फोन, कॅमेरे सांभाळा!

निनाद परुळेकर
सोमवार, 25 जुलै 2022

विशेष

पावसाच्या अविरत वर्षावाने हवा दमट व्हायला सुरुवात झालेली आहे अन् हीच ती वेळ, जेव्हा आपण आपले मोबाईल फोन, कॅमेरे, लेन्स (भिंगे), कॉम्प्युटर, विविध डिजिटल उपकरणे, गॅस लायटर, काडेपेट्या (माचिस) इत्यादी गोष्टींना ओलसर हवेमुळे होणाऱ्या त्रासापासून सांभाळले पाहिजे.

पावसाळ्यामुळे हवा दमट/ओलसर झाली आहे हे आपल्याला समजते. याचे पुरावे आपल्याला घरात घरमाश्यांचा वाढलेला वावर, बरणीतली ओली झालेली साखर, काड्यापेटीची काडी तसेच लायटर चटकन न पेटणे, रस्त्यावर काही झाडांच्या बुंध्यावर अळंबी येणे, वाळत घातलेले कपडे सुकण्यास जास्त वेळ लागणे अशा अनेक गोष्टींमधून मिळत असतात.

दमट हवेमुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. कॅमेऱ्यांच्या लेन्स पावसाळ्यातल्या दमट हवेत सांभाळणे हे एक मोठे दिव्य आहे. पावसाळा सुरू होताच छायाचित्रकार, तसेच हौशी लोक, ज्यांच्या ज्यांच्याकडे उत्तम कॅमेरे आणि महागड्या टेलीफोटो, झूम लेन्स, अशा विविध लेन्स आहेत त्यांनी तर विशेष काळजी घ्यायला हवी.
होते असे, की दमट हवेमुळे कॅमेऱ्याच्या लेन्समधील विविध काचांवर (Various lens elements) बुरशीचे तंतू निर्माण होऊन ते आतील इतर काचांवर पसरतात आणि काही दिवसांतच ते एवढे फोफावतात, की त्यामुळे लेन्सची दृश्यदर्शन क्षमता कमी कमी होत जाते. त्या कॅमेऱ्याने काढलेले फोटो अस्पष्ट निघतात.

या लेन्स, विशेषतः लेन्सच्या आतल्या काचा, नाजूक तर असतातच पण त्यांची आतील बांधणीही विशिष्ट भौमितिक पद्धतीने आणि कौशल्याने केलेली असते. व्यावसायिक व्यक्तीकडून अथवा कॅमेऱ्याच्या सर्व्हिस सेंटरमध्ये देऊनच ती दुरुस्त करून घ्यावी लागतात. हे काहीसे महागडे प्रकरण आहे. पैशांच्या भाषेत सांगायचे, तर हजार रुपयांपासून ते १५-२० हजार रुपयांपर्यंत केवळ लेन्स स्वच्छ करण्याचा खर्च असतो; अर्थात तो लेन्सच्या रेंजवर अवलंबून असतो. छोट्या ५०एमएम लेन्सला कमी खर्च, तर झूम लेन्सना चार ते पाच हजार, तर त्याहून मोठ्या रेंजच्या, उदा. ७०-३००एमएम,  २००-४०० एमएम किंवा १५०-६०० एमएम लेन्सना त्या त्या पटीत खर्च येतो (सध्याचे दर तपासून घ्यावेत).  

म्हणून हा सर्व ‘झमेला’ टाळण्यासाठी अगोदरच लेन्स किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांना निर्वात प्लॅस्टिकच्या पेटी/बरण्यांमध्ये (Airtight container) ठेवावे. सिलिका जेल क्रिस्टल (Silica Gel-crystals) नामक स्फटिकासारख्या कण-समूहांना कागदी वेष्टणात बंदिस्त करून ते पाकीट वर सांगितलेल्या बरणी अथवा पेटीमध्ये घालून ठेवावे. हे सिलिका जेल प्रत्येक केमिस्टकडे मिळतीलच असे नाही; पण केमिस्टच्या मोठ्या दुकानांमध्ये प्रयत्न करून पाहावे किंवा त्यांनाच विचारावे की ही वस्तू कोठे मिळू शकेल. याच्या किमतीही काही फार नाहीत, १००-२०० रुपयांत विविध आकारांची १०-१२ पाकिटे मिळतात.

हे सिलिका जेलचे स्फटिक आजूबाजूचा दमटपणा शोषून घेतात आणि त्या त्या लेन्स/इलेक्ट्रॉनिक चिपवर जमणाऱ्या बुरशीला नष्ट करतात. पण हीच सिलिका जेलची पाकिटे हवेत दमटपणा निर्माण होण्याच्या आधीच निर्वात पेटी/बरण्यांमध्ये टाकली, तर आतील वस्तू कोरड्याच राहतील आणि त्या अपेक्षित कामगिरी देऊ शकतील.
लायटर किंवा काडेपेट्या छोट्या प्लॅस्टिक बॉक्समध्ये ठेवून त्यात सिलिका जेलची छोटी पुरचुंडी ठेवली तरीही काम भागते.
दमटपणा गेला की त्या त्या वस्तू/कॅमेरा, लेन्स इत्यादी गोष्टी बरण्यांमधून बाहेर काढण्यास हरकत नाही.

संबंधित बातम्या