ॲण्ड द ऑस्कर गोज् टू...

प्रसाद नामजोशी
सोमवार, 4 एप्रिल 2022

विशेष

यावर्षीचा ऑस्करचा निकाल लागला आणि पुरस्कार कोण पटकावणार याबद्दलची आपण सर्वांनीच मांडलेली मतं व अंदाज ठरल्याप्रमाणे चुकवत ‘कोडा’ या चित्रपटानं बाजी मारली आणि ‘बेस्ट पिक्चर’चं ऑस्कर जिंकलं. विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासाठी या वर्षी दहा चित्रपटांना नामांकनं होती. ‘पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजेच बारा विभागांमध्ये नामांकनं होती, मात्र या चित्रपटाला फक्त दिग्दर्शनाचं ऑस्कर मिळालं. दहा नामांकनं असलेल्या ‘ड्यून’ चित्रपटानं सर्वाधिक, म्हणजेच सहा पुरस्कारांवर नाव कोरलं!  

थप्पड आणि ऑस्कर
दर वर्षी ऑस्कर कुठल्या ना कुठल्या कारणासाठी गाजतो. कधी स्त्री-पुरूष समानतेचा मुद्दा असतो, कधी एखाद्या राजकीय भूमिकेला विरोध केला जातो, तर कधी नव्या विषयाला तोंड फोडण्यासाठी ऑस्करच्या जागतिक रंगमंचाचा वापर होतो. यावर्षी मात्र एखाद्या नव्या विषयाला तोंड फोडण्याऐवजी पुरस्कार प्रदान करायला आलेल्या मान्यवर पाहुण्याचंच तोंड फोडण्याची घटना घडली आणि हॉलिवूडचं डॉल्बी थिएटर स्तब्ध झालं! 

झालं असं की सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार द्यायला आलेल्या विनोदवीर ख्रिस रॉकनं विल स्मिथ या अभिनेत्याच्या बायकोवर विनोद केला. स्मिथची बायको जेडा पिंकेट स्मिथ हिला २०१८मध्ये अॅलोपिशीया नावाच्या आजारानं ग्रासलं. या आजारात मोठ्या प्रमाणावर केसांची गळती होणं, टक्कल पडणं अशा समस्या उद्‍भवतात. रॉकनं जेडाच्या अगदी बारीक कापलेल्या केसांची तुलना जी.आय.जेन या चित्रपटातल्या डेमी मूरच्या टक्कल असलेल्या पात्राशी करत ‘चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये जेडानं काम करायला हरकत नाही,’ असं विधान केलं. त्यामुळे चिडलेल्या स्मिथनं स्टेजवर जाऊन ख्रिस रॉकच्या श्रीमुखात भडकावली. आधी सगळ्यांनाच हा विनोद वाटला. पण आपल्या जागेवर जाऊन बसलेल्या स्मिथनं चिडून रॉकला ‘तुझ्या घाणेरड्या तोंडानं माझ्या बायकोचं नाव घेऊ नकोस,’ असं म्हटल्यामुळे काही क्षण सोहळ्यात शांतता पसरली. रॉकनं वेळेवर काहीतरी बोलून वेळ निभावून नेली आणि पुढे सोहळा शांततेत पार पडला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विल स्मिथनं पटकावला खरा, पण चर्चा झाली ती कानाखाली वाजवल्याचीच. अर्थात हा ठरवून केलेला स्टंट आहे असंही अनेकांचं म्हणणं आहे. खरं खोटं मात्र स्मिथ, रॉक आणि ऑस्करच्या मंडळींनाच माहिती! पुरस्कार स्वीकारल्यानंतर सआश्रू नयनांनी केलेल्या भाषणात विल स्मिथनं ॲकॅडमी आणि सहकलाकारांची माफीही मागितली.

