शक संवत्सराचा जनक ‘चष्टन’

प्रतिमा दुरुगकर
सोमवार, 8 एप्रिल 2019

विशेष
 

गुढी पाडवा! महाराष्ट्रात नववर्षाचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभी करून आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. यावर्षी शालिवाहन शक १९४१ ला प्रारंभ होईल. या कालगणनेविषयी लोकांमध्ये सर्वसाधारणपणे अशी समजूत आहे, की शालिवाहनांनी म्हणजे सातवाहनांनी शकांचा पराभव केला आणि हा संवत्सर सुरू केला. काही अभ्यासकांच्या मते, कुषाणांनी हा संवत्सर सुरू केला व त्याच्या मांडलिक राजांनी पुढे चालू ठेवला. 

पुराभिलेख, नाणी, उत्खननातील पुरावे इत्यादी भौतिक पुरावे, तसेच धार्मिक, निधर्मी साहित्य व परदेशी प्रवाशांची प्रवासवर्णने इत्यादी लिखित पुरावे ही साधने इतिहासाचा अभ्यास करताना महत्त्वाची ठरतात. त्याचप्रमाणे परंपरा, रीतिरिवाज इत्यादी गोष्टीही असतात. वरील ऐतिहासिक पुरावे व परंपरा या एकमेकांच्या संदर्भात तपासून पाहिल्या, तर आपण ऐतिहासिक सत्याच्या जवळ जाऊ शकतो. त्यानुसार ‘शालिवाहन शक संवत्सर’ नावाने आपण जो संवत्सर ओळखतो, तो चष्टन या शकवंशीय कार्दमक घराण्यातील पश्‍चिमी क्षत्रपाने सुरू केला. सातवाहन हे केवळ त्या घटनेला कारणीभूत ठरले असे दिसते. 

आता हे सर्व कसे घडले यासाठी इतिहासात मागे जावे लागेल. मध्य आशियातील शकांच्या टोळ्या इ.स.पूर्व पहिल्या शतकात बोलन खिंड पार करून हिंदुस्थानात शिरल्या. या टोळ्या सिंध, सौराष्ट्र (गुजरात) व महाराष्ट्र इथपर्यंत पसरल्या. ‘क्षहरात’ आणि ‘कार्दमक’ अशा त्यांच्या दोन शाखा आहेत. या शकांना इतिहासात ‘पश्‍चिमी क्षत्रप’ या नावाने ओळखले जाते. क्षहरात पश्‍चिमी क्षत्रपांनी गुजरात व महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनाऱ्यावरील बंदरांवर ताबा मिळविला. चोल, भृगुकच्छ (भडोच), कल्याण, सोपारा ही बंदरे त्या काळी व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची होती. त्यामुळे समुद्री व्यापारावर क्षहरातांनी वर्चस्व प्रस्थापित केले व ते समृद्ध बनले. त्या काळात महाराष्ट्रात सातवाहनांचे राज्य होते. तेही सामर्थ्यवान होते. त्यांचेही वरील भागावर सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असत. त्यामुळे दोघांमध्ये संघर्ष होत असे. नहपान या क्षहरात क्षत्रपाने विस्तृत व समृद्ध राज्य स्थापन केले. त्याचे उल्लेख जुन्नर, कार्ले व नाशिक येथे सापडतात. त्याची चांदीची नाणीही समृद्धीची साक्ष देतात. हे पश्‍चिमी क्षत्रप आपल्या संस्कृतीत मिसळून गेले होते. यांची पुढील पिढ्यांमधील नावेही भारतीय आहेत. उदा. चष्टनाच्या पिढीत पुढे रुद्रसेन नाव दिसते. तर नहपानाच्या मुलीचे नाव दक्षमित्रा व जावयाचे ऋषभदत्त होते. ऋषभदत्त जैन असावा असे म्हणतात. 

