अभावातही भाव उराशी...

प्रवीण टोकेकर
सोमवार, 10 जानेवारी 2022

... मौसम है क्लासिकाना 2.0

जगातल्या आत्तापर्यंतच्या  दहा किंवा बारा सर्वोत्कृष्ट चित्रपटांची यादी काढली तर ‘बायसिकल थीफ’ हे नाव लिहावंच लागेल. इलाजच नाही. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात घराणी असतात- आग्रा घराणं, जयपूर-अत्रौली, ग्वाल्हेर किंवा मेवाती घराणं वगैरे. ‘बायसिकल थीफ’नं एक आपलं घराणं सुरू केलं. आजही त्यात भर पडतच  असते. काय होतं एवढं या चित्रपटामध्ये? एवढं कुठलं भारी कथानक होतं? की त्यानं एवढी मन्वंतरं घडवावीत?

जगभर कितीतरी चित्रपट दरसाल निघत असतात. त्यातले बहुसंख्य टुकार, टाइमपास, तर काही लक्ष चाळवणारे असतात. काही थक्क करून टाकणारे, काही डोळे दिपवणारे, काही अस्वस्थ करणारे नि काही मनात खोलवर चरा उठवून जाणारे.

एखाद्या कातरवेळी त्या चित्रपटातल्या निवडक चौकटी समोर तरंगतात. डोळ्यात पाणीबिणी येत नाही, पण हळवं व्हायला होतं. हा चित्रपट पुन्हा एकदा पाहायला हवा, अशी ऊर्मी दाटून येते. ते पाहणंही होत नाहीच. कातरवेळ गेली की या चित्रचौकटीही गायब होतात. मग लक्षात येतं की, अरेच्चा, त्या सिनेमातल्या चौकटी नव्हत्याच.  ती आपलीच मनोवस्था होती...

लहानपणी खेळताना खोक पडल्याची खूण जन्मभर वागवावी लागते तशापैकी असतात या चौकटी. खूप वर्षांनंतर कधीतरी, त्या जखमेचा व्रण बघून, चिमुकल्या बोटांनी आपली हनुवटी ओढत  एखादं लहान पोर कुतूहलानं विचारतं, तू पडला होता? कुथे? खूप लक्त आलं? सांग, सांग ना...

उत्तर नसतं आपल्यापाशी. जखम बुजलेली असते नि त्या वेदनाच काय, प्रसंगसुद्धा धड आठवत नसतो. पण व्रण राहातोच. 

‘बायसिकल थीफ’ हा नितांतसुंदर चित्रपट अशाच एका जुन्या जखमेच्या व्रणासारखा आहे. फरक इतकाच की इतकी वर्षं झाली तरी तो अधूनमधून थोडा कासावीस करतो. जगातल्या आत्तापर्यंतच्या  दहा किंवा बारा सर्वोत्कृष्ट चित्रपटांची यादी काढली तर ‘बायसिकल थीफ’ हे नाव लिहावंच लागेल. इलाजच नाही.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळत होतं, त्या काळात या चित्रपटाचं रोममध्ये शूटिंग चाललं होतं. १९४८च्या ऑगस्ट महिन्यात हा चित्रपट इटलीत प्रदर्शित झाला. अर्थात तेव्हा त्याचं नाव ‘लार्द्री द बायसिक्लेत’ असं होतं. लार्द्र म्हणजे इटालियन भाषेत चोर. लार्द्री हे बहुवचन.

या चित्रपटात कोणीही रुढार्थानं अभिनेता किंवा चित्रपटसितारा नव्हता. सगळे नवखे. बजेटची अवस्था इतकी तोळामासा होती की दिग्दर्शक वितोरिओ डी सिकानं स्वतःच उधारउसनवारी करून पैसे जमवून हा चित्रपट जमवून आणला. हिरो ठरलेला नव्हता. एका कारखान्यात टर्नरचं काम करणारा कामगार निवडला. लॅम्बेर्तो माजिओरॅनी नावाचा हा कामगार काही कारण नसताना पुढे जगप्रसिद्ध सितारा झाला, पण अर्थात त्यामुळे त्याचं नशीब काही बदललं नाहीच. 

