डोळ्यांचे पारणे फेडणारा ‘दुबई एक्स्पो’

मृणाल तुळपुळे
सोमवार, 6 डिसेंबर 2021

विशेष

नवीन उद्योग, तंत्रज्ञानातील संधी याबरोबर विविध देशांच्या संस्कृती, कला एकाच जागी अनुभवायला मिळतात. सर्जनशीलता, नवनिर्मिती, विविध संस्कृतींची ओळख आणि एकमेकांच्या साहाय्याने नवीन आव्हाने पेलून भविष्य घडवणे ही दुबई एक्स्पोची उद्दिष्टे आहेत. 

‘एक्स्पो २०२० दुबई’ या भव्य आणि शानदार प्रदर्शनाला भेट देणे म्हणजे एक स्वप्नवत अनुभव आहे. खरेतर हा एक्स्पो गेल्या वर्षी होणार होता, पण कोविडमुळे तो पुढे ढकलावा लागला. १७३ दिवस चालणारा दुबई एक्स्पो ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२२ या काळात होत असले तरी त्याला ‘एक्स्पो २०२०’ असेच म्हटले जाते. मध्यपूर्व देश, दक्षिण आशियायी देश आणि आफ्रिका खंड या भागात प्रथमच हा एक्स्पो होत असून त्याचे यजमानपद भूषविण्याचा मान दुबईला मिळाला आहे.

हा एक्स्पो जागतिक स्तरावर भरविले जाते. याआधीचा म्हणजे २०१७चा एक्स्पो कझाकिस्तानातील ‘अस्ताना’ येथे भरला होता व पुढचा २०२३चा एक्स्पो अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्स येथे व २०२५चा एक्स्पो जपानमधील ओसाका येथे होणार आहे. जगात घडणाऱ्या चांगल्या बदलांची लोकांना माहिती करून देणे, जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना सर्व क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हा अशा प्रकारची प्रदर्शने भरवण्यामागचा उद्देश असतो. 

एक्स्पोचे यजमानपद मिळविण्याची प्रक्रिया सात-आठ वर्षे आधीच सुरू होते. २०२० या वर्षीचे यजमानपद मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या अनेक देशांनी १६४ देश सभासद असलेल्या असेंब्लीपुढे आपला प्रस्ताव मांडला होता. त्यावर मतदान होऊन ११६ देशांनी दुबईला आपले मत दिले. त्यानुसरा २७ नोव्हेंबर २०१३ला दुबईची २०२०च्या एक्स्पोच्या यजमानपदासाठी निवड झाली आहे, असे जाहीर करण्यात आले. या आनंदाप्रित्यर्थ त्या दिवशी दुबईमध्ये असलेल्या जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर आतषबाजी करण्यात आली होती. 

एक्स्पोच्या परंपरेनुसार प्रत्येक एक्स्पोसाठी एक बोधवाक्य ठरवले जाते. त्याप्रमाणे दुबई एक्स्पोसाठी ‘Connecting Minds and Creating Future’ - मने जुळवा आणि भविष्य घडवा हे बोधवाक्य पक्के केले गेले. त्याच्या जोडीला लोकांना प्रेरणा देण्यासाठी दुबई एक्स्पोने ‘Sustainability, Mobility and Opportunity’ (शाश्वतता, गतिशीलता आणि संधी) हे तीन बोधशब्द ठरवले. ते बोधवाक्य आणि बोधशब्द डोळ्यासमोर ठेवून दुबई कामाला लागली आणि गेली सहा सात वर्षे अथक परिश्रम घेऊन त्याला साजेसे असे आज उभे असलेले वैशिष्ठ्यपूर्ण  आणि दिमाखदार ‘दुबई एक्स्पो’ साकारले. 

