चलो, इक बार फिर से...

प्रवीण टोकेकर
सोमवार, 3 जानेवारी 2022

... मौसम है क्लासिकाना 2.0

चित्रपट माध्यमात आजपर्यंत अनेक स्थित्यंतरं घडली. पण हे स्थित्यंतर कशासाठी घडलं? कथाकथन किंवा स्टोरीटेलिंगसाठी. हा गोष्ट सांगण्याचा व्यवसाय आहे. तो जितका प्राचीन, तितकाच आजही सदाबहार आहे. सिनेमा बदलला, आजही बदलतो आहे, आणि उद्याही बदलणार. बदलत नाही ती गोष्ट सांगण्याची ऊर्मी आणि ऐकण्याची आवड. 

बाज़ीचा-ए-अतफ़ाल है दुनिया मिरे आगे
होता है शब-ओ-रोज़ तमाशा मिरे आगे
-मिर्ज़ा ग़ालिब 

अंथरुणावर पडल्या पडल्या डोळे मिटले की भवताल नष्ट होतो. दिवसभरातली घडलेली, न घडलेली घटितं, आठवणी, दिवास्वप्न, भावचित्रं नवाच खेळ सुरू करतात. मनाच्या भिंतींवर चाललेला हा प्रतिमांचा तुटक खेळ बराच काळ चालू राहातो. कुठल्यातरी अज्ञात क्षणी झोप येते. हलक्या पावलानं खोलीत येऊन कुणी जळणारा दिवा विझवून जावं तशी सगळं काही बंद करुन टाकते.  
माणूस एकटं कधीच नसतं. अद्वैत असतं ते. बोध आणि अबोधाचं. भान आणि बेभानाचं. आपण मनात बोलत असतो सारखं. कुणाशीतरी. हे ‘कुणाशीतरी’ नेमकं असतं कोण? तो आवाज कुणाचा असतो? उदाहरणार्थ, तुम्ही मनातल्या मनात कुणालातरी गोष्ट सांगताय. हे ‘कुणालातरी’ हमखास आपलंच कुणीतरी प्रिय असतं. तोच असतो तो आवाज. 

या प्रतिमांच्या खेळानंच तर माणसाला उत्क्रांतीच्या चरकात ढकललं. ‘माणसानं सांगितलेली पहिली गोष्ट’ हा उत्क्रांतीच्या अभ्यासकांमध्ये फार कुतूहलाची गोष्ट आहे. सुचलेली पहिली गोष्ट माणसानं कशी सांगितली असेल? मनघडंद काही तरी नक्कीच सांगितलं नसणार. रचून काहीतरी सांगता येतं, ही जाणीव बरीच उशिरा झाली असावी. रचून काहीतरी सांगणं म्हंजे तसं बघायला गेलं तर खोटं सांगणं! खोटं बोलण्याची कला तेव्हातरी माणसात नसावी. खोटं बोलायला चांगला प्रगल्भ मेंदू असावा लागतो म्हणे! पण ते जाऊ दे. 

बहुधा एखादी खरीखुरी शिकारकथाही पहिली कथा असू शकेल. कुठल्यातरी टोळीतल्या आदिमानवानं कशी मर्दुमकी गाजवून सावज गारद केलं वगैरे. किंवा एखाद्या विशालकाय मॅमथनं केलेल्या हल्ल्याची असेल. किंवा एखाद्या आदिमातेनं आपल्या लेकराला उगी करण्यासाठी काहीबाही गोष्ट रचून सांगितली असेल. जे काही असेल, त्यात प्रतिमांचाच खेळ होता असावा. आदिम काळातल्या गुहेत प्राण्यांची चित्रं आढळून येतात. त्याकाळी कदाचित भाषा नावाची गोष्ट नसेलही. पण उत्कटतेनं काही व्यक्त व्हायला शब्दांची फारशी गरज पडतही नाही. खरंतर खाणाखुणांचीही पडत नाही. भाषेपलीकडला प्रांत आहे तो. माणसानं प्रतिमांच्या जोरावरच तो काबीज केला...

मेसापोटेमियामधल्या गिलगामेह नावाच्या राजाची गोष्ट ही जगातली लिखित स्वरूपाची सर्वात प्राचीन गोष्ट आहे, असं मानलं जातं. उरुक प्रांताचा हा गिलगामेह नावाचा सम्राट होता. त्याच्या पाच गोष्टी आहेत. याच म्हणे जगातल्या पहिल्या गोष्टी. ख्रिस्तपूर्व दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी घडलेल्या. अर्थात, उत्खननशास्त्राच्या दृष्टीनं हे खरंही असेल, पण आपलं महाभारत नि रामायण कुठे नवं आहे? त्या गोष्टी तर युगानुयुगाच्या आहेत. मुद्दा एवढाच, की गोष्ट सांगण्याची माणसाची प्रेरणा अतिप्राचीन अशीच आहे, त्या प्रेरणेनं आता पंख पसरलेले आहेत, आणि त्या पंखांवरचे रंग दिवसेंदिवस दिलखेचक होत चालले आहेत...