गर्दीतली पोरं हुडकली. आसपासच्या दुकानदारांना बाबापुता करून सिनेमात काम करायला तयार केलं. नाना तऱ्हेची माणसं हुडकली, नि त्यांना रंग फासून तयार केलं. 

सेट वगैरे उभं करण्यासाठी पैसेच नव्हते. मग? सोप्पा उपाय! थेट लोकेशनवर जाऊन गर्दीत शूटिंग करून टाकायचं. रिटेक वगैरे कटकटी कमीतकमी ठेवायच्या. सगळाच कडका कारभार.

त्या अभावातही भाव उराशी जपलेला होता दिग्दर्शक डी सिकानं. तेच त्याचं मुख्य भांडवल. 

साधं सोपं कथानक. एक लहरी, मोडक्या तिकाटण्यावरचा सुमार कॅमेरा. चालला तर चालला, नाहीतर अडून बसला, असा. आणि नव्या स्वप्नानं भारलेला, नव्या प्रतिमांचं जंजाळ डोक्यात घेऊन चलतचित्रांचं जग बदलू पाहणारा भन्नाट दिग्दर्शक. 

‘बायसिकल थीफ’ असा घडला. तो पुढे अमेरिका-युरोपात दाखवला गेला. इंग्रजीत डबिंग वगैरे केल्यानंतर त्याचं नामकरण  घडलं- बायसिकल थीव्ज! हे बहुवचन पुढे इंग्लंडमध्ये गळून पडलं. त्याचं झालं असं की पोस्टर तयार करणाऱ्यानं एकाच सायकलचोराची कहाणी आहे, असं समजून ‘बायसिकल थीफ’ असं छापून टाकलं. तेच आज जगात प्रसिद्ध आहे. इतकंच नव्हे, तर तेच सयुक्तिक असल्याचे दावे किंवा प्रतिदावे समीक्षक हिरिरीनं करत आले आहेत. 

पुढे या चित्रपटाला सन्मानपूर्वक विशेष ऑस्कर पुरस्कार दिला गेला. आपल्या सत्यजित राय, बिमल रॉयपासून कित्येक दिग्गज दिग्दर्शकांनी या चित्रपटाला जाहीर सलाम ठोकले. नुसता सलाम ठोकून ते थांबले नाहीत. ‘बायसिकल थीफ’ मधला नववास्तववाद त्यांनी आपापल्या कलाकृतींमधून पुढं नेला. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात घराणी असतात- आग्रा घराणं, जयपूर-अत्रौली, ग्वाल्हेर किंवा मेवाती घराणं वगैरे. ‘बायसिकल थीफ’ नं एक आपलं घराणं सुरू केलं. आजही त्यात भर पडतच  असते. काय होतं एवढं या चित्रपटामध्ये? एवढं कुठलं भारी कथानक होतं? की त्यानं एवढी मन्वंतरं घडवावीत?

* * *
रोम हे तसं गजबजलेलं शहर. आडवंतिडवं पसरलेलं. अगदी १९४०च्या सुमारासही ते तसं होतं. हा सुमार असेल १९४५चा. दुसरं महायुद्ध नुकतंच संपलं होतं. हिटलर नावाचा नरराक्षस मेला होता, आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे बेनितो मुसोलिनीची फॅसिस्ट राजवट एका चौकात तितक्याच क्रूरपणे संपवण्यात आली होती. मुसोलिनी आणि त्याची प्रेयसी क्लारा पेटाची यांचे मृतदेह  मिलानच्या चौकात उलटे टांगून त्यांची विटंबना करण्यात आली होती.

युद्धाचे दळभद्री ढग पांगल्यानंतर लोक जगरहाटीला लागले. हाताला काम शोधू लागले. गिळायला दोन घास कुठं मिळतील, याची शोधाशोध सुरू झाली. शहराबाहेर काही कारखाने निघत होते. त्यातल्याच एका कारखान्यात होता अंतोनिओ रिची.  

