एक स्वयंपूर्ण प्रवास

निती मेंहेंदळे
सोमवार, 18 एप्रिल 2022

विशेष

सावित्रीची ओळख झाली तेव्हा पहिला अनोळखी डोंगराळ कोकणप्रवास करत होते. आंबेतहून बाणकोटला जायचं होतं. वाटेत कमी लोकवस्तीचे प्रदेश. शेनाळेची घाटवाट अरुंद नि खडकाळ. एकंदर परिसर आव्हानात्मक होता. पण घाट सुरू होताना एक लांबलचक पूल पार केलेला लक्षात आहे. सावित्री नदीवरचा. तिचं आश्वासक पात्र घाटातल्या वळणवाटांवर  तितकंच सहज वळत होतं. डुईवर रणाणतं ऊन, धुळीतला प्रवास करून शिणलेली शरीरं, गुगल नसलेल्या काळात हातात एक नकाशा अशा चित्रात मी कुठेतरी मार्ग शोधत होते. त्यात तिची तेवढी सोबत वाटली होती.

महाबळेश्वरच्या ऑर्थर सीट जवळ उभं राहिलं की तिथल्या बऱ्यापैकी उंच टप्प्यात उभं असल्याचा आनंद होतो. इथून थोडं दक्षिण धरून चालत राहायचं. रस्त्यात सावित्री पॉइंटपाशी जरा थांबायचं. इथून तशी बरीच लांब असली तरी सावित्रीची उगमाची धार दृष्टिपथात येते हे अतिशय सुखावह दृश्य आहे. सावित्रीचा प्रवास असा देखणा सुरू होतो. जुन्या महाबळेश्वरात पंचगंगा मंदिर आहे. महाबळेश्वर डोंगर रांगेतून उगम झालेल्या पाच महत्त्वाच्या नद्यांची प्रतीकात्मक मुखं तिथं दाखवली आहेत. त्यातली एक सावित्री. तिचा खरा उगम मात्र तिथं,सावित्री पॉइंट समोर. या पॉइंटवर पश्चिमेकडे सन्मुख राहिलं की डोंगरात लपलेलं तिचं जन्मस्थान आहे. या पाचही नद्या जन्म झाल्या तशा उसळून खळखळत आपापल्या मार्गांनी प्रवाहशील झाल्या. सावित्री ही पण त्यांमधलीच एक सह्यनगकन्या. कृष्णा,  कोयना,  वेण्णा,  गायत्री या तिच्या बहिणी. इतर बहिणी एकमेकींना भेटत राहिल्या कुठे ना कुठे. पण ही मात्र स्वतंत्र वाटचाल करत राहिली ती थेट बाणकोट- हरिहरेश्वरपर्यंत. सह्याद्रीचं भक्कम माहेर सोडून ती कोकणाच्या ओढीनं वाहते आहे; युगानुयुगं, शतकानुशतकं. केवळ लोभस दृश्य बनून न रेंगाळता महाबळेश्वरचा डोंगर उतरून ती पायथा गाठते ना तेव्हा एका खळाळत्या पोरवयाच्या अल्लड धारेचं जाणत्यासुरत्या स्त्रीनदीत कधी स्थित्यंतर होतं, ते अप्रूपच आहे. बघताबघता आपलं पात्र रुंदावण्याकडे तिचं काटेकोर लक्ष असतं. पोलादपूर गाठलं की एक स्वाभाविक वळण घेऊन ती ज्या पवित्र्यात महाडकडे चालू लागते ते केवळ अपूर्व आहे.

सावित्रीला येऊन मिळणाऱ्या नद्याही स्वतःची ओळख बाळगून असलेल्या. लहानखुऱ्या पण महत्त्व मिळालेल्या. एक गांधारी नदी आहे. छत्रपती  शिवरायांच्या रायगडाच्या अगदी जवळ जाऊन इतिहास पाहून आलेली.  दुसरी ढवळी नदी. प्रतापगडाजवळ जावळीच्या खोऱ्यात लपलेल्या किल्ल्यांपैकी चंद्रगड म्हणजेच ढवळगड खालून वाहणारी ही शिवकालीन महत्त्व प्राप्त झालेली.  तिसरी काळ नदी. रायगड दुर्गाची एक बाजू पाचाडची, दुसरी काळ नदीची. लिंगाण्यामागच्या डोंगरातून उद्‌्‍भवलेली निसणीच्या वाटेजवळून अवघड कडे हसतहसत उतरणारी नावाला साजेशी धडकी भरेल अशा प्रवाहाची नदी. या तिघींचे स्वभाव सामावून घेणारी सावित्री खरंच समन्वय साधण्याची कला अवगत असणारी सोशिक नदी असावी बहुतेक.