बोधवाक्याप्रमाणेच प्रत्येक एक्स्पोचा एक मॅस्कॉट म्हणजे शुभंकर असतो. दुबई एक्स्पोमध्ये तब्बल सहा मॅस्कॉट आहेत. त्यापैकी एक आहे ‘सलामा’ नावाचे गाफचे झाड. हे झाड वाळवंटातील टोकाच्या हवामानातदेखील कायम हिरवेगार राहते. त्याला अमिराती संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुसरे दोन मॅस्कॉट म्हणजे ‘लतिफा’ आणि ‘रशीद’ हे आठ आणि नऊ वर्षांचे अमिराती बहीण भाऊ, आणि उरलेले तीन म्हणजे ‘ऑप्टी’, ‘अलूफ’ आणि ‘टेरा’ नावाचे तीन रोबोट. यातले काही रोबोट एक्स्पोच्या परेडमध्ये भाग घेतात व आलेल्या लोकांशी संवाद साधून त्यांना सर्व प्रकारची मदत करतात. ते त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देतात, त्यांना विनोद सांगतात आणि त्यांच्याबरोबर नाचतातदेखील. काही रोबोट तुम्हाला खाण्याचे पदार्थ मागवण्यासाठी मदत करतात, तर काही एक्स्पोच्या सुरक्षिततेसाठी मुख्य वॉकवेवर गस्त घालत असतात. चेहऱ्‍याची ओळख आणि थर्मल कॅमेऱ्‍याच्या साहाय्याने ते एक्स्पो आणि तेथील मेट्रो स्टेशनची सुरक्षा व्यवस्थापन करतात. तिथे आलेले लोक सोशल डिस्टन्सिंग पाळतात का, याकडेदेखील त्यांचे लक्ष असते. दुबई एक्स्पोमध्ये नावीन्यपूर्ण कल्पना आणि अद्ययावत तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम बघायला मिळतो आणि हे रोबोट म्हणजे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

दुबईतील सर्वच गोष्टी शानदार आणि भव्यदिव्य असतात, मग एक्स्पो तरी त्याला अपवाद असून कसे चालेल. आजपर्यंत जगभरातील सुमारे एकवीस देशांत शंभरपेक्षा जास्त एक्स्पो भरवली गेली आहेत आणि त्यातले अनेक विक्रम दुबई एक्स्पोने मोडले आहेत. इटलीमधील मिलान येथे झालेल्या एक्स्पोमध्ये सर्वात जास्त म्हणजे १३९ देशांचा सहभाग होता. दुबई एक्स्पोमध्ये १९२ देश सहभागी होऊन तो विक्रम मोडला गेला.

सर्जनशीलता, नवनिर्मिती, विविध संस्कृतींची ओळख आणि एकमेकांच्या साहाय्याने नवीन आव्हाने पेलून भविष्य घडवणे ही दुबई एक्स्पोची उद्दिष्टे आहेत. जागतिक एक्स्पोच्या इतिहासात दुबई एक्स्पोने स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमटवला आहे. याची प्रचिती प्रवेशद्वाराची कार्बन फायबर टेक्निक वापरून उभारलेली एकवीस मीटर उंच कमान बघितल्यावरच येते. प्रदर्शनाच्या मध्यवर्ती भागात ‘अल वासल’ नावाचा प्लाझा आहे. ‘अल वासल’ हे दुबईचे ऐतिहासिक नाव असून अरेबिक भाषेत त्याचा अर्थ ‘जोडणे’ किंवा ‘नाते’ असा होतो. या प्लाझाची रचना दुबई एक्स्पोच्या लोगोसारखी केली आहे. अल वासलच्या तीन बाजूला Sustainability, Mobility आणि Opportunity हे तीन विभाग  आहेत. या विभागांत अनेक देशांची पॅव्हेलियन आहेत. तेथे त्या त्या देशातील संस्कृती, त्या देशाचे वैशिष्ट्य, तेथील कला आणि विकास याचे दर्शन घडते. त्या देशाची अर्थव्यवस्था, उद्योग,  तंत्रज्ञान व कला यांची वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म व व्याख्यानाद्वारे माहिती करून दिली जाते. त्यात प्रामुख्याने नवीन तंत्रज्ञान, उद्योगधंद्यातील संधी, गुंतवणूक आणि वेगवेगळ्या विषयांवरील परिसंवाद यांचा समावेश असतो. 

