इंडोनेशियातील गणपती

मृणाल तुळपुळे
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

विशेष

भारतातील असंख्य देवदेवतांपैकी परदेशात पोहोचलेल्या देवांमध्ये गणपती खूप वरच्या स्थानावर आहे. आग्नेय आशियायी देशात म्हणजे थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया येथे अनेक गणेश मंदिरे व मूर्ती असल्यामुळे श्रीगणपतीला खऱ्या अर्थाने ‘आंतरराष्ट्रीय देव’ म्हणायला हवे. 

इतिहासातील दाखल्यांनुसार इंडोनेशिया काही काळ हिंदू राजवटीखाली होता व त्या काळात तेथील अनेक भागात देवदेवतांची देवळे बांधली गेली. त्यापैकी सुस्थितीत जतन करून ठेवलेल्या अनेक भव्य आणि ऐतिहासिक मंदिरांची आज जगातील प्राचीन मंदिरांमध्ये गणना केली जाते. त्यात गणपतीची स्वतंत्र मंदिरे आहेत. तसेच बहुतेक सर्व शिव मंदिरांमध्येदेखील गणपतीच्या विविध रूपातील मूर्ती बघायला मिळतात. त्यात गणपतीच्या हातांच्या व अस्त्रांच्या संख्येत, तसेच सोंडेमध्ये विविधता दिसून येते. हे गणपती अलंकाराने सुशोभित केलेले असून बहुतेक गणपतींच्या सोंडेवर ओम किंवा कमळ  असते.

जावा बेटावरील वाडा येथे अकराव्या शतकातील कमळात बसलेल्या गणपतीची मूर्ती मिळाली आहे. इंडोनेशियामध्ये इतर ठिकाणीदेखील गणपतीच्या आसनस्थ मूर्ती मिळाल्या असून त्यापैकी खिचिड येथे मिळालेली मूर्ती सर्वात सुंदर आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून तीन हातात अक्षसूत्र, विषाण व मोदकभांडे आहे, तर चौथा हात अस्पष्ट आहे. सांबीसारी येथील देवळामधील नवव्या शतकातील गणेशमूर्ती विशेष मानली जाते. कारण ते देऊळ पाच मीटर जमिनीखाली होते. उत्खनन करून देऊळ व त्यातील मूर्ती बाहेर काढल्या गेल्या. बारा येथील देवळातील गणेशमूर्ती तीन मीटर उंचीची असून अतिशय आखीव रेखीव अशी आहे. बालीमधील एका देवळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन गणेश मूर्ती होत्या व त्या मूर्ती देवळाचे रक्षण करण्यासाठी बसवल्या असतील असे म्हटले जाते.

आजही जाकार्ता, जावा, बाली, बांडुंग या ठिकाणी भारतीय संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. तेथे गणपतीच्या तसेच महाभारत व रामायणातील कथा घरोघरी सांगितल्या जातात व त्यावर आधारित लीला व नाटकांचे आयोजनदेखील केले जाते. या देशातील चित्रकला व शिल्पकलेमध्ये रामायण, महाभारत व गणपती हे महत्त्वपूर्ण व लोकप्रिय विषय असून तेथील अनेक देवळांच्या भिंतींवर गणपतीची विविध रूपातील चित्रे रंगवलेली दिसून येतात. 

इंडोनेशियाची राजधानी जाकार्तामधील राष्ट्रीय संग्रहालय बघायला गेलो असताना बाहेर हत्तीचे एक सुंदर शिल्प बघितले. त्या शिल्पावरून त्याला ‘गजा म्युझियम’ म्हटले जाते. इंडोनेशियात गणपतीलादेखील गजा असेच संबोधले जाते. या संग्रहालयात बॅनोन येथील देवळात मिळालेली आठव्या शतकातील गणेशाची मूर्ती बघायला मिळाली. देशातील इतर संग्रहालयांतदेखील गणपतीच्या विविध मूर्ती ठेवल्या असून त्यातील बहुतेक मूर्ती शेकडो वर्षे जुन्या आहेत. 

जाकार्तानंतर बांडुंगला गेलो असता, तेथेदेखील गणपतीचे नाव जिथे तिथे ऐकायला मिळाले. इंडोनेशियात गणपतीला ज्ञान, कला आणि विज्ञान यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच की काय देशातील अतिशय प्रसिद्ध अशा बांडुंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा लोगो म्हणजेसुद्धा गणपतीचे चित्र आहे. या इन्स्टिट्यूटचा पत्तादेखील ‘१० गणेशा रोड, बांडुंग वेस्ट’ असा आहे. गणेशा रोडव्यतिरिक्त बांडुंग व जाकार्तामध्ये विविध दुकानांना, बँकेला, कंपन्यांना गणपतीचे नाव दिलेले आढळते.