अंतोनिओ हा एक नाकासमोर चालणारा एक साधासुधा अनपढ  कामगार. राकट हातांचा. ओबडधोबड. काळ्याला काळं नि पांढऱ्याला पांढरं म्हणणारा. छक्केपंजे नाहीत. तो, त्याची प्रेमळ आणि तितकीच खमकी बायको मारिया, तिच्या कडेवरचं तान्हं मूल आणि एक चिमखडा हाताबुडी येऊ घातलेला चंट मुलगा ब्रुनो. 

चौकोनी कुटुंब. पण हातातोंडाशी गाठ पडणं मुश्कील झालेलं. कुणी नोकरीच देत नव्हतं. युद्धाचे परिणाम जाणवत होते. रोजगार अधिकारी हाकलून देत असत.

एक दिवस रोजगार अधिकाऱ्यानं हटकलं, ‘‘अंतोनिओ, तुझ्याकडे सायकल आहे का?’’

‘‘नाही ना!’’ अंतोनिओ.

‘‘मग कठीण आहे. सायकल असेल, तर नोकरी आहे एक...पोस्टर डकवण्याची,’’ अधिकारी कोरडेपणानं म्हणाला. 

अंतोनिओ हळहळला. सायकल असती तर आज हाताला काम मिळालं असतं. त्यानं जवळजवळ  नकार दिलाच होता.

मारियाला मात्र हे पटलं नाही. तिनं घरात नजर फिरवली. लग्नात माहेरच्यांनी दिलेले महागडे पलंगपोस होते. महागाची म्हणाल तर तेवढीच वस्तू घरात उरली होती. तिनं विचार न करता ते पलंगपोस गुंडाळले. घड्या करून दोन गल्ल्या सोडून पलीकडच्या दुकानदारासमोर नेऊन आदळले. त्यानं मोजून काही लिरा दिल्या. तेवढ्यात सायकल नक्की आली असती.

...अशी घेतली अंतोनिओनं आपली सायकल. पोरगं, ब्रुनोसुद्धा खूश झालं. नोकरी चालू होणार, या कल्पनेनं अंतोनिओ खुशालला. नोकरीच्या दिवशी घरातून निघताना जिन्यात आला. बायकोपोरांशी बडबडत असतानाच भयंकर गोष्ट घडली. जिन्यालगत ठेवलेली त्याची सायकल कुण्या चोरानं उचलून नेली. डोळ्यांदेखत!

अरे, अरे अरे! अंतोनिओनं त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न केला. पण छे, गुंगारा देऊन तो पळालाच. हाताशी आलेली नवीकोरी सायकल गेली. आता नोकरी? अंतोनिओ चरफडला. तो आणि त्याचा मुलगा ब्रुनो, सायकल शोधायला बाहेर पडले. 

सायकलसाठी या बापलेकांची जी तिरपीट झाली, तेच या चित्रपटाचं कथानक आहे.

बघायला गेलं तर यात काय थरारक किंवा चित्रपटीय आहे किंवा होतं? पण स्वतःचीच स्वकष्टानं मिळवलेली सायकल परत मिळवण्यासाठी या बापलेकांना जे काही भोगावं लागतं, जो संघर्ष करावा लागतो, त्यात या चित्रपटाचा सारा अर्क साकळलेला आहे. महायुद्धानंतरची आर्थिक हलाखी, लोकजीवन, दांभिकपणा, स्वार्थ, निरागसतेचं मूल्य कसं हरवून गेलं आहे, त्याचं चित्रण...हे सगळं ‘बायसिकल थीफ’नं इतक्या तटस्थपणे दाखवलं की कलावंतांचं जग हादरूनच गेलं. सिनेमा असाही असतो? हा जो साक्षात्कारी सवाल या चित्रपटानं उभा केला होता, त्याचं उत्तरही देऊन टाकलं होतं : होय, असाच असतो सिनेमा!