दुबई एक्स्पोमध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक देशाचे स्वतःचे असे वेगळे पॅव्हेलियन असणे हे आत्तापर्यंत झालेल्या एक्स्पोंमध्ये प्रथमच घडले आहे. यापैकी यूएई, बहारीन, ब्राझील, चीन या देशांची पॅव्हेलियन आणि तिथले कार्यक्रम अगदी बघण्याजोगे आहेत. त्याशिवाय अराऊंड दी वर्ल्ड, वूमेन्स पॅव्हेलियन, व्हिजन पॅव्हेलियन आणि मिशन पॅव्हेलियन ही दुबई एक्स्पोमधील काही खास पॅव्हेलियन्स आहेत.

दुबई एक्स्पोचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ‘एक्स्पो पासपोर्ट.’ हा पासपोर्ट म्हणजे पिवळ्या रंगाची पुस्तिका असून त्यावर दुबई एक्स्पोचा लोगो आहे. आत तुमचा फोटो आणि वैयक्तिक माहिती लिहायला जागा आणि प्रत्येक पानावर वॉटरमार्क इमेजेस आहेत. तुम्ही ज्या ज्या देशाच्या पॅव्हेलियनला भेट द्याल, त्या देशाचा शिक्का तुमच्या पासपोर्टवर मारला जातो.

एक्स्पोमधील चार मजली ‘इंडिया पॅव्हेलियन’ अगदी आगळे वेगळे आहे. त्याच्या बाहेरील भागात ६०० हलणारी पॅनेल्स आहेत. या पॅव्हेलियनमध्ये आयुर्वेद, योग, स्पेस प्रोग्रॅम, वस्त्रोद्योग, देशाची औद्योगिक प्रगती, नृत्य, कला आणि विविध प्रांतातील पोशाख यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व प्रदर्शनाद्वारे यथार्थ दर्शन घडवले आहे. एका मजल्यावर ताजमहाल, राम मंदिर, कोणार्क येथील सूर्यमंदिर यांच्या प्रतिकृती ठेवल्या असून त्याची माहिती विस्तृतपणे दिली आहे. नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने या पॅव्हेलियनमध्ये रोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. त्यामध्ये नृत्य, संगीत व लोककथा यांचा समावेश होता. दिवाळीच्यावेळी रांगोळ्या आणि पणत्यांची रोषणाई केली गेली. हे सगळे अनुभवण्यासाठी तिथे लोकांची रीघ लागली होती. पहिल्या महिन्यातच जगभरातील दोन लाख लोकांनी या पॅव्हेलियनला भेट दिली आणि इंडिया पॅव्हेलियनला ‘क्राउड पुलर’ ही उपाधी मिळाली. 

अशा या दुबई एक्स्पोला भेट देणे सोयीचे व्हावे म्हणून त्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नवीन मेट्रो स्टेशन उभारले गेले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे एक्स्पोचे तिकीट असल्यास मेट्रोने तिथपर्यंत विनाशुल्क प्रवास करता येतो. अठरा वर्षांखालच्या मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश शुल्क आकारले जात नाही. या सगळ्याच्या जोडीने एक्स्पोमध्ये खाण्यापिण्याची चंगळ आहे. तुम्ही म्हणाल त्या देशातील म्हणाल तो पदार्थ तिथे उभारलेल्या दोनशे रेस्टॉरंट्समध्ये आणि बाहेरील स्टॉलवर मिळतो.  दुबई एक्स्पोमध्ये रोज वेगवेगळ्या देशांचे साठ शो होतात. ते ऑडिओ व्हिज्युअल शो आणि सांस्कृतिक कार्यक्रम बघून अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटले. रात्रीच्या वेळची सजावट आणि रोषणाई बघितल्यावर एक्स्पोचे वर्णन करायला ‘अप्रतिम’ हा शब्द अपुरा आहे, असे अगदी प्रकर्षाने जाणवले!

संबंधित बातम्या