बिकट वाट वहिवाट...

प्रवीण टोकेकर
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022

... मौसम है क्लासिकाना 2.0

कधी कधी वाटतं, अज्ञाताच्या हातातला हा लगाम, नियतीनं पाठीवर चढवलेलं खोगीर उधळून द्यावं बेलाशक, आणि वारा नेईल तिथं पळत सुटावं. मोकळा श्वास घ्यावा, अन्नाची भ्रांत नको, वस्त्रांचा अडसर नको, संस्कारांचा गुंताडा नको, काही नको. माळरानावर हुंदडणाऱ्या अवखळ  गोऱ्ह्याप्रमाणे उड्या मारत सुटावं. 

मन मोठं खेळगडी असतं. कधी कुठला हट्ट धरेल, सांगता येत नाही. कितीही वढाय वढाय झालं तरी शेवटी तारतम्य नावाची गोष्ट लगाम खेचत असतेच. म्हणून तर आपण तग धरून राहातो. बहुतेकदा तो लगाम मनाचा वारू रोखून धरतो. पण दरवेळी असले निर्बंध नाही कामी येत. एखाद-दुसरा क्षण असा येतो की…त्याला ‘पतन’ म्हणायचं की ‘उन्नयन’ हे ज्याचं त्यानं ठरवावं. ज्याचं त्यानं ठरवणं हेही तसं बरोबर नाही. आपल्या आसपासच्या समाजात जी मूल्यव्यवस्था असते, ती ठरवते पतन-उन्नयनाचे नियम. 

कधी कधी वाटतं, अज्ञाताच्या हातातला हा लगाम, नियतीनं पाठीवर चढवलेलं खोगीर उधळून द्यावं बेलाशक, आणि वारा नेईल तिथं पळत सुटावं. मोकळा श्वास घ्यावा, अन्नाची भ्रांत नको, वस्त्रांचा अडसर नको, संस्कारांचा गुंताडा नको, काही नको. माळरानावर हुंदडणाऱ्या अवखळ  गोऱ्ह्याप्रमाणे उड्या मारत सुटावं. 

असल्या ऊर्मी बंड करून उठल्या की तारतम्य नावाची ती गोष्ट करकचून लगाम खेचते. मन कळवळतं. पुन्हा तबेल्यातल्या खुंटाशी जाऊन उभं राहतं. आपलं प्राक्तन हेच- हा गोठा. मालक टाकेल तो चंदीचारा, हीच आपली कमाई.

तबेल्यातलं वारू ठाणबंद करता येतं. पण त्याचं मन? त्याला कुठला लगाम? 
रीतीभातींच्या पल्याडचा तो प्रदेश मनातल्या मनात हिंडून यायला कुणाची हरकत आहे? तो प्रदेश बघण्याची ऊर्मी प्रत्येकात असतेच. ती फक्त दबलेली असते इतकंच. मोकळा वेळ मिळाला की मन अनिर्बंध सुटतं. इच्छा-आकांक्षांना निळे पंख फुटतात, आणि नीती-अनीती, भलं-बुरं, खरं-खोटं ही नेहमीची द्वंद्व मागे टाकत मन झेप घेतं.

भ्रम आणि वास्तवाच्या मधला हा गूढ प्रदेश असतो. मनाची गाडी तिथं भरधाव सोडायची. मग ते भ्रम-विभ्रम खरे वाटायला लागतात, आणि बोचरं वास्तव नाकारण्याची सोय निर्माण होते.  कमी अधिक प्रमाणात ही आपल्या सगळ्यांचीच अवस्था, आणि सगळ्यांचीच गोष्ट असते.

हे सगळंच नाही म्हटलं तरी बोजड आहे. एखाद्या साध्याशा गोष्टीतून सांगितलं तर कदाचित थोडी सुसह्य होईल. मिसिसिपीतल्या ब्लांशे डुबॉय नावाच्या एका तरुणीचं असंच झालं. तिच्या गोष्टीचं नाव होतं, ‘द स्ट्रीट कार नेम्ड डिझायर’. 

तिची गोष्ट बघता बघता एवढी मोठी झाली की संसर्गजन्य रोगासारखी जगभर पसरली.

ब्लांशे डुबॉय ही तरुणीच मुळात स्वप्न-वास्तवाच्या सरहद्दीवरची होती. ना धड खरी, ना धड खोटी. ना धड सरळसीधी,  

ना धड चालू. ना धड इथली, ना धड तिथली.

***

बहात्तर वर्षांपूर्वी ‘द स्ट्रीटकार नेम्ड डिझायर’ नावाचं एक नाटक इंग्रजी रंगभूमीवर आलं होतं. लेखक होते टेनेसी विल्यम्स. भवतालच्या भयाकारी वास्तवातलं नाट्य त्यांना अस्वस्थ करत होतं. काय होतं तेव्हाचं भवताल? 

