क्रांतीची मशाल...

प्रवीण टोकेकर
सोमवार, 17 जानेवारी 2022

... मौसम है क्लासिकाना 2.0

सतराव्या शतकात ब्रिटिश राजसत्तेनं शेवटचा घाला घालत आयर्लंडचा घास घेतला, सगळा देश ब्रिटिश राजघराण्याच्या दावणीला बांधला गेला. दमनयंत्रापुढे सामान्य जनतेचं फारसं काही चालत नसतं. 

आयर्लंडच्या उत्तरेला एक आळसटलेलं, पण टुमदार गाव आहे. आयरिश लोक त्याला नुसतंच क्लोन म्हणतात. वस्ती पाचेक हजारांची असेल नसेल. वर्षातून एकदा तिथं गर्दी दाटते. पर्यटकांच्या झुंडी जातात. मोठ्या रस्त्यालगतच एक वस्तुसंग्रहालय आहे. तिथं कुण्या मायकेल कॉलिन्स नामक स्वातंत्र्यवीरानं लिहिलेली टिपणं, डायऱ्या, पेनं, टेबल-खुर्च्या असं काहीबाही ठेवलं आहे. कोण हा मायकेल कॉलिन्स?

हा आहे आयर्लंडच्या मुक्तीसंग्रामाचा एक जहाल नेता. ज्यानं स्वतंत्र आयर्लंडसाठी ब्रिटिश साम्राज्याशी जबरदस्त लढा दिला. बॉम्बस्फोटांनी साम्राज्य हलवलं. जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश राजसत्तेला जेरीला आणलं. इथं भारतात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी असंतोषाचा अग्नी पेटवला होता. त्या यज्ञाच्या झळा साम्राज्याला बसत होत्या. त्याच काळात आयर्लंडच्या स्वातंत्र्यलढ्याला मायकेल कॉलिन्सनं कळसाला नेलं होतं. 

सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ‘मायकेल कॉलिन्स’ याच नावाचा एक चित्रपट येऊन गेला होता. मोठ्या काटेकोरपणे केलेला. काटेकोर अशासाठी म्हणायचं की ब्रिटिशांची तपशीलवार इतिहास नोंदवायची खोड तिथं कामाला आली होती. नील जॉर्डन नामक दिग्दर्शक-लेखकानं आपलं सर्वस्व पणाला लावून हा चित्रपट  केलेला होता. त्याला ऑस्कर नामांकनं होतीच. नंतर व्हेनिसमध्येही तो गौरवला गेला. पण ब्रिटिश अकादमीनंही त्या चित्रनिर्मितीची बूज राखली, हे विशेष होतं. हे थोरच. ‘या माणसानं आमचं नाक ठेचलं होतं बरं का, बघा, बघा!’ असं म्हणण्यापैकीच हे!! 

मुंबईतल्या ब्रिटिश कौन्सिलतर्फे १९९७च्या सुमाराला या चित्रपटाचा एक स्पेशल खेळ ठेवण्यात आला होता. बहुधा ‘रिगल’ सिनेमागृहात. तिथं हा चित्रपट इन्यागिन्या नामवंत प्रेक्षकांसमवेत बघायची संधी मिळाली होती. 

बाबा आमटे यांची एक कविता आठवतेय-

क्रांती ही सीतेसारखे असते,

ती वनवासी रामाची साथ करते.

जेव्हा तो मर्यादित पुरुषोत्तम 

सिंहासनावर आरूढ होतो,

तेव्हा ती पृथ्वीच्या उदरात गडप होते…

….अशा काहीशा त्यांच्या ओळी आहेत. ‘मायकेल कॉलिन्स’ बघताना हाच अनुभव येतो. हा चित्रपट बघण्याचं आणखी एक कारण आहे. लिएम नीसन या भन्नाट अभिनेत्यानं त्यात मायकेल कॉलिन्सची भूमिका साकारली आहे. खुद्द नीसन आयरिश रक्ताचा. याच नीसननं पुढे ‘शिंडलर्स लिस्ट’मध्ये कसला भारी रोल केला होता. ‘टेकन’ या मारधाडपटांच्या मालिकेतही त्यानं ‘ब्रायन मिल्स’ची भूमिका सॉलिड केली होती. नीसन आता म्हातारा झालाय. मायकेल कॉलिन्सचा रोल केला, तेव्हाच तो ४३ वर्षांचा होता. कॉलिन्सचं प्रियपात्र किटी किअर्ननचा रोल ज्युलिया रॉबर्टसनं साकार केलाय, तर डी व्हॅलेराची बेजोड भूमिका दिग्गज ब्रिटिश कलावंत ॲलन रिकमननं केली आहे. 