* * *

सुरूवातीला सांगितलं त्याप्रमाणे या चित्रपटात कोणीही महासितारा नव्हता. इटलीतले एक लेखक होते- बार्तोलिनी. चांगली सत्तरेक पुस्तकं लिहिलेले. त्यांची एक गोष्ट होती. ‘लार्द्री दी बायसिक्लेत’ नावाची. वितोरिओ झ्जावानिनी नावाच्या आपल्या सहलेखकाच्या मदतीनं डी सिकानं स्वत:च पटकथा तयार करून घेतली. ‘गॉन विथ द विंड’वाल्या पीटर ओ सेल्झनिकपर्यंत या पटकथेची बातमी गेली होती. त्याचं म्हणणं होतं की कोणीतरी बलदंड सितारा घेऊन चित्रपट करावा. डी सिकाच्या मनात हेन्री फोंडा हे नाव होतं. पण सगळीच दानं उलटी पडत गेली आणि शेवटी एकही प्रस्थापित नट किंवा नटी न घेता सिनेमा पूर्ण करण्याचा निर्णय डी सिकानं घेतला.

अंतोनिओ रिचीचा रोल करणारा लॅम्बेर्तो माजिओरानी एक टर्नर होता, हे वर सांगितलं आहेच. ऑडिशनच्या वेळेला तो आपल्या बारक्या पोराबरोबरच आला होता. त्याची निवड झाली. कॅमेरा कशाशी खातात हे त्याला माहीत नव्हतं. पण त्याचं ते बावचळलेपण, संकोची स्वभाव याचा भूमिकेला चपखल  उपयोग झाला. लॅम्बेर्तो हा कामगार असला तरी डी सिकानं त्याची बडदास्त एखाद्या सिताऱ्यासारखी ठेवली हे मात्र खरं. त्याला कामाचे सहा हजार लिरा म्हणजे त्याकाळचे हजारभर डॉलर्स दिले. त्याच्यासाठी हा मोबदला अफाटच होता. चित्रपटाच्या धामधुमीत लॅम्बेर्तोची टर्नरची नोकरी गेली.

मालक पुन्हा कामावर घेईना. म्हणाला, ‘‘कशाला मस्करी करता, शेठ! लाखो कमवाल की! तुमच्यासारख्या स्टारलोकांना असल्या नोकरीवर ठेवलं तर लोक शेण घालतील माझ्या तोंडात!’’ 

लॅम्बेर्तोला शेवटपर्यंत नोकरी, कामधंदा मिळाला नाही. रुटुखुटू, एक्स्ट्राचे रोल करत त्यानं पोट जाळलं. डी सिकानंही त्याला नंतर काम दिलं नाही, हे विशेष. एका सार्वजनिक इस्पितळात तो पुढे एकांड्या अवस्थेत मेला. 

खंगलेल्या अवस्थेत तो इस्पितळाच्या खाटेवर पडून हसत म्हणायचा: ‘‘माझी सायकल चोरीला गेली ती गेलीच, पुन्हा मिळालीच नाही. बहुधा ती माझ्या नशिबातच नव्हती...’’

मारिया झालेली लायनेला कॅरेल ही तर रीतसर पत्रकार होती. पूर्णवेळ नव्हे, उगीच ‘हौसेला मोल नसतं’ टाइप! तिला डी सिकाची मुलाखत घ्यायची होती. मुलाखतीला ती आली, आणि डी सिकानं थेट विचारलंच : ‘‘सिनेमात काम करतेस का आमच्या?’’

ब्रुनोची सुंदर भूमिका करून जगभर नाव झालेल्या एन्झो स्टायोलाची कहाणी तर वेगळीच. बापाबरोबर तो रोमच्या चौकात चक्क फुलं विकत होता. तेवढ्यात त्याला शूटिंग चाललेलं दिसलं. वाभरं पोर ते, थांबलं गर्दीत! दिग्दर्शक डी सिकाच्या नजरेला पडलं आणि बात बन गई.

