सर्व जगाचे मंगल! मंगल माझे गाणे !

प्रवीण दवणे
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022

कव्हरस्टोरी

एकाच आयुष्यात अनेक कर्तृत्ववान आयुष्यांची कारकीर्द जगणारे व्यक्तिमत्त्व आपण ‘लता मंगेशकर’ यांच्या रूपाने अनुभवले. भावोत्कट नि पारदर्शी सुरांचे, सर्वोच्चतेचे परिमाण ठरावे असा हा दैवी स्वर! अनेक पिढ्या बदलल्या, तरी प्रत्येक पिढीला हा सूर ‘आपल्या पिढीचा’ वाटावा, अशी किमया हा निसर्गाचा एक अलौकिक आविष्कार म्हणावा लागेल.

लता मंगेशकरांच्या सुमंगल स्वराने खरेच आपल्याला काय दिले, याचा मी नेहमीच विचार करीत आलो आहे. केवळ मनोरंजनापलीकडे एखादी कलाकृती आपला जीवनाधार ठरते, तेव्हा ती कलाकृती आणि आपण, यांच्यात एक अनुबंध निर्माण होतो. मनाच्या उदास एकांत प्रहरी आपण एखादी कविता उराशी कवटाळतो, तेव्हा त्या कवितेची वाटचाल अभंगत्वाकडे सुरू होते. लतादीदींच्या अनेक गाण्यांना ती दैवी झळाळी आहे. दैवी स्वराबरोबर कुशाग्र बुद्धिमत्तेचे सुदैवी देणेही लतादीदींना मिळाले. ‘आपण गायिका झाल्या नसतात तर आपण कोण झाला असता?’ या प्रश्नावर त्या उत्तरल्या, ‘मी कोणत्याही क्षेत्रात गेले असते, तरी मी ‘लता मंगेशकर’ झाले असते.’ सकृतदर्शनी हे विधान आत्मप्रौढी वाटू शकेल; पण जरा खोलात गेले की जाणवते, या विधानामागे स्वतःच्या परमोच्च समर्पणभावावरचा जबरदस्त विश्वास आहे. 

आपल्या पिढीला लतादीदींनी त्यांचा सुरेल गायनाबरोबर हा ध्येयभक्तीचा मानदंड दिला; अनेक पिढ्यांना जिद्दीचे अपार बळ दिले; नियतीने कोवळ्या वयात परिस्थितीचे नकार नि केवळ नकारच दिले, परंतु त्याचे रूपांतर आत्मबळात करता येऊ शकते, याचे उदाहरण स्वतःच्या आयुष्यातून उभे केले.

दारिद्र्य, उपेक्षा, मानभंग, जिवलगांचे चिरविरह त्यांनी सोसले. त्यामुळे त्यांच्यातील मातीचे भान असलेल्या चिंतनशीलतेने तुमच्या-माझ्या माणूसपणासारख्या माणूसपणाने स्वतःतील कलावंत समृद्ध केला नि काव्याच्या सुरावटीच्या आशयात ते वेदनेचे तेजाब मिसळून त्यांच्या सुरांनी गाण्यालाच नवी नियती दिली, गाण्यालाच संपूर्ण व्यक्तिरेखेचे आयुष्य दिले. कानाकोपऱ्यातील रसिकांच्या अनेकरंगी सुख-दुःखाच्या, आनंद वा दुःख कल्लोळाच्या, तरल क्षणी असे वाटत गेले, की अरे हे गीत ‘लता’ गात नसून आपलेच ‘मन’ गात आहे. 

‘आयेगा आनेवाला’मधली विरह कातर प्रतीक्षा असो, ‘ये जिंदगी उसिकी है’मधील समर्पितता असो, किंवा ‘प्यार किया तो डरना क्या?’मधील निरागस अल्लडता असो, ‘यूँ हसरतों के दाग’मधील समजूतदार नाइलाज असो; दीदींनी केवळ गीतरचना वा काव्य गायले नाही, तर त्या काव्य-गीतातील ‘आयुष्य’ गायले आणि म्हणूनच पंच्याहत्तर वर्षे हे गाणे कोट्यवधी मनांचे ‘आपले’ गाणे झाले. संगीतकाराने स्वररचना केलेली चाल स्वरालिपीबरहुकुम अचूक गाणारे अनेक गायक-गायिका आहेत. त्यांचेही अर्थात कलाक्षेत्राला योगदान आहेच, परंतु मला वाटते दीदींच्या गाण्याचे थोरपण, गाणे ‘सुरेल’ असण्यापुरतेच नाही, तर गाण्यातील आशयाचा व व्यक्तिरेखेचा तरलकातर ‘जिव्हाळा’ रंग त्या सुरात मिसळण्यात आहे. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे.. घराकडे आपुल्या...’मधील पिल्लांची वाट पाहणाऱ्या आईचे काहूर, ‘नीज माझा नंदलाला, नंदलाला रे’मधील अंगाईचा भाव, ‘गुडिया, कबतक रुठी रहोगी?’मधील नटखटपणा, ‘चंदा है तू, मेरा सूरज है तू..’मधील प्रसन्न खेळकरपणा - एक ना अनेक... केवळ लतादीदींनी स्वरातून उभी केलेली ‘आई’ हीच अनेक स्वभावछटांची आहे. 