एका स्वातंत्र्यवीराला आयरिश सिनेकलावंतांनी केलेला हा एक अनोखा सॅल्युट आहे. 

***

इंग्लिश राजघराण्याच्या आधिपत्याखाली बरीच वर्षे काढल्यानंतर गेल्या शतकाच्या सुरूवातीला आयर्लंड हट्टानं फुटून निघालं. पाठोपाठ तिथं यादवी झाली. आयर्लंड प्रजासत्ताक स्वतंत्र झालं, तरी उत्तर आयर्लंड मात्र स्वखुशीनं ब्रिटिश साम्राज्याशी नातं जोडून राहिलं. आयर्लंडलाही जे स्वातंत्र्य मिळालं, तेही मारुन मुटकून -देणेकऱ्यानं  हप्त्याहप्त्यानं रक्कम परत करावी, तसं. 

ब्रिटिशांनी १९२१ साली आयर्लंडला नाखुशीनं स्वातंत्र्य दिलं, पण राजघराण्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घालून! ते अनेकांना मंजूर नव्हतं. पण एक गडी असा निघाला, तो म्हणाला की तसं तर तसं. सध्या एवढं तरी पदरात पाडून घेऊ. मग पुढचं पुढं बघता येईल.

त्याबद्दल त्याला भर रस्त्यात गोळ्या घालण्यात आल्या.

***

दृश्य एक : दणकट बांधा. उंचनींच तरुण. डोळ्यात कडवट असमाधान. मायकेल कॉलिन्स नावाचा बंडखोर तरुण रॉयल आयरिश लष्कराशी दोन हात करतोय. आपल्या लाडक्या आयर्लंडच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची पर्वा न करता रणकुंडात उतरलाय. डोळ्यात खून उतरलाय. रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले? 

दृश्य दोन : तोच दणकट  बांध्याचा तरुण. तेच असमाधान. तसाच लढतोय. पण ते आयरिश बंडखोरांशी. आयरिश लष्कराच्या खांद्याला खांदा भिडवून तो रणकुंडात उतरलाय. शांततापूर्ण स्वातंत्र्यासाठी कुणी गद्दार म्हटलं तरी त्याला चालणार आहे. पण हातात आलेलं स्वातंत्र्य त्याला घालवायचं नाही.

यातलं कुठलं दृश्य खरं? 

मायकेल कॉलिन्सचं आयुष्य असं विसंगती, विरोधाभासांनी भरलेलं होतं. जनरल  पोस्टातला हा एक साधा कारकून. पण मन सैनिकाचं. आयरिश संस्कृती, तिथली गेलिक भाषा, राहणीमान याचा अभिमान बाळगणारं. पण…पण…बलाढ्य ब्रिटिश सैन्याच्या ‘अरे’ला ‘कारे’ करणारा मायकेल कॉलिन्स पुढे अर्ध्यामुर्ध्या स्वातंत्र्यावर समाधानी कसा काय झाला? काय होतं त्याच्या मनात? 

त्याचीच ही गोष्ट आहे.

***

तो साधारणतः १९१४-१५चा सुमार असेल. आयर्लंड धगधगत  होता. ‘पूर्वेकडला उठाव’ असं संबोधन त्याला इतिहासात लाभलं आहे. या उठावाच्या केंद्रस्थानी होती डब्लिनमधल्या ओकॉनल मार्गावरली मुख्य टपाल कचेरी. या इमारतीतूनच बंडखोर हालचाली करत होते. याच इमारतीच्या प्रशस्त प्रांगणात पॅट्रिक पिअर्सनं आयरिश स्वातंत्र्याचा संकल्प वाचून दाखवला होता. थॉमस मॅक्डोना, टॉम क्लार्क, जेम्स कॉनोली हे त्याचे साथीदार होते. एक पोरसवदा बंडखोरही त्यांच्यात होता. मायकेल कॉलिन्स. डी व्हॅलेरा त्यांचा म्होरक्या होता.  

पुढे हा उठाव ब्रिटिश राजवटीनं फार क्रूरपणे चिरडला. याच डब्लिनच्या मुख्यालयात बंडखोर शरण आले. पिअर्स, कॉनोली, मॅक्डोना यांना फासावर चढवण्यात आलं. डी व्हॅलेरानं फाशी चतुराईनं टाळली, कारण तो मुळात आयरिश असला तरी त्याच्याकडे अमेरिकी नागरिकत्व होतं. त्याला तुरुंगात डांबण्यात आलं. तुरुंगात त्याला मायकेल कॉलिन्स आणि हॅरी बोलँड भेटले.