...गोष्ट सांगण्यासाठी माणसानं आता कितीतरी माध्यमं शोधून काढली आहेत. अर्थात शब्द हे त्यातलं मूलभूत माध्यम. त्याला अजून तरी पर्याय मिळालेला नाही. हलत्या चित्रांनी शब्दमुजोरीला थोडा धक्का दिला हे खरंय, पण शब्दाची मातब्बरी अजूनही बऱ्यापैकी टिकून आहे, हे मान्य करायला हवं.

कालांतरानं तंत्रज्ञानानं मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व मिळवलं. इतर अनेक शोधांबरोबरच हलत्या, चालत्या चित्रांचा शोध लागला. ‘एक आगीनगाडी स्टेशनात येतेय’ असं दृश्य पडद्यावर दिसायला लागलं. या दृश्यफितीचे खेळ फ्रान्समध्ये जेव्हा व्हायला लागले, तेव्हा पडद्यासमोर बसलेली माणसं पळून जायची. आगगाडी अंगावर येणार, आणि आपल्याला चेंदून जाणार, या कल्पनेनं पब्लिकचा थरकाप उडायचा. तिथून निघालेलं हे दृकश्राव्य माध्यम आता थेट अंतराळातल्या गोष्टी दाखवतं... रचून सांगतं. थ्रीडी म्हंजे त्रिमित तंत्रज्ञानसुद्धा मर्यादित असून त्याला आणखी एखादी चौथी मिती जोडून कथाकथनाचा परिणाम अधिक प्रभावी कसा करता येईल, यावर हल्ली संशोधनं चालली आहेत. 

तंत्रज्ञान हे असं प्रकरण आहे की ते स्वतःचेच जुने ढाचे मोडतं, आणि नवा ढाचा बनवतं. नवा ढाचा, नवे नियम. चित्रपट तंत्रज्ञानानं नेमकं हेच केलं. ही अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ, अगदी सुरुवातीला चित्रपट अबोल होते. पिटातला वाद्यवृंद पडद्यावरच्या दृश्यांना साजेसं संगीत देत असे. पुढे चित्रपट बोलू लागला. त्यात रंग भरले गेले. कॅमेऱ्याचं तंत्रज्ञान अधिक सुविहीत झालं, आणि नंतर नंतर तर संगणक तंत्रज्ञानानं त्याचा ढाचाच बदलून टाकला. काळे चष्मे लावून थ्रीडी सिनेमे बघायचीही सोय झाली. हल्ली तर हे काळे चष्मे लावणंही तंत्रज्ञांना कमीपणाचं वाटायला लागलंय. उघड्या डोळ्यांनी थ्रीडी दिसलं पाहिजे, असा त्यांचा आटापीटा आहे. लवकरच असलं काहीतरी तंत्रज्ञान अवतरणार, हे वेगळं सांगायची गरज नाही. ग्राफिक तंत्रज्ञानाने तर या क्षेत्रात काहीच्या काहीच क्रांती केली. पूर्वीच्या काळी केशवराव दात्यांच्या एकाच डोळ्याचा क्लोजअप घेताना शांतारामबापूंना कितीतरी तास खर्ची घालावे लागत होते. आज आख्खाच्या आख्खा मानवी डोळा हुबेहूब संगणकावर तयार करता येतो. पडद्यावर दाखवता येतो. त्यातल्या अंगभूत बारकाव्यांसकट. 

फुलपाखरांचे थवे उडताना दाखवण्यासाठी निर्मात्यांना रानोमाळ माणसं पिटाळावी लागत. जाळ्या नि डबे घेऊन ‘प्रॉडक्शन विभागा’चे लोक जंगलात फुलपाखरं पकडायला धावत असत. पुरेशी फुलपाखरं मिळाली की ती जिवंतपणे चित्रीकरणस्थळी आणून ठेवावी लागत, आणि मग हिरॉइनच्या आईचा मूड बघून दृश्य टिपावं लागत असे! एक ना दोन शंभर कटकटी! हल्ली लाखो फुलपाखरं आभाळभर उडतानाची डझनावारी दृश्य दाखवता येतात. ‘शेजारी’ चित्रपटाच्या क्लायमॅक्सला धरण फुटल्याचं दृश्य होतं. त्यासाठी केवढा व्याप करावा लागला, पण आता तुडुंब हिंदकळणारा समुद्र ग्राफिक स्टुडिओतल्या एका संगणकावर अवतरतो. पाण्याच्या थेंबांसकट! 