कीर्तीच्या परमोच्च, ‘भारतरत्न’ सन्मानाच्या शिखरावर असतानाही, आपली प्रत्येक अभिव्यक्ती परिपूर्णच व्हायला हवी, याचा त्या एक कलावंत म्हणून किती विचार करीत होत्या याचा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभव घेण्याचे भाग्य, भाग्यानेच मला मिळाले. ‘माझा छकुला’ तसा अलीकडचा चित्रपट. त्यात माझी गीतरचना असलेले याच शब्दांचे गाणे होते. आई मुलाचे लाड करीत, त्याला खेळवत, भरवते आहे, असा आशय होता. हे गाणे लता मंगेशकर गाणार म्हटल्यावर ध्वनिमुद्रणाचे रूपांतर सोहळ्यात होणार हे निश्चित होते.  

त्या गाण्याच्या वेळी अनपेक्षितपणे माझ्या काळजाचा ठोका चुकवणारी गोष्ट घडली. अनिल मोहिते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी यांनी गाण्याची चाल नि प्रसंगाविषयी चर्चा केली. दीदी गाण्यासाठी सज्ज झाल्या. स्वरांचा आनंदघन बरसू लागला नि अचानक भावसमाधी लागलेल्या मला दीदींनी सिंगरबूथमधून विचारले, ‘प्रवीण जरा येता?’ दीदी गात असलेल्या केबिनमध्ये जाणे नि आता त्यांना माझ्या गीतरचनेत काय बरं खटकलं नि पुढे...? हे सारे ‘टेन्शन’ काही क्षणांनाही पेलणारे नव्हते...

‘प्रवीण, एक छोटा बदल.. तुमच्या परवानगीने करता येईल का? बघा हं...’

‘?!’

‘आपण या ओळी छान लिहिल्यात, साध्या सोप्या...

कसा बोलतो चिमणा

कसा हासतो देखणा

दृष्ट कोणाची न लागो, 

वासराला माझा छकुला!

माझा सोनुला!

यात ‘गं’ गे अक्षर असं घेतलं तर - ‘कसा बोलतो गं चिमणा!’ चालेल का?’

मी अधीरपूर्वक आदराने विचारले,

‘दीदी, हरकत नाहीच, पण ‘गं’मुळे मात्रा वाढतील ना?’

दीदींनी स्मित केले नि म्हणाल्या, ‘आई मुलाचे लाड करतेय, खेळवतेय अशी सिच्युएशन आहे नं, ‘कसा बोलतो गं चिमणा’मुळे आई मुलाला अधिक जवळ करेल, त्याचे गाल मायेने ओढेल, अशी गंमत अभिनयात करायला वाव मिळेल..’

मी केवळ अवाक झालो. खरोखर एका ‘गं’ अक्षरामुळे ते गाणे चित्रपटाचे गाणे झाले होते. 

गीताचा गायनासाठी त्या कसा विचार करतात याची मी अनुभवलेली घटना म्हणून हे कथन केले.

श्रेष्ठ ‘माणूस’ आणि श्रेष्ठ ‘कलावंता’चा म्हणून जो मांगल्याचा आदर्श असतो, त्याचे दर्शन दीदींच्या रूपाने आपण अनुभवले. रंगमंचावर सादर करताना गाणे कितीही अवखळ, मिस्कील असो, त्यांचा रंगमंचीय वावर कधीही उथळ भासला नाही. ‘दीदी तेरा देवर दिवाना’ असो की ‘मेरे हाथों में नौ नौ चुडियाँ’ असो, लतादीदींनी शब्दांतील सर्व गंमत स्वरातून देतानाही त्या ‘दीदी’च राहिल्या. कलेचा आदर, आदरपूर्वकच करायला हवा हा वस्तुपाठ देणारे अतिशय मोजके कलावंत, त्यातील एक आदरणीय लतादीदी!