दुसरं महायुद्ध संपलं होतं. दोन्ही महायुद्धांमध्ये होरपळलेलं जग अजूनही आपल्या जखमा कुरवाळत होतं. शरीराच्या जखमा भरून येतात. मनं भाजली, होरपळली की दुखणं चिघळतच जातं. 

बाईनं सोशिक असावं, बापई माणसांच्या जगात जपून वागावं. घरंदाज बाईनं तर आब राखून राहिलं पाहिजे. भलभलती स्वप्नं पाहूदेखील नयेत. बाप्या सांगेल, तसं जगावं. मग ती माता, भगिनी, दुहिता, कन्या, देवी, देवता, प्रिया…सर्व काही!! बाई गं, बाप्याच्या खांद्यावर डोकं ठेवून जग, तो सांगेल तेव्हा शेतात ये किंवा शेजेवर ये. भलते उद्योग केलेस तर झटक्यात चवचाल ठरशील…

या मूल्यव्यवस्थेवरचा राग हळू हळू डोकं वर काढत होता. इथं आपल्या भारतात नव्हे, तिथं युरोप-अमेरिकेत. भारतात ते लोण येईपर्यंत साठीचं दशक उलटत  होतं. सत्तरीच्या दशकात आपल्याकडे विजय तेंडुलकर, मोहन राकेश आदी नाट्यलेखकांनी ती बंडखोरी भारतीय रंगभूमीवर आणली. 

तो काळ सर्वंकष अनादराचा आणि प्रस्थापितांविरुद्ध बंड पुकारणारा होता. टेनेसी विल्यम्सच्या या नाटकानं तमाम रसिक प्रेक्षक चमकला. बाईचं मन हा विषय असा मांडायचा असतो? भलतंच काहीतरी. हे असलं काही त्यांनी रंगभूमीवर घडताना पाहिलंच नव्हतं. असं कुठं नाटक असतं व्हय? 

बॅले आणि ऑपेराला सरावलेल्या प्रेक्षकांना रंगमंचावर वास्तवाचं असं काही रूप दिसलं की रंगभूमीवर नटनट्या आहेत की खुद्द आपणच आहोत, हे प्रेक्षकांना कळेनासं झालं. ही गोष्ट माझीच आहे की काय? या कल्पनेनं स्त्रीवर्ग चमकला. नाटकातले प्रसंग ऐकून टरकलेला पुरुषवर्ग या नाटकाची तिकिटं काढून बायकोला न्यायला कां-कूं करू लागला. एवढं करकरीत वास्तव रंगभूमीवर मांडायचं तर नाटकं करायचीच कशाला? असा विसंवादी सूरही उमटायला लागला. पण नाटक कुठंतरी जाऊन भिडलं होतं हे नक्की. नुसतं भिडलं नव्हतं. कचकन टोचलं होतं.

एलिया कझान या विख्यात दिग्दर्शकानं या नाटकाची संहिता हातात घेतली आणि त्यांना त्याच्यात एक चित्रपट दिसू लागला. किंबहुना हे नाटक ब्रॉडवेवर सर लॉरेन्स ऑलिव्हिए यांनी बसवलं होतं. ते गाजलं होतं. एलिया कझान या नाटकाच्या प्रचंड प्रेमात पडले. इतके की नाटकातला (एक सोडून) सर्वच्या सर्व नटसंच त्यांनी चित्रपटात घेतला. नाटकाला रंगमंचाची मर्यादा असते. एलिया कझान यांना त्या मर्यादेतसुद्धा काहीएक अर्थ जाणवला. चित्रपटही त्यांनी नाटकासारखाच चित्रित केला. मर्यादित नेपथ्यानिशी. अगदीच नावापुरतं बाह्य चित्रीकरण केलं. त्यातून एक कोंडीफोडू चित्रपट निर्माण झाला. त्याच नावाचा- ‘द स्ट्रीटकार नेम्ड डिझायर’.

या चित्रपटापासून आधुनिक चित्रपटांचं एक घराणं खुलं झालं. करकरीत वास्तवाचं चित्रण कुठलाही आव न आणता पडद्यावर करता येतं, याची जाणीव करून देणारा हा चित्रपट. चित्रपटात फक्त चित्रपटीय घटकच  असले पाहिजेत, हा आग्रह सुटला. किंबहुना मनाचे आचरट व्यापार, ओढी, वासनांची विकारविलसितं हेदेखील चित्रपटीय घटकच  आहेत, हे बिंबवलं गेलं.