नाहीतरी तोवर डी सिकाला, अंतोनिओच्या पोराच्या भूमिकेसाठी मनासारखा बच्चा सापडत नव्हताच. त्यानं स्टायोलाला हेरलं, आणि थेट कॅमेऱ्यासमोर उभं केलं. सर्जिओ लिओनीचंही असंच. तो डी सिकाचा सहायक दिग्दर्शक होता. त्यालाच त्यानं पाद्री करून टाकलं. हाच लिओनी पुढे ‘स्पॅघेटी वेस्टर्नपटां’चा हॉलिवूडमधला प्रणेता ठरला. त्याचे ‘द गुड द बॅड द अग्ली’, ‘फॉर अ फ्यू डॉलर्स मोअर’ कोण विसरेल? याच सर्गिओनं पुढे ‘बेन हर’ या महाचित्रपटातली रथांची शर्यत चित्रित करण्यात सहभाग घेतला, त्याची टिपणंही काढली. ती पुढे कित्येक चित्रपट अभ्यासकांनी अभ्यासली.

या चित्रपटात अनेक गर्दीची दृश्यं आहेत. ती मात्र डी सिकानं स्वत: मेहनत करून, भर रस्त्यात शिस्तीत चित्रित केली. रोममधला एक प्रसिद्ध चौक आहे. त्या चौकात एकदा शूटिंग होतं. हीऽऽ तुंबळ गर्दी!  शूटिंगचा कुठलाही परवाना न काढता युनिट पोचलं होतं. वाहनांची वर्दळ थांबवणं अशक्य होतं. शेवटी प्रॉडक्शनचा मोरेत्ती स्वत: ट्रॅफिक हवालदाराचा पोशाख करून उतरला. त्यानं शिट्या मारत सगळी वाहतूक काही काळ वळवली. हे सगळं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यांनी मोरेत्तीला अटक केली. तो हसत हसत पोलिसांच्या गाडीत चढला तेव्हा चित्रीकरणाचं युनिट काम संपवून गाशा गुंडाळत होतं. असे कितीतरी किस्से या चित्रपटाबद्दल सांगता येतील.

डी सिकाच्या ‘बायसिकल थीफ’मधला नववास्तववाद हे पन्नाशीच्या दशकात तरी नवंच प्रकरण होतं. तेव्हाही त्याच्यावर टीका झालीच. इटलीतलं दारिद्र्य इतकं ढळढळीतपणे जगासमोर मांडण्याची काही गरज होती का, असा कडवट सवालही त्याला विचारला गेला. इटलीत तर प्रेक्षकांनी सुरुवातीला नाकंही मुरडली. 

‘बायसिकल थीफ’चं खरं कौतुक झालं ते अमेरिकेत आणि इंग्लंडात. तोवर सिनेमा म्हणजे ग्लॅमर, चकाचौंध करणाऱ्या मनोरंजक कहाण्या, संगीत असल्याच ठाशीव कल्पना होत्या. डी सिकानं ते सगळं एका फटक्यात बदलून टाकलं. कालांतरानं तेव्हाचा बेजोड अभिनेता आणि सितारा हेन्री फोंडा यानं चित्रपट बघितला आणि तो कमालीचा अस्वस्थ झाला. एका चाहत्यानं लिहावं, तसं भक्तिभावानं ओथंबलेलं पत्रच त्यानं डी सिकाला पाठवलं. आपल्याकडे सत्यजित राय, बिमलदा यांचीही अवस्था यापेक्षा फार वेगळी झाली नव्हती. त्यांनी तर हा नववास्तववादी चित्रपटांचा प्रवाह भारतात आणला. ‘पथेर पांचाली’मध्ये त्याचा प्रभाव आपल्याला दिसत राहातो, तो त्यामुळेच.

काही वर्षांपूर्वी असाच एक चित्रपट मराठीत आला होता. ना कुणी सितारे, ना कुणी बडी बडी नावं. एक प्रेमकथा, जिला रोमांचक वळणं नाहीत. वास्तवाची धार मात्र जरूर आहे, अशी प्रेमकहाणी होती ती. दिग्दर्शकही असाच डी सिकासारखा पेटलेला. आपला नागराज मंजुळे आणि त्याचा तो मन्वंतरकारी चित्रपट ‘सैराट’.

हे असलं काही बघितलं की उर अभिमानानं भरून येतो. अभावातला भाव दाटून येतो. तो जुना जखमेचा व्रण बोटांनी चाचपावासा वाटतो. बालपण आठवतं. त्या व्रणाची हरवलेली कहाणी मन शोधू लागतं.

 

संबंधित बातम्या