वरुणाचे पाश...

प्रतिमा दुरुगकर
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

विशेष

आपल्या पूर्वजांनी निसर्गावर ऋचा रचल्या. ऋग्वेदातील सर्वात आधीच्या ऋचा खरेतर निसर्गातील शक्तींना तसेच निसर्गात दिसणाऱ्‍या गोष्टींना उद्देशून आहेत. जे शेकडो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना उमगले होते, ते आपल्याला कधी उमगणार? निसर्गचक्रातील हस्तक्षेप आपण केव्हा थांबविणार? 

सात फेब्रुवारी २०२१, उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात नदीमध्ये प्रलयाची लाट उसळली. अनेक बेपत्ता, अनेक मृत्यू अशा बातम्या आल्या. पाठोपाठ विश्लेषण आले. मानवाने त्या भागात केलेला हस्तक्षेप, धरणे, जलविद्युत प्रकल्प इत्यादींचा ऊहापोह झाला. हा धुरळा काही दिवस उठतो आणि पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या....’ २०१३च्या केदारनाथ पुरानंतरही धरणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पुन्हा सारे शांत. ‘१९९०नंतर तापमानवाढ वेगात सुरू. गेल्या तीस वर्षांत हिमनद्यांचे क्षेत्र दहा टक्‍क्‍यांनी आक्रसले. पृथ्वीवरील ओझोन वायूला पडलेले छिद्र...’ या बातम्यांची आता आपल्याला सवय झाली आहे.

मध्यंतरी एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालात पृथ्वीवरील समुद्रात प्लॅस्टिक कचरा किती व कोठे पसरला आहे याचे फोटो पाहिले आणि धक्का बसला. विशेषतः पश्चिमेकडे अमेरिका व युरोप दरम्यान तर हे प्रमाण खूप होते. त्यामुळे समुद्री जीवन धोक्यात आले आहे. निसर्गाची साखळी मोडत आहे. मानवाने केलेली जंगल तोड, प्राणी हत्या, वाढते शहरीकरण आणि कारखाने, त्यामुळे वाढणारे प्रदूषण ही यादी न संपणारी आहे. मध्यंतरी खवले मांजराची बातमी आली होती. अनिर्बंध हत्येमुळे ही जात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. खवले मांजर वाळवी, मुंग्या खाते. निसर्गातील हा दुवा निखळत आहे. किडीवरच्या नैसर्गिक नियंत्रणांना मानवाने जेव्हा जेव्हा धक्का लावला, तेव्हा तेव्हा त्याला त्याची जबर किंमत मोजावी लागली.

स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या आजच्या मानवाला हे सर्व केव्हा उमजणार?

निसर्गचक्रातील हस्तक्षेप तो केव्हा थांबविणार? जे शेकडो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना उमगले होते, ते आपल्याला कधी उमगणार?आपल्या पूर्वजांनी त्यावर ऋचा रचल्या. ऋग्वेदातील सर्वात आधीच्या ऋचा खरेतर निसर्गातील शक्तींना तसेच निसर्गात दिसणाऱ्‍या गोष्टींना उद्देशून आहेत. त्याकाळी मानव निसर्गाकडे कुतूहलाने व भयाने पाहत होता. त्याची नजर बालकाची होती. तो निरीक्षण करीत होता. ‘रोज सूर्य उगवतो, वर जातो, पुन्हा खाली येतो.’ ‘दिवसानंतर रात्र येते, रात्रीनंतर दिवस.’ ‘ढग येतात, विजा कडाडतात, पाऊस येतो.’ ऋतूंचे हे चक्र आहे. या सर्व निसर्गक्रमात नियमितपणा आहे. हे सर्व घडविणारा कुणीतरी आहे. निसर्गात दिसणाऱ्‍या गोष्टी उदा. सूर्य, पाऊस, उषा, संध्या या त्याच्या देवता म्हणजे वर्ण्य विषय झाल्या. (आपण देवता हा शब्द ज्या अर्थाने वापरतो तसा अर्थ येथे नाही. येथे देवता म्हणजे त्या ऋचेत वर्णिलेला विषय) निसर्ग एका नियमाने चालतो. ते कधीच मोडले जात नाहीत. तर मग या वैश्विक नियमांचे नियमन करणारी शक्ती असली पाहिजे. ती मग वरुण देवता झाली, वर्ण्य विषय झाली. ही ऋग्वेदातील अर्धपारदर्शक देवता आहे. परंतु तिचे स्वरूप अतिशय व्यापक आहे. आपण वरुण म्हणजे समुद्रदेवता किंवा जलदेवता असे समजतो. पण ऋग्वेदात त्याला सम्राट म्हटले आहे. (इंद्र राजा आहे पण वरुण मात्र सम्राट आहे) तो ऋतगोपा आहे. ऋत म्हणजे विश्वाचे सूक्ष्म धागे किंवा नियम. गोपा म्हणजे ऋतांचे रक्षण करणारा. तो आकाशाच्याही पलीकडे, वर स्थानापन्न आहे. तेथून तो सर्व पाहतो. त्याला सर्व दिसते. म्हणूनच एका ऋचेत म्हटले आहे.