पूर्वी दोन-तीन तासांचे चित्रपट असायचे. हल्ली ९०-९५ मिनिटांचेसुद्धा चित्रपट असतात, आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’सारखी तासातासाचे ८० एपिसोड असलेल्या सलग महामालिकाही असतात. म्हणजे विशिष्ट कालखंडाचा नियमही या माध्यमानं आता धुडकावला आहे. 

पूर्वीच्या काळी एखादा चित्रपट रीलीज झाला की एक-दोन आठवड्यात डब्यात जायचा किंवा चांगला पंचवीस-पंचवीस आठवडे थेटरात मुक्काम ठोकून असायचा. सिल्वर जुबिली, गोल्डन जुबिली हे फिल्म इंडस्ट्रीचे लाडके आणि हवेहवेसे शब्द होते. हल्ली तेही गेलं. कसली आलीये सिल्वर आणि गोल्डन जुबिली? सगळा जेमतेम दोन-तीन वीकेंडचा कारभार असतो. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसात गल्ला गोळा करायचा, उरलेला पैसा प्रक्षेपणाच्या हक्कात मिळवायचा, बात खतम. 

पूर्वीच्या काळी चित्रपट काही कोटीत बनले तरी जाहिराती काही हजारांच्याच असत. गावगन्ना लागलेली पोस्टर्स आणि सिनेमासिकातले उतारे नि गॉसिप सोडलं तर ‘प्रमोशन’ नावाचं इंगित काही नीटसं गवसलेलं नव्हतं. हल्ली ‘मियां मूठभर नि दाढी हातभर’ या न्यायानं ‘प्रमोशन’चा खर्चच काही कोटींच्या घरात जातो. इतका की तेवढ्या खर्चात दुसरा नवा चित्रपट बनवता येईल. 

हिरो आणि हिरॉइनच्या मानधनांचे आकडे अशीच बदलाची गोष्ट सांगत असतात. पूर्वी स्टुडिओजकडे कलाकारांना पगार मिळत असे. एकाअर्थी ती नोकरीच होती. नंतर भरभक्कम मानधनं मिळायला लागली. पुढे हे आकडे एवढे गगनाला भिडले की आघाडीचे कलाकार थेट वितरणाचे हक्कच मागायला लागले. आजकाल तर बिनीचा हिरो स्वतःच चित्रपटाच्या निर्मिती आणि वितरणात लक्ष घालतो, आणि दामदुपटीनं पैसे मिळवतो. 

पूर्वीच्या काळी सरधोपट, एकरेषीय कथा असायची. सुरुवात, मध्य आणि दी एण्ड. आता कथाकथनाचं तंत्रही अधिक गुंतागुंतीचं आणि आकर्षक झालं. चित्रपटाची गोष्ट अशी अथपासून इतिपर्यंत सांगितलीच पाहिजे असं नाही, काही उलटसुलट खेळ करून ती अधिक रंजक आणि उत्कंठावर्धक करता येते, हे आता नव्या पटकथाकारांनी ओळखलं आहे. 

चित्रपटाचं संगीत हा खरंतर स्वतंत्र विषय आहे. पूर्वीच्याकाळी पाश्चात्य चित्रपटांमध्ये तिथलं ‘क्लासिकल’ म्हणजे सिंफनीज वगैरे वापरल्या जायच्या. आपल्याकडेही गोविंदराव टेंब्यांपासून नौशादपर्यंत दिग्गज संगीतकार हेच काम करत होते. पुढे तंत्रज्ञानानं चित्रपटाचं संगीत देण्याची पद्धतच इतकी बदलून टाकली की हल्ली संगीत तयार केलं जातं. त्याला ‘साऊण्ड’ म्हटलं जातं. वाद्यमेळही बदलला. पूर्वी सत्तर-सत्तर व्हायलिनचा ताफा मुद्रणाच्यावेळी असे. हल्ली सिंथेसायझरची चलती आहे. अर्थात तरीही अभिजात चाली नि संगीत तयार होतच असतं. चालीही कालानुरूप बदलत गेल्या आहेत. हल्ली काय, गाणं कुठल्या भाषेत आहे, यालाही तसं महत्त्व उरलेलं नाही. 

हे सगळं स्थित्यंतर कशासाठी घडलं? कथाकथन किंवा स्टोरीटेलिंगसाठी. हा गोष्ट सांगण्याचा व्यवसाय आहे. तो जितका प्राचीन, तितकाच आजही सदाबहार आहे. सिनेमा बदलला, आजही बदलतो आहे, आणि उद्याही बदलणार. बदलत नाही ती गोष्ट सांगण्याची ऊर्मी आणि ऐकण्याची आवड. गोष्ट सांगायची म्हटली तर ती आधी सुचावी लागते. त्यासाठी प्रतिभा लागते. ती आता कुठनं आणायची?