पूर्वेचा उठाव असा दाबून टाकल्याचा परिणाम संपूर्ण आयर्लंडवर झाला. लोकांची सहानुभूती स्वातंत्र्यासाठी भांडणाऱ्या या तरुणांकडे झुकू लागली. सिन फिएन ही बंडखोरांची संघटना लोकप्रिय होऊ लागली. १९१८ साली सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्यात सिन फिएनच्या मंडळींना भरघोस यश मिळालं. त्यांनी ताबडतोब जल्लोष करत आयरिश स्वातंत्र्याची परस्पर घोषणा करून टाकली. डी व्हॅलेरा आयर्लंडचा राष्ट्राध्यक्ष झाला, आणि आयरिश रिपब्लिकन आर्मीचा प्रमुख झाला मायकेल कॉलिन्स. (‘आयआरए’ या नावानं पुढे ही फौज नावारूपाला आली.) अर्थात गुप्तचर विभागही त्याच्याच अखत्यारीत आल्यानं सत्ता त्याच्या हाती अचानक एकवटली होती. हे सगळं अर्थात ब्रिटिश राजवटीला मंजूर नव्हतंच.

नेड ब्रॉय हा खरं तर राजनिष्ठावंतांपैकी एक लष्करी अधिकारी होता. पण स्वातंत्र्यलढ्याला त्याची सहानुभूतीही होती. त्यानं कॉलिन्सला खबर दिली की बहुतेकांना सुळावर चढवण्याची योजना लंडनमध्ये शिजतेय. कॉलिन्सनं हा प्रकार डी व्हॅलेराच्या कानावर घातला. पण त्याचं म्हणणं पडलं की, ‘करू देत अटक. त्यांनाच भोगावं लागेल!’ मायकेल कॉलिन्स आणि हॅरी बोलँड सटकले, बाकीचे कटवाले पकडले गेले.

भूमिगत राहून स्वातंत्र्ययुद्ध चालवायची जबाबदारी आता एकट्या मायकेल कॉलिन्सवर येऊन पडली होती.

***

कॉलिन्स आणि बोलँड हे दोघेही तसे बालमित्रच म्हणायचे. दोघांची जोडी अशी अभिन्न की त्यांची मैत्रीणही एकच होती- केटी किअर्नन. खरं तर ती बोलँडची प्रेयसी, पण कॉलिन्सला मनोमन आवडायची. ‘‘तुमच्या दोघा बंदुकवाल्यांपैकी कोण माझ्यासोबत नाचायला येणारेय?’’ असं ती नाक वर करून विचारायची. मग बोलँडकडे बघत कॉलिन्स तिला नृत्यभूमीकडे घेऊन जायचा.

प्रणयभूमीवर हे खेळ चालले होते, आणि रणभूमीवर आग अधिकाधिक तेज होत होती. कॉलिन्सनं आयरिश रिपब्लिकन आर्मीचे हल्ले तेज करत नेले. या काळात कॉलिन्सनं ब्रिटिश राजवटीमधल्या धेंडांची झोप उडवली होती.

कर्नल सोएम्स नावाच्या एका कर्दनकाळ अधिकाऱ्याला ‘आयआरए’ची नाकेबंदी करण्याचं फर्मान सुटलं. सोएम्स हा अतिशय कर्तबगार आणि पाताळयंत्री होता. त्यानं कॉलिन्सची माणसं हुडकायला प्रारंभ केला. त्यानं आयरिश बंडखोरांशी लागेबांधे असलेल्या नेड ब्रॉयला टिपून खलास केलं, आणि कॉलिन्सच्या गुप्तचर कारवायांना खीळच बसवली. त्याच सुमारास, म्हणजे १९ नोव्हेंबर १९२० या दिवशी तो रक्तरंजित रविवार उजाडला. ‘ब्लडी संडे’ म्हणून आज तो ओळखला जातो.

मायकेल कॉलिन्सच्या निवडक बंदुकबाज साथीदारांनी डब्लिनमध्ये त्या रविवारी अक्षरश: धिंगाणा घातला. ब्रिटिश एजंटांच्या घरात घुसून एकेकाला टिपून काढलं. ब्रिटिश अधिकारी विलक्षण घाबरून गेले. अर्थात याचा सूड ताबडतोब उगवला गेला. डब्लिनमधल्या क्रोक स्टेडिअममध्ये फुटबॉलचा सामना रंगला होता. ब्रिटिश सैनिक आणि त्यांना साथ देणाऱ्या अन्य बंदुकबाजांनी भर स्टेडिअममध्ये शिरून पब्लिकवर अनिर्बंध गोळीबार केला. बघता बघता डब्लिनला रणांगणाचं स्वरूप आलं.