देवांची बेटे म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या बाली बेटावर तर बहुतेक पवित्र ठिकाणे, मंदिरे, शाळा, सरकारी कार्यालये, बँका अशा ठिकाणी गणपतीची मूर्ती विराजमान झालेली दिसून येते. इतकेच काय तर हॉटेल, सार्वजनिक बागा, बाजारात, तसेच चौकांमध्ये गणपतीची शिल्पे दिसून येतात. त्यामध्ये  कमळात बसलेला, नृत्य करणारा, आठ हातांचा, हातात मोदकाचे भांडे घेतलेला, चार हात असलेला व त्या हातात कुऱ्‍हाड, अंकुश, सर्प तसेच धनुष्यबाण घेतलेल्या गणपतीच्या मूर्ती बघण्यात आल्या. आपल्याकडील परंपरेनुसार गणपतीचे स्थान ऐश्‍वर्य, समृद्धी व संपत्तीची देवता लक्ष्मीशेजारी असते; पण बालीमधील काही गणपती विद्या, संगीत आणि कलेची देवता मानल्या जाणाऱ्‍या सरस्वतीशेजारी  विराजमान झालेले दिसतात. 

या बेटांवरील एक प्रथा म्हणजे, तेथील बहुतेक घरांच्या प्रवेशद्वाराजवळ गणेशाची मूर्ती बसवलेली असते. त्या गणेशाचे मुख घरात प्रवेश करणाऱ्‍या पाहुण्यांकडे असते व त्याचा एक हात आशीर्वाद देत असतो. गणपतीचे आशीर्वाद अतिशय लाभदायक असतात असे इंडोनेशियात मानले जाते. गणेश हा विघ्नहर्ता असल्यामुळे तो घरावर येणाऱ्‍या विघ्नांचे निवारण करतो व दुष्टशक्तीपासून घरातील लोकांचे रक्षण करतो, ही त्यामागची भावना असते. या गणपतीने पांढऱ्या व सोनेरी रंगाचे सोराँग परिधान केलेले असते.

ऐकून आश्‍चर्य वाटेल, पण इंडोनेशियाच्या चलनातील वीस हजार ‘रुपिया’च्या नोटेवर गणपतीचे चित्र छापलेले आहे. नोटेच्या पुढील बाजूस गणपती व शेजारी देशाचे पहिले शिक्षणमंत्री हजर देवांत्रा यांचा फोटो आहे, तर मागील बाजूस विद्यार्थी व शिक्षक यांचा एकत्र फोटो आहे. काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था अतिशय बिकट होती व त्यावेळी वीस हजार रुपियाची नोट बाजारात आणली. त्या नोटेवर छापलेल्या गणपतीमुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारली अशी तेथील लोकांची धारणा आहे.

अशीच अजून एक आश्‍चर्य वाटण्याजोगी गोष्ट म्हणजे माउंट ब्रोमोवर असलेले गणपतीचे देऊळ. इंडोनेशियात अनेक ज्वालामुखी असून माउंट ब्रोमो हा त्यापैकी एक आहे. त्याच्या पायथ्याशी सुमारे तीस गावे आहेत व त्या गावातील लोकांच्या मते ते देऊळ आणि त्यातील गणपतीची मूर्ती सुमारे ७०० वर्षे तेथे आहे. हा ज्वालामुखी सक्रिय असल्यामुळे आजूबाजूचा परिसर धोकादायक झाला आहे. तेथे जाण्यास मनाई असूनसुद्धा स्थानिक लोक नेमाने त्या देवळात गणपतीची पूजा करण्यासाठी जातात. ज्वालामुखीच्या इतके जवळ राहूनसुद्धा त्या गणपतीमुळेच आज ते सुरक्षित आहेत, अशी त्यांची श्रद्धा आहे. या देवळाचे विशेष म्हणजे त्यात मुख्य गणपतीच्या जोडीने अनेक लहान मोठ्या गणेशमूर्ती  असून त्या ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून घडल्या आहेत. 

अशा या इंडोनेशियात गेली अनेक वर्षे ‘इंडिया व आशिया’ यांचा सुरेख संगम बघायला मिळतो व त्यावरून या देशाचे नाव इंडोनेशिया असे पडले आहे. तेथील संस्कृतीला खरा आकार मिळाला तो तेथे  असलेल्या देवदेवतांच्या मंदिरांमुळे व त्यामुळेच आजही तिथे गणपतीचे माहात्म्य टिकून आहे.

 

संबंधित बातम्या