यावर एक उपाय म्हणजे इतरांना सुचलेल्या गोष्टीच आपण नव्यानं सांगायच्या.  

याच ऊर्मीतून काही वर्षांपूर्वी ‘सकाळ’च्या रविवार पुरवणीत ‘...मौसम है क्लासिकाना’ हे सदर लिहायला सुरुवात केली. साधी सोप्पी कल्पना होती- आवडलेल्या चित्रपटांची गोष्ट नव्या उत्साहानं सांगायची. जमेल तशी. हे आवडलेले चित्रपट बव्हंशी इंग्रजी किंवा अन्य परदेशी भाषांमधले होते. लहानपणापासून पाहिलेले. अगदी पुन्हा पुन्हा आवडीनं पाहिलेले. तो चित्रपट आपल्याला जसा कळला, आवडला, तस्साच तो इतर सुहृदांनाही आवडावा, अशा असोशीनं ती रसग्रहणं लिहिली होती. नाक्यावरच्या दोस्तमंडळीत नवा चित्रपट बघून आल्यानंतर एखादा येरु फुल्ल अंगविक्षेप करत ष्टोरी सांगतो, तशाच ऊर्मीनं ते सदर लिहिलं होतं. त्यात विद्वत्ता किंवा काही फार जीवनविषयक सखोल चिंतन वगैरे भयंकर गोष्टी नव्हत्या. होतं ते दुर्दम्य उत्साहातून आलेलं पुनर्कथन! गाजलेल्या अभिजात चित्रपटांवरच नव्यानं लिहायचं मुद्दामच ठरवलं होतं. मागल्या पिढ्यांनी ते अर्थात बघितलेलेच सिनेमे होते. पण त्यावर नव्यानं काही लिहिल्यानं पुनःप्रत्ययाचा का काय म्हणतात, तो आनंद मिळाला. - निदान लिहिणाऱ्याला!

आश्चर्याची गोष्ट म्हणजे वाचकांनाही तो प्रकार आवडला. उदंड प्रतिसाद मिळाला. दोनेक वर्षात तब्बल शंभरावर चित्रपटांची रसग्रहणं लिहून झाली, पण वाचकांच्या उत्साहाला खळ नव्हता. शेवटी आणखी किती लिहिणार? असं स्वतःशीच म्हणत ते सदर बंद केलं. सदर का थांबवलं? पुन्हा लिहिणार का? त्या अमक्या अमक्या चित्रपटावर का नाही लिहिलंत? पुस्तक कधी काढणार? अशा विचारणा करणारी पत्रांवर पत्र आली, अजूनही येत आहेत. शेवटी नव्या स्वरूपात तेच सदर पुन्हा लिहायचं ठरवलं आणि पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. 

‘मौसम है क्लासिकाना’च्या या दुसऱ्या पर्वात आपणही थोडं बदलायला हवं. गेल्या काही दशकांमध्ये चित्रपटांचं क्षेत्र प्रचंड विस्तारलं आहे. पडद्यावरून ते थेट हातातल्या मोबाइल फोनमध्ये आलं. त्यानुसार त्याचा स्वभावही बदलला. त्याचाही आपण थोडा ठाव शोधण्याचा प्रयत्न करूया. ओटीटी मंचांवर जगभरातल्या विविध देशातले डझनावारी चित्रपट येऊन पडत असतात. पोलिश, टर्की, अरेबिक, नॉर्वेकडले, जपानी, कोरियन... कितीतरी. भाषा कुठलीही असली तरी इंग्रजीचा टेकू त्यांना असतोच. परवा तर युगांडात तयार झालेला एक चित्रपट बघायला मिळाला! असल्या चित्रपटांचाही जरा समाचार घेऊ या. ओटीटीच्या महासागरात सगळेच काही मोती मिळत नाहीत, हे तर मान्यच. तिथंही भरपूर कचरा असतो. थोडा तोदेखील सावडूया. 

शेवटी ग़ालिब म्हणतो तशी ही एक फूलबाग आहे. आपण कोपऱ्यातल्या बाकड्यावर आहोत, समोरच्या हिरवळीवर बालबच्चे खेळताहेत. कुणी घसरगुंडीवर आहे, कुणी झोपाळ्यावर. आपण गंमत बघायची. डोळ्यांसमोर अहर्निश चालणारा हा प्रतिमांचा खेळ आणि आपण यांचंही एक अद्वैत असतंच.

 

संबंधित बातम्या