एवढं काय होतं त्या चित्रपटात?

***

ब्लांशे डुबॉय ही मिसिसिपीची एक युवती. विवाहित, वारसा हक्कानं चांगली प्रॉपर्टी हाताशी आलेली. हिरव्यागार इस्टेटीत, जंगी घरात राहणारी, उच्चभ्रू वर्तुळात हॅट घालून मिरवणारी, सोसायटी वूमन होती ती. गावातल्या सुसंस्कृत शाळेत छान नोकरी होती. सभ्य नवरा होता. भरलेलं घर होतं. पण नशिबानं थट्टा मांडली जणू तिच्याशी.

नवऱ्यानं आत्महत्या केली. इस्टेटीचा बोजवारा उडाला. कर्जात बुडून होत्याचं नव्हतं झालं. नोकरीचा थारा डळमळला. शेवटी बॅग उचलून ती न्यूऑर्लिन्स शहरात आपल्या धाकट्या बहिणीकडे राहायला निघून आली. 

ज्या स्ट्रीटकारनं तिला बहिणीच्या दारात सोडलं, तीच ती ‘डिझायर’ नावाची सर्विस मोटार…

ब्लांशेच्या धाकट्या बहिणीचं नाव स्टेला. सामान्य संसारी बाई. तिचा तुटपुंजा. दोन खोल्यांचा. भरपूर पसाऱ्याचा. भरपूर गैरसोयींचा. एक तारखेच्या पगारासाठी जगत, जगवत ठेवलेला. तिचा नवरा स्टॅनली कोवाल्सकी हा साधा, रांगडा कामगार आणि बिनडोक. काहीसा रानटीच. तिच्या त्या तसल्या संसारात ब्लांशेच्या भल्यामोठ्या बॅगेची भर पडली. मोठ्या घरात राहायला सवकलेली ब्लांशे इथं कशी तडजोड करत राहणार? पण तिला राहावं लागलं. नियतीचा खेळच तो. 

‘‘माझं हल्ली मन थाऱ्यावर नसतं गं... म्हणून मी सुट्टी घेऊन आलेय!,’’ असं ब्लांशे म्हणाली खरी, पण ते खरं नाही, हे कळत होतं. स्टॅनली कोवाल्सकीला आपल्या मेव्हणीची ही ‘स्टोरी’ अजिबात पटली नाही. काळ्याला काळं नि गोऱ्याला गोरं म्हणणारा तो गडी. रागलोभ सगळं जे काही असेल ते समोरासमोर. ब्लांशेच्या गोष्टीत त्याला काळंबेरं दिसायला लागलं. पण स्टेलाकडे बघून तो कुरकूरत गप्प बसला. 

ब्लांशे आली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी मिच येऊन दारात उभा राहिला. मिच हा स्टॅनलीचा मित्र होता. खेळकर स्वभावाचा. जग पाहिलेला. मिश्कील, आणि काहीसा फ्लर्ट. त्यानं ब्लांशेचं पाणी ओळखलं. पत्ते खेळता खेळता त्याने नवाच खेळ सुरू केला.

गोडगोड शब्दांची पखरण, स्तुतीसुमनांची उधळण करत त्यानं ब्लांशेच्या गालावर फुलं उमटवली. ब्लांशेनंही त्याला प्रतिसाद दिला. हे वाढतच गेलं. स्टॅनलीचं माथं भिरमिटलंच. 

सदानकदा अंघोळीला पळणाऱ्या ब्लांशेचं वागणं तसंही स्टॅनलीला आवडत नव्हतं. आपली मेहुणी थापाडी आहे, असं त्याला सतत वाटायचं. त्यात एक दिवस त्यानं ब्लांशेला सांगितलं की, स्टेलाला दिवस गेले आहेत…

तिथून ब्लांशेचं गाडं पुरतं गडगडलं.

कालांतरानं लक्षात आलं की ब्लांशेची नोकरी गेलेली आहे. तीही एका तरुण विद्यार्थ्याशी लफडं केल्यामुळे. प्रॉपर्टीही कर्ज भागवता भागवता सावकारी पाशात गमावली आहे. ब्लांशेकडे फुटकी कवडीदेखील नाही. तिच्या नवऱ्यानं आत्महत्या केली, त्याला कारण ब्लांशेचा चवचाल स्वभावच आहे.

मिचच्या कानावर हे सगळं गेलं. त्यानं ब्लांशेला शिव्या घातल्या आणि तोही निघून गेला. डोक्यानं हल्लक झालेली ब्लांशे शेवटी स्टॅनली कोवाल्सकीच्या जनावरी अभिलाषेला बळी पडली. 