‘कोडा’ची बाजी
सगळ्यांनाच अनपेक्षित असलेल्या ‘कोडा’ या चित्रपटानं बाजी मारली आणि ‘बेस्ट पिक्चर’चं ऑस्कर जिंकलं. ‘कोडा’चं वैशिष्ट्य असं की या चित्रपटाला ज्या तीन विभागात नामांकनं होती, त्या प्रत्येक विभागातला पुरस्कार कोडानं पटकावला. सर्वोत्कृष्ट चित्रपटाबरोबरच साहाय्यक अभिनेता आणि रूपांतरित पटकथा (शॉन हेडर) असे ते तीन पुरस्कार. साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार ट्रॉय कॉटसरला मिळाला. मूकबधिर असलेला हा विलक्षण अभिनेता पुरस्कार स्वीकारायला आला, तेव्हा उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवण्याऐवजी  दोन्ही हात उंचावून अभिनंदन केलं. त्यानं आपलं भाषणही खाणाखुणांच्या सांकेतिक भाषेत केलं. 

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार स्वीकारताना निर्माता फिलिप रूसलेटनं एका कौटुंबिक हलक्याफुलक्या कथेला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दिल्याबद्दल मोशन पिक्चर अकादमीचेही आभार मानले. चित्रिकरणाच्या काही आठवणीही त्यानं ताज्या केल्या. एका मूकबधिक कुटुंबाची ही कहाणी आहे. या चित्रपटाची नायिका रुबी हिच्या कुटुंबाचा मासेमारीचा व्यावसाय आहे. समुद्रातल्या एका दृश्याच्या चित्रिकरणासाठी ज्या दिवशी संपूर्ण टीम पहाटे चार वाजता लोकेशनवर हजर राहणार, नेमकं त्याच दिवशी एक मोठं वादळ किनाऱ्यावर येऊन धडकणार असल्याची बातमी होती. एकूण असंख्य अडचणींवर मात करत चित्रपटानं मानाचा ऑस्कर पुरस्कार पटकावल्याचा आनंद आणि टीमविषयीचा अभिमान त्यानं व्यक्त केला. 

जपानी चित्रपटाला ऑस्कर
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट ठरला जपानचा ‘ड्राईव्ह माय कार’! दिग्दर्शक ऱ्ह्यूसुगे हामागूचीच्या या चित्रपटांनं जपानी सिनेमाला प्रथमच मुख्य पुरस्काराच्या शर्यतीत नामांकन मिळवून दिलं होतं. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं कथानक, उत्तम संवाद आणि या दोन्हीला सांधणारा अभिनय यामुळे ‘ड्राईव्ह माय कार’ इतर नामांकित चित्रपटांपेक्षा उजवा ठरला. 

जेसिका चेस्टन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
‘द आईज् ऑफ टॅमी फे’ या चित्रपटासाठी जेसिका चेस्टनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आपल्या डोळ्यांच्या पापण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या, नवरा जिम बॅकरसह टेलिव्हिजनवर उपदेशक म्हणून प्रसिद्ध झालेल्या आणि पुढे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या टॅमी फेचा हा चरित्रपट. त्याच्या पहिल्या बायकोची भूमिका जेसिकानं साकारली आहे.

जेन कॅम्पियन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक  
स्टीव्हन स्पिलबर्गसारखा दिग्गज शर्यतीत असूनही ‘द पॉवर ऑफ द डॉग’ या चित्रपटासाठी जेन कॅम्पियननं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं ऑस्कर पटकावलं. दिग्दर्शनासाठी ऑस्कर मिळवणारी ती तिसरी महिला ठरली. तसंच दिग्दर्शनासाठी दोन ऑस्कर नामांकनं मिळवणारी ऑस्करच्या इतिहासातली ती एकमेव दिग्दर्शिका आहे. १९९४मध्ये तिला ‘द पियानो’ या चित्रपटासाठी पहिलं दिग्दर्शनाचं नामांकन मिळालं होतं. 

‘ड्यून’ला मिळाले सर्वाधिक पुरस्कार
बहुचर्चित ‘ड्यून’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. या चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जरी हुकला असला, तरी तांत्रिक विभागांमधील व्हिज्युअल इफेक्ट्स, सिनेमॅटोग्राफी, साऊंड, प्रॉडक्शन डिझाईन, एडिटिंग, ओरिजिनल स्कोअर असे तब्बल सहा पुरस्कार मिळवत ‘ड्यून’नं ९४व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वाधिक ऑस्कर मिळवले. 