अतो विश्वान्यभ्दुता चिकित्वाँ अभि पश्यति।
कृतानि या च कत्वा।।

अर्थ - या ठिकाणाहून आश्चर्यकारक (म्हणजे ग्रासमान, म्हणजेच सहजी दिसू न शकणारी) अशी केली गेलेली आणि केली जाणारी सर्व कर्मे, तो सर्वज्ञ बारकाईने पाहतो.
ऋग्वेदातील ऋचांत वरुण सत्यानुरूप समीक्षक आहे. सत्यवादी त्याच्यापासून सुरक्षित आहेत. पण असत्यवाद्यांवर तो पाश टाकतो. त्यातून सुटका नाही. म्हणूनच एका ऋचेत म्हटले आहे,  

उदुत्तमं मुमुग्धि नो वि पाशं मध्यमं चृत।
अवाधमानि जीवसे।।

अर्थ - आमच्या जगण्यासाठी, आमचा वरचा (डोक्याचा) पाश तू वरच्या वर सोडव. मधला (पोटाचा) पाश नष्ट कर. आमचे खालचे (पायाचे) पाश तोडून टाक.
वरुणाजवळ ‘माया’ ही शक्ती आहे. ही असुरी शक्ती. म्हणून वेदात वरुणाला ‘असुर’ मानतात. असुर म्हणजे दैत्य ही कल्पना वेदात नाही. ‘असु+र’ म्हणजे प्राणशक्ती देणारा, असा अर्थ आहे. त्याचे स्पश् म्हणजे हेर सर्वत्र पसरले आहेत. तो सर्व जाणतो. पाहा या ऋचेत काय म्हटले आहे,

बिभद्रापिं हिरण्ययं वरुणो वस्त निर्णिजम्।
परि स्पशो नि षेदिरे।।

अर्थ - सोन्याचे कवच धारण करणारा वरुण पुष्ट असे आपले शरीर आच्छादतो. हेर त्याच्या भोवती बसतात.
वसिष्ठ मंडलात वरुणाची सूक्ते आहेत. तो अधिभौतिक आणि नैतिक व्यवस्थेचा अधिष्ठाता आहे. विश्व व्यवस्थेविषयीचे त्याचे नियम कधीही बदलत नाहीत. म्हणून त्याला ‘धृतवत्’ म्हणतात.

नि षसाद धृतव्रतो वरुणः पस्त्या३स्वा 
साम्राज्याय सुक्रतुः

अर्थ - वैश्विक नियमांचा निर्धारक, तीक्ष्ण बुद्धिमान असा वरुण, साम्राज्याच्या पालनासाठी त्याच्या घरात स्थानापन्न होतो.
त्या काळात आपल्या पूर्वजांनी वैश्विक नियम जाणले. ते तोडले तर काय होते हेही जाणले. आपण हे कधी जाणणार? वरुणाचे पाश आपल्यावर केव्हाच पडले आहेत. पण आपल्या पूर्वजांनी केलेली पुढील प्रार्थना, आपण कधी करणार?

कदा क्षञश्रियं नरमा वरुणं करामहे। 
मृळीकायोरुचक्षसम्।।

अर्थ  - क्षात्रतेज असणाऱ्या, दीर्घ दर्शी (दूरवर सगळीकडे पाहू शकणाऱ्या) श्रेष्ठ पुरुषाला, वरुणाला प्रसन्न होण्यासाठी, आम्ही केव्हा आमच्याकडे वळवू शकू?

संबंधित बातम्या