सायकलवरून फिरणे पसंत करत होते असे दिसून आले.

डेन्मार्क हा सायकलवेड्या लोकांचा देश असून सायकल चालवणे हा डॅनिश लोकांच्या जीवनातला एक महत्त्वाचा भाग आहे. हा देश साधारणपणे चारशे बेटांचा समूह आहे. तिथे डोंगरदऱ्या किंवा उंच सखल भाग असा प्रकार नसून बहुतेक भाग सपाट आहे. देशात १२,००० किलोमीटर एवढा सायकल ट्रॅक तयार केल्यामुळे लोक सायकल चालवण्याचा पुरेपूर आनंद उपभोगताना दिसतात. डॅनिश लोक आपल्या तब्येतीविषयी फार जागरूक असतात व आपल्या उत्तम तब्येतीचे श्रेय ते सायकल चालवण्याला देतात. युरोपमध्ये सायकल वापरणे हे सकारात्मक विचाराचे प्रतीक मानले जाते. तेथील लोक सायकल वापरण्यामागे व्यक्ती स्वातंत्र्य, उत्तम प्रकृती व वैयक्तिक ऊर्जा या तीन गोष्टींचे नाते जोडतात.  

डेन्मार्क व नेदरलँड्समध्ये लहान मुलांना बसण्यासाठी पुढे बास्केट लावलेल्या व सामान आणण्यासाठी मागच्या बाजूला मोठी बास्केट लावलेल्या सायकलींना  कार्गो सायकल म्हटले जाते. तिथे सायकलसाठी वेगळी लेन असते व त्यामुळे मोठ्या रस्त्यांवर सायकल चालवणे अगदीच सुरक्षित होते. या दोन्ही देशांत  समाजाच्या सर्व थरातील लोक सायकली वापरतात. प्रत्येक घरात गाडी असली तरी दोन सायकली हमखास असतात व गाडीपेक्षा या सायकलींचाच जास्त वापर केला जातो. ऑफिसला जाणारे लोक, विद्यार्थी, गृहिणी असे सगळेच सायकली वापरतात. सकाळी ऑफिसच्या वेळेला बघितले तर रस्त्यावर गाड्यांपेक्षा सायकलीच जास्त दिसतात. लोक कामाला जाताना सायकल घेउन जाणे पसंत करतात. पेट्रोलचा खर्च नाही, पार्किंगचे पैसे द्यावे लागत नाहीत, पार्किंगचे पैसे द्यावे लागलेच तर गाडीच्या पार्किंगच्या तुलनेत अगदीच नगण्य असतात. शिवाय व्यायाम होतो ते वेगळेच.

डॅनिश लोक फक्त आपल्या गावातच सायकली चालवतात असे नाही, तर ते जवळपासच्या गावी अथवा पिकनिकला जातानादेखील सायकल घेऊन जाणे पसंत करतात. या गावांमध्ये अनेक प्रकारच्या सायकल टूर्सचे आयोजन केलेले आढळून येते. तिथे परदेशी लोकांना सायकल चालवण्यासंबधीची नियमावली दिली जाते. सायकलसाठी असलेल्या लेनमधूनच सायकल चालवावी. जर सायकलसाठी वेगळी लेन नसेल तर ती रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवावी. रहदारीच्या विरूद्ध दिशेने सायकल चालवू नये. पादचारी मार्गावरून अथवा साईडवॉक्स वरून सायकल चालवू नये. रस्ता क्रॉस करताना पादचारी पट्ट्यावरून सायकल घेऊन रस्ता क्रॉस करू नये. हेल्मेट वापरणे सक्तीचे नसले, तरी शक्यतो हेल्मेट घालूनच सायकल चालवावी. आवश्‍यकता असेल तेव्हाच घंटेचा उपयोग करावा. मोबाइल फोनचा वापर करू नये. सायकल लेनमधून एकमेकांच्या शेजारून गप्पा मारत सायकली चालवू नयेत. अशा नियमांचे सर्वांना काटेकोरपणे पालन करावे लागते.

गावात ठिकठिकाणी उत्तम स्थितीतील सायकली ठेवलेल्या असतात. लोक पैसे टाकून त्याचे कुलूप काढतात व सायकल घेऊन जातात. देशातील नियमानुसार त्या सायकलींना घंटा, पुढच्या बाजूला दिसेल असा पांढरा रिफ्लेक्टर आणि मागच्या बाजूला लाल रिफ्लेक्टर लावलेला असतो. याशिवाय पायडल आणि चाकावर पिवळे रिफ्लेक्टर लावलेले असतात. रात्रीच्यावेळी अंधारात सायकलला पुढच्या बाजूला पांढरा प्रकाश पडणारा दिवा आणि आणि मागच्या बाजूला लाल दिवा असतो.  

सायकल चालवण्याच्या सर्व नियमांचे पालन करून आज डेन्मार्कमध्ये लाखो लोक रोज सायकल वापरताना दिसतात. काही वर्षांपूर्वी केलेल्या पाहणीनुसार डेन्मार्क हा जगातील सर्वांत जास्त सायकली वापरणारा देश मानला जातो, तर नेदरलँड्‍स हा सायकलची राजधानी म्हणून ओळखला जातो.

सध्या स्मार्ट सिटी योजनेद्वारे पुणेकरांना सायकली वापरण्यास उद्युक्त केले जात आहे. त्यायोगे वेगवेगळ्या ठिकाणी सायकल ट्रॅक उभारणे, पब्लिक सायकली ठेवणे असे उपक्रम सुरू केले, पण त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ही योजना फारशी यशस्वी झाली नसली, तरी लोकांमध्ये व्यायाम म्हणून सायकल वापरण्याचे प्रमाण मात्र नक्कीच वाढले आहे. सलमान खान व हृतिक रोशन हे दोघे आपल्या व्यायामाचा एक भाग म्हणून रोज सायकल चालवतात व लोक अशा सेलेब्रिटींचे अनुकरण करतात. आज सायकलप्रेमींचे अनेक गट आहेत व ते सायकलवरून लांबलांबचे प्रवास करताना दिसून येत आहेत. या  सर्वांमुळेच पुण्याला ‘सायकलींची शहर’ हे बिरूद परत मिळावे असे नक्कीच वाटते.

संबंधित बातम्या