सोहळ्याची सूत्रं तीन महिलांकडे
या वर्षी ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन महिलांनी मिळून संपूर्ण सोहळ्याची सूत्रं सांभाळली. गेली तीन वर्षं सूत्रसंचालकशिवायच ऑस्करचा सोहळा पार पडला होता, कदाचित त्याचीच कसर भरून काढण्याकरिता की काय पण अकॅडेमीनं यंदाच्या वर्षी वॅन्डा साईक्स, एमी शुमर आणि रेजिना हॉल या तीन सूत्रसंचलिका नेमल्या असाव्यात. पन्नास वर्षं पूर्ण झाल्याबद्दल ‘गॉडफादर’ या जगप्रसिद्ध चित्रपटाचा आणि साठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बॉँडपटांचा विशेष गौरव करण्यात आला. 

दुर्मीळ विक्रम
या सोहळ्यात आणखी एक विक्रम झाला. अभिनेत्री केट ब्लॅंचेटनं ऑस्करच्या इतिहासातल्या सर्वाधिक ‘बेस्ट पिक्चर्स’ची नामांकनं असलेल्या चित्रपटांत काम केल्याचा बहुमान मिळवला आहे. या वर्षी तिनं काम केलेले ‘नाईटमेयर अॅली’ आणि ‘डोन्ट लूक अप’ हे दोन चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेत होते. ब्लॅंचेट स्वतःही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराच्या शर्यतीत होती. पुरस्कार तिच्या नावावर झाला नसला; तरी हा एक दुर्मीळ विक्रम मात्र तिनं आपल्या नावावर केला आहे. 

खऱ्या जोडप्यांना नामांकनं
ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन खऱ्या जोडप्यांना एकत्र अभिनयासाठीची नामांकनं मिळाली होती. क्रिस्टन डंस्ट आणि जेसी प्लेमन्स या दोघांना ‘पॉवर ऑफ द डॉग’ या चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेता आणि अभिनेत्रीचं नामांकनं होतं. दुसरं जोडपं आहे हॅवियर बारडेम् आणि पिनलोपी क्रूझ. ह्या दोघांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेता (बिईंग द रिकार्डोज) आणि अभिनेत्री (पॅरलल मदर्स)चं नामांकन होतं. 

केनेथ ब्रानाहची सात मानांकनं
‘बेलफास्ट’चा दिग्दर्शक केनेथ ब्रानाह हा ऑस्करच्या सात वेगवेगळ्या विभागांत नामांकन मिळालेला एकमेव कलावंत ठरला आहे. या आधी त्याला दिग्दर्शन, अभिनय, सहाय्यक अभिनय, रूपांतरित पटकथा, आणि बेस्ट लाईव्ह-अॅक्शन शॉर्टफिल्म अशा पाच विभागात नामांकनं मिळाली होती. या वर्षी बेस्ट पिक्चर आणि बेस्ट स्क्रीनप्ले या दोन विभागांत नामांकनं मिळवून त्यानं ही कामगिरी केली आहे. 