साठ ते सत्तरच्या दशकात बालपण जगलेले आम्ही, अक्षरशः निम्न मध्यमवर्गीय, म्हणायचे म्हणूनच ‘मध्यमवर्गीय’.  खरेतर गरिबीने मेटाकुटीला आलेले आमच्या आई-वडिलांचे फरशीला छप्पर टेकलेले संसार! पण त्या गरिबीच्या झळा मृदुल करण्याचे कार्य दैवी सुरांनी आमच्या घरात येऊन केले. लता, आशा, किशोर, रफी, मुकेश, मन्नादा, हेमंतदा, अशी सप्तरत्ने; सहसा पुढील बटणातून सुरू न होणाऱ्या, थप्पड मारल्यावर आतला व्हॉल्व्ह लागणाऱ्या रेडिओतून अक्षरशः अम्लान शब्द- सुरांचे पाणी भरत होती. जाती, धर्म, अमीरी, गरिबी यांचे सर्व भेद पुसून आलेल्या सुखदुःखांना चांदण्याचे कलाबूत लावले ते याच सुरांनी!

युगल गीतांत गायकाचा स्वर बदलता असे, पण असंख्य वेळा गायिकेचा स्वर लता मंगेशकरांचाच असे. ‘अनाडी’, ‘बरसात’, ‘शोर’, ‘आराधना’, ‘आँधी’, ‘दो रास्ते’, अशी यादी कितीही वाढेल. त्या गायकाला अनुकूल अशी स्वरशैली बदलणे, नायिकेच्या संवादछटेला अगदी तिनेच गायले आहे असे वाटावे, असे दुर्मीळ कौशल्य दीदींच्या स्वरांचे! त्या वेळी दहा-बारा वर्षांच्या आम्हा मुलांची स्पर्धाच लागे हे गाणे लतादीदींनी नूतनसाठी गायलेय का वहिदा रेहमान यांच्यासाठी? रेडिओ हेच ‘जिवाचे कान’ करण्याचे सुख नि सूर निधान होते. जेवणाच्या पानातील अन्नाचे अन्नब्रह्मात रूपांतर करण्याचे सामर्थ्य ‘लता’ नावाच्या स्वरब्रह्मात होते. ‘मेघा गाए आधी रात बैरन बन गयी निंदिया’मधील तो स्वर पापण्यांवर ती हुरहूरती रात्र घेऊनच यायचा. ‘रसिक बलमा’मधील आलाप वयापुढे जाऊन तरुण करायचा. ‘लग जा गले’मधील आर्जव, आपल्यासाठी कुणी आळवावे अशी स्वप्ने पाडायचे. गरिबीला स्वप्न पाहण्याचे वेड अधिक असावे. लतादीदींच्या स्वरांनी वास्तवाची धग सुंदरतेच्या प्रदेशात नेली, स्वप्नवत केली.

गरीब, निम्नमध्यमवर्गीयांच्या वाड्यातील नि चाळीतले उत्सव तबकडी गाण्यांतूनच रंग भरीत. तेथेही आता आठवणीतील झालेली गाणी आम्ही नवी म्हणून ऐकली. ‘मी डोलकर डोलकर’, ‘राजा सारंगा’, ‘वादळ वारं सुटलं गो’, या गाण्यांनी प्रत्येक वाडा हा कोळीवाडा केला. शांताबाई शेळके यांचे शब्द, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतात हेमंतकुमारांचा धीम्या समुद्रगाजेचा स्वर दीदींच्या आभाळस्वरात ‘लाटा.. लाटा.. लाटा...’ गाऊ लागला की लग्नातल्या लाकडी खुर्चीवरील गोल्ड स्पॉट अमृत भासायचा. 

त्याच सुमारास नवी म्हणून गणपतीची गाणी गाजू लागली. ‘गणराज रंगी नाचतो’ असो की ‘गजानना श्री गणराया’, या दीदींच्या गाण्यांनी आमच्या श्रीगणेशाची मखरे उजळून निघाली. आज इतक्या वर्षांनीही ही गाणी दीदींच्या सुरात ऐकू आल्याशिवाय गणपती आलेत असे वाटत नाही. ही किमया केवळ दैवी सुरांची नाही, सुरांनी जपलेल्या मांगल्याची आहे. तर्कापलीकडचे असे काहीतरी अवकाशात असते, की जे निसर्गदत्त कलेलाही अभिमंत्रित करते. 