या नदीची वळणंही विलक्षण मोहक आहेत. घागरकोंड, चाळीचा कोंड अशा काही ठिकाणी दीर्घ वेलांट्या, उकार मनोवेधक आहेत. नदी कधीकधी अनपेक्षित वळण घेते आणि तिचा मार्गच बदलून टाकते. तिच्या या वळणवाटा मुद्दाम ठरवून घेतल्यासारख्या वाटतात,पूर्वनियोजित जशा काही. पण हे नदीचं वळणं कधीच मानवनिर्मित नसतं. तिच्या अचानक वळण घेण्यामाग भूस्तरामधील हालचाली, खडकांची प्रतिक्रिया, पर्यावरणातल्या घटकांमुळे खडकांची झीज होणं, आणि पाण्याचा प्रवाह, या चार सबळ कारणांपैकी एक नक्कीच असतं. तिच्या वळणांमध्ये काही डोह निर्माण झालेले असतात तर कधी रांजणकुंडांसारखे अद्‌भुत प्रकार बघायला मिळतात. तर कधीतरी तिच्या काठचा खडकाचा, केक कापावा तसा, एकावर एक असा अख्खा जुन्या नव्या थरांचा पुरातत्वीय पुरावा हाती लागतो. सावित्री आणि तिच्या काळ सारख्या उपनद्यांच्या वळणांवर असं खडकांचं आंतरिक सौंदर्य बरेचदा पाहायला मिळतं. काळ नदीच्या पात्रात वळणकोंडाजवळ अशी थरांची लगड बघायला मिळते.

सावित्रीच्या काठाशी आजही बऱ्यापैकी भक्कम अवस्थेत असलेल्या गडकोटांचं अस्तित्व तिची ऐतिहासिक खूण अधिक गडद करतं. चांभारखिंडीतला चांभारगड ऊर्फ महेंद्रगड, आंबेतजवळचा दासगावचा किल्ला,  टोकाचा बाणकोटचा किल्ला,  रायगडाच्या रस्त्यावरचा पहारेकरी किल्ला सोनगड,  ढवळी नदीकाठचा चंद्रगड /ढवळगड,  असे तिच्या आसपासचे गड तिला इतिहासात नेऊन ठेवतात.

सावित्रीच्या तीरावर वसलेलं महाड. महाड म्हणजे ''महा हाट'' अर्थात् मोठी बाजारपेठ अशी एक शब्द व्युत्पत्ती केली गेली आहे.  इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून यादव राजवटीपर्यंत महाड हे प्राचीन समृद्ध बंदर होतं, अशी ऐतिहासिक नोंद मिळते. पण कालांतरान सावित्री नदीने आपला मार्ग बदलला आणि मग महाड बंदरही इतिहासजमा झालं.

रायगड जिल्ह्याच्या प्रमुख नद्यांमध्ये सावित्रीचा अग्रक्रम लागत असे तो तिच्यातून असलेल्या या वाहतूक व व्यापारामुळे असावा. समुद्री बंदर बाणकोटपासून आंबेतमार्गे महाड, पोलादपूर असा जलवाहतुकीसाठी तिचा वापर केला जात असावा. यथावकाश अनेक नगरंही तिच्या काठी वसवली गेली असावीत.