‘ब्लडी संडे’मुळे दोन गोष्टी घडल्या. आयरिश रिपब्लिकन आर्मीचं नाव जगभर बदनाम झालं, आणि आयरिश स्वातंत्रलढ्यातील सेनानींमध्ये दुफळीची बीजं पडली.

***

काय हालचाली झाल्या कुणास ठाऊक, लंडनमधल्या ब्रिटिश सत्ताधीशांनी अचानक नमतं घेऊन बोलणी करण्याची भाषा सुरू केली. डी व्हॅलेरानं बोलणी करण्यासाठी मायकेल कॉलिन्सलाच पाठवलं. कॉलिन्सनं बोलणी केली, आणि आंग्ल-आयरिश करार अस्तित्वात आला. करारावर सह्या करूनच कॉलिन्स परतला. पण काय होतं या करारात?- ब्रिटिश राजघराण्याशी एकनिष्ठ राहण्याची अट होती, आणि स्वातंत्र्यही टप्प्या-टप्प्यानंच मिळणार होतं. त्यातही उत्तर आयर्लंडचा समावेश नव्हताच. 

शेवटी फाळणी पदरात पडली!

सगळ्यांना एकत्र बसवून कॉलिन्सनं स्वच्छ शब्दात आपली भूमिका सांगून टाकली : हे बघा मित्रांनो, मला हे सगळं आता संपवायचंय. स्वातंत्र्य हवंय ना? हेच आहे ते स्वातंत्र्य. ते नाकारलं तर काय मिळेल? युद्ध. युद्ध हा स्वातंत्र्याला पर्याय असू शकतो का? माझ्या तोंडाला काळं फासा, फितूर म्हणा, गद्दार म्हणा, शेपूटघाल्या म्हणा, काहीही म्हणा. पण आता रक्त सांडायला नको. सातशे वर्षांचा भूतकाळ-जो आपला नव्हताच- तो गाडून, भविष्याकडे बघू या. निदान ते भविष्य तरी आपलं असेल!..’’

डी व्हॅलेराच्या अनुपस्थितीत मायकेल कॉलिन्सनं स्वतंत्र आयर्लंडचा ध्वज फडकवला. ध्वजारोहणाला कॉलिन्स उशिरा आला.

‘‘तुम्ही सात मिनिटं उशीर केलात, मि. कॉलिन्स!,’’ ब्रिटिश अधिकाऱ्यानं घड्याळात पाहात सुनावलं.

‘‘तुम्ही सातशे वर्षं उशीर केलात, आम्ही सात मिनिटं! बिघडलं कुठं?’’ तिथल्या तिथे कॉलिन्सनं त्याला सुनावलं. ब्रिटिश युनियन जॅक उतरला. नवा ध्वज चढला.

***

कॉलिन्सला स्वातंत्र्याचा खूप मोठा मोबदला द्यावा लागला. त्याचे जन्मोजन्मीचे म्हणावेत असे जोडीदार दुरावले. ज्यांच्या खांद्याला खांदा भिडवून गोळ्या झाडल्या, तेच बंदूक ताणून उभे राहिले. मुख्य म्हणजे जिवाभावाचा साथीदार हॅरी बोलँड दुरावला. त्याची प्रियतमाही कॉलिन्सनं पळवल्यानं त्याचा विखार दुहेरी होता. डी व्हॅलेरानं तर बोलणंच टाकलं…

त्यानंतर काही महिन्यांनी क्रूक कौंटीमध्ये मायकेल कॉलिन्सचा ताफा करारविरोधी बंडखोरांनी अडवला. त्याच्या डोक्यात गोळी घालण्यात आली. या खुनानंतर साधं पोस्टमॉर्टेम झालं नाही की चौकशी झाली नाही. कुणीही फासावर वगैरे गेलं नाही.

पुढे अनेक वर्षांनी डी व्हॅलेरानं जाहीर केलं की, ‘‘मायकेल कॉलिन्सचं स्वातंत्र्यलढ्यातलं योगदान बहुमोल आहे. ते मी माझे पैसे खर्च करून जगाला ओरडून सांगणार आहे...’’ तसं काही घडलं नाही. व्हॅलेरानं कॉलिन्सला मारण्याचा आदेश दिला होता, असं आजही काही लोक म्हणतात.

संबंधित बातम्या