रायटिंग विथ फायर ः तिची पत्रकारिता
ऑस्कर सोहळ्यामध्ये यंदा ‘रायटिंग विथ फायर’ नावाच्या भारतीय माहितीपटाचा बोलबाला पाहायला मिळाला. ही गोष्ट केवळ महिलांनी चालविलेल्या एका माध्यमसंस्थेपुरती मर्यादित नाही तर ती प्रस्थापित माध्यमांच्या चौकटींना नाकारत गावातील शेवटच्या माणसाच्या व्यथा, त्यांचं दुखणं, त्यांच्या जीवनमरणाचे प्रश्न मांडणारी आहे. शिवाय या माध्यमसंस्थेच्या पत्रकार ह्या दलित, मुस्लिम आणि आदिवासी अशा तळातील घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला असल्यानं त्यांच्या वार्तांकनाला एक वेगळाच जिवंतपणा येतो. ही गोष्ट आहे ‘खबर लहरियॉँ’ या डिजिटल न्यूज पोर्टलची. हा माहितीपट मागील वर्षी सुदान फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकल्यानंतर त्याला दोन पुरस्कारदेखील मिळाले होते. भारतामध्ये तो अद्याप रिलीज झाला नसला तरीसुद्धा ऑस्करचं मिळालेलं नामांकन आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’सारख्या दैनिकानं केलेलं कौतुक यामुळं विशेष चर्चेचा विषय ठरला. उत्तरप्रदेशातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या बुंदेलखंडमध्ये २० वर्षांपूर्वी या सिंगलशिट वर्तमानपत्राला सुरुवात झाली होती. पुढे त्याचं रूपांतर डिजिटल न्यूज पोर्टलमध्ये झालं. त्याच्या सबस्क्रायबर्सची संख्या काही कोटींमध्ये आहे. या माहितीपटामध्ये ऑनलाइन पत्रकारिता करताना व्यवस्थापकीय संपादकपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मीरा देवी आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना कुटुंब आणि समाजाच्या चौकटी मोडताना कसा संघर्ष करावा लागतो, याचं दर्शन घडतं. ग्रामीण धाटणीच्या हिंदी भाषेचं प्राबल्य असणाऱ्या या न्यूजपोर्टलवर ग्रामीण विकास, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, महिलांविरोधातील गुन्हे आणि पाणी टंचाई या सारख्या समस्यांचं वार्तांकन वाचायला आणि पाहायला मिळतं मीरा देवी आणि वरिष्ठ बातमीदार नाझनी रिझवी यांची ही संघर्षगाथा एका अर्थानं प्रस्थापित माध्यमांना आरसा दाखविण्याचेही काम करते.  सामान्याचं जिणं मांडणाऱ्या या माहितीपटाला ऑस्कर मिळाला नसला तरीसुद्धा प्रेक्षक आणि परिक्षकांचं मात्र भरभरून प्रेम मिळालं आहे.    -

- गोपाळ कुलकर्णी

पुरस्कार विजेते

सर्वोत्कृष्ट चित्रपट 
कोडा

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
जेसिका चेस्टन 
(द आइज ऑफ टॅमी फे)

सर्वोत्कृष्ट अभिनेता
विल स्मिथ (किंग रिचर्ड)

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री
आरियाना दबोस 
(वेस्ट साइड स्टोरी)

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता
ट्रॉय कॉटस (कोडा)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
 जेन कॅम्पियन 
(द पॉवर ऑफ द डॉग)

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा
बेलफास्ट (सर केनेथ ब्रँनाघ)

सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा
कोडा (सिएन हेडर)

सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फिचर
एन्कॅन्टो

सर्वोत्कृष्ट माहितीपट
समर ऑफ सोल

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट
ड्राइव्ह माय कार (जपान)

ओरिजिनल साँग 
नो टाइम टू डाय - बिली इलिश, फिनिअस ओकोनल 
ओरिजिनल स्कोअर 
ड्यून - हान्स झिमर

छायांकन 
ड्यून - क्रेग फ्रेझर
 
व्हिज्युअल इफेक्ट्स 
ड्यून - पॉल लँबर्ट, ट्रिस्टन 
माइल्स, ब्रायन कॉनर, गर्ड नेफझर
 
फिल्म एडिटिंग 
ड्यून - जो वॉकर
 
वेषभूषा 
क्रुएला - जेनी बिव्हन
 
साउंड 
ड्यून - मॅक रुथ, मार्क 
मँगिनी, थिओ ग्रीन, डग 
हेम्फिल, रॉन बार्लेट
 
प्रॉडक्शन डिझाइन 
ड्यून - पॅट्रिस व्हर्मेट, 
सिसुशाना सिपोस
 
रंगभूषा, केषभूषा 
द आइज ऑफ 
टॅमी फे - लिंडा डाउड्स, 
स्टेफनी इनग्राम, जस्टिल रॅले
 
लाइव्ह ॲक्शन शॉर्ट 
द लाँग गूडबाय
 
ॲनिमेटेड शॉर्ट 
द विंडशिल्ड वायपर
 
डॉक्युमेंटरी शॉर्ट 
द क्वीन ऑफ बास्केटबॉल
 

संबंधित बातम्या