डॉक्टरांबरोबर इस्पितळात जाताना ब्लांशे जे बडबडली, ते अखिल जगतातल्या स्त्रीजातीची वेदना मुखर करणारं होतं. अर्धवट शुद्धीत ती म्हणाली : ‘‘आगांतुकाच्या ममत्त्वावरच तर मी कायम अवलंबून राहिले आहे... चला, न्याल तिथं येते!’’ 

एवढं होऊनही स्टेलाला तिचा नवरा, तिचा संसार प्रियच होता. असं का? काहीही होवो, बाईनं दरवेळी पुरुषावरच अवलंबून राहायचं का? तिला, तिच्या म्हणून काही ऊर्मी असाव्यात की असू नयेत? तिच्या इच्छा –आकांक्षांचं मोजमाप करण्याचा अधिकार पुरुषांना कोणी दिला? बाईनंच दिला?

अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांची मालिका मनात तयार होते, आणि त्या गुंताड्यातच ब्लांशेची गोष्ट संपते.

***

सिनेमा बघताना हटकून आठवतात आपल्या विजय तेंडुलकरांची नाटकं. ‘शांतता! कोर्ट चालू आहे…’ मधलं बेणारेबाईचं स्वगत आठवू लागतं. ‘सखाराम बाईण्डर’मधली लक्ष्मी डोकावून जाते. बरंच काही आठवतं.

एलिया कझान हे त्या काळात कलात्मक चित्रपटांच्या क्षेत्रात दबदबा असलेलं व्यक्तिमत्त्व होतं. ‘विवा! झपाटा’, ‘ऑन द वॉटरफ्रंट’ सारखे चित्रपट देणारे कझान हॉलिवुडमध्ये मात्र पुढे बदनाम झाले. 

टेनेसी विल्यम्सच्या नाटकाने अनेकांचं लक्ष तेव्हा वेधून घेतलं होतं. त्या नाटकाला तर पुलित्झर पुरस्कारही जाहीर झाला होता. ग्रेगरी पेक, बर्ट लँकेस्टरसारख्या मोठ मोठ्या नट-नट्यांनी या कथानकात रस दाखवला होता. पण एलिया कझाननं मार्लन ब्रँडो नावाचा तरणाबांड इटालियन वंशाचा अभिनेता स्टॅनलीच्या भूमिकेसाठी निवडला. मूळ नाटकातही तोच होता. विवियन ले नाटकातही ब्लांशेचा रोल करायची, तिला तीच व्यक्तिरेखा देण्यात आली. ‘स्ट्रीटकार नेम्ड डिझायर’ च्या नंतर इतक्या आवृत्त्या निघाल्या की विचारता सोय नाही.  त्याकाळातही बारा ऑस्कर नामांकनं आणि तीन पुरस्कार या चित्रपटानं मिळवले. 

नव्या मूल्यव्यवस्थेतही बाईचं बाईपण हे पुरुषावरच अवलंबून असतं, हे या चित्रपटानं इतक्या एकात्मिकपणाने दाखवून दिलं की सगळं फिल्मी जगत खाडकन वास्तवाच्या पातळीला उतरलं. विटंबना, अवहेलना, अपमान हे झाले बाईच्या जगण्यातले ढोबळ अनुभव. याच्यापेक्षाही भयानक परावलंबित्व बाई जगत असते, आणि तिला त्याची जाणीवही नसते, नि सुटकेची इच्छाही…हेच ‘द स्ट्रीटकार नेम्ड डिझायर’चं सांगणं होतं.

या चित्रपटामुळे इंग्रजी भाषेला अनेक शब्दप्रयोग मिळाले. त्यातल्या संवादांचे मुहावरे झाले. मार्लन ब्रँडोला स्वतःला हीच भूमिका सर्वात आवडली होती. ‘गॉडफादर’सारख्या महाचित्रपटातली प्रमुख भूमिका समर्थपणे साकार करणारा हा अभिनेता शेवटपर्यंत स्वत:चं स्टॅनली कोवाल्सकीशी असलेलं नातं प्रामाणिकपणे सांगत राहिला. विवियन ले हिला पुढे दुभंगलेपणाचा मनोरोग जडला. त्या झटक्यात अनेकदा ती तिचं नाव ‘ब्लांशे’ असल्याचं सांगायची...

हा चित्रपट कुठं सहसा बघायला मिळत नाही आता. खूप जुनाही आहे. पण नवकथेचे रंग कुठून सुरू झाले, त्याचा उगम कुठं होता, याचं मूळ शोधण्याची ‘डिझायर’ असेल तर हा चित्रपट मिळवून बघावाच.

संबंधित बातम्या