मुलाखतीची तयारी... 

प्रवीण दीक्षित
सोमवार, 9 मे 2022

विशेष

लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी अनिवार्य असणारी मुलाखत ही त्या उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाची व विषयातील ज्ञानाची परीक्षा असते. योग्य उमेदवार निवडण्यासाठी म्हणून मुलाखतकार प्रश्न विचारत असतात. मुलाखतीला सामोरे जाताना वरवर लहान वाटणाऱ्या काही बाबी लक्षात घेऊन, अशा मुलाखतींचा वारंवार सराव करून आत्मविश्वासाने  मुलाखत दिल्यास  आपली निवड नक्की होणार ह्याची खात्री बाळगावी.

संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) व महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) सध्या विविध पदांच्या निवडीसाठी मुलाखत घेणे चालू आहे. संघ लोकसेवा आयोगातर्फे  किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे निवड करण्यापूर्वी मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची तीस ते पंचेचाळीस मिनिटे मुलाखत घेतली जाते. पूर्वी ही मुलाखत संघ लोकसेवा आयोगातर्फे इंग्रजीत घेतली जात असे; आणि इंग्रजी बोलण्याची सवय नसल्याने अनेक उमेदवार निवड न झाल्याने खट्टू होत असत. इंग्रजीवर प्रभुत्व नसणाऱ्या उमेदवारांना भाषेचा अडथळा वाटू नये ह्यासाठी आता ही मुलाखत हिंदी अथवा मातृभाषेत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या मुलाखती अर्थातच मराठीत होत असतात. काहीवेळा भाषेचा अडसर नसतानाही मुलाखतीच्यावेळी अनेक उमेदवार निर्माण होणाऱ्या तणावामुळे गडबडून जातात. आपल्याला काय विचारले आहे हे त्यांना समजेनासे होते. ते नुसतेच गप्प बसून राहतात किंवा त्यातील काहीजणांना मुलाखतीदरम्यान रडू फुटते. अशा प्रकारे भावनिक उद्रेक होऊन एका महत्त्वाच्या पदासाठी पात्र असतानाही, केवळ आपल्या वर्तनाने मुलाखतीत अपयशी ठरल्याने उमेदवार आपली निवडीची संधी घालवून बसतो.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी  अर्ज करताना अर्जदाराने लिहिलेली माहिती, त्यात त्याने उल्लेख केलेले विषय, पूर्वानुभव, छंद, त्याच्या पदासाठी अपेक्षा, तो कोणत्या राज्यात जाऊ इच्छितो, कोणती सेवा स्वीकारू इच्छितो, खेळात भाग घेतला असल्यास खेळांची नावे, आरक्षणाचे लाभ हवे असल्यास त्या संदर्भातील अचूक माहिती अपेक्षित असते. त्यामुळे अर्ज ऑनलाइन भरलेला असेल तरीही त्याची एक प्रत उमेदवाराने आपल्याजवळ ठेवणे अत्यावश्यक आहे. बरेचसे उमेदवार ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सायबरकॅफेमधे जाऊन, अन्य व्यक्तीच्या मदतीने हे अर्ज भरतात. त्यामुळे अनेकवेळा उमेदवार सांगतो एक गोष्ट व प्रत्यक्षात अर्जामधे लिहिलेली गोष्ट ह्यात तफावत निर्माण होते व अर्जाची प्रत स्वतःजवळ न ठेवल्यामुळे मुलाखतीदरम्यान उमेदवार भांबावून जातो. त्याला नेमकी माहिती आठवेनाशी होते. परिणामी मुलाखतकारांचा, हा उमेदवार निवडण्यासाठी योग्य नाही, असा ग्रह होतो.

वर उल्लेख केल्याप्रमाणे उमेदवाराने त्याची जन्मतारीख, जन्मस्थळ, तो कोणत्या ठिकाणी राहतो, त्याचे छंद, खेळ, विविध आवडी या बद्दलची व त्याबद्दलच्या वैशिष्ट्यांची माहिती मुद्दाम अभ्यास करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा. परीक्षेसाठी घेतलेले विषय केवळ क्रमिक पुस्तकांपर्यंत मर्यादित न ठेवता, त्या विषयातील अन्य जाणकार लेखक व त्यांचे विचार थोडक्यात पण अचूकपणे सांगता येतील ह्याची तयारी ठेवावी. तसेच एखाद्या लेखकाचे विचार आपल्याला मान्य नसल्यास त्याची कारणे विषद करण्याचीही तयारी ठेवावी. लेखकाच्या पुस्तकाचे नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा. ते माहीत नसल्यास काहीतरी नाव सांगण्याचा म्हणजेच थापा मारण्याचा प्रयत्न करू नये. कारण त्यामुळे उमेदवार खोटी माहिती सांगत आहे, असा समज तयार होतो. लेखी परीक्षेमध्ये अनेकांना अनेक विषय सोडून द्यायची सवय असते. परंतु मुलाखतीच्या वेळेस आपल्याला कोणत्याही विषयावर प्रश्न येऊ शकतात, हे लक्षात ठेवून अभ्यास करावा. बऱ्याचवेळा ज्यांच्या आधारे अभ्यास केला ती पुस्तकेही कालबाह्य झालेली असतात. त्यामुळे त्या विषयातील नवनवीन घडामोडी व पूर्वीच्या विचारांचे आजच्या काळातील घटनांशी संबंध व महत्त्व ह्यांची माहिती घेणे आवश्यक आहे.