महाड शहरापाशी सावित्री अशीच स्वतःची एक विशिष्ट संस्कृती बांधून घेत असावी. इथे तिचं स्वत्व एक निराळंच रूप धारण करतं. तिचा हा एक खास उल्लेखनीय आवेश. महाडपाशी सावित्री प्रमुख घटक असल्यासारखी जाणवते ती उगाच नव्हे. राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूला गांधारपालेची इसवी सन १५० ते ३१०मध्ये कधीतरी कोरून काढलेली दुमजली बौद्ध लेणी आणि दुसऱ्या बाजूला कोळची इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शतकातली सातवाहन कालीन गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळातली आणखी साताठ लेणी. या लेण्यांमधले शिलालेख बौद्ध धर्माच्या प्रसाराचा इतिहास सांगत प्राचीनत्वाचे पुरावे देतच आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या समतेसाठीच्या सत्याग्रहाने इतिहासात अजरामर स्थान मिळवलेलं चवदार तळंही सावित्रीकाठच्या या महाडचे भूषण.

महाडजवळ सावित्रीची अजून एक ओळख म्हणजे सव नावाचे नैसर्गिक उष्ण पाण्याचे झरे. त्या कुंडांना डावीकडे ठेवत तिचं एव्हाना विस्तीर्ण झालेलं पात्र आंबेतनंतर पुन्हा एक ओढाळ वळण घेते ते निराळ्याच कारणासाठी. ओढाळ अशासाठी म्हणायचं की नदीला सागराची ओढ असतेच आणि सावित्रीची ती ओढ जाणवते अगदी पार बाणकोटपर्यंत. इथून पुढे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांची नैसर्गिक विभागणी करणारी सावित्री जलसमाधी घेते ती बाणकोटजवळ.

एका बाजूस बाणकोटचा भक्कम किल्ला आणि दुसऱ्या हाताला हरिहरेश्वरसारखं तीर्थक्षेत्र ही सावित्रीची कृतार्थ सांगता. हरिहरेश्वराचं क्षेत्र वेढलं आहे आहे ते तीन डोंगरांनी,  हरिहरेश्वर,  हर्षिनाचल आणि पुष्पाद्री. स्वयंभू शंकराच्या मंदिराजवळ असलेलं  कालभैरवाचं मंदिर हे अनेक घराण्यांचं कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वराची दीर्घ प्रदक्षिणेला राकट उंच डोंगर,  समुद्राकडे जाणाऱ्या खोल पायऱ्या,  खाली असलेल्या कातळातल्या गुहा,  तीन बाजूंनी वेढणारा समुद्र अशा बाबींनी आपोआपच नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे.

सावित्री एक स्वयंपूर्ण नदी आहे. पण तिलाही पूर येतात,  तिचे मानवनिर्मित पूल वाहून जातात,  पण त्याचा दोष नदीवर येत नाही. नदीचं काम असतं वाहणं आणि वाहता वाहता तिच्या काठी एक संस्कृती रुजवणं,  जोपासणं,  आपली जैवविविधता सांभाळणं,  दगडगोट्यांपासून,  सजीव साकारावर भवतालच्या पर्यावरणावर आपला ठसा उमटवणं आणि ती ते अव्याहत करत असतेच.   

सावित्रीचं असं आहे सगळं. ही कविता तिलाच वाहिली आहे.

कधी काही न बोलता
गुपचूप प्रवाही पण
     एक नदी असते मात्र..
तिच्या खोल पात्राची
नसलेली खळखळ
     असतं तिचं गुणसूत्र..

कधी कुठे ती असते
नैसर्गिक विश्रांतत
    डोह डुह कालवत..
नांदलेल्या भरलेल्या
संपन्न साम्राज्यात
   डुंबत असते हरवत ..
 ओसाड लेणी ओवत
इतिहास गोळा करत
बंदिस्त करत राहते..
उन्हवरी गरम गंधकाचं
ऊन ऊन सचैल
सान्निध्य घेत वाहते..

तिचे पूल सोडतात धीर
तिथे बुडतं खोलवर
तिच्यातच तिचं अस्तित्व
पूर गिळतात तिचे काठ
 उरते दुःखाची गाभणकळा
आणि विस्कळीत स्वत्व..
पण...
तरीही.. तरीही बाकी
शून्य असून
स्वत:चा भाग द्यायला
तीच मागे उरते
आपल्यातला
उसना हातचा घेत
ती सज्ज असते..

माणसाची तुटली  
चित्रं  जोडायला  
   तीच  
सौख्याचा उतारा असते ..

संबंधित बातम्या