ज्ञानेश्वर माऊलींची विराणी असो की पसायदान, गीतेचे अध्याय असोत की संत रामदास स्वामींचे छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्य व्यक्त करणारे ‘निश्चयाचा महामेरू’, की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विद्युतपात्यासारखे ‘जयोस्तुते! जयोस्तुते!’... या अजर शब्दांना अमर करण्यात लतादीदींच्या समर्पित शुभमंगल आध्यात्मिक अधिष्ठानाचेही तेवढेच योगदान आहे. मूल्यांचे अधिष्ठान मानणाऱ्या, कलेतील समग्रता जपणाऱ्या पिढीला या ‘सर्व जगाने मंगल! मंगल माझे गाणे’ म्हणत आश्चर्य वाटाव्या अशा त्यांच्या प्रदीर्घ वाटचालीने ध्यासाचे मोल समजावले. 

इ.स. १९८१मधील ११ सप्टेंबर हा दिवस माझ्यासाठी स्वप्नवत होता. बालपणी मऊ भाताबरोबर जी गाणी ऐकत पुढे गेलो होतो, दूरदर्शन व मोबाईल ही साधने दृष्टिपथातही नसल्यामुळे चित्रसाप्ताहिकांत येणारी त्यांची ध्वनिमुद्रण क्षणचित्रे पाहण्यावर तृष्णा भागवावी लागे, त्या दीदींना प्रत्यक्ष भेटण्याचा तो दिवस... ‘सुबह’ चित्रपटातील ‘चैतीपुरम का चित्तचोर’ या गाण्याचे ध्वनिमुद्रण होणार होते. ध्वनिमुद्रण काही काळ थांबले. का, ते कळत नव्हते. वेध घेतल्यावर कळले, गीताचे कवी पं. नरेंद्र शर्मांना दीदींनी बोलावून घेतले होते. पंडितजी आल्यावर कळले, कवीकडूनच काव्य समजून घेऊन मग त्या गाण्यासाठी सज्ज झाल्या. हा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवणे हाही वस्तुपाठच होता. शब्दांना सूर देण्यापेक्षा गीताच्या आशयाला सूर देणाऱ्या विश्वमोहिनीचे दर्शन घडत होते. 

आपल्या गायनशैलीला सतत अद्ययावत ठेवण्याचा, नव्या पिढीलाही तो आपलाच वाटेल असा, ‘गेले तेथे मिळले हो’ असा प्रवाही ठेवण्याचा वसा ‘लता मंगेशकर’ या मूर्तिमंत दंतकथेने जपला होता. 

गेल्या रविवारी, ६ फेब्रुवारीला शिवाजी पार्कवर पोचल्यावर दीदींना निरोप देण्यासाठी जनसामान्यांनी जी प्रचंड गर्दी उसळलेली पाहिली, ती पाहून वाटावे, आज माध्यमांची छायाचित्रणयंत्रे रुपेरी चेहऱ्यांना सेलिब्रिटी मानून त्यांच्याभोवती ‘झूम’ताहेत. पण दीदींना भेटायला आलेले वय वर्षे पंधरा ते ऐंशी-नव्वद, काही प्रज्ञात्वक्षू, काही दिव्यांग, गोरगरीब दर्शनासाठी आतुर होते. सारा समुदाय प्रचंड संख्येने असूनही किती उदास शांत होता. हात जोडीत, डोळे टिपत होता. वाटलं, जगातील अशा जनसामान्यांना लता मंगेशकर या दैवताने जे दिले, त्या न फेडता येणाऱ्या ऋणाची कृतज्ञता म्हणून ते आले होते. ही कष्टकरी - कामकरी जनता - हीच खरी सेलिब्रिटी! त्यांच्या आयुष्याचा उत्सव होतो म्हणून कलावंत थोर ठरतात. सतत आठ दशके इतके उदंड प्रेम लतादीदींच्या सुरांनी दिले आहे.

स्वरांनी दिलेली आपुलकीच्या सर्व नात्यांची ही जिव्हाळ्याची जवळीक, हे दीदींचे गाण्यापलीकडचे गाणे आहे. नक्षत्रांचे गाणे!

‘डोळा भरून’ अंतिम दर्शन घेताना सहजपणे तरलिका तरारून मनात आली-

मोगऱ्याच्या बहराला
समाधीतून वाटले, गावेसे; 
पुन्हा जन्म घेऊन 

लता वाटले व्हावेसे!

संबंधित बातम्या