इ.स. ७८ मध्ये नाशिकजवळ गोवर्धन येथे नहपान व गौतमीपुत्र सातकर्णी यांची लढाई झाली व नहपान हरला. एवढेच नव्हे, तर गौतमीपुत्राने ‘क्षहरात वंश निर्वंश केला’ असा उल्लेख नाशिक येथील पांडव लेण्यांत सापडतो. हा लेख गौतमीपुत्र सातकर्णीचा मुलगा वासिष्ठीपुत्र सातकर्णी याचा आहे. या युद्धानंतर नहपानाच्या चांदीच्या नाण्यावर गौतमीपुत्र सातकर्णीने आपली मुद्रा ठोकली. अशी पुनर्मुद्रांकित नऊ हजारपेक्षा जास्त नाणी नाशिकजवळ ‘जोगळटेंभी’ येथे सापडली. 

या युद्धानंतर महाराष्ट्रातील नहपानाचे राज्य सातवाहनांनी घेतले, तरी गुजरातमधील राज्य मात्र पश्‍चिम क्षत्रपांच्या कार्दमक या दुसऱ्या शाखेतील चष्टनाने घेतले व तो राज्य करू लागला. हे त्याचे पहिले राज्यवर्ष इ.स. ७८ आणि हाच शक संवत्सर, शक राजाचा संवत्सर. (पूर्वी राजे राज्यावर बसल्यावर त्या वर्षीपासून स्वतःचा संवत्सर (राज्यवर्ष) सुरू करीत. तशी नोंद अनेक शिलालेखांत आढळते. चष्टनाचा हा शक संवत्सर पुढे ३०० वर्षे सुरू राहिला. हे त्यांच्या नाण्यांवरून समजते. 

त्यानंतर हा शक संवत्सर इतर राजे वापरू लागले असे पुराव्यांवरून दिसते. हिस्से बोराळा (विदर्भ) येथील लेखात ‘शक नृपतीचा काळ ३८०’ असा उल्लेख आहे. चालुक्‍यांच्या ऐहोळे (कर्नाटक) येथील जैन मंदिराच्या बाह्य भिंतीवर प्रसिद्ध ऐहोळे प्रशस्ती कोरली आहे. त्यात ‘शक ५५६’ अशी नोंद आहे. इथे ‘शक’ हे नाव आहे. पुढे मात्र हा ‘शक संवत्सर’ शब्द इतका लोकप्रिय झाला, की ‘शक’ हा शब्द ‘संवत्सर’ या अर्थी वापरला जाऊ लागला. उदा. शिवाजी महाराजांनी ‘राज्याभिषेक शक’ असा शब्द वापरला आहे. वरील लिखित पुराव्यांत कुठेही सातवाहनांचा उल्लेख नाही. पुढे मध्ययुगात ‘शक संस्थापक शालिवाहन’ याविषयी अनेक कथा रचल्या गेल्या. त्या जनमानसात एवढ्या घट्ट रोवल्या गेल्या, की लोकांनी शक संवत्सर साजरा करताना सातवाहन आणि त्यांनी शकांवर मिळवलेला विजय हेच स्मृतीत जपले. खरे तर वरील युद्धानंतर गौतमीपुत्राने संवत्सर चालू केल्याचा पुरावा नाही. त्याचा मुलगा वासिष्ठीपुत्र पुळुमाविने तर ‘स्वतःचे राज्यवर्ष’ चालू केल्याचे दिसते. पुढे शककाल दक्षिणेत जास्त लोकप्रिय झाला. या संवत्सराचा उपयोग पूर्वी चालुक्‍य व गंगराजांनीदेखील केला. १२ व्या शतकात सेन राजांनी हा संवत्सर कर्नाटकातून बंगालमध्ये नेला. बंगाल व बिहारमधून हा आसाममध्ये गेला. नेपाळमध्येही गेला. पण ज्याने हा सुरू केला त्या शक राजाला, ‘चष्टनाला’ मात्र सर्वजण विसरूनच गेले.    
 

संबंधित बातम्या