मुलाखतीस जाताना ज्या कपड्यांची तुम्हाला नेहमी सवय असेल असे कपडे परिधान करावेत. परंतु कपडे भडक रंगाचे किंवा तोकडे असू नयेत. पुरुष उमेदवारांना टाय लावायचा असेल तर सदऱ्याची वरची गुंडी लावणे आवश्यक आहे. कोट घालायचा असेल तर तुमच्या मापाचा आहे ह्याची खात्री करावी. अन्यथा मुलाखतीच्यावेळी  उमेदवाराचे लक्ष विचारलेल्या प्रश्नांच्या ऐवजी कोट किंवा टाय ठीक आहे का नाही, ह्याकडेच जात राहते. महिलांनी सूट किंवा साडी वापरावी, पण त्याचीही नेहमी सवय असेल ह्याची खात्री करावी. बूट पॉलिश केलेले असावेत परंतु चालताना ज्यांचा ‘टकटक’ आवाज येत असेल असे नसावेत. महिलांनी उंच टाचांच्या सँडल्स टाळाव्यात.  बरोबर न चुकता स्वच्छ रुमाल ठेवावा, व खोकला किंवा शिंक आल्यास त्याचा न चुकता उपयोग करावा. मुलाखतीस जाताना दर्पयुक्त बॉडी फ्रेशनर वापरणे टाळावे. चष्मा वापरत असल्यास काचा रंगीत नसाव्यात. बोलताना तोंडात पुटपुटल्यासारखे किंवा वाक्याच्या शेवटचे शब्द ऐकू येत नाहीत असे बोलू नये. बोलताना केवळ एकाच व्यक्तीशी डोळ्याने संपर्क न ठेवता मुलाखत घेणाऱ्या अन्य व्यक्तींच्याकडेही पाहावे व सावकाश, स्पष्ट, मुद्देसूद व आत्मविश्वासाने बोलावे. बोलताना चेहऱ्यावर थोडेसे स्मित ठेवावे. आवाज ओरडल्यासारखा फार मोठा नसावा.

मुलाखतीसाठी प्रवेश करताना, “आत येऊ का?” विचारावे व दिवसाची वेळ जशी असेल त्याप्रमाणे योग्य शब्द वापरून सर्वांना अभिवादन करावे. बसण्यास सांगितल्याशिवाय बसण्याची घाई करू नये. बसताना पायावर पाय टाकून किंवा पाठीमागे रेलून बसू नये. ते उद्धटपणाचे समजले जाते. मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलेला प्रश्न नीट ऐकावा. जर नीट ऐकू आले नसेल तर प्रश्न पुन्हा सांगण्याची विनंती करावी. प्रश्न ऐकल्यानंतर लगेचच उत्तर देण्यापेक्षा त्या प्रश्नासंबंधी काही क्षण विचार करावा, आपले विचार नीट एकत्र करावे, व सुसूत्रपणे मांडावेत. विचारलेल्या प्रश्नाबद्दल आपल्याला जी चांगली माहिती असेल त्याकडे बोलण्याचा ओघ न्यावा. आपण जे बोलतो त्यातूनच मुलाखत घेणारे आपल्याला पुढील प्रश्न  विचारीत असतात. मुलाखत घेणाऱ्यांनाच आपण उलट प्रश्न विचारू नये किंवा तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, चूक आहे असे अभिप्राय देऊ नयेत. उत्तरे देताना कोणत्याही विषयासंबंधी उलटसुलट मते मांडावीत परंतु आपण त्यात समन्वय राखावा. एखादा प्रश्न कितीही खोचक असला तरीही आपला तोल ढळू देऊ नये. प्रश्नाचे उत्तर माहीत नसल्यास, ‘माहीत नाही’ हे सांगणे गैर नाही. उत्तरे देताना पोपटपंची करणे टाळावे व स्वतः काय विचार केला असेल ते सांगावे.

मुलाखत संपताना पुन्हा एकदा मुलाखत घेणाऱ्यांना सस्मित अभिवादन करावे व पायाचा आवाज न करता बाहेर पडावे. मुलाखत ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची व विषयातील ज्ञानाची परीक्षा असते. मुलाखतकार तुम्हाला निवड करण्यासाठी म्हणून प्रश्न विचारत असतात. अशा मुलाखतींची वारंवार स्वतःला सवय करून आत्मविश्वासाने  मुलाखत दिल्यास आपली निवड नक्की होणार ह्याची खात्री बाळगावी. 

(लेखक  महाराष्ट्र राज्याचे 
निवृत्त पोलिस महासंचालक आहेत.)

संबंधित बातम्या